प्रकल्प वर्तक... विनीत वर्तक ©
आपल्याच देशात अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नसतात. चीन च्या भारतातील घुसखोरी ला थांबवण्यासाठी भारताने अरुणाचल प्रदेश मधे दळण वळण सुधारण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. ज्यात प्रामुख्याने रस्ते आणि बोगदा यांची निर्मिती करून सैन्याला वेगाने सिमारेषेजवळ पोहचण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येते आहे. ज्यावर वेगाने बी. आर. ओ. म्हणजेच (Border Roads Organisation) काम करत आहे. त्याच्याच भाग म्हणून गेल्या वर्षी भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी अरुणाचल प्रदेश मधील कामेंग भागात 'नेचीफु' नावाचा ५०० मीटर लांब आणि इंग्रजी अक्षर D आकाराचा एक बोगदा निर्माण करण्याच्या कामाला सुरवात केली. हा बोगदा झाल्यावर बालीपारा आणि तवंग यामधील अंतर ६ किलोमीटर ने कमी होणार आहे. तर प्रवासाची २० मिनिटे वाचणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आहे की कोणत्याही काळात या रस्त्यावरून अगदी सैन्याच्या वाहनांच दळणवळण शक्य होणार आहे. तवंग हा भाग भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण चीन याला आपला भाग मानतो तर भारताने हा भाग आपला असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच सामरिकदृष्ट्या तवंग भारतासाठी आणि एकूणच अरुणाचल प्रदेश च्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तर या नेचीफु बोगद्याच महत्व भारतासाठी महत्वाचं असलं तरी माझ्यासाठी अजून थोडं जास्तीच खास आहे. कारण हा बोगदा बी. आर. ओ. च्या ज्या प्रोजक्ट अंतर्गत होतो आहे त्याच नाव आहे 'प्रकल्प वर्तक'.
७ मे १९६० साली भारतात दोन प्रकल्पा अंतर्गत बी. आर. ओ. ची स्थापना करण्यात आली. त्यात एक होता 'बिकॉन' जम्मू आणि श्रीनगर साठी तर दुसरा होता तेजपूर इथला 'टुस्कर'. सिमेवर रस्त्यांची आणि दळण वळण यंत्रणांची निर्मिती करण्यासाठी हे प्रकल्प चालू झाले. १९६२ साली चीन ने अरुणाचल प्रदेश मधे घुसखोरी करत इथे बी. आर. ओ. ने प्रकल्प टुस्कर अंतर्गत केलेल्या कामाची संपूर्णतः वाट लावली. पण १९६३ साली बी. आर. ओ. ने पुन्हा इकडे काम सुरु केलं. हा भारताचा भाग आहे आणि त्यामुळेच भारतीय नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. या प्रकल्प च नामकरण भारताचं प्रतिनिधित्व करणार नाव म्हणजे 'प्रकल्प वर्तक' असं याच नामकरण करण्यात आलं.
प्रकल्प वर्तक च बोधवाक्य आहे,
“Patience – Perseverance – Performance” (पी.पी.पी.)
आपल्या प्रत्येक कृती आणि कामात गुणवत्ता आणि उत्कृष्ठता यांचा मिलाफ करत देशाच्या सैन्य दलासाठी आणि आसाम, अरुणाचल प्रदेश मधल्या लोकांसाठी काम करणं. या प्रकल्पा अंतर्गत दळवळणाच्या कामात अग्रेसर राहून राज्यातील दुर्गम, विस्तीर्ण भागात सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी संधी उपलब्ध करण्याचं काम बी. आर. ओ. आजही निष्ठेने करत आहे. हे सर्व करत असताना आजवर जवळपास ४३८८ लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देशाच्या संरक्षणासाठी कार्य करताना दिली आहे. त्यांच्या या बलिदानाची आठवण ठेवताना प्रकल्प वर्तक च्या माध्यमातून तेजपूर इकडे त्यांच स्मारक ही उभारण्यात आलेलं आहे. पश्चिम अरुणाचल प्रदेशातील दुर्गम आणि प्राचीन भागात ज्याला “Land of Dawn-Lit-Mountains” असेही म्हंटल जाते त्या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आपलं बोधवाक्य "कठोर परिश्रमाने सर्व काही साध्य आहे" हे प्रकल्प वर्तक च्या माध्यमातून आजही दाखवत आलेली आहे.
आज मला खंत याचीच वाटते की आपल्या आडनावाच भारतीय असण्याचं इतकं मोठं उदाहरण आजवर माझ्या समोर कधीच आलं नव्हतं. ना कोणत्या पुस्तकात ना कोणत्या बातम्यात ना कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमात. आपलं आडनाव असणाऱ्या एका प्रकल्पाने आज भारताच्या संरक्षणात एक महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या प्रकल्पासाठी आजवर हजारो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं आहे. ही किती मोठी गोष्ट आजवर माझ्यापासून आणि माझ्यासारख आडनाव असणाऱ्या लोकांना माहिती नाही हे नक्कीच कुठेतरी टोचणारं आहे.
आज जेव्हा प्रकल्प वर्तक बद्दल माहिती मिळाली तेव्हा मूठभर मास अंगावर चढल्यासारखं वाटलं आणि त्याचवेळी त्या हजारो लोकांच्या बलिदानाची आठवण होऊन डोळेही पाणावले. प्रकल्प वर्तक च्या माध्यमातून देशाच्या संरक्षणात गेली ५८ वर्षापेक्षा अधिक काळ आपलं योगदान देणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन च्या त्या अनाम विरांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. मला भारतीय असल्याचा अभिमान आहेच पण त्याहीपेक्षा देशाच्या संरक्षणात भरीव योगदान देणारा एक प्रकल्प आपल्या आडनावावर आहे याचा अभिमान कांकणभर नक्कीच जास्त असेल.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्यः- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Proud to be a Vartak.
ReplyDelete