Thursday, 7 July 2022

पोएम ... विनीत वर्तक ©

 पोएम ... विनीत वर्तक ©

भारताच्या इसरो म्हणजेच Indian Space Research Organisation.(ISRO) ने अवकाशात एका नवीन पोएम ची सुरवात केली आहे. पोएम चा इंग्रजी अर्थ हा कविता असा होतो. त्यामुळेच एखाद्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेने अवकाशात पोएम लिहण्याचा श्रीगणेशा केला हे वाचून अनेक भारतीय बुचकळ्यात पडू शकतात. ३० जून २०२२ ला इसरो च्या रॉकेट ने अंतराळात उपग्रहांना त्यांच्या योग्य कक्षेत प्रक्षेपित करताच इसरो चे चेअरमन एस. सोमनाथ यांनी यशस्वी प्रक्षेपणानंतरच्या भाषणात एक वाक्य म्हंटल जे खूप अर्थाने महत्वाचं होतं. त्यांचे शब्द होते, 

“write some poems in orbit” ISRO Chairman S Somanath. 

राजकीय विषयांवर एकमेकांच्या झिंज्या ओढणाऱ्या, जातीवरून, धर्मावरून एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या आणि एकमेकांच्या खाजगी आयुष्यात अतिशय रस असणाऱ्या भारतीयांकडून इसरो च्या चेअरमन चे शब्द कानावर पडणार नाहीत हे सर्वश्रुत होतं. अर्थात ते पडले असते तरी एका कानातून जाऊन दुसऱ्या कानातून बाहेर पडून विसरले गेले असते. पण त्यामुळे त्या शब्दांच महत्व कमी होत नाही. अमेरिका, चीन, युरोपियन युनियन देशांच्या तगड्या अवकाश संस्थांना मात देताना आणि जे भारतीय इसरो ने करू नये यासाठी अमेरिकेने सगळ्या साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. तेच भारताच्या इसरो ने ३० जून च्या चाचणीत करून दाखवलेलं आहे. यासाठीच इसरो च्या चेअरमन चे शब्द भारतासाठी आणि भारतीयांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. 

तर पोएम म्हणजे नक्की काय? पोएम चा अर्थ होतो PSLV Orbital Experimental Module  (‘POEM’). पोएम समजावून घ्यायला आपल्याला एकूणच रॉकेट कश्या पद्धतीने काम करते हे थोडक्यात समजावून घ्यावं लागेल. कोणतंही रॉकेट टप्या टप्याने उड्डाण करते. या प्रत्येक टप्यात वेगवेगळी इंजिने, फ्युल आणि इतर तंत्रज्ञानाचा समावेश असतो. ज्याला आपण स्टेज असं म्हणतो. रॉकेट ने उड्डाण केल्यावर आपण अनेकदा रॉकेट स्टेज १, स्टेज २, स्टेज ३ आणि स्टेज ४ मधले टप्पे गाठत असताना ऐकलेलं असेल. तर त्या प्रमाणे भारताचं PSLV (Polar Satellite Launch Vehicle) हे ४ टप्यात उड्डाण करते. याचा अर्थ जमिनीवरून उड्डाण करून एखाद्या उपग्रहाला साधारण ४०० ते ६०० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करायला या रॉकेट मधे ४ स्टेज वापरण्यात येतात. 

आजवर PSLV (Polar Satellite Launch Vehicle) ने उड्डाण केल्यावर त्याच्या पहिल्या तीन स्टेज आपलं काम पूर्ण झाल्यावर मुख्य रॉकेट पासून विलग होऊन समुद्रात कोसळत होत्या. राहिलेली चौथी स्टेज ही अंतराळात कचरा म्हणून जमा व्हायची आणि कालांतराने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट व्हायची. भारताच्या वैज्ञानिकांनी या चौथ्या स्टेज चा वापर आपण करू शकतो का यावर संशोधन सुरु केलं. कारण पृथ्वीपासून लो ऑर्बिट वरून या स्टेज अनेकवेळा पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालून मग नष्ट होत होत्या. मग जर रॉकेट चा भाग म्हणून फुकट अवकाशात प्रक्षेपित झालेली ही स्टेज आपण जर वापरू शकलो तर त्याचे दूरगामी परीणाम आपण साधू शकतो हे भारताच्या म्हणजेच इसरो च्या लक्षात आलं. PSLV हे रॉकेट ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपित करते म्हणजे जे उपग्रह पृथ्वीच्या दक्षिणोत्तर ध्रुवांकडून प्रवास करतात. याच कक्षेत आपण आपले रिमोट सेन्सिंग उपग्रह, हेरगिरी करणारे उपग्रह, जमिनीवर चालणाऱ्या गोष्टीच मॅपिंग करणारे उग्रह याच कक्षेत परिवलन करत असतात. मग जर भारत या आयत्या प्लॅटफॉर्म चा वापर करून घेऊ शकला तर त्याचे आर्थिक आणि सैनिकी परीणाम खूप दूरगामी असणार होते. 

२०१९ मधे प्रक्षेपित करण्यात आलेल्या PSLV C ४४ मिशन मधे पहिल्यांदा या चौथ्या स्टेज चा वापर करून कलामसॅट व्ही २ या विद्यार्थ्यांच्या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यात आलं. याचा अर्थ काय होता तर रॉकेट ने आपलं मिशन फत्ते केल्यावर संपलेल्या आणि अवकाशात अधांतरी फिरत राहणाऱ्या ४ थ्या स्टेज च्या प्लॅटफॉर्म वर इसरो ने हा उपग्रह ठेवलेला होता. लिथियम आयर्न बॅटरी चा वापर करून त्याची कक्षा योग्य ती करत विद्यार्थ्यांचा हा उपग्रह अवकाशात काम करायला लागला. त्यामुळे इसरो ला असे वैज्ञानिक किंवा नमुना म्हणून उपग्रह फुकटात पाठवण्याचा की प्लॅटफॉर्म मिळाला. लक्षात घेतलं पाहिजे एखादा उपग्रह निर्माण करायला सोपं असते. पण त्याला प्रक्षेपित करण्याचा खर्च हा कैक पटीने जास्त असतो. इसरो इकडे थांबली नाही. नुसत्या बॅटरी वर न थांबता जर यात आपण सौर पॅनल बसवले तर या बॅटरी रिचार्ज होत राहतील आणि आपण अधिक काळ या प्लॅटफॉर्म चा वापर करू शकू हे इसरो ला लक्षात आलं. 

अश्या पद्धतीने इसरो ने आपल्या ४ थ्या स्टेज चा वापर करू नये यासाठी अमेरिका दबाव टाकत होती. याच कारण होतं हा प्लॅटफॉर्म दुहेरी तलवार आहे हे त्यांना चांगल माहित होतं. जसे याचे आर्थिक आणि वैज्ञानिक फायदे आहेत त्यापेक्षा अधिक सैनिकी फायदे आहेत. भारत उद्या अश्या पद्धतीने अवकाशात मिसाईल स्थापन करू शकतो आणि वेळ पडल्यास तिकडून डागू शकतो. हे अमेरिकेला रुचणार नव्हतं. भारताने आधीच 'ए सॅट मिसाईल' ची निर्मिती करून आपण लो अर्थ ऑर्बिट मधील उपग्रह नष्ट करू शकत असल्याची जगाला वर्दी दिलेली होतीच. त्यात आता अवकाशातून अवकाशात किंवा अवकाशातून जमिनीवर मिसाईल डागण्याची क्षमता अश्या प्लॅटफॉर्ममुळे भारताला उपलब्ध होणार होती. आपण लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळात अवकाशात युद्धाची बीजे पेरलेली असणार आहेत. अश्या वेळी भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने इसरो ने घेतलेली ही उडी अतिशय महत्वाची होती. 

३० जून २०२२ च्या PSLV उड्डाणात इसरो ने यशस्वी रित्या PSLV Orbital Experimental Module  (‘POEM’) अवकाशात स्थापन केलेलं आहे. ज्यात सौर पॅनल बसवलेले होते. उपग्रहाने आपलं काम फत्ते केल्यावर म्हणजे उपग्रह प्रक्षेपित केल्यावर काम संपलेल्या ४ थ्या स्टेज च्या टाक्यांना जोडलेले सौर पॅनल उघडले गेले. हा प्लॅटफॉर्म Navigation Guidance and Control (NGC) ने जोडला गेलेला होता. याचा अर्थ होतो की या प्लॅटफॉर्म ला आपण पृथ्वीवरून आपल्या हव्या त्या कक्षेत स्टॅबिलाइझ म्हणजेच स्थिर करू शकत होतो. त्याची जागा, कोन, उंची हे सगळं इसरो नियंत्रित करू शकणार होती. तसेच यावर हेलियम गॅस थ्रस्टर बसवलेले आहेत. जे चालवून आपण आपल्याला हवं तिकडे हा प्लॅटफॉर्म नेण्यास सक्षम झालो आहोत. याचा अर्थ जर का आपण यावर एखादं मिसाईल भविष्यात बसवलं तर त्याला आपण आपल्या मर्जीप्रमाणे गरज वाटल्यास शत्रू देशांचे उपग्रह किंवा जमिनीवरील इतर टार्गेट कोणाच्याही लक्षात न येता भेदू शकतो. ३० जून च्या मिशन मधे अजून एक गोष्ट महत्वाची भारताने साध्य केली आहे ती म्हणजे या प्लॅटफॉर्म वर असणारे दोन उपग्रह हे Indian National Space Promotion and Authorization Center (IN-SPACe) च्या माध्यमातून भारतातील खाजगी कंपन्यांकडून बनवलेले होते. दिगंतरा आणि ध्रुव स्पेस या दोन खाजगी कंपन्यांचे उपग्रह या प्लॅटफॉर्म वर प्रक्षेपित करण्यात आलेले आहेत. यातून भारताने एक नव क्षेत्र भारतीयांसाठी खुलं केलेलं आहे. ज्याप्रमाणे स्पेस एक्स सारख्या कंपनीचा अमेरिकेत उदय झाला त्याच धर्तीवर भारतात खाजगी स्पेस इंडस्ट्री उभी करण्याच्या दृष्टीने ही खूप मोठी मजल आहे. 

PSLV च्या पोएम ने एका नव्या क्रांतीची बिज ३० जून २०२२ च्या उड्डाणात रोवली आहेत. ज्याची फळ येत्या काळात आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळेच इसरो चे चेअरमन एस. सोमनाथ यांच वाक्य अनेक अर्थाने महत्वाचं ठरते. इसरो च या यशासाठी अभिनंदन. या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्व अभियंते, वैज्ञानिक, कर्मचारी आणि खाजगी कंपन्या त्यांचे कर्मचारी या सर्वांचे आभार. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!   

फोटो शोध सौजन्य :- गुगल, इसरो  ( PSLV सी ५३ आकाशात उड्डाण घेताना ३० जून २०२२ ) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment