Wednesday 27 July 2022

भारतीय सरस्वती... विनीत वर्तक ©

 भारतीय सरस्वती... विनीत वर्तक ©

विश्वाची रचना अशी अकल्पनीय आहे की अनेकदा विश्वातल्या अनेक गोष्टी आपल्याला निशब्द करतात. विश्व हे एखाद्या कोळ्याने विणलेल्या जाळ्या प्रमाणे आहे. ज्याचे धागे असे एकमेकात गुंतलेले आहेत की अनेकदा त्याची रचना बघून आपण त्यापुढे क्षुद्र ठरतो. आपल्या पृथ्वीपासून सुरवात केली तर आपली पृथ्वी आपल्या सौरमालेचा एक भाग आहे. आपली सौरमाला ज्यात सूर्यापासून त्याच्या भोवती परिवलन करणारे सगळे ग्रह, लघुग्रह आणि इतर गोष्टी येतात. आपली सौरमाला 'मिल्की वे' या आकाशगंगेचा भाग आहे. आपली आकाशगंगा व शेजारच्या काही दिर्घिका मिळून एक छोटा ग्रुप तयार होतो त्याला दिर्घिकांचा समूह असे म्हणतात. आपल्या दिर्घिकांच्या समूहात ५४ दिर्घिका येतात. अश्या इतर दिर्घिकांचे समूह मिळून 'व्हर्गो क्लस्टर' ( समूह) तयार होतो. ज्यात साधारण २००० दिर्घिका आहेत. या व्हर्गो क्लस्टर ची व्याप्ती १० मिलियन प्रकाशवर्ष अंतराइतकी आहे. ( याचा अर्थ एका टोकाकडून निघालेला प्रकाश जेव्हा ३ लाख किलोमीटर प्रती सेकंद  वेगाने प्रवासकरेल तेव्हा त्याला दुसऱ्या टोकावर जायला १० मिलियन म्हणजेच ( १ कोटी ) प्रकाशवर्ष लागतील. 

आता हे वाचून आपल्याला वाटत असेल की किती विश्व किती मोठं आहे. पण ही सुरवात आहे. तर असे अनेक व्हर्गो क्लस्टर मिळून दिर्घिकांचे सुपर क्लस्टर तयार होतात. आपली आकाशगंगा आणि व्हर्गो क्लस्टर हे 'लानियाकीया' या सुपर क्लस्टर चा भाग आहे. याची व्याप्ती ५०० मिलियन (५० कोटी) प्रकाशवर्ष   इतकी आहे. विश्वात लानियाकीया सारखे किती सुपर क्लस्टर आहेत याचा अंदाज सध्या जो आपण बांधला आहे त्यानुसार हा आकडा १० मिलियन ( १ कोटी) इतका प्रचंड आहे. हे सगळं फक्त आपण बघू शकत असलेल्या विश्वातील आहे. या विश्वाच्या जाळ्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की अजून अनेक धागे आपण बघितलेले नाहीत. पण हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे २०१७ मधे भारतीय वैज्ञानिकांनी अशाच एका सुपर सुपर क्लस्टर चा शोध लावलेला आहे. त्याच नाव आहे 'सरस्वती सुपरक्लस्टर'. 

सरस्वती ही हिंदू संस्कृतीत बुद्धीची देवी समजली जाते. त्याच बुद्धीच्या जोरावर भारतीय शास्त्रज्ञांनी एका सुपर क्लस्टर आकाशगंगेचा शोध २०१७ साली लावला आहे. या सुपर क्लस्टर ला सरस्वती हे नाव देण्यात आलं म्हणून ज्यांना खगोलशास्त्रातील काही कळत नाही त्यांनी आंदोलन वगरे सुरु केली. त्यांनी तिकडे पण जाती आणि धर्म आणून सरस्वती हे नाव का? अश्या तऱ्हेची चर्चा सुरु केली. हा विषय बाजूला ठेवून हा शोध किती महत्वाचा आणि भारतीयांसाठी एक अभिमान असण्याची गोष्ट आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुण्यातील आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे ह्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. सरस्वती सुपर क्लस्टर हे मानवाला आत्तापर्यंत ज्ञात असणाऱ्या सगळ्यात मोठ्या सुपर क्लस्टर पैकी एक आहे. सरस्वती सुपर क्लस्टर ची व्याप्ती ६५० मिलियन (६५ कोटी) प्रकाशवर्ष इतकी आहे. हे आपल्यापासून जवळपास ४ बिलियन ( ४०० कोटी) प्रकाशवर्ष अंतरावर आहे. सरस्वती सुपर क्लस्टर मधे जवळपास ४० क्लस्टर आहेत. (आपल्या व्हर्गो क्लस्टर सारखी). या सुपर क्लस्टर च वस्तुमान आपल्या सूर्यापेक्षा २० मिलियन बिलियन पेक्षा जास्त आहे. याचा शोध लागणं वैज्ञानिक दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण विश्व निर्मिती च्या अगदी काही काळात हे सुपर क्लस्टर अस्तित्वात होतं. इतक्या मोठ्या व्याप्तीमधे असं एखाद सुपर क्लस्टर अस्तित्वात असणं खूप दुर्मिळ घटना होती. आपण विश्वाच्या ४०० कोटी वर्षाच्या भूतकाळात डोकावून बघत आहोत. त्यामुळे एकूणच विश्वातील अनेक घटकांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा अश्या एखाद्या सुपर क्लस्टर मधून होण्याची शक्यता खूप आहे. अल्बर्ट आईनस्टाईन ने मांडलेली जनरल रिलेटिव्हिटी ची थिअरी आणि भौतिकशास्त्रातील अनेक नियम हे विश्वाच्या उत्पत्ती आणि एकूणच त्याची जडणघडण, रचना यावर खरे उतरतात का नाही हे सिद्ध करण्यासाठी याचा वापर होतो आहे. त्यातून अजून अनेक रहस्य आपल्याला उघड होत आहेत.  

आपण विश्वाच्या या कोळाच्या जाळ्यातील एक सूक्ष्म धाग्याचा एखादा अणू, रेणू आहोत. सरस्वती सुपर क्लस्टर सारख्या महाकाय गोष्टी सुद्धा त्यामानाने फारतर दोन धाग्याचं मिलन होते ती जागा म्हणता येईल इतका विश्वाचा पसारा मोठा आहे. या विश्वाच्या निर्मिती आणि एकूणच विश्वाबद्दल आपल्याला असलेली माहिती अजूनही खूप तुटपुंजी आहे. विश्वातील या जाळ्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की कदाचित तिकडून निघालेला प्रकाश अजून आपल्या पर्यंत पोहचलेला नाही.  आपण कोण? आपल अस्तित्व काय? अश्या साध्या प्रश्नांची उत्तर आपल्याला अजून मिळाली नाही. त्या उत्तरांच्या शोधात मानव आता उपलब्ध असलेल्या विज्ञानाचा वापर करून आपल्या परीने उत्तर शोधत आहे. मानवाच्या संशोधनात भारतीय संस्था आणि भारतीय वैज्ञानिक पण तितकच मोलाच योगदान देत आहेत याचा आपल्याला नक्कीच अभिमान असला पाहिजे. सरस्वती सुपर क्लस्टर च्या शोधात अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व आयुका, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, पुणे येथील भारतीय शास्त्रज्ञांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढील संशोधनाला शुभेच्छा. भारतीय संशोधक आणि वैज्ञानिकांनी विश्वातील रहस्यांचा उलगडा करण्यात असं अमूल्य योगदान देण्यासाठी एक भारतीय म्हणून आपण त्यांच्या शोधाचा नक्कीच यथोचित सन्मान केला पाहिजे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment