Sunday 24 October 2021

रामनामी... विनीत वर्तक ©

रामनामी... विनीत वर्तक ©

राम हा शब्द जितका आस्थेचा विषय आहे तितकाच तो भारतातील असंख्य लोकांच्या आयुष्याशी कळत नकळत निगडित आहे. राममंदिर आणि बाबरी मशीद यावरून कित्येक वर्ष राजकारण खेळलं गेलं आणि सरतेशेवटी ५ ऑगस्ट २०२० ला राममंदिराच भूमिपूजन झालं. भारतातील आणि जगातील हिंदूंच्या आस्थेशी निगडित असलेली  एक महत्वाची गोष्ट इतिहासाच्या पानात कोरली गेली. असं असलं तरी आस्था हा शब्द किती सापेक्ष आहे हे दाखवणार एक उदाहरण भारतात आहे. भारतात गेल्या १०० वर्षाहून अधिक काळ एका जातीतील कित्येक पिढ्या राम नामाचा जप करत आपली आस्था मंदिरा पलीकडे जपत आलेल्या  आहेत. 

प्रख्यात गायक सुधीर फडके यांनी गायलेलं एक गाणं जे याच आस्थेला शब्दातून दाखवते, 

देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी

देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे

देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी

देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे

देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे

तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही

देव स्वये जगन्‍नाथ, देव अगाध अनंत

देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण

काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही      

अक्षरशः या गाण्यातील शब्द न शब्द जगणारी एक जमात छत्तीसगड मधे आजही रामाचा जप करत आपली संस्कृती जपते आहे. रामनामाचा (टॅटू) आपल्या संपूर्ण शरीरावर गोंदवून हि जमात आपल्या रामाच्या भक्तीच प्रतीक गेली १०० वर्षापेक्षा जास्त काळ दाखवते आहे. रामाचं नाव आपल्या शरीरावर गोंदवण हा त्यांच्या श्रद्धेपेक्षा भारतीय समाजात ज्या पद्धतीने खालच्या जातीतील लोकांना कश्या प्रकारे मुख्य प्रवाहापासून डावललं गेलं त्याचा निषेध करण्याच एक प्रतिकात्मक स्वरूप होतं. 

१०० वर्षापूर्वी जेव्हा रामनामी समाजातील लोकांना उच्च वर्णीय लोकांकडून मंदिर प्रवेश आणि मूर्तिपूजेपासून समाजाने डावललं त्यावेळेला रामाप्रती असलेल्या आपल्या श्रद्धेला त्यांनी टॅटू च्या रूपात स्थान दिलं. रामनाम आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर गोंदवून घेत त्यांनी उच्च वर्णीय लोकांना आपल्या भक्तीच एक रूप दाखवलं. हा प्रतिकात्मक वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला गेला. भारत स्वातंत्र्य झाल्यावर जाती वरून कोणाला समाजात स्थान देण्याची व्यवस्था संपुष्टात आली. पण रामनामाचा टॅटू (गोंदवण) मात्र परंपरेने पुढल्या पिढीकडे हस्तांतरित केला गेला. 

राम हे पवित्र शब्द आपल्या अंगावर गोंदवून घेताना काही जबाबदाऱ्या ही ओघाने या समाजाने आपल्यावर लादून घेतल्या. रामनामाचा जप दिवसातून एकदातरी करणं हे समाजातील प्रत्येकाला आजही अनिवार्य आहे. त्याच सोबत सिगारेट, दारू, तंबाखू अश्या व्यसनांपासून ही हा समाज संपूर्णपणे लांब आहे. आजची नवीन पिढी काळाच्या ओघात संपूर्ण शरीरावर रामनाम गोंदवून घेत नसली तरी जन्म झाल्यावर शरीराच्या एका भागावर रामनाम गोंदवण आजही समाजातील सगळ्यांना बंधनकारक आहे. त्यांच्या घराच्या भिंतीवर सुद्धा रामाच नाव हे कोरलेलं असते. समजातील प्रत्येक माणूस हा समान आहे हा संदेश हा समाज आपल्या वागण्या बोलण्यातून आणि आपल्या रामनामातून संदेश जगाला देत आला आहे आणि देत राहील असा विश्वास या समाजातील लोकांना आहे. 

२१ व्या शतकात सुद्धा सोशल मिडिया सारख्या आधुनिक प्लॅटफॉर्मवर आजही आडनाव बघून संबंध प्रस्थापित केले जातात. सोशल स्टेटस बघून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा दर्जा ठरवला जातो. आजही काही कळप संस्कृती रक्षणाचा झेंडा घेऊन सोशल मिडीयावर पद्धतशीरपणे झुंडशाही करत असताना आपण बघू शकतो. समाजाच्या उत्कर्षामधील काही क्षेत्रे अमुक एक जातीचा अभेद्य किल्ला असल्याचा माज आणि गर्व ठेवला जातो. तिकडे रामनामी सारख्या खालच्या जातीतून समाजाला समानतेची शिकवण देणाऱ्या रामाची श्रद्धा करणारे रामनामी लोकं मला जास्त प्रगल्भ असल्याचं जाणवतं. देव हा मूर्तीत नाही, श्रद्धा ही कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. देवपण आणि संस्कृती फक्त देवळात जाऊन जपली जाते असं नाही तर ती आपण आपल्या कृतीतून नक्कीच जपू शकतो. असा संदेश देणाऱ्या रामनामी लोकांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय श्रीराम!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



1 comment: