Saturday 30 July 2022

नंबी नारायणन चा 'रॉकेटरी'... विनीत वर्तक ©

 नंबी नारायणन चा 'रॉकेटरी'... विनीत वर्तक ©

१ जुलै २०२२ ला झळकलेल्या रॉकेटरी चित्रपटाने भुतकाळाच्या पानात लुप्त झालेल्या आणि भारताला रॉकेट तंत्रज्ञानात १०-१५ वर्ष मागे नेणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कटाचा एक फ्लॅशबॅग भारतीयांसमोर आणला आहे. चित्रपट कसा आहे? याबद्दल समीक्षक लिहतील. पण या निमित्ताने इसरो आणि भारताला काय नुकसान झालं ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याची नुकसान भरपाई ही लाखात आणि कोटी रुपयात होऊ शकत नाही. इसरो ला आणि भारताला जाणून बुजून अवकाश क्षेत्रात मागे खेचण्यासाठी यशस्वीरीत्या खेळलेली एक चाल होती. चित्रपटात संपूर्ण कथेबद्दल नक्कीच जास्ती सविस्तर सांगितलेलं असेल. मला त्यात जायचं नाही तर तांत्रिक बाबतीत भारताने काय गमावलं हे इकडे मांडायचं आहे. 

उपग्रह प्रक्षेपित करणारं अथवा मानवाला अवकाशात घेऊन जाणारं कोणतंही रॉकेट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर जाई पर्यंत त्याचा संघर्ष असतो. त्यासाठीच सगळ्यात जास्ती शक्ती तिकडेच खर्च होत असते. त्यासाठी त्याला प्रचंड प्रमाणात इंधन जाळून बल निर्माण करायला लागते. हे इंधन रॉकेट मधे साठवून ठेवायला ही तितकीच जागा लागते त्याच सोबत इंधनाचे वजन हे सुद्धा त्या रॉकेटचा भार असतो. याचा अर्थ काय तर जे इंधन कमीत कमी प्रमाणात जास्तीत जास्त बल निर्माण करेल ते सगळ्यात महत्वाचं असते. एक उदाहरण द्यायचं झालं तर भारताचं जी.एस.एल.व्ही. मार्क ३ हे रॉकेट ने चंद्रयान २ ला घेऊन उड्डाण भरताना रॉकेट च वजन जवळपास ६९० टन (६,९०,००० किलोग्रॅम ) वजनाचं होतं. पण त्यावर असणारं चंद्रयान २ हे फक्त ३.८ टन (३८०० किलोग्रॅम ) वजनाचं होतं. याचा अर्थ काय तर जवळपास ८५% ते ९०% वजन हे फक्त इंधनाचं भरते. त्यामुळेच कमीत कमी वजनात जास्तीत जास्त बल उत्पन्न करणारं इंधन आणि त्याच प्रज्वलन करणारं इंजिन गरजेचं असते. 

१९९५ च्या काळात भारताने पी.एस.एल.व्ही. च यशस्वी प्रक्षेपण करून अवकाश क्षेत्रात आपल्या नावाची वर्दी दिली होती. या रॉकेट च्या यशाने अमेरिकासह इतर देशांच्या पोटात दुखायला लागलं. पण या रॉकेट ची क्षमता एखादा भुस्थिर उपग्रह प्रक्षेपित करण्याची नव्हती. भारताला त्यासाठी परकीय देशांकडे अवलंबून राहावं लागत होतं आणि त्यात भारताचं परकीय चलन खर्च होत होतं. भारताला जर आपलं रॉकेट शक्तिशाली बनवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं असं क्रायोजेनिक तंत्रज्ञान स्वबळावर बनवण्याची गरज भासत होती. क्रायोजेनिक म्हणजे काय? तर क्रायोजेनिक चा अर्थ होतो अतिशीत तपमानामधे कोणत्याही वस्तूंचा अभ्यास. एक साधं उदाहरण घेऊ तुमच्या आमच्या घरात जो सिलेंडर वापरला जातो त्यात असतो एल.पी.जी. म्हणजेच ( लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस). हा एक सिलेंडर साधारण एक महिना आपल्याला गॅस पुरवत रहातो. इतक्या छोट्या आकाराच्या सिलेंडर मधे तब्बल एक महिना पुरेल इतका गॅस कसा राहतो तर त्याच उत्तर त्याच्या नावात आहे. पेट्रोलियम गॅसवर दाब दिला की त्याच रूपांतर लिक्विड मधे होते. त्याच आकारमान कमी होते आणि गॅस आकुंचन पावतो आणि द्रवरूपात तो सिलेंडर मधे बसतो. पुन्हा बाहेर येताना प्रसरण पावून गॅस स्वरूपात आपल्याला महिनाभर पुरतो. हे सगळं सांगण्याचं कारण इतकच रॉकेट मधे ही अश्या प्रकारचे सिलेंडर वापरले जातात पण त्यात फरक हा असतो की दाब न देता त्यांच तपमान कमी केलं जाते.    

जेव्हा इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या गॅस चे तपमान हे -१५० डिग्री सेल्सिअस च्या खाली जाते तेव्हा अश्या अतिशीत तपमानात गॅस हे वायू रूपातून द्रव रूपात जातात. अश्या स्थितीत त्यांचा इंधन म्हणून वापर करणाऱ्याला इंजिनाला क्रायोजेनिक इंजिन असं म्हणतात. १९६९ साली नासा चंद्रावर माणूस पाठवू शकली ती याच इंजिनामुळे. क्रायोजेनिक इंजिनाच का? तर क्रायोजेनिक इंजिन आणि इंधन हे प्रत्येक किलोग्रॅम इंधनमागे जास्ती बल निर्माण करते. कोणत्याही सॉलिड अथवा लिक्विड इंधनापेक्षा हे खूप जास्ती असते तसेच त्याची कार्यक्षमता ही खूप जास्ती असते. इंधनाचे वजन जितकं कमी तितकी जास्त जागा तुम्हाला एखादी वस्तू, उपग्रह अथवा इतर गोष्टी अवकाशात पाठवण्यासाठी उपलब्ध. कोणत्याही रॉकेट मधे अनेक स्टेज असतात. जसं जी.एस.एल.व्ही. मधे तीन स्टेज आहेत. याचा अर्थ जी.एस.एल.व्ही. च्या पहिल्या टप्यातील इंजिनाला पुढल्या दोन स्टेज च्या इंधनाचा भार उचलून पृथ्वीच्या कक्षेतून उड्डाण भरायचं असते. जर पुढल्या दोन स्टेज च्या इंधनाचं वजन जास्ती असेल तर रॉकेट च्या पहिल्या स्टेज मधील इंजिनाला सगळी शक्ती त्यांचा भार वाहून नेण्यात खर्च होणार. त्यासाठीच सगळ्यात महत्वाचं आहे ते 'क्रायोजेनिक इंजिन'. 

क्रायोजेनिक स्टेज मधे अतिशीत तपमानात असलेला हायड्रोजन (LH2) व ऑक्सिजन (LOX) स्टोअर करून त्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. हवेतील ऑक्सिजन उणे -१९६ डिग्री सेल्सियस तर हायड्रोजन उणे -२५३ डिग्री सेल्सियस ला द्रवरुपात येतो. जेव्हा तुम्ही ही दोन्ही इंधन रॉकेट उड्डाणाच्या आधी रॉकेट मधे भरता तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते तसेच उड्डाणाच्या वेळी पहिल्या दोन स्टेज संपेपर्यंत हे तपमान अतिशीत ठेवणे अत्यावश्यक असते. एकतर या दोन स्टेज मधील इंधांच्या ज्वलनातून निर्माण होणारी उर्जा त्यात रॉकेट च्या वेगामुळे उत्पन होणारे घर्षण ह्या सर्वांवर मात करून ह्या दोन्ही टाक्यांमधील तपमान अतिशीत ठेवावे लागते. एकाच वेळी दोन वेगळ्या टाक्यांमध्ये वेगवेगळे अतिशीत तापमान टिकवायचे तसेच हि दोन्ही इंधन अत्यंत ज्वालाग्रही असल्याने त्यांना वेगळ ठेवून योग्य तितकच आणि योग्य त्या वेळीच त्याचं मिश्रण करण अत्यंत गरजेच असते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत तसं कवच ह्या दोन्ही टाक्यांना देण. तसेच त्यांच मिश्रण योग्य त्या वेळेत आणि योग्य त्या प्रमाणात प्रज्वलित करून उपग्रहाला योग्य त्या कक्षेत पोचवणे हे अत्यंत किचकट आणि कठीण अभियांत्रिकी तंत्रज्ञान आहे. त्यामुळे खूप कमी देश असं क्रायोजेनिक इंजिन बनवू शकले आहेत.

नंबी नारायणन हे १९९५ साली इसरो च्या याच क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचे प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली इसरो आणि भारत झपाट्याने विकास क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानावर प्रगतीपथावर होता. एका अंदाजानुसार १९९८-२००० सालापर्यंत भारताने स्वबळावर विकास क्रायोजेनिक इंजिन बनवले असते. पण नंबी नारायण आणि या प्रोजेक्ट वर काम करणाऱ्या इतर वैज्ञानिकांना एक मोठ्या बुद्धिबळाच्या चालीने चेकमेट करण्यात आलं. अर्थात याला आपल्याच घरभेदी लोकांनी पैश्याच्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मदत केली. इसरो आणि भारताच क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान तब्बल १०-१५ वर्ष मागे फेकलं गेलं. या १०-१५ वर्षात भारताने अजून जास्ती उंच उडी अवकाशात मारली असती. पण दुर्दैवाने देशद्रोही लोकांनी देशाला सर्वोच्च स्थानावर घेऊन जाणाऱ्या वैज्ञानिकांचा बळी दिला. आज कोर्टाने कितीही लाखो, कोटी रुपये नंबी नारायणन यांना दिले तरी देशाचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही. 

रॉकेटरी हा चित्रपट म्हणून न बघता त्यातून कश्या पद्धतीने आपल्याला मूर्ख बनवले जाते. कश्या पद्धतीने हनी ट्रॅप आणि कायद्याचा आधार घेऊन फसवले जाते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंबी नारायणन हे एकमेव नाहीत. अश्या पद्धतीने खच्चीकरण अनेक भारतीय संशोधकांच आणि वैज्ञानिकांचे आत्तापर्यंत करण्यात आलेलं आहे. भारत अजूनही तंत्रज्ञानात मागे असायला आपली व्यवस्था कारणीभूत आहे. जिचं नेतृत्व करणारे पैश्यासाठी आणि देशाला तोडण्यासाठी वाट्टेल त्या थराला जायला तयार आहेत. असे लोक कायद्याचा आधार घेऊन त्यातून निसटून पण जाण्यात हुशार आहेत. नंबी नारायणन हे हिमनगाचे एक टोक आहे. गेल्या ७० वर्षाच्या इतिहासात अनेकदा राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अनेक पद्धतशीरपणे अनेक चाली खेळल्या गेल्या आहेत. पण त्या यशस्वी न होऊ देण्याचं आणि आपल्या वैज्ञानिक, अभियंते तसेच इतर महत्वाच्या लोकांच्या आपण पाठीशी उभं राहून या घरभेदी लोकांच्या चाली निष्फळ केल्या पाहिजेत. नंबी नारायणन यांनी जे भोगलं ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. ते जेल मधून घरी परत आल्यावर त्यांच्या पत्नी ची प्रतिक्रिया त्यांच्या शब्दात होती, 

“She turned around slowly, raised her head and stayed still, staring into my eyes. She had a strange expression as if she was watching me doing something horrible. Then she let out a shriek that I had never heard — from a human or an animal,”

नंबी नारायणन सारख्या देशाच्या महान वैज्ञानिकाचा अपमान, खच्चीकरण आणि अतिशय वाईट वागणूक दिली गेली. पण त्यांनी न डगमगता सरकारी व्यवस्थे विरुद्व लढा दिला. आज रॉकेटरी सारख्या चित्रपटातून देशापुढे तो आलेला आहे. पण या सगळ्यात देशाने जे गमावलं त्याची मोजदाद इकडे शब्दात होऊ शकत नाही. २०१९ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण सन्मान देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. पण भारताने गमावलेला १५ वर्षाचा काळ मात्र आता पुन्हा परत येऊ शकत नाही. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: