Saturday 9 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ चौथं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ चौथं पान... विनीत वर्तक ©

जन्म मृत्यूचा फेरा कोणाला चुकलेला नाही. आयुष्य जगत असताना अनेकदा आपण हे विसरून जातो, पण नियती कधीतरी खडबडून आपल्याला जागं करते आणि आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची जाणीव करून देते, पण एका सरळ रस्त्याने सुरळीत चालू असलेल्या आयुष्यात जेव्हा अशी अनपेक्षित वळणं येतात तेव्हा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आपलं माणूस अचानक आपल्यातून निघून जाणं हा धक्का पचवणं खूप कठीण असतं, पण अश्या प्रसंगांना धीराने सामोरं जाऊन पुन्हा एकदा स्वतः उभं राहणं आणि आपल्यासोबत उद्योगाचा उत्कर्ष करून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत जाऊन पोहोचणं आणि त्यानंतर या सगळ्या जबाबदाऱ्यांतून स्वतःला मुक्त करत समाजकल्याणाच्या कामासाठी आयुष्य वेचणं, हे करून दाखवलं आहे एका भारतीय उद्योजक स्त्रीने ज्यांचं नाव आहे अर्नवाझ आगा म्हणजेच 'अनु आगा'. 

३ ऑगस्ट १९४२ रोजी पारशी कुटुंबात अनु आगा यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपलं पदवयुत्तर शिक्षण Tata Institute of Social Sciences (TISS) इथून पूर्ण केलं. आपल्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या रोहिंटन आगा यांनी त्यांच्या मनात घर केलं ते कायमचं. १९६५ साली ते दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. राजा-राणीचा सुखाचा संसार चालू झाला. त्यांना मेहेर नावाची एक मुलगी आणि कुरुष नावाचा मुलगा झाला. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या वॅनसॅन इंडिया या कंपनीची सूत्रं त्यांच्या नवऱ्याकडे म्हणजेच रोहिंटन आगा यांच्याकडे आली. १९८० ला रोहिंटन आगा यांनी कंपनीचं नाव बदलून तिचं नाव ठेवलं 'थरमॅक्स'. १९८० साली पुण्यात मुख्यालय असलेल्या कंपनीने वेस्ट मॅनेजमेंट, हिटिंग आणि कुलिंग अश्या क्षेत्रांत भरारी घेतली. एक आदर्श कुटुंब असा प्रवास सुरू असणाऱ्या आयुष्यात अचानक एक वळण आलं. 

१९९५ साली थरमॅक्स कंपनीने आपली नोंदणी मुंबई शेअर बाजारात केली. या काळात अनु आगा थरमॅक्सच्या ह्युमन रिसोर्सच्या अध्यक्षा होत्या. १९९६ साली युरोपातून आपल्या मुलीला प्रसूतीकाळात मदत करून त्या मुंबईत परतत होत्या. त्यांना मुंबई विमानतळावर भेटण्यासाठी रोहिंटन आगा पुण्यातून मुंबईकडे निघाले होते. पण नियतीच्या मनात वेगळं काहीतरी होतं. रस्त्यात असताना आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच वर्षापूर्वी पब्लिक झालेल्या थरमॅक्सचा बाजारभाव भारतीय आर्थिक क्षेत्रांत झालेल्या बदलांमुळे घसरून ४०० रुपयांपासून ३६ रुपयांवर आला होता. त्यात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर कंपनीचं भवितव्य अधांतरी होतं. सरकारच्या नियमांप्रमाणे रिक्त झालेलं पद भरण्यासाठी फक्त ४८ तासांचा अवधी होता. आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या आणि आपल्या नवऱ्याने वाढवलेल्या या वृक्षाची जबाबदारी अचानक अनु आगा यांच्या खांद्यावर आली. एकीकडे जोडीदाराची तुटलेली साथ तर दुसरीकडे आर्थिक चक्रीवादळात सापडलेला उद्योग अश्या चक्रव्यूव्हात अनु आगा यांनी थरमॅक्सची सूत्रं आपल्या हाती घेतली. 

आपल्या जोडीदाराच्या जाण्याच्या धक्क्यातून त्या सावरत नाहीत तोच पुन्हा एकदा नियतीने त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आणलं, ज्याचा कोणीच विचार केला नव्हता. एका अपघातात त्यांचा २५ वर्षांचा मुलगा आणि सासूबाई त्यांच्यापासून काळाने हिरावून नेले. पुन्हा एकदा उभं केलेलं सगळं कोलमडलं. आयुष्यात सगळ्यांत जवळच्या दोन व्यक्ती नियतीने त्यांच्यापासून हिरावून घेतल्या होत्या. 'मीच का?' या प्रश्नाचं उत्तर त्यांना विपश्यनेतून मिळालं. नियती जे समोर घेऊन येते ते स्वीकारण्याचे बळ त्यांना विपश्यनेनं दिलं. यातून सावरत त्यांनी पुन्हा एकदा थरमॅक्सकडे लक्ष केंद्रित केलं. पुण्यातून सुरू झालेल्या थरमॅक्सचा प्रवास त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात नेला. २००४ साली जेव्हा अनु आगा यांनी निवृत्ती घेतली तेव्हा थरमॅक्सची वार्षिक उलाढाल १३०० कोटीच्या पुढे होती आणि अनु आगा पहिल्या ४० श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत पोहोचल्या होत्या. आपल्या मुलीकडे थरमॅक्सची जबाबदारी देऊन त्यांनी समाजकल्याणात आपलं लक्ष वळवलं. 

'Teach for India' आणि 'आकांक्षा' तसेच इतर अनेक समाजसेवी संस्थांच्या माध्यमांतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी लक्ष, वेळ आणि पैसा दान करण्यास सुरूवात केली. २०१२ मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांची नियुक्ती राज्यसभेवर केली. २०१२ ते २०१८ त्या राज्यसभेच्या सदस्य राहिल्या. तसेच National Advisory Council च्याही त्या सदस्य राहिल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २०१० साली पद्मश्री सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. आजही निवृत्त झाल्यावर त्यांनी आपलं समाजससेवेचं व्रत अविरत सुरू ठेवलं आहे. आज थरमॅक्सची उलाढाल ४७०० कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे. 

नियतीच्या त्या एका वळणावर आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जात आपल्या उद्योगाला अटकेपार नेणाऱ्या अनु आगा दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत. भारतीय स्त्री किती कणखर असू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'अनु आगा'. अवेळी आपल्या जोडीदाराची सुटलेली साथ आणि आपल्या तरुण मुलाचा अकाली मृत्यू असे कठीण धक्के पचवत त्यांनी उद्योजक म्हणून जागतिक पातळीवर आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. हे करत असताना समाजाच्या तळागाळातील मुलांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी त्या आजही मदत करत आहेत. त्यांच्या या कार्यास माझा कडक सॅल्यूट आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



2 comments:

  1. लक्षणीय कर्तृत्व. बरेच काही शिकण्या सारखे.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर, खरंच शिकण्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व, स्त्री शक्ती चे मूर्तिमंत रूप. शतशः आभार आमच्या पर्यंत हा लेख पोहोचवल्यबद्दल

    ReplyDelete