Tuesday 5 July 2022

घातक... विनीत वर्तक ©

 घातक... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी भारताच्या डी.आर.डी.ओ. ने 'घातक' या जेट विमानाची चाचणी घेतली. सोशल मिडिया आणि बातम्यांच्या माध्यमातून याबद्दल अनेक ठिकाणी लिहिलं गेलं. पण सामान्य माणसा पर्यंत मानवरहीत एका जेट विमानाची चाचणी भारताने घेतली इतपत ज्ञान पोहचलं. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. ही चाचणी अनेक अर्थाने वेगळी होती. घातक च्या चाचणीने भारताने भविष्यात येऊ घातलेल्या अनेक तंत्रज्ञानांना आपलसं केलं आहे याची नोंद जगाने घेतली आहे. येत्या काळात संपूर्ण युद्धनीती बदलविण्याची ताकद असलेलं हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळेच भारताने नक्की घातक च्या चाचणीतून काय मिळवलं? या चाचणीचे भविष्यात काय परिणाम होणार? नक्की यातून आपण कोणती तंत्रज्ञान विकसित केलेली आहेत? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 

घातक हे डी.आर.डी.ओ. बनवत असलेलं (UCAV) म्हणजेच  stealthy unmanned combat air vehicle च छोटं स्वरूप आहे. त्याच्या नावात दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातच घातक का महत्वाचं आहे याच उत्तर लपलेलं आहे. एक म्हणजे stealth technology. ( गुप्त तंत्रज्ञान ). आपल्यापैकी प्रत्यकाच्या कानावर stealthy हा शब्द पडला असेल. हे असं तंत्रज्ञान आहे ज्यात अनेक तंत्रज्ञानाचा संगम आहे. ज्यांचा वापर करून एखादी वस्तू हवेत रडार वरून अदृश्य करता येऊ शकते अथवा ती अदृश्य रहाते. जर आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने हवेत प्रवास करणाऱ्या गोष्टीचा व्हिसिबल स्पेक्ट्रम, इन्फ्रारेड रडार सिग्नेचर, रेडिओ फ्रिक्वेन्सी तसेच इलेक्ट्रॉनिक रेडिएशन या सर्व गोष्टी नियंत्रित किंवा त्या बाजूला काढू शकलो. तर अशी वस्तू हवेत प्रवास करत असताना रडार वरून अदृश्य रहाते. यालाच stealth technology. ( गुप्त तंत्रज्ञान ) असं म्हणतात. भारताकडे आजवर असं तंत्रज्ञान नव्हतं. जगात फक्त अमेरिका आणि इस्राईल कडे असं स्टेल्थ तंत्रज्ञान असल्याचं म्हंटल जाते. भारत त्यामुळेच स्टेल्थ तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेली काही दशके काम करत आहे. 

Aeronautical Development Establishment (ADE), Defence Research and Development Organisation (DRDO) आणि भारतीय हवाई दल  यांनी मिळून स्टेल्थ पद्धतीच्या यूकॅव्ह च्या निर्मितीसाठी काम सुरु केलं. आधी ऑरा नावाने २००९ साली या प्रोजेक्ट ची सुरवात झाली होती. पण २०१५ साली तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रोजेक्ट ला प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलं आणि याच नामकरण 'घातक' असं करण्यात आलं. त्यांनी २०१६ मधे या प्रोजेक्टसाठी तब्बल २३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. येणाऱ्या काळात ड्रोन च वाढतं महत्व आणि भारताला स्टेल्थ तंत्रज्ञानाची गरज त्यांनी ओळखली होती. यानंतर भारताच्या या दोन्ही संस्थांनी वायू दलासोबत मिळून गेली ५-७ वर्ष हे तंत्रज्ञान भारतात विकसित केलं. आपण शिकलेल्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी २०२० मधे या तंत्रज्ञानाच छोटं स्वरूप ज्याला Stealth Wing Flying Testbed (SWiFT) असं म्हंटलं गेलं त्यावर काम सुरु करण्यात आलं. याच वजन साधारण १ टन ( साधारण १००० किलोग्रॅम ) इतकं निश्चित करण्यात आलं. २०२१ पर्यंत याची निर्मिती आणि जमिनीवरील सगळ्या चाचण्या यशस्वी केल्यानंतर वेळ होती ती प्रत्यक्ष उड्डाणाची. 

जेव्हा तुम्ही एखादं स्टेल्थ यूकॅव्ह ( stealthy unmanned combat air vehicle) बनवतं असतात तेव्हा तुम्हाला अनेक तंत्रज्ञान एकाच वेळी शिकून त्यांच एकत्रीकरण करावं लागते. तुम्ही एक विमान बनवता जे स्वतःहून उड्डाण करेल, स्वतःहून हवेत मार्गक्रमण करेल, स्वतःहून जमीनीवर उतरेल, ज्याची चाक ते स्वतःहून पोटात घेईल, स्वतःहून ती उतरण्याच्या वेळी पोटातून बाहेर काढेल, उड्डाण भरताना आणि उतरताना हवेतील कोन, जागा, वेग याच सर्व नियंत्रण स्वतः करेल, स्वतःहून कंट्रोल टॉवर शी संपर्क प्रस्थापित करेल. वातावरणातील बदलांशी स्वतः जुळवून घेईल एवढं सगळं करून आपल्या सोबत मिसाईल, बॉम्ब, लेझर गायडेड मिसाईल अशी अत्याधुनिक आयुध घेऊन शत्रूच्या गोटात प्रवेश करून आपलं लक्ष्य साध्य करेल. इतकं सगळं करताना शत्रूच्या रडारवरून अदृश्य राहील. आपण वाचताना दमून जाऊ इतकं किचकट यातील प्रत्येक तंत्रज्ञान आहे. या सर्वांच एकत्रीकरण करून त्याला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देणं हे तितकं कठीण आहे. त्यामुळेच जगातील मोजक्या देशांकडे आजवर असं तंत्रज्ञान आहे. 

१ जुलै २०२२ रोजी डी.आर.डी.ओ. ने घातक च्या छोट्या स्वरूपाची यशस्वी चाचणी घेऊन आपल्या पुढल्या प्रवासाचा मार्ग मोकळा केला आहे. घातक च मॉडेल हे अमेरिकेच्या प्रसिद्ध बी-२ स्टेल्थ बॉम्बर विमानाशी मिळतं जुळतं आहे. ज्याला फ्लाईंग विंग डिझाईन म्हंटल जाते. याच डिझाईन करताना स्टेल्थ हे सगळ्यात टॉप प्रायोरिटी वर ठेवण्यात आलेलं आहे. याच्या इंजिनाची पाती कुठून दिसणार नाही अश्या प्रकारे याची रचना आहे. तसेच यात वापरण्यात आलेलं मटेरियल कंपोझिट आणि यावर दिला गेलेला रंग सुद्धा रडार चे सिग्नल शोषणारा आहे. ज्यामुळे घातक हे रडारवर संपूर्णपणे अदृश्य राहील. १ जुलै ला केलेली चाचणी प्रामुख्याने घातक मधील यंत्रणा आपापसात योग्य ताळमेळ राखून हवाई प्रवास करू शकतात की नाही याची तपासणी करण्यासाठी होती. ज्यात हे स्विफ्ट मॉडेल यशस्वी ठरलं आहे. त्याचसोबत त्याच्या स्टेल्थ तंत्रज्ञानाची ही चाचणी घेतली गेली आहे. अर्थात त्या बद्दल पब्लिक डोमेन मधे काही सांगण्यात येणार नाही. कारण अश्या गोष्टी गुप्त ठेवलेल्या असतात. स्विफ्ट ची यशस्वी चाचणी भारताच्या पाचव्या पिढीतील स्वबळावर निर्माण होत असलेल्या Advanced Medium Combat Aircraft (AMCA) साठी एक मैलाचा दगड ठरली आहे. 

स्विफ्ट च्या यशस्वी चाचणी नंतर पहिलं घातक हे २०२५ पर्यंत चाचणीसाठी तयार असेल. घातक आपल्यासोबत २००० किलोग्रॅम वजनाची मिसाईल, लेझर गायडेड बॉम्ब, प्रिसिजन गायडेड बॉम्ब आणि मिसाईल ( बालाकोट हल्यात वापरली गेलेली स्पाईस सारखी मिसाईल त्याच सोबत राफेल सोबत विकत घेतलेलं हॅमर सारखं मिसाईल ) घेऊन जाऊ शकणार आहे. हवेत तब्बल ३०,००० फूट पर्यंत उंच जाण्याची आणि जवळपास १.२ मॅक ( १५०० किलोमीटर / तास ) वेगाने जाण्याची क्षमता असेल. घातक सुपरसॉनिक वेगाने प्रवास करणारं जगातील पहिलं स्टेल्थ यूकॅव्ह ( stealthy unmanned combat air vehicle) असेल. ३०० किलोमीटर पर्यंत लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे. याची सगळ्यात मोठी उपयुक्तता म्हणजे स्टेल्थ असल्यामुळे रडार यंत्रेणेने सुरक्षित असलेल्या शत्रूच्या एखाद्या बेस ची सुरक्षा यंत्रणा भेदून किंवा तिला सुगावा लागू न देता मिसाईल स्ट्राईक करण्यात सक्षम असेल. ज्यात हा संपूर्ण बेस बेचिराख होऊ शकतो. तसेच घातक हे संपूर्णपणे उपग्रह यंत्रणांशी ही जोडण्यात येईल. ज्यामुळे ज्याच्या मार्गाची सर्व यंत्रणा जमनीवरून नाही तर भारताच्या अवकाशात असलेल्या उपग्रहांवरून नियंत्रित केली जाऊ शकेल. ( अमेरिका अश्या पद्धतीने आपल्या स्टेल्थ यूकॅव्ह च नियंत्रण करण्यात सक्षम आहे. भारत स्वबळावर हे तंत्रज्ञान विकसित करत असल्याचं अनेक रक्षा तज्ञांचे म्हणणे आहे. ) 

घातक हे नावाप्रमाणेच शत्रूसाठी घातक ठरणारं तंत्रज्ञान आहे. स्विफ्ट च्या चाचणीने भारताने या तंत्रज्ञानात मारलेली मजल जगापुढे आलेली आहे. येत्या ३ वर्षात घातक चाचणीसाठी तयार झालेलं असेल तोवर भारताने स्टेल्थ सोबत इतर अनेक तंत्रज्ञानाला स्वबळावर निर्माण करून आत्मनिर्भरतेकडे एक उंच उडी घेतलेली असेल. १ जुलै ला झालेली चाचणी नुसती एखाद्या मानवविरहित जेट विमानाची चाचणी नव्हती. तर बदलणाऱ्या युद्धाच्या पटावर भारताची एक चाल होती. या चालीने भारत जगाच्या तुलनेत कुठे मागे नाही आणि स्वबळावर असं कठीण तंत्रज्ञान निर्माण करण्यात सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे. तूर्तास स्विफ्ट च्या यशस्वी चाचणीसाठी सर्व वैज्ञानिक, अभियंते, कर्मचारी आणि खाजगी कंपन्या यांना माझा कडक सॅल्यूट. राष्ट्र सुरक्षितेत त्यांच योगदान नेहमीच वरच्या स्थानावर राहील. 

या प्रसंगी भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. कारण त्यांनी दूरदृष्टीने घातक च्या निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ दिलं गेलं. ज्याची फळे आज आपण चाखत आहोत. त्यांच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




4 comments:

  1. Sir मी सुद्धा ब्लॉगर आहे...
    Itworkss.in ही post तुमच्या नावा सह अणि लिंक सकट माझ्या blog vr टाकली tr chalel ka?
    Mi Dr. काशिनाथ देवधर, DRDO, यांच्या लेखांची सिरीज चालू केली आहे..
    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त...
    Tyatch tumcha हा लेख add करायची परमिशन मिळाली tr खूप चांगल होईल...

    ReplyDelete
    Replies
    1. Maz नाव प्रा. Varunraj कळसे...
      वरुण राज कळसे
      https://www.itworkss.in/

      Delete
  2. Sir, ur article on My blog by your name and link Please check following link
    https://www.itworkss.in/ghatak-indias-unmanned-combat-aerial-vehicle-in-marathi/

    ReplyDelete