#दुर्गाशक्ती_२०२१ सहावं पान... विनीत वर्तक ©
भारत हा जवळपास १३५ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येची खायची गरज पुरवण्यासाठी लागणारं अन्नधान्य पिकवण्यासाठी भारतासारख्या कृषिप्रधान देशाला पाण्याची मोठी गरज लागते. भारतातील ६०% जमिनीमधील पाण्याचा साठा हा संपलेला आहे किंवा त्या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, अश्या ठिकाणी पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सगळ्या शेतकरी वर्गाची दरोमदार असते ती पावसाच्या पाण्यावर. भारतातील ७०% पेक्षा जास्त शेतीसाठी लागणारे पाणी हे भारतात मौसमी वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसामुळे मिळत असते. त्यामुळेच पाऊस कसा पडणार यावर भारतातील शेती आणि एकूणच संपूर्ण आर्थिक क्षेत्राची वाटचाल अवलंबून असते. या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक वर्षी मौसमी पाऊस कसा पडणार यावर संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले असते.
भारतात पडणारा पाऊस ज्या मौसमी वाऱ्यांमुळे पडतो त्याचं भविष्य वर्तवणं हे सगळ्यांत कठीण काम आहे असं जगातील संशोधक उघडपणे मान्य करतात. कारण या मौसमी वाऱ्यांची निर्मिती, त्यांचं भारतीय उपखंडावर होणार वहन या सर्वच गोष्टी अनेक इतर गोष्टींशी निगडीत आहेत. भारतातील पावसाचं भविष्य भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असल्याने या विषयावर संशोधन करून भारतातील पावसाचा योग्य रीतीने वेध घेण्यासाठी बहुमूल्य योगदान भारतातील एका स्त्री वैज्ञानिकेनं दिलेलं आहे. आजवर शिकत आलेल्या आणि आपल्याला माहित असलेल्या माहितीला छेद देऊन त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली, ज्यामुळे भारतातील मौसमी पावसाचा अंदाज बांधणं अधिक सोप्पं झालं. तसेच वर्तवलेल्या अंदाजाचे ठोकताळेही बरोबर येऊ लागले. योग्य अंदाजामुळे शेतीची कामं योग्य रीतीने करता येऊ लागली. या सर्वांचा फायदा शेतकरी आणि पर्यायाने भारताच्या आर्थिक विकासाला झाला. भारताच्या मौसमी पावसाच्या भविष्य वेध घेण्याच्या वैज्ञानिक पद्धतीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या दुर्गाशक्ती आहेत 'डॉक्टर सुलोचना गाडगीळ'.
जगातील पावसासंदर्भात संशोधनात अग्रणी असलेल्या डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांचा जन्म पुण्यात १९४४ साली झाला. त्यांचे आजोबा हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी नेते होते तर त्यांचे वडील एक प्रथितयश डॉक्टर होते. शिक्षणाचं बाळकडू त्यांच्याकडे आपल्या कुटुंबाकडूनच आलं. त्यांनी आपलं पदवी शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केलं. तिकडेच त्यांची ओळख माधव गाडगीळ यांच्याशी झाली. पुढे त्यांचं लग्न झालं. सुलोचना आणि माधव गाडगीळ दोघांनाही जगातील प्रतिष्ठित अश्या हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. तिकडेच दोघांनी आपलं पुढलं शिक्षण पूर्ण केलं. १९७१ ला भारतात परत आल्यावर त्यांनी देशातील पावसाचा अभ्यास करणाऱ्या भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे इकडे आपलं संशोधन सुरू केलं. नंतर त्यांची नियुक्ती Centre for Atmospheric and Oceanic Sciences (CAOS) इथे झाली.
आत्तापर्यंत भारतामधे दरवर्षी पाऊस घेऊन येणाऱ्या मौसमी वाऱ्यांवर पाऊस अवलंबून असतो असं संशोधन आणि एक जनसामान्य प्रवाह होता. तसेच या वाऱ्यांच्या निर्मितीत पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या 'एल निनो'ची मोठी भूमिका आढळून येते. ज्यावर्षी 'एल निनो'चा प्रभाव जास्ती त्यावर्षी भारतात दुष्काळ पडतो. पण या थेअरी वरून बांधलेले अंदाज अनेकदा चुकत असल्याचं सिद्ध होत होतं. म्हणजेच अजून अश्या काही अदृश्य गोष्टी होत्या ज्या भारतातील पावसाला आणि त्याच्या प्रवासात प्रमुख भूमिका बजावत होत्या. डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी एल निनो शिवाय भारताच्या मौसमी पावसात तयार होणाऱ्या ढगांची भूमिका निर्णायक असल्याचं संशोधनाने सिद्ध केलं. डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी अशी थेअरी मांडली की भारतात ज्या ४ महिन्यात मौसमी पाऊस पडतो त्याकाळात हिंद महासागराच्या पूर्व आणि पश्चिम अश्या दोन्ही भागात खूप जास्ती प्रमाणावर ढगांची निर्मिती होत असते. ज्यावेळेस पश्चिम भागात पूर्व भागापेक्षा जास्ती ढगांची निर्मिती होते त्या काळात भारतात पावसाचे प्रमाण सामान्य राहते. ज्यावेळेस पूर्व भागात जास्ती प्रमाणात ढग तयार होतात त्यावेळेस ते पावसाच्या प्रवासाला बाधक ठरतात.
डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी मांडलेल्या थिअरीला Equatorial Indian Ocean Oscillation, इक्विनो असं म्हटलं गेलं. एल निनो आणि इक्विनो यांच्यामधील नातं आपण जर दरवर्षी सप्रमाणात मांडू शकलो तर भारतात त्या वर्षी होणाऱ्या पावसाचा अंदाज अचूकतेने बांधू शकतो. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आणि अभ्यासानंतर भारतातल्या पावसाच्या अंदाजाची अचूकता वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या अंदाजानुसार शेतकरी आपल्या शेतीची लागवड करू शकला आहे. भारतातील पाऊस अजून अनेक घटकांवर अवलंबून आहे. वृक्षतोड, प्रदूषण, वाढती मनुष्यवस्ती अश्या सगळ्याच गोष्टी त्याच्यावर प्रतिकूल परिणाम करत असतात. पण पावसाचा थोडाफार अंदाजसुद्धा भारतासारख्या शेतीप्रधान देशात अतिशय महत्वाचा ठरतो. त्यामुळेच डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी भारताच्या मौसमी पावसाला समजून घेण्यात दिलेलं योगदान खूप मोठं आहे.
भारतात पडणाऱ्या पावसाचा योग्य अंदाज बांधणारी यंत्रणा निर्माण करून शेतकऱ्यांचं आयुष्य उज्ज्वल करणाऱ्या वैज्ञानिक, संशोधिका डॉक्टर सुलोचना गाडगीळ दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत. त्यांच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि पुढल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
फोटो शोध सौजन्यः- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment