#दुर्गाशक्ती_२०२१ तिसरं पान... विनीत वर्तक ©
पार, बोगी, ईगल, एस असे शब्द आजही भारतीयांसाठी नवीन आहेत. हे शब्द कशाशी निगडीत आहेत, इकडून आपली सुरूवात आहे. तर हे शब्द आहेत अतिशय निरस वाटणाऱ्या गोल्फ या खेळातील. स्कॉटलंड इकडे साधारण १५ व्या शतकात हा खेळ खेळायला सुरूवात झाली. हा खेळ पहिल्यापासून श्रीमंत असलेल्या लोकांचा खेळ म्हणून नावारूपाला आला. त्यामुळे भारतासारख्या प्रगतीशील देशात याचा प्रसार तितकासा झाला नाही. १९५५ साली काही गोल्फ खेळणाऱ्या खेळाडूंनी एकत्र येऊन इंडियन गोल्फर युनियनची स्थापना केली. गोल्फचा भारतातील प्रसार तसा जास्त झाला नाही. अर्जुन अटवाल, जीव मिल्खा सिंग आणि अनिर्बन लाहिरी अशी काही मोजकी नावं होती, ज्यांनी भारताचा तिरंगा गोल्फ या खेळात फडकावला. असं असलं तरी क्रिकेटसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या भारतात त्याचा चाहता वर्ग मर्यादित राहिला. मुळात हा खेळ खेळतात कसा? या प्रश्नाचं उत्तर भारतात अजूनही अनेकांना माहीत नाही. अश्या भारतातून कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना एक स्त्री गोल्फ खेळते आणि नुसतं खेळत नाही तर खेळांचं महाकुंभ समजलं जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकवते, ती म्हणजे भारताची अव्वल गोल्फर 'अदिती अशोक'.
२०२१च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जिकडे सगळ्या भारतीयांचं लक्ष इतर खेळांकडे होतं आणि त्यात पदक मिळेल यासाठी अनेक भारतीय त्या स्पर्धांना टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघत होते. पण अचानक या सगळ्यांत गोल्फसारख्या स्पर्धेत भारतीय गोल्फर अदिती अशोकचं नाव पहिल्या तीन स्पर्धकांत दिसायला लागलं आणि कुठेतरी भारतीयांच्या पदकाच्या आशा पल्लवित होऊ लागल्या. लोक 'अदिती अशोक'चा खेळ बघायला तर लागले, पण गोल्फ खेळतात कसं हेही माहीत नसलेला भारतीय प्रेक्षक तिला जे विचारत होता, त्याबाबतीत अदिती अशोक लिहीते,
“A lot of people were trying to figure out what golf was, so that they could understand how I was playing and if I had a chance to win a medal,”
२०२१च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्षुल्लक फरकाने गोल्फर 'अदिती अशोक'चं पदक हुकलं. या स्पर्धेत ती चौथ्या स्थानावर राहिली, पण पावसामुळे उशीर झालेल्या फायनल स्पर्धेचे शेवटचे क्षण अनुभवण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या मोबाईलमधील अलार्म लावला होता आणि मला वाटते यातच तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं असेल. कारण भारतासारख्या पुरुषप्रधान देशात आणि त्यात पुरुषप्रधान असणाऱ्या गोल्फसारख्या खेळात 'अदिती अशोक'ने आपल्या खेळाने स्वतःचं स्थान निर्माण केलं, ही गोष्ट येणाऱ्या काळात भारताच्या खेळ संस्कृतीला कलाटणी देणारी असणार आहे यात शंका नाही.
'अदिती अशोक'चा हा प्रवास सोप्पा नव्हता. वयाच्या ५ व्या वर्षी तिने गोल्फ खेळायला सुरूवात केली, ज्यावेळेस बंगलोरसारख्या शहरात फक्त तीन गोल्फ कोर्स उपलब्ध होते. गोल्फशी तिचं नातं जुळलं ते कायमचं. वयाच्या १२व्या वर्षी तिने एशिया पॅसिफिक स्पर्धेत भाग घेतला. तर वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी तिने व्यावसायिक गोल्फ स्पर्धा जिंकली. Lalla Aicha Tour School जिंकत तिने आपलं लेडीज युरोपियन टूरमधील स्थान पक्कं केलं. २०१६ साली तिने लेडीज युरोपियन टूर जिंकत क्रिकेट खेळणाऱ्या भारतात इतिहास घडवला. गोल्फ खेळात अजिंक्य राहणारी पहिली भारतीय महिला ठरली. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली सगळ्यांत कमी वयाची गोल्फपटू होती. २०१७ साली अदिती अशोकला Ladies Professional Golf Association (LPGA) अश्या जगातील प्रतिष्ठित अश्या गोल्फ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत प्रवेश मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
२०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ४१व्या स्थानावर राहिलेल्या अदिती अशोकने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या नंबरपर्यंत मजल मारली. या ५ वर्षांत अदिती अशोकला कोणीच कोच नव्हता. तिने स्वतःवर स्वतः मेहनत घेऊन आपल्या खेळाचा दर्जा उंचावत नेला. २०१६ मध्ये तिचे वडील तिचे कॅडी राहिले होते तर २०२०च्या टोकियो स्पर्धेत तिच्या आईने ही जबाबदारी पार पाडली. गोल्फ या खेळात खेळाडू सोबत कॅडीची भूमिका अतिशय महत्वाची असते. अदितीच्या मते तिची आईच तिच्यासाठी आदर्श आहे. एकतर लहान वयात तिला आवडलेल्या क्षेत्रात तिने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन तर दिलेच पण त्यापलीकडे कॅडीच्या भूमिकेत राहून ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत अदितीच्या प्रवासात तिचं सारथ्य केलं. गेल्या ५ वर्षांत अदिती अशोकने गोल्फ या खेळात गाठलेल्या उंचीची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेशिवाय व्यावसायिक गोल्फ स्पर्धेतही अदिती अशोकने भारताचा तिरंगा तेजाने फडकवत ठेवला आहे. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी तिने भारतात गोल्फ या खेळात गाठलेली उंची कौतुकास पात्र आहे. यापलीकडे आपल्या खेळाने तिने भारतातील अनेक मुलींना गोल्फसारख्या खेळात करिअर करता येऊ शकते हा नवीन आत्मविश्वास दिला आहे. २१व्या शतकातील भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना 'अदिती अशोक'ने आपल्यात असलेल्या दुर्गाशक्तीचं एक रूप समस्त भारतीयांपुढे ठेवलं आहे. तिच्या या प्रवासाला माझा कडक सॅल्यूट आणि पुढल्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा !
फोटो शोध सौजन्यः- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment