#दुर्गाशक्ती_२०२१ सातवं पान... विनीत वर्तक ©
सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या नर्मदा नदीचं हिंदू धर्मात पौराणिक महत्व खूप आहे. त्यामुळेच नर्मदा परिक्रमा करणं आजही खूप पवित्र मानलं जातं. नर्मदा नदी आई, माईच्या रूपात या परिक्रमेत आपल्याशी संवाद साधते आणि आपल्यातील स्व कुठेतरी या परिक्रमेत गळून पडतो, असा अनेक परिक्रमा केलेल्या लोकांचा अनुभव आहे. याच अनुभवाने प्रेरित होऊन एका सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या गृहिणीने नर्मदा परिक्रमा करण्याचं ठरवलं. नर्मदा नदीची लांबी उगमापासून ते समुद्राला मिळेपर्यंत साधारण १३२७ किलोमीटर आहे. पण नदीवर बांधलेल्या धरणांमुळे तिचं पाणलोट क्षेत्र हे जवळपास १ लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड आहे. त्यामुळेच नर्मदा परिक्रमा ही जवळपास ३५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची आहे. तर हीच परिक्रमा करताना आयुष्यामधील एका वेगळ्या अनुभवाला सामोरं गेलेल्या त्या गृहिणीने या परिसराचा कायापालट आपल्या परीने करण्याचा निश्चय केला आणि तो पूर्णत्वाला नेताना कित्येक मुलांच्या आयुष्यात एक आशेचा किरण आणला. त्या गृहिणी म्हणजेच नर्मदालय संस्था स्थापन करणाऱ्या शिक्षणदूत "भारती ठाकूर".
एका मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटूंबातून आलेल्या भारती ठाकूर यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली. आधीपासून भटकंती आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या त्या, नाशिकच्या संरक्षण खात्यात नोकरी करत होत्या. जंगलाची ओढ त्यांना होतीच, त्यातूनच नर्मदा परिक्रमेबद्दल त्यांच्या मनात कुतूहल होतं. आपल्या त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवताना त्यांनी जवळपास ३५०० किलोमीटरची नर्मदा परिक्रमा ४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या काळात केली. या परिक्रमेत आलेल्या अनुभवांनी आणि त्या परिसरात जाणवलेल्या खऱ्या आयुष्याचं रूप बघून त्या कुठेतरी आत अस्वस्थ झाल्या. आजवर सुखवस्तू आयुष्य जगलेल्या त्यांना नर्मदेच्या परिसरात शिक्षणाबद्दल लोकांमध्ये असलेली अनास्था आणि शिक्षणव्यवस्थेची हलाखीची स्थिती बघून या लोकांसाठी काही करण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी पक्की केली.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा आणि त्यांनी आयुष्यात अंगिकारलेल्या आदर्श तत्त्वांचा प्रभाव भारती ठाकूर यांच्यावर आधीपासून खूप होता. त्यांच्या गुरूंनीसुद्धा त्यांना 'मातृभूमी ही देव असते, तेव्हा तिची सेवा कर' असा सल्ला दिला. तिकडून सुरू झाला एक बदल घडवणारा प्रवास. २००९ साली सरकारी नोकरीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नर्मदा माई ज्या मध्यप्रदेश राज्यामधून जास्ती काळ वाहते, त्याच मध्य प्रदेशातील निमाड प्रांतातील मंडलेश्वर येथे भाड्याने खोली घेऊन मंडलेश्वर ते लेपा असा जाऊन येऊन रोज १६ किमीचा पायी प्रवास करायला लागल्या. लेपा गावातील मुलांना शिकवू लागल्या. मुळातच शिक्षणाबद्दल या भागात खूप अनास्था होती. त्यामुळे आधी शिक्षणाचं महत्व पालकांना समजावून देऊन मग विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू झाली. सुरवातीला अवघ्या ६ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता १७०० पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. एकेकाळी ५० मधून २ विद्यार्थी शालेय परीक्षेत पास होत असत, पण आज या भागातील निकाल १००% लागतो. या भागातील मुलांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे शिक्षणासोबत मुलांना रुचि वाटावी म्हणून सकस माध्यान्ह भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. २०१० मध्ये आपल्याच समविचारी लोकांना सोबत घेऊन त्यांनी Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A.) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.
'नर्मदा' या संस्थेच्या माध्यमातून भारती ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागात खरे विद्यार्थी घडवायला सुरूवात केली. अभ्यासासोबत खेळ, पर्यावरण, संगीत ते अगदी गोशाळेचे धडे ही मुलं गिरवायला लागली. पुस्तकी कारकून बनवण्यापेक्षा संपूर्ण विद्यार्थी घडवण्याचं कार्य आजतागायत भारती ठाकूर आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. संस्थेमधील फर्निचरपासून सी.सी.टी.व्ही. सिस्टीम, ते ८० देशातील प्रतिनिधींसमोर सादर केलेला सोलार ड्रायरसारखा शोधप्रबंध तसेच संस्थेतील मुलांनी बनवलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू आणि कपडे यांची विविध ठिकाणी प्रदर्शने भरवून विद्यार्थाना आणि संस्थेला स्वयंपूर्ण पद्धतीने कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय त्या चालवत आहेत. भारती ताईंनी त्यांच्या पायी परिक्रमेतील अनुभवांवर आधारित "नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा" या नावाचे खूप छान पुस्तकही लिहीले आहे.
नर्मदा माईच्या कृपेने सुरू झालेला 'नर्मदालाय' या संस्थेचा प्रवास अनेक निराधार मुलांचा जीवनाचा आधार आज बनला आहे. आपलं सुखवस्तू आयुष्य बाजूला ठेवत नर्मदा माईच्या शिकवणीला आत्मसात करून समाजाच्या सुख सोयींपासून कोसो लांब असणाऱ्या वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणलं आहे. असं करताना एका नवीन पिढीच्या जडणघडणीची जबाबदारी शिक्षकदूत म्हणून स्वीकारत समाजात आणि समाजाच्या मानसिकतेत बदल घडवणाऱ्या दुर्गाशक्ती भारती ठाकूर यांच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढल्या प्रवासाला खूप शुभेच्छा!
फोटो शोध सौजन्यः- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment