Thursday, 14 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ नववं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ नववं पान... विनीत वर्तक ©

१८ फेब्रुवारी २०२१ चा दिवस होता. या दिवशी जगातील करोडो लोकांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागून राहिले होते, मिळेल त्या माध्यमातून सगळे त्यावरच लक्ष ठेऊन होते. नुसतं अमेरिकेच्याच नव्हे तर मानवाच्या आजवरच्या तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड गाठला जातो की नाही, यासाठी संपूर्ण जगाचे डोळे त्या घटनेकडे लागलेले होते. ती घटना होती अमेरिकेच्या नासाचं 'पर्सीव्हरन्स' हे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार होतं. २७९ मिलियन अमेरिकन डॉलर (२७.९ कोटी अमेरिकन डॉलर) खर्चाच्या मोहिमेतील सगळ्यांत महत्वाची होती, ती ७ मिनिटे ज्याला '7 minutes of terror' असं म्हटलं गेलं. मंगळाच्या पृष्ठभागाच्या दिशेने पर्सीव्हरन्स तब्बल २०,००० किलोमीटर/तास वेगाने झेपावलं, त्याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूट उघडलं. पृष्ठभागाच्या जवळ येताच रोव्हर वरील कॅमेराने पृष्ठभागाचा वेध घेऊन ते कुठे उतरणार ते निश्चित केलं. जवळपास ८० सेकंदांनंतर पर्सीव्हरन्सने मंगळाच्या पृष्ठभागावर आपलं अस्तित्व उमटवलं. ह्या सगळ्या हालचाली नासाचे सगळे वैज्ञानिक आणि अमेरिकन लोकांसह संपूर्ण जग लाईव्ह बघत होतं. पर्सीव्हरन्सच्या हालचालींची इत्यंभूत माहिती आणि ही मोहीम यशस्वी झाल्याची माहिती जगाला देत होती कपाळावर टिकली लावलेली नासाची एक ३८ वर्षीय वैज्ञानिक, जन्माने आणि संस्कृतीने भारतीय पण अमेरिकेत लहानाची मोठी झालेली ही संशोधक आणि पर्सीव्हरन्स मोहिमेची लीडर म्हणजेच 'डॉक्टर स्वाती मोहन'. 

डॉक्टर स्वाती मोहन यांचा जन्म बंगळुरू, भारत इकडे झाला. त्या एक वर्षाची असताना त्यांच्या आई वडिलांनी कामाच्या निमित्ताने अमेरिकेत स्थलांतर केलं. लहानपणी अमेरिकेत प्रसारित होणाऱ्या स्टार ट्रेक मालिकेने त्यांच्या मनात घर केलं. त्यातून त्यांनी अवकाशात जाण्याची स्वप्नं बघायला सुरूवात केली. शाळेत असताना त्यांनी नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधून इंटर्नशिप पूर्ण केली, त्याच स्वप्नांचा पाठलाग करत त्यानी आपलं पुढलं शिक्षण अमेरिकेत एरोस्पेस अभियांत्रिकी विषयात पदवी मिळवत पूर्ण केलं. पदवी मिळताच नासाने त्यांना आपल्या कॅसिनी मिशनमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नियुक्त केलं. शनीचा उपग्रह असणाऱ्या टायटन उपग्रहाच्या कक्षेत मानवनिर्मित उपग्रह पाठवण्याच्या टीमच्या त्या सदस्य होत्या. ही मोहीम यशस्वी झाल्यावर त्यांची नासाशी नाळ जुळली ती कायमची . 

यानंतर त्यांनी आपलं पुढलं शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित अश्या एम.आय.टी. (Massachusetts Institute of Technology) विद्यापीठात प्रवेश घेतला. तिकडून त्यांनी आपली डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी नासाच्या इतर मोहिमांमध्येही आपलं योगदान दिलं. २०१३ साली त्यांच्या अभ्यासू, संशोधक वृत्तीने तसेच दिलेलं कोणतंही काम सचोटीने, चिकाटीने तडीस नेण्याच्या वृत्तीने नासाने त्यांना मंगळ मोहिमेत सामाविष्ट केलं. मंगळावर जीवसृष्टीच्या शोधासाठी जाणारी पर्सीव्हरन्स ही मोहीम नासासाठी अतिशय महत्वाची होती. नासा मंगळावरील जेझारो विवरात आपलं यान उतरवणार होती. याच विवरात तब्बल ३५० मिलियन (३५ कोटी) वर्षांआधी पाण्याचे साठे होते. जर मंगळावर त्याकाळी जीवसृष्टी असल्याचे काही दाखले असतील तर ते याच विवरात मिळण्याची शक्यता दाट होती. नासासाठी पर्सीव्हरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर योग्य त्या ठिकाणीच उतरणं अतिशय गरजेचं होतं. त्यामुळेच अश्या अतिशय किचकट कामाची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर स्वाती मोहन यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमला देण्यात आली. 

डॉक्टर स्वाती मोहन यांच्या नेतृत्वाखालील टीमने नासाच्या इतिहासात पहिल्यांदा 'Attitude Control System Terrain Relative Navigation' नावाची प्रणाली विकसित केली. या प्रणालीमध्ये यानाला स्वतः मंगळाचा पृष्ठभाग न्याहाळून स्वतः तिथली प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन कुठे उतरायचं हे ठरवायची मुभा देण्यात आली होती. याशिवाय नासाच्या आधीच्या मंगळ मोहिमांमध्ये यानाला सरळ उतरवणं शक्य झालं नव्हतं. या प्रणालीमुळे यानाला ते ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत अलगद उतरवण्याची योजना होती. यामुळे करोडो डॉलर खर्च करून सोडलेल्या यानाचं भवितव्य हे अधांतरी नव्हतं. डॉक्टर स्वाती मोहन यांनी नासाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं शोधली. पृथ्वीवर अश्या प्रकारे यान उतरवण्याचे अनेक प्रयोग आणि चाचण्या यशस्वी करून दाखवल्यानंतर नासाने हे तंत्रज्ञान आपल्या पर्सीव्हरन्स यानात वापरण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. 

डॉक्टर स्वाती मोहन यांच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. जगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ, अभियंते जिकडे काम करतात आणि जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान जिकडे वापरले जाते, अश्या जगातील अतिशय नावाजलेल्या संस्थेत सगळ्या चाचण्यांमधून आपण सुचवलेल्या योजनेला मूर्त स्वरूप देणं अतिशय खडतर असं काम होतं. डॉक्टर स्वाती मोहन यांची टीम आणि त्या दररोज १२-१२ तास नासाच्या लॅबमधून आपल्या कल्पनांना तयार करत होते. याच काळात डॉक्टर स्वाती मोहन मातृत्वाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडत होत्या. त्यांचे पती हे अमेरिकेतील एक निष्णात आणि प्रथितयश डॉक्टर आहेत. आपल्या जोडीदाराच्या बरोबरीने त्यांनी एक पत्नी, दोन मुलींची आई, एक सून, एक संशोधक, एक अभियंता, एक टीम लीडर, अवकाश मोहिमेचं सारथ्य करणारी स्त्री अश्या सर्व जबाबदाऱ्या आपण समर्थपणे सांभाळू शकतो हे सिद्ध केलं आहे. 

अमेरिकेत आपलं सर्व आयुष्य घालवूनसुद्धा डॉक्टर स्वाती मोहन भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी नासाच्या मोहिमेची इतकी मोठी जबाबदारी त्यांनी अतिशय साधेपणाने पेललेली आहे. अगदी पर्सीव्हरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या दिवशीसुद्धा अगदी साध्या कपड्यांत आणि आपल्या कपाळावर टिकली लावत भारतीय संस्कृतीचं दर्शन त्यांनी संपूर्ण जगाला करवलं आहे. Attitude Control System Terrain Relative Navigation हे तंत्रज्ञान येत्या काळात अवकाशातील दुसऱ्या ग्रहांच्या पृष्ठभागावर होणारं यानांचं लँडिंग हा प्रकार संपूर्णपणे बदलवून टाकेल असं खुद्द नासाने जाहीररीत्या म्हटलं आहे. या तंत्रज्ञानाची निर्मिती एका भारतीय-अमेरिकन स्त्रीच्या नेतृत्वाखाली झाली आहे. हा भारतातील स्त्रियांसाठीही अभिमानाचा क्षण आहे. 

डॉक्टर स्वाती मोहन यांची कर्मभूमी जरी अमेरिका असली तरी जन्माने आणि आपल्या आचरणाने त्या नेहमीच भारतीय राहिलेल्या आहेत. आज २१ व्या शतकात जेव्हा विश्वाच्या पटलावर मानव आपलं अस्तित्व शोधण्यासाठी भरारी घेतो आहे, तेव्हा त्याला सुखरूप उतरवण्याची जबाबदारी भारताच्या एका दुर्गाशक्तीने समर्थपणे पेललेली आहे. एकाचवेळी सगळ्या भूमिकेंत आपलं योगदान देऊनसुद्धा गर्वाचा, अहंकाराचा लवलेशही त्यांच्या वागणुकीत दिसून येत नाही. भारतीय संस्कृती ही मागासलेली आहे अथवा आपण त्या संस्कृतीचा भाग आहोत म्हणून कमीपणा न वाटू देता भारतीय स्त्री ही गजरा माळून आणि आपल्या कपाळावर टिकली लावूनसुद्धा त्याच समर्थपणे जगातील तंत्रज्ञानाचा सर्वोच्च आविष्कार यशस्वी करू शकते हे आधुनिक अवकाश युगातील दुर्गाशक्ती डॉक्टर स्वाती मोहन यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. येणाऱ्या काळातसुद्धा अवकाशात अनेक स्वप्नांना पादाक्रांत करण्यासाठी त्यांना माझ्याकडून आणि समस्त भारतीयांकडून खूप खूप शुभेच्छा!  

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




1 comment:

  1. अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख !

    ReplyDelete