#दुर्गाशक्ती_२०२१ पहिलं पान... विनीत वर्तक ©
२०१९ च्या वर्षातला शेवटचा महिना सुरू होता. संपूर्ण जगात लोक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या तयारीत व्यस्त होते. त्याचवेळेस जगाच्या एका कोपऱ्यात संपूर्ण जगाचं स्वरूप बदलवून टाकणाऱ्या एका विषाणूने आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात केली. हुबाई या चीनमधल्या प्रांतातील वुहान या शहराच्या एका मच्छीबाजारात एका वेगळ्या विषाणूने आपलं खातं उघडलं. साम्यवादी असणाऱ्या चीनने याचं अस्तित्व लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण या विषाणूने हळुहळू आपला प्रसार वाढवायला सुरूवात केली. २०२० हे वर्षं उजाडलं ते नवीन स्वप्नांसोबत जगाचं भविष्य बदलवणाऱ्या या खतरनाक विषाणूच्या जागतिक वर्दीने. बघता बघता या विषाणूने जगाच्या २१५ पेक्षा जास्त देशांत जवळपास २३ कोटी लोकांना गेल्या दोन वर्षांत लक्ष्य केलं असून हा लेख लिहेपर्यंत जवळपास ४८ लाख लोकांना आपले प्राण या विषाणूमुळे गमवावे लागले आहेत.
COVID-19 असं या विषाणूचं नामकरण करण्यात आलं. यातील 'CO' म्हणजे 'कोरोना' तर VI म्हणजे व्हायरस (विषाणू) आणि D म्हणजे डिसीज (आजार) आणि १९ म्हणजे २०१९ साली त्याचं अस्तित्व दिसून आलं. तर या कोरोनाने भारतीयांनाही आपल्या कवेत घेतलं. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात याचा प्रसार वेगाने झाला. भारतात वैद्यकीय सेवांवर याआधी दुर्लक्ष झालेलं होतं आणि ज्या काही होत्या त्या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीला पुरं पडण्यास संपूर्णपणे अपयशी ठरत होत्या. सप्टेंबर २०२० येईपर्यंत भारतात जवळपास ९० हजार ते १ लाख लोक दररोज कोरोना विषाणूच्या जाळ्यात सापडत होते. वैद्यकीय सेवांवर अतिप्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभर लसीसंदर्भात संशोधन सुरू झालं. नेहमीप्रमाणे जगातील प्रगत देश ही लस शोधणार आणि भारताला नेहमीप्रमाणे प्रगत देशांकडून ती विकत घ्यावी लागणार आणि तोवर किती भारतीय लोकांचे बळी हा विषाणू घेणार असा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात होता.
८ डिसेंबर २०२० रोजी इंग्लंडमध्ये कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. भारताला पुन्हा एकदा प्रगत देशांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागणार असंच वाटू लागलं होतं, पण हे चित्र बदलून 'ये नया आत्मनिर्भर भारत है' असं चित्र उभं करण्यासाठी भारतातील डॉक्टर, संशोधक आणि लस बनवणाऱ्या कंपन्या या सगळ्या रात्रंदिवस कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीच्या संशोधनावर काम करत होत्या. एप्रिल २०२० मध्येच 'भारत बायोटेक' या हैद्राबाद स्थित कंपनीने आपण कोरोना लसीवर काम करणार असल्याचं जाहीर केलं. मे २०२० मध्ये Indian Council of Medical Research's (ICMR's) National Institute of Virology ने आपण लसीवर काम करण्यासाठी कोरोनाचे स्टेन देण्याचं मान्य केलं. मग सुरूवात झाली एका कठीण अश्या कामगिरीला, ज्यात जगाची आणि भारताची प्रतिमा बदलविण्याची ताकद होती. अश्या कामगिरीची सूत्रं देण्यात आली 'डॉक्टर सुमती के' यांच्या हाती. तब्बल ६ महिने वेगवेगळ्या चाचण्यांतून पार पडल्यानंतर भारताने ३ जानेवारी २०२१ ला 'कोव्हीशील्ड'सोबत भारताने भारतात निर्माण केलेल्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन'ला मान्यता दिली.
भारत स्वबळावर जगाच्या तोडीस तोड लस बनवू शकतो हा विश्वास भारताला या लसीच्या यशस्वी निर्मितीमुळे आला. १६ जानेवारी २०२१ पासून भारताने 'कोव्हॅक्सिन' लस भारतीयांना द्यायला सुरूवात केली. आज भारतातील ९० कोटींपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालेलं आहे. यात सिंहाचा वाटा भारत बायोटेकने निर्माण केलेल्या 'कोव्हॅक्सिन'चा राहिलेला आहे. भारताच्या पंतप्रधानांनी ही लस घेऊन तिच्या क्षमतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं आहे. 'डॉक्टर सुमती के' यांनी जे. एन. यु. दिल्लीमधून लाईफ सायन्स या विषयात डॉक्टरेट मिळवली. भारत बायोटेकमध्ये काम करत असताना त्यांनी चिकनगुनिया आणि झिका विषाणूपासून जीव वाचवणारी लस तयार करण्यात भरीव योगदान दिलेलं आहे. त्यामुळेच भारताचं भवितव्य बदलवणाऱ्या क्रांतिकारी लसीच्या निर्मितीची जबाबदारी 'डॉक्टर सुमती के' यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करताना त्यांनी कोरोना लसीमध्ये भारताला स्वयंपूर्ण करताना करोडो लोकांचे प्राण वाचवले आहेत.
गेली अनेक दशकं चूल आणि मूल यांत रमलेली भारतीय स्त्री आजच्या नव्या भारतात भारतीयांना कोरोनासारख्या महामारीमधून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. नवरात्रात आदिशक्ती म्हणून पूजली जाणारी दुर्गा, तिचं या आत्मनिर्भर नव्या भारताचं प्रतीक म्हणजे 'डॉक्टर सुमती के'. कोरोनाच्या महामारीत भारताला स्वयंपूर्ण करत करोडो भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या दुर्गाशक्तीच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्यः- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment