Friday, 29 October 2021

खड्यात घातलेली लाल परी... विनीत वर्तक ©

 खड्यात घातलेली लाल परी... विनीत वर्तक ©

मुंबई ही कर्मभूमी असली तरी मुंबईतल्या बेस्ट पेक्षा एस.टी. म्हणजेच लाल परीशी आयुष्यात जवळचा संबंध होता. मुंबईतल्या डबल डेकर मधला एक प्रवास सोडला तर बेस्ट च्या आठवणी कमी आहेत. पण लाल परीशी जोडलेल्या आठवणी अनेक आहेत. मला ड्रायव्हींग च वेड कोणी लावलं असेल तर मी लाल परीच नाव घेईन. लहानपणी माझ्या आजोळी किंवा गावी जाताना या लाल परीची साथ ठरलेली असायची. गणपती असो वा दिवाळी नेहमीच तीच आणि तिला हाकणाऱ्या ड्रायव्हर काकांसोबत त्या गर्दीत हिशोब चोख ठेवणाऱ्या कंडक्टर काकांच अप्रूप नेहमीच वाटत आलं. ड्रायव्हर काकांच्या बाजूला असणारा बॅटरी बॉक्स म्हणजे माझं एस.टी. मधील सिंहासन होत ज्यावर विराजमान होऊन मी अनेकवेळा जग जिंकल्याचा अनुभव घेतला होता. 

डिझेल चा दरवळणारा सुगंध, गरम झालेली सिट आणि त्यावर बिन बाह्यांचा गंजी घालून थोडं तिरकस बसत फेरारी पेक्षा जास्त वेगात आणि बॉम्ब पेक्षा जास्ती कर्कश आवाज करत बदलणाऱ्या त्या गियर च्या साथीने मी प्राण कंठाशी घेऊन त्या लाल परीच्या ड्रायव्हर काकांसोबत प्रवास करण्याचा अनुभव अनेकदा घेतला होता. आजही ते सगळं आठवलं की ते सगळं चित्र जसच्या तसं समोर उभं रहाते. काळाच्या ओघात परिस्थिती बदलली आणि लाल परीचे जणूकाही पंखच छाटले गेले. आता तर अशी अवस्था आणून ठेवली आहे की बिचारीला जगणं ही मुश्किल करून ठेवलं आहे. लाल फितीचा फास मुद्दामून या लाल परीच्या मानेभोवती हळूहळू आवळला गेला. तिची होणारी धडपड दिसत असून सुद्धा राजकारण करून आता तिचं अस्तित्व जवळपास संपवल्यात जमा केलं आहे. 

लाल परी नेहमीच सामान्य माणसाच्या प्रवासाची साक्षी राहिली आहे. आजही पैसा खिशात आल्यावर थंडगार एस.सी. च्या त्या कारमधून प्रवास करताना बाजूने जाणारी ती लाल परी का कोणास ठाऊक आजही अशी लपवून बोलवत असते. पण गेल्या काही दिवसात तिला जिवंत ठेवणाऱ्या लोकांचे चाललेले हाल बघून कुठेतरी मन खट्टू झालं आहे. लाल परीला जिवंत ठेवणाऱ्या लोकांना आज पगार वेळेवर मिळत नाहीत. दिवाळी तोंडावर आलेली असताना सानुग्रह अनुदान आणि इतर गोष्टींची वानवा आहे. हे सगळं कशामुळे झालं असा विचार केला तर अनेक गोष्टी समोर येतात. काळानुरूप बदल करण्यात लाल परी अयशस्वी ठरली हे महत्वाचं कारण असलं तरी तिचे पंख गेल्या अनेक दशकात राजकारण्यांनी आणि त्याच राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी छाटले हे स्पष्ट दिसून येते. कोणता पक्ष आणि कोणता नेता यामागच्या राजकारणात मला जायचं नाही. कारण कोणीही आलं आणि कितीही केलं तरी लाल परीचा पद्धतशीरपणे गळा गेल्या काही वर्षात घोटण्यात आला हे वास्तव नाकारता येत नाही. 

आजही एकमेकांकडे बोट दाखवणारं राजकारण केलं जाते आहे पण मुळात खड्यात घातलेल्या लाल परीच कोणालाच काही वाटत नाही. रोज तिचे कर्मचारी दिवाळीच्या तोंडावर आपलं आयुष्य संपवत आहेत पण त्याच ना तिच्या भोवती फास आवळणाऱ्या लोकांना पडलं आहे न रोज २४ तास पैश्याच्या जोरावर मस्तवाल झालेल्या लोकांना हिरो दाखवण्याच्या कामात जुंपलेल्या मिडीयाला. नशेडी लोकांच भवितव्य काय हे आमच्यासाठी जास्ती महत्वाचं आहे कारण स्वतःचा जीव संपवणारे ते काका आमच्या स्टेटस मधे येत नाहीत. किंबहुना किती करोड रुपये कोणी खाल्ले आणि कोणाचा धर्म, जात आणि पंथ उकरून काढणे हे आद्य कर्तव्य समजणारे राजकारणी आणि मिडिया हे आपलं आद्य कर्तव्य करण्यात सध्या व्यस्त असल्याने शेवटच्या घटका मोजत असलेल्या लाल परीकडे कोणाचं लक्ष जात नाही. 

लाल परीच्या मरणाला कोणी एक राजकारणी अथवा पक्ष कारणीभूत नाही तर गेल्या काही दशकात राजकारण, भ्रष्टाचार आणि व्यवस्थापन अश्या चोहोबाजूने ती पोखरली गेली आहे. कोणे एके काळी शान असलेली लाल परीची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची आजची अवस्था बघवत नाही. महाराष्ट्राच्या अगदी टोकाच्या गावापर्यंत आपलं जाळ पसरलेल्या लाल परीचा खड्यात जाणारा प्रवास नक्कीच क्लेशदायक आहे. अजूनही लाल परीला सावरता येऊ शकते फक्त राजकीय आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या इच्छाशक्तीची गरज आहे. मला विश्वास आहे की या लाल परीला खड्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पण तसे जर केले गेले नाहीत तर नक्कीच या मातीशी नाळ असलेली लाल परी काळाच्या ओघात आपलं अस्तित्व नक्कीच हरवून बसेल.  

तळटीप :- लेखाचा वापर कोणत्याही राजकीय कुरघोडी अथवा पक्षीय राजकारणासाठी करू नये. पोस्टचा उद्देश दिवसेंदिवस खालावत चाललेल्या एस.टी. ची व्यथा मांडण्याचा आहे.  

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Wednesday, 27 October 2021

चित भी मेरी पट भी मेरा... विनीत वर्तक ©

 चित भी मेरी पट भी मेरा... विनीत वर्तक ©

आंतरराष्ट्रीय राजकारणात मुत्सुद्दीपणाने पावलं टाकावी लागतात. त्यासाठी परिस्थितीच आकलन करून कधी संयमाने आणि कधी आपला मुद्दा रेटून पारडं आपल्या बाजूने झुकवायचं असतं. नुकतीच अशी एक घटना भारताने घडवून आंतरराष्ट्रीय राजकारणात घडवून आणली आहे. ज्यात 'चित भी मेरी पट भी मेरा' अश्या पद्धतीने गोष्टी आपल्या बाजूने झुकावल्या आहेत. ही घटना आहे भारत खरेदी करत असलेल्या एस ४०० या एअर डिफेन्स प्रणाली बाबत. एस ४०० प्रणाली काय आहे? यात कोणत्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे? यात भारताची भूमिका? एकूणच भारताने कश्या पद्धतीने गोष्टी चित भी मेरी पट भी मेरा या पद्धतीने आपल्या बाजूने वळवल्या आहेत? हे जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे. 

एस ४०० ट्रायम्फ (नाटो नाव) ही एक एअर डिफेन्स प्रणाली आहे. या प्रणाली पासून ४०० किलोमीटर च्या अंतरातील जगातील कोणत्याही लढाऊ विमान, ड्रोन किंवा कोणत्याही बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्राला निष्प्रभ करण्यास सक्षम आहे. यात प्रणाली मधे ३ प्रकारची क्षेपणास्त्र वापरली जातात. सगळ्यात दूरवर मारा करणारी ४० एन ६, दूरवर मारा करणारी ४८ एन ६ तर जवळ मारा करणारी ९ एम ९६ मिसाईल. ही तिन्ही मिसाईल सुपर सॉनिक व हायपर सॉनिक वेगाने म्हणजे तब्बल १४ मॅक वेगाने ( ध्वनीपेक्षा १४ पट जास्ती वेगाने) १७,००० हजार किमी / तास वेगाने आपल्या लक्ष्याकडे झेपावतात. जमिनीपासून ३० किलोमीटर उंचीपर्यंत आणि ४०० किलोमीटर च्या पट्यात ही प्रणाली एखाद्या लेअर प्रमाणे काम करते. वर लिहिलं त्या प्रमाणे ही तिन्ही क्षेपणास्त्र वेगवेगळ्या टप्यात काम करतात. त्यामुळे एखादं विमान अथवा ड्रोन एका टप्यातून वाचलं तरी दुसऱ्या टप्यात वाचणं जवळपास अशक्य आहे. यामुळेच आजच्या घडीला कार्यरत अशी सर्वोत्तम एअर डिफेन्स प्रणाली म्हणून एस ४०० च नाव घेतलं जाते. 

एस ४०० च यश हे त्याच्या क्षेपणास्त्रासोबत त्याच्या रडार आणि ट्रॅकिंग प्रणाली मधे आहे. ही प्रणाली अमेरिकेच्या एफ १६, एफ २२ सह टॉमहॉक क्षेपणास्त्राला निष्प्रभ करू शकते. त्यामुळेच अमेरिकेला ही प्रणाली नको आहे. भारताने आपल्या सुरक्षिततेसाठी तब्बल ५ बिलियन (५०० कोटी) अमेरिकन डॉलर मोजून ही प्रणाली २०१८ मधे रशिया कडून विकत घेण्याचा करार केला. या कराराने अमेरिकेच्या भारतासोबत वाढत्या शस्त्रविक्रीला कुठेतरी धक्का बसला. अमेरिकेने आपल्या Countering America’s Adversaries Through Sanctions Act (CAATSA) चा हवाला देत भारतावर प्रतिबंध टाकण्याचा दम दिला. २०१९ मधे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एस ४०० करार रद्द करण्यासाठी खूप दबाव टाकला. पण भारताने यावेळी संयम बाळगताना अतिशय मुत्सुद्दीपणाने अमेरिकेसोबत चर्चेच आणि त्यांच्या शंकांना उत्तर देण्याचं काम सुरु ठेवलं तर दुसरीकडे रशियाला करार शाबूत असल्याचं स्पष्ट करताना  ८०० मिलियन (८० कोटी ) अमेरिकन डॉलरचा पहिला हप्ता ही सुपूर्द केला. अमेरिकेच्या कूटनीती च्या दृष्टीने हा खूप मोठा धक्का होता पण भारताने अतिशय अश्या चाली खेळल्या होत्या की हा जोर का धक्का इतक्या हळुवार पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवला की कोणाला त्याची दखल घ्यावी वाटली नाही. 

अमेरिकेला भारताने आपलं हित सर्वोतोपरी प्रथम असल्याचं निक्षून सांगितलं आणि त्याचवेळी अमेरिका आणि भारत एकमेकांचे घनिष्ठ मित्र असल्याचं स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय राजकारणात अश्या पद्धतीने दोन्ही बाजूंचा मेळ राखत गोष्टी आपल्या बाजूने साध्य करायच्या असतात. या वर्षाअखेर डिसेंबर २०२१ मधे रशिया भारताला एस ४०० ची पहिली बटालियन कराराप्रमाणे देत आहेत. एस ४०० च्या एका बटालियन मधे जवळपास ६००० पेक्षा जास्ती क्षेपणास्त्र असतात. भारताने अश्या ५ बटालियन ची ऑर्डर रशिया ला दिलेली आहे. ज्यातील तीन या पश्चिम म्हणजेच पाकिस्तान सोबतच्या सरहद्दीवर तर दोन या चीन सोबतच्या पूर्व सरहद्दीवर तैनात केल्या जाणार आहेत. हा करार संपत नाही तोवर भारत आणि रशिया एस ५०० ज्याला "Triumfator-M" असं म्हंटल जाते त्याच्या खरेदीचा करार करणार असल्याचं अमेरिकन गुप्तचर यंत्रणा तसेच रशियाच्या उप पंप्रधानांनी एका सभेत हे नुकतच स्पष्ट केलं की रशियाने जर दुसऱ्या देशाला ही प्रणाली दिली तर पहिला ग्राहक हा भारत असणार आहे. या सगळ्या हालचालींमुळे पुन्हा एकदा अमेरिकेत भारतावर (CAATSA) लादण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. 

गेल्या आठवड्यात मात्र अचानक अमेरिकेच्या संसदेतील अतिशय महत्वाच्या दोन मंत्र्यांनी ज्यात Sens. John Cornyn, R-Texas, आणि  Mark Warner, D-Va. यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहून भारताला (CAATSA) कायद्यातून मुभा देण्याची विनंती केली आहे. हे दोन्ही मंत्री अमेरिकेच्या सिनेट मधील अतिशय जुने आहेत तसेच ते दोन वेगवेगळ्या पक्षांच नेतृत्व करतात. यामुळेच त्यांच्या विनंतीचा विचार करण्याचा दबाव साहजिक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर येणार आहे. आपल्या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं आहे की भारत अमेरिकेचा चांगला आणि अतिशय महत्वाचा मित्र आहे. तो अमेरिकेच्या क्वाड ग्रुप चा भाग आहे. जर चीनवर अंकुश ठेवायचा असेल तर अमेरिकेला भारतावर (CAATSA) च्या रूपाने अंकुश ठेवणं परवडणारं नाही. अमेरिकेच्या फायद्यासाठी भारताला (CAATSA) मधून मुभा देण्याची विनंती केली आहे. 

अमेरिकेचा फायदा यात त्यांनी लिहिला असला तरी अचानक या गोष्टी उघडपणे समोर यायला पडद्यामागे मुत्सुद्दीकरणाचं राजकारण असते. जे सामान्य माणसांना कधीच दिसणार नाही. ही विनंती जर अमेरिकेने मान्य केली तर ज्याप्रमाणे भारत अमेरिका अणुकराराला भारताने आपल्या शर्तींवर मंजूर करून घेतलं त्याच धर्तीवर पुन्हा एकदा भारताने चित भी मेरी पट भी मेरा हे साध्य केल्याचं स्पष्ट होईल. यात भारताचा फायदा खूप आहे की एकीकडे भारत अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांसोबत आपले संबंध मजबूत करतो आहे. कोणत्याही एका देशावर विसंबून न राहण्याचं भारताने या निमित्ताने स्पष्ट केलं आहे. एस ४०० च्या आगमनाची आता वाट बघूया. कारण जेव्हा एस ४०० भारताच्या सिमांवर संरक्षणासाठी काम सुरु करेल तेव्हा हवेतून परिंदा भी पर मारने के पेहले १००० हजार बार जरूर सोचेगा.

जय हिंद!!!   

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



Sunday, 24 October 2021

रामनामी... विनीत वर्तक ©

रामनामी... विनीत वर्तक ©

राम हा शब्द जितका आस्थेचा विषय आहे तितकाच तो भारतातील असंख्य लोकांच्या आयुष्याशी कळत नकळत निगडित आहे. राममंदिर आणि बाबरी मशीद यावरून कित्येक वर्ष राजकारण खेळलं गेलं आणि सरतेशेवटी ५ ऑगस्ट २०२० ला राममंदिराच भूमिपूजन झालं. भारतातील आणि जगातील हिंदूंच्या आस्थेशी निगडित असलेली  एक महत्वाची गोष्ट इतिहासाच्या पानात कोरली गेली. असं असलं तरी आस्था हा शब्द किती सापेक्ष आहे हे दाखवणार एक उदाहरण भारतात आहे. भारतात गेल्या १०० वर्षाहून अधिक काळ एका जातीतील कित्येक पिढ्या राम नामाचा जप करत आपली आस्था मंदिरा पलीकडे जपत आलेल्या  आहेत. 

प्रख्यात गायक सुधीर फडके यांनी गायलेलं एक गाणं जे याच आस्थेला शब्दातून दाखवते, 

देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी

देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे

देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी

देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे

देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे

तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही

देव स्वये जगन्‍नाथ, देव अगाध अनंत

देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण

काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही      

अक्षरशः या गाण्यातील शब्द न शब्द जगणारी एक जमात छत्तीसगड मधे आजही रामाचा जप करत आपली संस्कृती जपते आहे. रामनामाचा (टॅटू) आपल्या संपूर्ण शरीरावर गोंदवून हि जमात आपल्या रामाच्या भक्तीच प्रतीक गेली १०० वर्षापेक्षा जास्त काळ दाखवते आहे. रामाचं नाव आपल्या शरीरावर गोंदवण हा त्यांच्या श्रद्धेपेक्षा भारतीय समाजात ज्या पद्धतीने खालच्या जातीतील लोकांना कश्या प्रकारे मुख्य प्रवाहापासून डावललं गेलं त्याचा निषेध करण्याच एक प्रतिकात्मक स्वरूप होतं. 

१०० वर्षापूर्वी जेव्हा रामनामी समाजातील लोकांना उच्च वर्णीय लोकांकडून मंदिर प्रवेश आणि मूर्तिपूजेपासून समाजाने डावललं त्यावेळेला रामाप्रती असलेल्या आपल्या श्रद्धेला त्यांनी टॅटू च्या रूपात स्थान दिलं. रामनाम आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर गोंदवून घेत त्यांनी उच्च वर्णीय लोकांना आपल्या भक्तीच एक रूप दाखवलं. हा प्रतिकात्मक वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला गेला. भारत स्वातंत्र्य झाल्यावर जाती वरून कोणाला समाजात स्थान देण्याची व्यवस्था संपुष्टात आली. पण रामनामाचा टॅटू (गोंदवण) मात्र परंपरेने पुढल्या पिढीकडे हस्तांतरित केला गेला. 

राम हे पवित्र शब्द आपल्या अंगावर गोंदवून घेताना काही जबाबदाऱ्या ही ओघाने या समाजाने आपल्यावर लादून घेतल्या. रामनामाचा जप दिवसातून एकदातरी करणं हे समाजातील प्रत्येकाला आजही अनिवार्य आहे. त्याच सोबत सिगारेट, दारू, तंबाखू अश्या व्यसनांपासून ही हा समाज संपूर्णपणे लांब आहे. आजची नवीन पिढी काळाच्या ओघात संपूर्ण शरीरावर रामनाम गोंदवून घेत नसली तरी जन्म झाल्यावर शरीराच्या एका भागावर रामनाम गोंदवण आजही समाजातील सगळ्यांना बंधनकारक आहे. त्यांच्या घराच्या भिंतीवर सुद्धा रामाच नाव हे कोरलेलं असते. समजातील प्रत्येक माणूस हा समान आहे हा संदेश हा समाज आपल्या वागण्या बोलण्यातून आणि आपल्या रामनामातून संदेश जगाला देत आला आहे आणि देत राहील असा विश्वास या समाजातील लोकांना आहे. 

२१ व्या शतकात सुद्धा सोशल मिडिया सारख्या आधुनिक प्लॅटफॉर्मवर आजही आडनाव बघून संबंध प्रस्थापित केले जातात. सोशल स्टेटस बघून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा दर्जा ठरवला जातो. आजही काही कळप संस्कृती रक्षणाचा झेंडा घेऊन सोशल मिडीयावर पद्धतशीरपणे झुंडशाही करत असताना आपण बघू शकतो. समाजाच्या उत्कर्षामधील काही क्षेत्रे अमुक एक जातीचा अभेद्य किल्ला असल्याचा माज आणि गर्व ठेवला जातो. तिकडे रामनामी सारख्या खालच्या जातीतून समाजाला समानतेची शिकवण देणाऱ्या रामाची श्रद्धा करणारे रामनामी लोकं मला जास्त प्रगल्भ असल्याचं जाणवतं. देव हा मूर्तीत नाही, श्रद्धा ही कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. देवपण आणि संस्कृती फक्त देवळात जाऊन जपली जाते असं नाही तर ती आपण आपल्या कृतीतून नक्कीच जपू शकतो. असा संदेश देणाऱ्या रामनामी लोकांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय श्रीराम!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Tuesday, 19 October 2021

प्रकल्प वर्तक... विनीत वर्तक ©

 प्रकल्प वर्तक... विनीत वर्तक ©

आपल्याच देशात अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नसतात. चीन च्या भारतातील घुसखोरी ला थांबवण्यासाठी भारताने अरुणाचल प्रदेश मधे दळण वळण सुधारण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. ज्यात प्रामुख्याने रस्ते आणि बोगदा यांची निर्मिती करून सैन्याला वेगाने सिमारेषेजवळ पोहचण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येते आहे. ज्यावर वेगाने बी. आर. ओ. म्हणजेच (Border Roads Organisation) काम करत आहे. त्याच्याच भाग म्हणून गेल्या वर्षी भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी अरुणाचल प्रदेश मधील कामेंग भागात 'नेचीफु' नावाचा ५०० मीटर लांब आणि इंग्रजी अक्षर D आकाराचा एक बोगदा निर्माण  करण्याच्या कामाला सुरवात केली. हा बोगदा झाल्यावर बालीपारा आणि तवंग यामधील अंतर ६ किलोमीटर ने कमी होणार आहे. तर प्रवासाची २० मिनिटे वाचणार आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आहे की कोणत्याही काळात या रस्त्यावरून अगदी सैन्याच्या वाहनांच दळणवळण शक्य होणार आहे. तवंग हा भाग भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण चीन याला आपला भाग मानतो तर भारताने हा भाग आपला असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच सामरिकदृष्ट्या तवंग भारतासाठी आणि एकूणच अरुणाचल प्रदेश च्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तर या नेचीफु बोगद्याच महत्व भारतासाठी महत्वाचं असलं तरी माझ्यासाठी अजून थोडं जास्तीच खास आहे. कारण हा बोगदा बी. आर. ओ. च्या ज्या प्रोजक्ट अंतर्गत होतो आहे त्याच नाव आहे 'प्रकल्प वर्तक'. 

७ मे १९६० साली भारतात दोन प्रकल्पा अंतर्गत बी. आर. ओ. ची स्थापना करण्यात आली. त्यात एक होता 'बिकॉन' जम्मू आणि श्रीनगर साठी तर दुसरा होता  तेजपूर इथला 'टुस्कर'. सिमेवर रस्त्यांची आणि दळण वळण यंत्रणांची निर्मिती करण्यासाठी हे प्रकल्प चालू झाले. १९६२ साली चीन ने अरुणाचल प्रदेश मधे घुसखोरी करत इथे बी. आर. ओ. ने प्रकल्प टुस्कर अंतर्गत केलेल्या कामाची संपूर्णतः वाट लावली. पण १९६३ साली बी. आर. ओ. ने पुन्हा इकडे काम सुरु केलं. हा भारताचा भाग आहे आणि त्यामुळेच भारतीय नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला. या प्रकल्प च नामकरण भारताचं प्रतिनिधित्व करणार नाव म्हणजे 'प्रकल्प वर्तक' असं याच नामकरण करण्यात आलं. 

प्रकल्प वर्तक च बोधवाक्य आहे,

 “Patience – Perseverance – Performance”   (पी.पी.पी.)

आपल्या प्रत्येक कृती आणि कामात गुणवत्ता आणि उत्कृष्ठता यांचा मिलाफ करत देशाच्या सैन्य दलासाठी आणि आसाम, अरुणाचल प्रदेश मधल्या लोकांसाठी काम करणं. या प्रकल्पा अंतर्गत दळवळणाच्या कामात अग्रेसर राहून राज्यातील दुर्गम, विस्तीर्ण भागात सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी संधी उपलब्ध करण्याचं काम बी. आर. ओ. आजही निष्ठेने करत आहे. हे सर्व करत असताना आजवर जवळपास ४३८८ लोकांनी आपल्या प्राणाची आहुती देशाच्या संरक्षणासाठी कार्य करताना दिली आहे. त्यांच्या या बलिदानाची आठवण ठेवताना प्रकल्प वर्तक च्या माध्यमातून तेजपूर इकडे त्यांच स्मारक ही उभारण्यात आलेलं आहे. पश्चिम अरुणाचल प्रदेशातील दुर्गम आणि प्राचीन भागात ज्याला “Land of Dawn-Lit-Mountains” असेही म्हंटल जाते त्या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आपलं बोधवाक्य "कठोर परिश्रमाने सर्व काही साध्य आहे" हे प्रकल्प वर्तक च्या माध्यमातून आजही दाखवत आलेली आहे. 

आज मला खंत याचीच वाटते की आपल्या आडनावाच भारतीय असण्याचं इतकं मोठं उदाहरण आजवर माझ्या समोर कधीच आलं नव्हतं. ना कोणत्या पुस्तकात ना कोणत्या बातम्यात ना कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमात. आपलं आडनाव असणाऱ्या एका प्रकल्पाने आज भारताच्या संरक्षणात एक महत्वाची भूमिका बजावली आहे. त्या प्रकल्पासाठी आजवर हजारो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं आहे. ही किती मोठी गोष्ट आजवर माझ्यापासून आणि माझ्यासारख आडनाव असणाऱ्या लोकांना माहिती नाही हे नक्कीच कुठेतरी टोचणारं आहे. 

आज जेव्हा प्रकल्प वर्तक बद्दल माहिती मिळाली तेव्हा मूठभर मास अंगावर चढल्यासारखं वाटलं आणि त्याचवेळी त्या हजारो लोकांच्या बलिदानाची आठवण होऊन डोळेही पाणावले. प्रकल्प वर्तक च्या माध्यमातून देशाच्या संरक्षणात गेली ५८ वर्षापेक्षा अधिक काळ आपलं योगदान देणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन च्या त्या अनाम विरांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. मला भारतीय असल्याचा अभिमान आहेच पण त्याहीपेक्षा देशाच्या संरक्षणात भरीव योगदान देणारा एक प्रकल्प आपल्या आडनावावर आहे याचा अभिमान कांकणभर नक्कीच जास्त असेल. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Thursday, 14 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ नववं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ नववं पान... विनीत वर्तक ©

१८ फेब्रुवारी २०२१ चा दिवस होता. या दिवशी जगातील करोडो लोकांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागून राहिले होते, मिळेल त्या माध्यमातून सगळे त्यावरच लक्ष ठेऊन होते. नुसतं अमेरिकेच्याच नव्हे तर मानवाच्या आजवरच्या तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड गाठला जातो की नाही, यासाठी संपूर्ण जगाचे डोळे त्या घटनेकडे लागलेले होते. ती घटना होती अमेरिकेच्या नासाचं 'पर्सीव्हरन्स' हे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार होतं. २७९ मिलियन अमेरिकन डॉलर (२७.९ कोटी अमेरिकन डॉलर) खर्चाच्या मोहिमेतील सगळ्यांत महत्वाची होती, ती ७ मिनिटे ज्याला '7 minutes of terror' असं म्हटलं गेलं. मंगळाच्या पृष्ठभागाच्या दिशेने पर्सीव्हरन्स तब्बल २०,००० किलोमीटर/तास वेगाने झेपावलं, त्याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूट उघडलं. पृष्ठभागाच्या जवळ येताच रोव्हर वरील कॅमेराने पृष्ठभागाचा वेध घेऊन ते कुठे उतरणार ते निश्चित केलं. जवळपास ८० सेकंदांनंतर पर्सीव्हरन्सने मंगळाच्या पृष्ठभागावर आपलं अस्तित्व उमटवलं. ह्या सगळ्या हालचाली नासाचे सगळे वैज्ञानिक आणि अमेरिकन लोकांसह संपूर्ण जग लाईव्ह बघत होतं. पर्सीव्हरन्सच्या हालचालींची इत्यंभूत माहिती आणि ही मोहीम यशस्वी झाल्याची माहिती जगाला देत होती कपाळावर टिकली लावलेली नासाची एक ३८ वर्षीय वैज्ञानिक, जन्माने आणि संस्कृतीने भारतीय पण अमेरिकेत लहानाची मोठी झालेली ही संशोधक आणि पर्सीव्हरन्स मोहिमेची लीडर म्हणजेच 'डॉक्टर स्वाती मोहन'. 

डॉक्टर स्वाती मोहन यांचा जन्म बंगळुरू, भारत इकडे झाला. त्या एक वर्षाची असताना त्यांच्या आई वडिलांनी कामाच्या निमित्ताने अमेरिकेत स्थलांतर केलं. लहानपणी अमेरिकेत प्रसारित होणाऱ्या स्टार ट्रेक मालिकेने त्यांच्या मनात घर केलं. त्यातून त्यांनी अवकाशात जाण्याची स्वप्नं बघायला सुरूवात केली. शाळेत असताना त्यांनी नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधून इंटर्नशिप पूर्ण केली, त्याच स्वप्नांचा पाठलाग करत त्यानी आपलं पुढलं शिक्षण अमेरिकेत एरोस्पेस अभियांत्रिकी विषयात पदवी मिळवत पूर्ण केलं. पदवी मिळताच नासाने त्यांना आपल्या कॅसिनी मिशनमध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नियुक्त केलं. शनीचा उपग्रह असणाऱ्या टायटन उपग्रहाच्या कक्षेत मानवनिर्मित उपग्रह पाठवण्याच्या टीमच्या त्या सदस्य होत्या. ही मोहीम यशस्वी झाल्यावर त्यांची नासाशी नाळ जुळली ती कायमची . 

यानंतर त्यांनी आपलं पुढलं शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठित अश्या एम.आय.टी. (Massachusetts Institute of Technology) विद्यापीठात प्रवेश घेतला. तिकडून त्यांनी आपली डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी नासाच्या इतर मोहिमांमध्येही आपलं योगदान दिलं. २०१३ साली त्यांच्या अभ्यासू, संशोधक वृत्तीने तसेच दिलेलं कोणतंही काम सचोटीने, चिकाटीने तडीस नेण्याच्या वृत्तीने नासाने त्यांना मंगळ मोहिमेत सामाविष्ट केलं. मंगळावर जीवसृष्टीच्या शोधासाठी जाणारी पर्सीव्हरन्स ही मोहीम नासासाठी अतिशय महत्वाची होती. नासा मंगळावरील जेझारो विवरात आपलं यान उतरवणार होती. याच विवरात तब्बल ३५० मिलियन (३५ कोटी) वर्षांआधी पाण्याचे साठे होते. जर मंगळावर त्याकाळी जीवसृष्टी असल्याचे काही दाखले असतील तर ते याच विवरात मिळण्याची शक्यता दाट होती. नासासाठी पर्सीव्हरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर योग्य त्या ठिकाणीच उतरणं अतिशय गरजेचं होतं. त्यामुळेच अश्या अतिशय किचकट कामाची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर स्वाती मोहन यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमला देण्यात आली. 

डॉक्टर स्वाती मोहन यांच्या नेतृत्वाखालील टीमने नासाच्या इतिहासात पहिल्यांदा 'Attitude Control System Terrain Relative Navigation' नावाची प्रणाली विकसित केली. या प्रणालीमध्ये यानाला स्वतः मंगळाचा पृष्ठभाग न्याहाळून स्वतः तिथली प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन कुठे उतरायचं हे ठरवायची मुभा देण्यात आली होती. याशिवाय नासाच्या आधीच्या मंगळ मोहिमांमध्ये यानाला सरळ उतरवणं शक्य झालं नव्हतं. या प्रणालीमुळे यानाला ते ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत अलगद उतरवण्याची योजना होती. यामुळे करोडो डॉलर खर्च करून सोडलेल्या यानाचं भवितव्य हे अधांतरी नव्हतं. डॉक्टर स्वाती मोहन यांनी नासाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं शोधली. पृथ्वीवर अश्या प्रकारे यान उतरवण्याचे अनेक प्रयोग आणि चाचण्या यशस्वी करून दाखवल्यानंतर नासाने हे तंत्रज्ञान आपल्या पर्सीव्हरन्स यानात वापरण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. 

डॉक्टर स्वाती मोहन यांच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. जगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ, अभियंते जिकडे काम करतात आणि जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान जिकडे वापरले जाते, अश्या जगातील अतिशय नावाजलेल्या संस्थेत सगळ्या चाचण्यांमधून आपण सुचवलेल्या योजनेला मूर्त स्वरूप देणं अतिशय खडतर असं काम होतं. डॉक्टर स्वाती मोहन यांची टीम आणि त्या दररोज १२-१२ तास नासाच्या लॅबमधून आपल्या कल्पनांना तयार करत होते. याच काळात डॉक्टर स्वाती मोहन मातृत्वाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडत होत्या. त्यांचे पती हे अमेरिकेतील एक निष्णात आणि प्रथितयश डॉक्टर आहेत. आपल्या जोडीदाराच्या बरोबरीने त्यांनी एक पत्नी, दोन मुलींची आई, एक सून, एक संशोधक, एक अभियंता, एक टीम लीडर, अवकाश मोहिमेचं सारथ्य करणारी स्त्री अश्या सर्व जबाबदाऱ्या आपण समर्थपणे सांभाळू शकतो हे सिद्ध केलं आहे. 

अमेरिकेत आपलं सर्व आयुष्य घालवूनसुद्धा डॉक्टर स्वाती मोहन भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी नासाच्या मोहिमेची इतकी मोठी जबाबदारी त्यांनी अतिशय साधेपणाने पेललेली आहे. अगदी पर्सीव्हरन्स मंगळाच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या दिवशीसुद्धा अगदी साध्या कपड्यांत आणि आपल्या कपाळावर टिकली लावत भारतीय संस्कृतीचं दर्शन त्यांनी संपूर्ण जगाला करवलं आहे. Attitude Control System Terrain Relative Navigation हे तंत्रज्ञान येत्या काळात अवकाशातील दुसऱ्या ग्रहांच्या पृष्ठभागावर होणारं यानांचं लँडिंग हा प्रकार संपूर्णपणे बदलवून टाकेल असं खुद्द नासाने जाहीररीत्या म्हटलं आहे. या तंत्रज्ञानाची निर्मिती एका भारतीय-अमेरिकन स्त्रीच्या नेतृत्वाखाली झाली आहे. हा भारतातील स्त्रियांसाठीही अभिमानाचा क्षण आहे. 

डॉक्टर स्वाती मोहन यांची कर्मभूमी जरी अमेरिका असली तरी जन्माने आणि आपल्या आचरणाने त्या नेहमीच भारतीय राहिलेल्या आहेत. आज २१ व्या शतकात जेव्हा विश्वाच्या पटलावर मानव आपलं अस्तित्व शोधण्यासाठी भरारी घेतो आहे, तेव्हा त्याला सुखरूप उतरवण्याची जबाबदारी भारताच्या एका दुर्गाशक्तीने समर्थपणे पेललेली आहे. एकाचवेळी सगळ्या भूमिकेंत आपलं योगदान देऊनसुद्धा गर्वाचा, अहंकाराचा लवलेशही त्यांच्या वागणुकीत दिसून येत नाही. भारतीय संस्कृती ही मागासलेली आहे अथवा आपण त्या संस्कृतीचा भाग आहोत म्हणून कमीपणा न वाटू देता भारतीय स्त्री ही गजरा माळून आणि आपल्या कपाळावर टिकली लावूनसुद्धा त्याच समर्थपणे जगातील तंत्रज्ञानाचा सर्वोच्च आविष्कार यशस्वी करू शकते हे आधुनिक अवकाश युगातील दुर्गाशक्ती डॉक्टर स्वाती मोहन यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. येणाऱ्या काळातसुद्धा अवकाशात अनेक स्वप्नांना पादाक्रांत करण्यासाठी त्यांना माझ्याकडून आणि समस्त भारतीयांकडून खूप खूप शुभेच्छा!  

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Wednesday, 13 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ आठवं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ आठवं पान... विनीत वर्तक ©

स्त्रीला नेहमीच समाजात पुरुषापेक्षा दुर्बल आणि अबला घटक समजलं जातं. कणखर मनोवृत्ती असलेली स्त्री शारीरिक पातळीवर मात्र पुरुषापुढे कमी असते, असा एक मतप्रवाह समाजात आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचारात वाढ होते आहे. बलात्कार आणि शारीरिक अत्याचाराच्या घटना दररोज आपल्या कानावर आदळत असतात. समाजाच्या या मतप्रवाहाला एका दुर्गाशक्तीने आपल्या प्रतिभेने छेद दिला आहे. मार्शल आर्ट प्रकारात तिने चक्क १० गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड तर एकत्रित १५ जागतिक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. वयाच्या ४७ व्या वर्षी तिने असा पराक्रम केला आहे. आपल्या प्रतिभेने तिने दाखवून दिलं आहे की स्त्री शारीरिकदृष्ट्याही तितकीच सक्षम असते. गरज पडली तर कोणालाही पाणी पाजू शकते. मार्शल आर्ट मध्ये जागतिक विक्रम करत भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्वाला वेगळीच उंची देणारी ही दुर्गाशक्ती आहे, 'किरण उनियाळ'. 

किरण उनियाळ यांचे वडील भारतीय सैन्यात होते. लहानपणापासून त्यांना ब्रूस ली बद्दल प्रचंड आकर्षण होतं. ब्रूस ली च्या पडद्यावरील कौशल्याने प्रभावित होत त्यांनी लहानपणीच तायक्वांदोला प्रवेश घेतला. त्यांच्या वडिलांनी नेहमीच त्यांच्या आवडीला जोपासण्यासाठी सहकार्य केलं. तायक्वांदोसोबत खेळात आणि एन.सी.सी. मध्येही त्यांनी आवडीने सहभाग घेतला. यासाठीच घरात सगळे त्यांना 'टॉम बॉय' म्हणत. तायक्वांदो ही नेहमीच लग्न होईपर्यंत एक आवड राहिली होती. त्यांचं लग्न भारतीय सैन्यात कर्नल असलेल्या सुनील उनियाळ यांच्याशी झालं. लग्नाच्या जबाबदाऱ्या आणि दोन मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये काही काळ निघून गेला. पण त्यांच्यातली तायक्वांदो आणि मार्शल आर्टची आवड मात्र दिवसेंदिवस वाढत गेली, नि आता ती एक लक्ष्य बनली होती. 

आपल्या लक्ष्याकडे झेपावताना त्यांनी अशी एक उंची गाठली ज्याचा स्वप्नातही कोणी विचार करू शकत नाही. तीन मिनिटांत एका पायाच्या गुढग्याने तब्बल २६३ वेळा आणि एका मिनिटात दोन्ही पायाने आलटून पालटून तब्बल १२० वेळा त्यांनी वार करण्याचे विश्वविक्रम केले. तीन मिनिटांत जगातील कोणत्या पुरुषालासुद्धा २२६ पेक्षा जास्ती वेळा वार करायला जमलं नव्हतं तिकडे किरण उनियाळ यांनी तब्बल २६३ वेळा वार करून सगळ्या जगाला भारतीय स्त्रीची ताकद दाखवून दिली. जानेवारी २०१९ मधे ३ मिनिटांत त्यांनी एका हाताच्या कोपराने तब्बल ४६६ वेळा वार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं. हा लेख लिहेपर्यंत १० गिनीज तर १५ विश्वविक्रम मार्शल आर्ट, फिटनेस आणि सामाजिक कार्यात त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत.

किरण उनियाळ यांचा पराक्रम हा फक्त त्यांच्या स्वतःपुरताच मर्यादित नाही तर त्यांनी तेलंगणा सरकार आणि एम.एन.जे.कॅन्सर हॉस्पिटलसोबत कॅन्सरबद्दल जनजागृती करण्याचा जगातील सगळ्यात मोठा उपक्रम केला, ज्याची नोंदही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. एका आवडीपासून सुरू झालेला प्रवास आता सामाजिक चळवळीत रूपांतरीत झाला आहे. आज किरण उनियाळ स्त्रीला कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार करायला झटत आहेत. त्यांच्या मते, 

“Women can use martial arts to their advantage, especially in a society where every second day we wake up to the news of sexual violence. It is difficult to make families understand girls and women too can learn the art form. Parents are more worried about their daughters turning manly or injuring themselves. It’s all a part of the sport and the larger picture one needs to understand here is how martial arts help women in self-defence when they are in trouble. The awareness should begin from schools where martial arts should become a compulsory subject,”

Kiran Uniyal 

किरण उनियाळ आणि त्यांचे पती कर्नल सुनील उनियाळ हे एका दिव्यांग मुलीचे पालक आहेत. या दोघांनी मिळून ‘Empowering Divyangjan: A compendium of benefits and facilities for the differently abled children of the armed forces’. नावाचं एक पुस्तकही लिहीलं आहे. त्यांचा मुलगासुद्धा तायक्वांदो शिकत असून त्याने सुद्धा दोन जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. किरण उनियाळ या अनेक आश्रम आणि सेवाभावी संस्थेत जाऊन तिथल्या मुलांना स्वसंरक्षणाचे धडे तर देत असतातच याशिवाय भारतीय सेनेतील मातृभूमीचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्या किंवा जायबंदी झालेल्या अनेक सैनिकी परिवारांची ज्यांना पेन्शन मिळत नाही, अश्या कुटुंबीयांची सेवा करतात. त्यांच्या मते सैनिकाने देशासाठी दिलेल्या बलिदानाची नुसती आपण जाणीव जरी ठेवली तरी ती त्यांच्यासाठी पुरेशी असते. 

भारतीय स्त्री ही अबला नारी नाही, तर तिच्या मनगटात कोणालाही पाणी पाजण्याची ताकद आहे. भारतीय स्त्री ठरवलं तर काय करू शकते हे त्यांनी आपल्या कामगिरीने दाखवून दिलेलं आहे. एक दोन नाही तर तब्बल १५ जागतिक विक्रम वयाच्या ४७ व्या वर्षी करताना त्यांनी एक लष्करी अधिकाऱ्याची बायको, एक दिव्यांग आणि एक सुदृढ अश्या दोन मुलांची आई, एक तायक्वांदो शिक्षक आणि एक समाजसेविका अश्या सगळ्या भूमिका समर्थपणे पेलताना आधुनिक भारतीय दुर्गाशक्तीचं रूपच जगापुढे ठेवलं आहे. अश्या या अष्टपैलू दुर्गाशक्तीस माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

जय हिंद!!!  

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

 


Tuesday, 12 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ सातवं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ सातवं पान... विनीत वर्तक ©

सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगांमधून वाहणाऱ्या नर्मदा नदीचं हिंदू धर्मात पौराणिक महत्व खूप आहे. त्यामुळेच नर्मदा परिक्रमा करणं आजही खूप पवित्र मानलं जातं. नर्मदा नदी आई, माईच्या रूपात या परिक्रमेत आपल्याशी संवाद साधते आणि आपल्यातील स्व कुठेतरी या परिक्रमेत गळून पडतो, असा अनेक परिक्रमा केलेल्या लोकांचा अनुभव आहे. याच अनुभवाने प्रेरित होऊन एका सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या गृहिणीने नर्मदा परिक्रमा करण्याचं ठरवलं. नर्मदा नदीची लांबी उगमापासून ते समुद्राला मिळेपर्यंत साधारण १३२७ किलोमीटर आहे. पण नदीवर बांधलेल्या धरणांमुळे तिचं पाणलोट क्षेत्र हे जवळपास १ लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड आहे. त्यामुळेच नर्मदा परिक्रमा ही जवळपास ३५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची आहे. तर हीच परिक्रमा करताना आयुष्यामधील एका वेगळ्या अनुभवाला सामोरं गेलेल्या त्या गृहिणीने या परिसराचा कायापालट आपल्या परीने करण्याचा निश्चय केला आणि तो पूर्णत्वाला नेताना कित्येक मुलांच्या आयुष्यात एक आशेचा किरण आणला. त्या गृहिणी म्हणजेच नर्मदालय संस्था स्थापन करणाऱ्या शिक्षणदूत "भारती ठाकूर". 

एका मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटूंबातून आलेल्या भारती ठाकूर यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली. आधीपासून भटकंती आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या त्या, नाशिकच्या संरक्षण खात्यात नोकरी करत होत्या. जंगलाची ओढ त्यांना होतीच, त्यातूनच नर्मदा परिक्रमेबद्दल त्यांच्या मनात कुतूहल होतं. आपल्या त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवताना त्यांनी जवळपास ३५०० किलोमीटरची नर्मदा परिक्रमा ४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या काळात केली. या परिक्रमेत आलेल्या अनुभवांनी आणि त्या परिसरात जाणवलेल्या खऱ्या आयुष्याचं रूप बघून त्या कुठेतरी आत अस्वस्थ झाल्या. आजवर सुखवस्तू आयुष्य जगलेल्या त्यांना नर्मदेच्या परिसरात शिक्षणाबद्दल लोकांमध्ये असलेली अनास्था आणि शिक्षणव्यवस्थेची हलाखीची स्थिती बघून या लोकांसाठी काही करण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी पक्की केली. 

स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा आणि त्यांनी आयुष्यात अंगिकारलेल्या आदर्श तत्त्वांचा प्रभाव भारती ठाकूर यांच्यावर आधीपासून खूप होता. त्यांच्या गुरूंनीसुद्धा त्यांना 'मातृभूमी ही देव असते, तेव्हा तिची सेवा कर' असा सल्ला दिला. तिकडून सुरू झाला एक बदल घडवणारा प्रवास. २००९ साली सरकारी नोकरीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नर्मदा माई ज्या मध्यप्रदेश राज्यामधून जास्ती काळ वाहते, त्याच मध्य प्रदेशातील निमाड प्रांतातील मंडलेश्वर येथे भाड्याने खोली घेऊन मंडलेश्वर ते लेपा असा जाऊन येऊन रोज १६ किमीचा पायी प्रवास करायला लागल्या. लेपा गावातील मुलांना शिकवू लागल्या. मुळातच शिक्षणाबद्दल या भागात खूप अनास्था होती. त्यामुळे आधी शिक्षणाचं महत्व पालकांना समजावून देऊन मग विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू झाली. सुरवातीला अवघ्या ६ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता १७०० पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. एकेकाळी ५० मधून २ विद्यार्थी शालेय परीक्षेत पास होत असत, पण आज या भागातील निकाल १००% लागतो. या भागातील मुलांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे शिक्षणासोबत मुलांना रुचि वाटावी म्हणून सकस माध्यान्ह भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. २०१० मध्ये आपल्याच समविचारी लोकांना सोबत घेऊन त्यांनी Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A.) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. 

'नर्मदा' या संस्थेच्या माध्यमातून भारती ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागात खरे विद्यार्थी घडवायला सुरूवात केली. अभ्यासासोबत खेळ, पर्यावरण, संगीत ते अगदी गोशाळेचे धडे ही मुलं गिरवायला लागली. पुस्तकी कारकून बनवण्यापेक्षा संपूर्ण विद्यार्थी घडवण्याचं कार्य आजतागायत भारती ठाकूर आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. संस्थेमधील फर्निचरपासून सी.सी.टी.व्ही. सिस्टीम, ते ८० देशातील प्रतिनिधींसमोर सादर केलेला सोलार ड्रायरसारखा शोधप्रबंध तसेच संस्थेतील मुलांनी बनवलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू आणि कपडे यांची विविध ठिकाणी प्रदर्शने भरवून विद्यार्थाना आणि संस्थेला स्वयंपूर्ण पद्धतीने कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय त्या चालवत आहेत. भारती ताईंनी त्यांच्या पायी परिक्रमेतील अनुभवांवर आधारित "नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा" या नावाचे खूप छान पुस्तकही लिहीले आहे.

नर्मदा माईच्या कृपेने सुरू झालेला 'नर्मदालाय' या संस्थेचा प्रवास अनेक निराधार मुलांचा जीवनाचा आधार आज बनला आहे. आपलं सुखवस्तू आयुष्य बाजूला ठेवत नर्मदा माईच्या शिकवणीला आत्मसात करून समाजाच्या सुख सोयींपासून कोसो लांब असणाऱ्या वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणलं आहे. असं करताना एका नवीन पिढीच्या जडणघडणीची जबाबदारी शिक्षकदूत म्हणून स्वीकारत समाजात आणि समाजाच्या मानसिकतेत बदल घडवणाऱ्या दुर्गाशक्ती भारती ठाकूर यांच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढल्या प्रवासाला खूप शुभेच्छा! 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 11 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ सहावं पान... विनीत वर्तक ©

#दुर्गाशक्ती_२०२१ सहावं पान... विनीत वर्तक ©

भारत हा जवळपास १३५ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येची खायची गरज पुरवण्यासाठी लागणारं अन्नधान्य पिकवण्यासाठी भारतासारख्या कृषिप्रधान देशाला पाण्याची मोठी गरज लागते. भारतातील ६०% जमिनीमधील पाण्याचा साठा हा संपलेला आहे किंवा त्या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, अश्या ठिकाणी पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सगळ्या शेतकरी वर्गाची दरोमदार असते ती पावसाच्या पाण्यावर. भारतातील ७०% पेक्षा जास्त शेतीसाठी लागणारे पाणी हे भारतात मौसमी वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसामुळे मिळत असते. त्यामुळेच पाऊस कसा पडणार यावर भारतातील शेती आणि एकूणच संपूर्ण आर्थिक क्षेत्राची वाटचाल अवलंबून असते. या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक वर्षी मौसमी पाऊस कसा पडणार यावर संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले असते. 

भारतात पडणारा पाऊस ज्या मौसमी वाऱ्यांमुळे पडतो त्याचं भविष्य वर्तवणं हे सगळ्यांत कठीण काम आहे असं जगातील संशोधक उघडपणे मान्य करतात. कारण या मौसमी वाऱ्यांची निर्मिती, त्यांचं भारतीय उपखंडावर होणार वहन या सर्वच गोष्टी अनेक इतर गोष्टींशी निगडीत आहेत. भारतातील पावसाचं भविष्य भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असल्याने या विषयावर संशोधन करून भारतातील पावसाचा योग्य रीतीने वेध घेण्यासाठी बहुमूल्य योगदान भारतातील एका स्त्री वैज्ञानिकेनं दिलेलं आहे. आजवर शिकत आलेल्या आणि आपल्याला माहित असलेल्या माहितीला छेद देऊन त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली, ज्यामुळे भारतातील मौसमी पावसाचा अंदाज बांधणं अधिक सोप्पं झालं. तसेच वर्तवलेल्या अंदाजाचे ठोकताळेही बरोबर येऊ लागले. योग्य अंदाजामुळे शेतीची कामं योग्य रीतीने करता येऊ लागली. या सर्वांचा फायदा शेतकरी आणि पर्यायाने भारताच्या आर्थिक विकासाला झाला. भारताच्या मौसमी पावसाच्या भविष्य वेध घेण्याच्या वैज्ञानिक पद्धतीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या दुर्गाशक्ती आहेत 'डॉक्टर सुलोचना गाडगीळ'.   

जगातील पावसासंदर्भात संशोधनात अग्रणी असलेल्या डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांचा जन्म पुण्यात १९४४ साली झाला. त्यांचे आजोबा हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी नेते होते तर त्यांचे वडील एक प्रथितयश डॉक्टर होते. शिक्षणाचं बाळकडू त्यांच्याकडे आपल्या कुटुंबाकडूनच आलं. त्यांनी आपलं पदवी शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केलं. तिकडेच त्यांची ओळख माधव गाडगीळ यांच्याशी झाली. पुढे त्यांचं लग्न झालं. सुलोचना आणि माधव गाडगीळ दोघांनाही जगातील प्रतिष्ठित अश्या हार्वर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. तिकडेच दोघांनी आपलं पुढलं शिक्षण पूर्ण केलं. १९७१ ला भारतात परत आल्यावर त्यांनी देशातील पावसाचा अभ्यास करणाऱ्या भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे इकडे आपलं संशोधन सुरू केलं. नंतर त्यांची नियुक्ती Centre for Atmospheric and Oceanic Sciences (CAOS) इथे झाली. 

आत्तापर्यंत भारतामधे दरवर्षी पाऊस घेऊन येणाऱ्या मौसमी वाऱ्यांवर पाऊस अवलंबून असतो असं संशोधन आणि एक जनसामान्य प्रवाह होता. तसेच या वाऱ्यांच्या निर्मितीत पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या 'एल निनो'ची मोठी भूमिका आढळून येते. ज्यावर्षी 'एल निनो'चा प्रभाव जास्ती त्यावर्षी भारतात दुष्काळ पडतो. पण या थेअरी वरून बांधलेले अंदाज अनेकदा चुकत असल्याचं सिद्ध होत होतं. म्हणजेच अजून अश्या काही अदृश्य गोष्टी होत्या ज्या भारतातील पावसाला आणि त्याच्या प्रवासात प्रमुख भूमिका बजावत होत्या. डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी एल निनो शिवाय भारताच्या मौसमी पावसात तयार होणाऱ्या ढगांची भूमिका निर्णायक असल्याचं संशोधनाने सिद्ध केलं. डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी अशी थेअरी मांडली की भारतात ज्या ४ महिन्यात मौसमी पाऊस पडतो त्याकाळात हिंद महासागराच्या पूर्व आणि पश्चिम अश्या दोन्ही भागात खूप जास्ती प्रमाणावर ढगांची निर्मिती होत असते. ज्यावेळेस पश्चिम भागात पूर्व भागापेक्षा जास्ती ढगांची निर्मिती होते त्या काळात भारतात पावसाचे प्रमाण सामान्य राहते. ज्यावेळेस पूर्व भागात जास्ती प्रमाणात ढग तयार होतात त्यावेळेस ते पावसाच्या प्रवासाला बाधक ठरतात. 

डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी मांडलेल्या थिअरीला Equatorial Indian Ocean Oscillation, इक्विनो असं म्हटलं गेलं. एल निनो आणि इक्विनो यांच्यामधील नातं आपण जर दरवर्षी सप्रमाणात मांडू शकलो तर भारतात त्या वर्षी होणाऱ्या पावसाचा अंदाज अचूकतेने बांधू शकतो. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आणि अभ्यासानंतर भारतातल्या पावसाच्या अंदाजाची अचूकता वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या अंदाजानुसार शेतकरी आपल्या शेतीची लागवड करू शकला आहे. भारतातील पाऊस अजून अनेक घटकांवर अवलंबून आहे. वृक्षतोड, प्रदूषण, वाढती मनुष्यवस्ती अश्या सगळ्याच गोष्टी त्याच्यावर प्रतिकूल परिणाम करत असतात. पण पावसाचा थोडाफार अंदाजसुद्धा भारतासारख्या शेतीप्रधान देशात अतिशय महत्वाचा ठरतो. त्यामुळेच डॉक्टर सुलोचना गाडगीळ यांनी भारताच्या मौसमी पावसाला समजून घेण्यात दिलेलं योगदान खूप मोठं आहे. 

भारतात पडणाऱ्या पावसाचा योग्य अंदाज बांधणारी यंत्रणा निर्माण करून शेतकऱ्यांचं आयुष्य उज्ज्वल करणाऱ्या वैज्ञानिक, संशोधिका डॉक्टर सुलोचना गाडगीळ दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत. त्यांच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि पुढल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday, 10 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ पाचवं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ पाचवं पान... विनीत वर्तक ©

भारतीय स्त्रीने जी काही स्वप्नं बघायची असतात ती लग्नाआधी, लग्नानंतर तिचे पंख छाटले जातात असा काहीसा अनुभव अनेक भारतीय स्त्रिया आपल्या आयुष्यात घेत असतात. लग्नानंतर पतीची आणि त्याच्या कुटुंबाची सेवा आणि मुलं यामधेच बहुतांश स्त्रियांचं आयुष्य अडकून पडतं. भारतातील पुढारलेल्या शहरातील स्त्रिया जे स्वप्न बघू शकणार नाहीत, ते स्वप्न भारताच्या अतिदुर्गम भागातील एका स्त्रीने बघितलं. नुसतं बघितलं नाही तर ते तब्बल ५ वेळा प्रत्यक्षातही उतरवलं. ज्यावेळी हे स्वप्न बघितलं तेव्हा ती लग्न होऊन दोन मुलींची आई होती, पण आपल्या सगळ्या भूमिका मग त्या एक बायको म्हणून असो वा मातृत्वाच्या असो, त्या पूर्ण करून भारताचा तिरंगा जगातल्या सगळ्यांत उंच टोकावर तब्बल ५ वेळा फडकवण्याचा पराक्रम तिने केला. 

आयुष्यात एकदा तरी जगातील सगळ्यांत उंच शिखर म्हणजेच माउंट एव्हरेस्ट ज्याची समुद्रसपाटीपासून उंची तब्बल ८८४८.८६ मीटर आहे, ते सर करण्याचं स्वप्न जगातील प्रत्येक गिर्यारोहक बघत असतो. हे स्वप्न लग्न झालेल्या आणि पासांग ड्रोमा आणि तेनझिंग न्यीडदोन या दोन मुलींची आई असलेल्या एका भारतीय स्त्रीने बघितलं आणि प्रत्यक्षात एकदा नाही तर तब्बल पाच वेळा साकार केलं, ती स्त्री म्हणजे पद्मश्री 'डॉक्टर अंशू जमसेनपा'. एखाद्या कलाकाराच्या मुलाने पहिल्यांदा बोलण्याची बातमी करणाऱ्या आणि ती चवीने वाचणाऱ्या भारतीयांसाठी खरे तर हे नाव नवीन असेल. डॉक्टर अंशू जमसेनपा या भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश इथल्या. त्यांचे वडील इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये ऑफिसर होते. त्यांचं लग्न त्सेरिंग वांगे यांच्याशी झालं, जे की अरुणाचल प्रदेश माउंटेनिअरिंग एन्ड ऍडव्हेंचर स्पोर्ट असोसिएशनशी निगडित होते. या स्वप्नाचे धुमारे त्यांच्या मनात फुटले ते आपल्या नवऱ्यामुळेच. याच संस्थेमध्ये त्यांनी गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे गिरवायला सुरूवात केली. तीन वर्षं गिर्यारोहणाचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी पहिल्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट दहा दिवसाच्या अंतराने दोनदा सर केलं. २०१३ साली पुन्हा एकदा त्यांनी माउंट एव्हरेस्टला गवसणी घातली. 

३ वेळा गवसणी घातल्यानंतरसुद्धा त्यांचं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नव्हतं. जगात कोणत्याच स्त्री गिर्यारोहकाला जे आजवर जमलं नव्हतं ते लक्ष्य त्यांना गाठायचं होतं. 'कमीत कमी वेळात माऊंट एव्हरेस्टला दोन वेळा गवसणी घालण्याचं स्वप्न'! जगातील पुरुष असो वा महिला गिर्यारोहक जिकडे आयुष्यात एकदातरी जगाच्या सर्वांत उंच टोकावर जाण्याचं स्वप्न बघतात, तिकडे डॉक्टर अंशू जमसेनपा यांच्या मनात वेगळं लक्ष्य होतं. ते घेऊन त्यांनी पुन्हा एकदा २०१७ साली माऊंट एव्हरेस्टकडे कूच केलं. अतिशय प्रतिकूल वातावरण असतानासुद्धा खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी १६ मे आणि २१ मे २०१७ या दिवशी भारताचा तिरंगा माऊंट एव्हरेस्टवर फडकावला. २०११ ला २ summit मधील अंतर १० दिवसांचं होतं ते २०१७ साली फक्त ११८ तास १५ मिनिटांचे होते. जे जगात कोणत्याच स्त्री गिर्यारोहकाला जमलं नाही ते डॉक्टर अंशू जमसेनपा यांनी करून दाखवलं. या चार दिवसात चार गिर्यारोहकांना आपल्या जीवाला मुकावं लागलं तर इतर अनेकांना फ्रॉसबाईटचा सामना करून चढाई करण्याचा विचार सोडून द्यावा लागला. त्यावेळेस भारताच्या या दुर्गाशक्तीने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारताचा तिरंगा दोन वेळा जगातील सर्वोच्च शिखरावर फडकवण्याचा पराक्रम केला. 

डॉक्टर अंशू जमसेनपा यांचा त्यांच्या साहसासाठी २०२० साली भारत सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. अर्थात असा भीमपराक्रम करणाऱ्या डॉक्टर अंशू जमसेनपा मात्र खेदाने भारतीयांच्या नजरेत कधी आल्या नाहीत. इतका मोठा सन्मान मिळाल्यावरही त्यांच्यासाठी खरा गौरवाचा क्षण होता, त्या २०१७ साली मोहिमेवरून घरी परत आल्यानंतर त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांना सांगितलेले शब्द !...

"“Mom, you have done us proud and the whole country proud,” That remains my biggest reward,”... Dr. Anshu Jamsenpa

डॉक्टर अंशू जमसेनपा यांनी भारतातील सर्व स्त्रियांना संदेश दिला आहे तो त्यांच्या शब्दात, 

"The first thing to believe is not to think about gender and differentiate any task based on gender. The most important thing which made my climbs possible was mental strength."

डॉक्टर अंशू जमसेनपा यांचा प्रवास भारतातील अनेक स्त्रियांना नक्कीच प्रेरणा देईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि त्यांचं हे दुर्गाशक्तीचं रूप हे 'भारतीय स्त्री चूल आणि मूल या आपल्या जबाबदाऱ्या सांभाळूनही एव्हरेस्टसारखी लक्ष्यं सुद्धा साध्य करू शकते' हा संदेश सुद्धा जागतिक पातळीवर देणारं ठरलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा !!

जय हिंद !!!      

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 





  

Saturday, 9 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ चौथं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ चौथं पान... विनीत वर्तक ©

जन्म मृत्यूचा फेरा कोणाला चुकलेला नाही. आयुष्य जगत असताना अनेकदा आपण हे विसरून जातो, पण नियती कधीतरी खडबडून आपल्याला जागं करते आणि आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची जाणीव करून देते, पण एका सरळ रस्त्याने सुरळीत चालू असलेल्या आयुष्यात जेव्हा अशी अनपेक्षित वळणं येतात तेव्हा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. आपलं माणूस अचानक आपल्यातून निघून जाणं हा धक्का पचवणं खूप कठीण असतं, पण अश्या प्रसंगांना धीराने सामोरं जाऊन पुन्हा एकदा स्वतः उभं राहणं आणि आपल्यासोबत उद्योगाचा उत्कर्ष करून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत जाऊन पोहोचणं आणि त्यानंतर या सगळ्या जबाबदाऱ्यांतून स्वतःला मुक्त करत समाजकल्याणाच्या कामासाठी आयुष्य वेचणं, हे करून दाखवलं आहे एका भारतीय उद्योजक स्त्रीने ज्यांचं नाव आहे अर्नवाझ आगा म्हणजेच 'अनु आगा'. 

३ ऑगस्ट १९४२ रोजी पारशी कुटुंबात अनु आगा यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपलं पदवयुत्तर शिक्षण Tata Institute of Social Sciences (TISS) इथून पूर्ण केलं. आपल्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या रोहिंटन आगा यांनी त्यांच्या मनात घर केलं ते कायमचं. १९६५ साली ते दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. राजा-राणीचा सुखाचा संसार चालू झाला. त्यांना मेहेर नावाची एक मुलगी आणि कुरुष नावाचा मुलगा झाला. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या वॅनसॅन इंडिया या कंपनीची सूत्रं त्यांच्या नवऱ्याकडे म्हणजेच रोहिंटन आगा यांच्याकडे आली. १९८० ला रोहिंटन आगा यांनी कंपनीचं नाव बदलून तिचं नाव ठेवलं 'थरमॅक्स'. १९८० साली पुण्यात मुख्यालय असलेल्या कंपनीने वेस्ट मॅनेजमेंट, हिटिंग आणि कुलिंग अश्या क्षेत्रांत भरारी घेतली. एक आदर्श कुटुंब असा प्रवास सुरू असणाऱ्या आयुष्यात अचानक एक वळण आलं. 

१९९५ साली थरमॅक्स कंपनीने आपली नोंदणी मुंबई शेअर बाजारात केली. या काळात अनु आगा थरमॅक्सच्या ह्युमन रिसोर्सच्या अध्यक्षा होत्या. १९९६ साली युरोपातून आपल्या मुलीला प्रसूतीकाळात मदत करून त्या मुंबईत परतत होत्या. त्यांना मुंबई विमानतळावर भेटण्यासाठी रोहिंटन आगा पुण्यातून मुंबईकडे निघाले होते. पण नियतीच्या मनात वेगळं काहीतरी होतं. रस्त्यात असताना आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच वर्षापूर्वी पब्लिक झालेल्या थरमॅक्सचा बाजारभाव भारतीय आर्थिक क्षेत्रांत झालेल्या बदलांमुळे घसरून ४०० रुपयांपासून ३६ रुपयांवर आला होता. त्यात कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर कंपनीचं भवितव्य अधांतरी होतं. सरकारच्या नियमांप्रमाणे रिक्त झालेलं पद भरण्यासाठी फक्त ४८ तासांचा अवधी होता. आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या आणि आपल्या नवऱ्याने वाढवलेल्या या वृक्षाची जबाबदारी अचानक अनु आगा यांच्या खांद्यावर आली. एकीकडे जोडीदाराची तुटलेली साथ तर दुसरीकडे आर्थिक चक्रीवादळात सापडलेला उद्योग अश्या चक्रव्यूव्हात अनु आगा यांनी थरमॅक्सची सूत्रं आपल्या हाती घेतली. 

आपल्या जोडीदाराच्या जाण्याच्या धक्क्यातून त्या सावरत नाहीत तोच पुन्हा एकदा नियतीने त्यांच्या आयुष्यात एक असं वळण आणलं, ज्याचा कोणीच विचार केला नव्हता. एका अपघातात त्यांचा २५ वर्षांचा मुलगा आणि सासूबाई त्यांच्यापासून काळाने हिरावून नेले. पुन्हा एकदा उभं केलेलं सगळं कोलमडलं. आयुष्यात सगळ्यांत जवळच्या दोन व्यक्ती नियतीने त्यांच्यापासून हिरावून घेतल्या होत्या. 'मीच का?' या प्रश्नाचं उत्तर त्यांना विपश्यनेतून मिळालं. नियती जे समोर घेऊन येते ते स्वीकारण्याचे बळ त्यांना विपश्यनेनं दिलं. यातून सावरत त्यांनी पुन्हा एकदा थरमॅक्सकडे लक्ष केंद्रित केलं. पुण्यातून सुरू झालेल्या थरमॅक्सचा प्रवास त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात नेला. २००४ साली जेव्हा अनु आगा यांनी निवृत्ती घेतली तेव्हा थरमॅक्सची वार्षिक उलाढाल १३०० कोटीच्या पुढे होती आणि अनु आगा पहिल्या ४० श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत पोहोचल्या होत्या. आपल्या मुलीकडे थरमॅक्सची जबाबदारी देऊन त्यांनी समाजकल्याणात आपलं लक्ष वळवलं. 

'Teach for India' आणि 'आकांक्षा' तसेच इतर अनेक समाजसेवी संस्थांच्या माध्यमांतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी लक्ष, वेळ आणि पैसा दान करण्यास सुरूवात केली. २०१२ मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांची नियुक्ती राज्यसभेवर केली. २०१२ ते २०१८ त्या राज्यसभेच्या सदस्य राहिल्या. तसेच National Advisory Council च्याही त्या सदस्य राहिल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना २०१० साली पद्मश्री सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. आजही निवृत्त झाल्यावर त्यांनी आपलं समाजससेवेचं व्रत अविरत सुरू ठेवलं आहे. आज थरमॅक्सची उलाढाल ४७०० कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे. 

नियतीच्या त्या एका वळणावर आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जात आपल्या उद्योगाला अटकेपार नेणाऱ्या अनु आगा दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत. भारतीय स्त्री किती कणखर असू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'अनु आगा'. अवेळी आपल्या जोडीदाराची सुटलेली साथ आणि आपल्या तरुण मुलाचा अकाली मृत्यू असे कठीण धक्के पचवत त्यांनी उद्योजक म्हणून जागतिक पातळीवर आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. हे करत असताना समाजाच्या तळागाळातील मुलांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी त्या आजही मदत करत आहेत. त्यांच्या या कार्यास माझा कडक सॅल्यूट आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday, 8 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ तिसरं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ तिसरं पान... विनीत वर्तक ©

पार, बोगी, ईगल, एस असे शब्द आजही भारतीयांसाठी नवीन आहेत. हे शब्द कशाशी निगडीत आहेत, इकडून आपली सुरूवात आहे. तर हे शब्द आहेत अतिशय निरस वाटणाऱ्या गोल्फ या खेळातील. स्कॉटलंड इकडे साधारण १५ व्या शतकात हा खेळ खेळायला सुरूवात झाली. हा खेळ पहिल्यापासून श्रीमंत असलेल्या लोकांचा खेळ म्हणून नावारूपाला आला. त्यामुळे भारतासारख्या प्रगतीशील देशात याचा प्रसार तितकासा झाला नाही. १९५५ साली काही गोल्फ खेळणाऱ्या खेळाडूंनी एकत्र येऊन इंडियन गोल्फर युनियनची स्थापना केली. गोल्फचा भारतातील प्रसार तसा जास्त झाला नाही. अर्जुन अटवाल, जीव मिल्खा सिंग आणि अनिर्बन लाहिरी अशी काही मोजकी नावं होती, ज्यांनी भारताचा तिरंगा गोल्फ या खेळात फडकावला. असं असलं तरी क्रिकेटसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या भारतात त्याचा चाहता वर्ग मर्यादित राहिला. मुळात हा खेळ खेळतात कसा? या प्रश्नाचं उत्तर भारतात अजूनही अनेकांना माहीत नाही. अश्या भारतातून कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नसताना एक स्त्री गोल्फ खेळते आणि नुसतं खेळत नाही तर खेळांचं महाकुंभ समजलं जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकवते, ती म्हणजे भारताची अव्वल गोल्फर 'अदिती अशोक'.
२०२१च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जिकडे सगळ्या भारतीयांचं लक्ष इतर खेळांकडे होतं आणि त्यात पदक मिळेल यासाठी अनेक भारतीय त्या स्पर्धांना टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघत होते. पण अचानक या सगळ्यांत गोल्फसारख्या स्पर्धेत भारतीय गोल्फर अदिती अशोकचं नाव पहिल्या तीन स्पर्धकांत दिसायला लागलं आणि कुठेतरी भारतीयांच्या पदकाच्या आशा पल्लवित होऊ लागल्या. लोक 'अदिती अशोक'चा खेळ बघायला तर लागले, पण गोल्फ खेळतात कसं हेही माहीत नसलेला भारतीय प्रेक्षक तिला जे विचारत होता, त्याबाबतीत अदिती अशोक लिहीते,
“A lot of people were trying to figure out what golf was, so that they could understand how I was playing and if I had a chance to win a medal,”
२०२१च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्षुल्लक फरकाने गोल्फर 'अदिती अशोक'चं पदक हुकलं. या स्पर्धेत ती चौथ्या स्थानावर राहिली, पण पावसामुळे उशीर झालेल्या फायनल स्पर्धेचे शेवटचे क्षण अनुभवण्यासाठी अनेक भारतीयांनी आपल्या मोबाईलमधील अलार्म लावला होता आणि मला वाटते यातच तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं असेल. कारण भारतासारख्या पुरुषप्रधान देशात आणि त्यात पुरुषप्रधान असणाऱ्या गोल्फसारख्या खेळात 'अदिती अशोक'ने आपल्या खेळाने स्वतःचं स्थान निर्माण केलं, ही गोष्ट येणाऱ्या काळात भारताच्या खेळ संस्कृतीला कलाटणी देणारी असणार आहे यात शंका नाही.
'अदिती अशोक'चा हा प्रवास सोप्पा नव्हता. वयाच्या ५ व्या वर्षी तिने गोल्फ खेळायला सुरूवात केली, ज्यावेळेस बंगलोरसारख्या शहरात फक्त तीन गोल्फ कोर्स उपलब्ध होते. गोल्फशी तिचं नातं जुळलं ते कायमचं. वयाच्या १२व्या वर्षी तिने एशिया पॅसिफिक स्पर्धेत भाग घेतला. तर वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी तिने व्यावसायिक गोल्फ स्पर्धा जिंकली. Lalla Aicha Tour School जिंकत तिने आपलं लेडीज युरोपियन टूरमधील स्थान पक्कं केलं. २०१६ साली तिने लेडीज युरोपियन टूर जिंकत क्रिकेट खेळणाऱ्या भारतात इतिहास घडवला. गोल्फ खेळात अजिंक्य राहणारी पहिली भारतीय महिला ठरली. २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली सगळ्यांत कमी वयाची गोल्फपटू होती. २०१७ साली अदिती अशोकला Ladies Professional Golf Association (LPGA) अश्या जगातील प्रतिष्ठित अश्या गोल्फ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत प्रवेश मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
२०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ४१व्या स्थानावर राहिलेल्या अदिती अशोकने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या नंबरपर्यंत मजल मारली. या ५ वर्षांत अदिती अशोकला कोणीच कोच नव्हता. तिने स्वतःवर स्वतः मेहनत घेऊन आपल्या खेळाचा दर्जा उंचावत नेला. २०१६ मध्ये तिचे वडील तिचे कॅडी राहिले होते तर २०२०च्या टोकियो स्पर्धेत तिच्या आईने ही जबाबदारी पार पाडली. गोल्फ या खेळात खेळाडू सोबत कॅडीची भूमिका अतिशय महत्वाची असते. अदितीच्या मते तिची आईच तिच्यासाठी आदर्श आहे. एकतर लहान वयात तिला आवडलेल्या क्षेत्रात तिने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन तर दिलेच पण त्यापलीकडे कॅडीच्या भूमिकेत राहून ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत अदितीच्या प्रवासात तिचं सारथ्य केलं. गेल्या ५ वर्षांत अदिती अशोकने गोल्फ या खेळात गाठलेल्या उंचीची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेशिवाय व्यावसायिक गोल्फ स्पर्धेतही अदिती अशोकने भारताचा तिरंगा तेजाने फडकवत ठेवला आहे. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी तिने भारतात गोल्फ या खेळात गाठलेली उंची कौतुकास पात्र आहे. यापलीकडे आपल्या खेळाने तिने भारतातील अनेक मुलींना गोल्फसारख्या खेळात करिअर करता येऊ शकते हा नवीन आत्मविश्वास दिला आहे. २१व्या शतकातील भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना 'अदिती अशोक'ने आपल्यात असलेल्या दुर्गाशक्तीचं एक रूप समस्त भारतीयांपुढे ठेवलं आहे. तिच्या या प्रवासाला माझा कडक सॅल्यूट आणि पुढल्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा !
फोटो शोध सौजन्यः- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




 

Thursday, 7 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ दुसरं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ दुसरं पान... विनीत वर्तक ©

१९५९ चं वर्षं होतं. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये आजही चाळसंस्कृती शाबूत होती. घराला घरपण देणारी माणसं शेजारी पाजारी असायची. एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण कधी खिडकीमधून तर कधी दरवाजातून तर कधी गच्चीवर भेटून होत असे. अश्या एका संध्याकाळी मुंबईच्या गिरगाव भागात एकेमकांच्या शेजारी राहणाऱ्या सात बायका बिल्डिंगच्या गच्चीवर भेटल्या होत्या. बघायला गेलं तर भेटीला काही निमित्त नव्हतं पण विचार केला तर त्या भेटीत खूप काही दडलं होतं. कदाचित त्यांनाही माहित नव्हतं की ही भेट भारताच्या सहकार क्षेत्राला आणि हजारो भारतीय स्त्रियांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे. याच भेटीत सहकार क्षेत्रातील एका उद्योगाचा श्रीगणेशा झाला. तो उद्योग म्हणजेच 'श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड'. ज्या उद्योगानं भारताच्या स्त्रियांचं आयुष्य तर बदलून टाकलंच पण आजही जगात अभ्यासाचा विषय असलेल्या या उद्योगाने आपले पंख जगातील २५ पेक्षा जास्ती देशांत पसरले आहेत. भारतीय दुर्गाशक्तीचं प्रतीक असणाऱ्या या उद्योगाची सुरूवात केली होती 'लिज्जत सिस्टर्स'नी. त्यातील एक होत्या 'जसवंतीबेन जमनादास पोपट'. 

भारतीय संस्कृतीत आहाराला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं आहे, त्यामुळे भारतीयांच्या आहारातील प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं स्थान आहे. चपाती, भाजी, भात, आमटी, डाळ ते अगदी कोशिंबीर आणि लोणच्यापर्यंत प्रत्येक पदार्थाची विविध रूपं आणि ते बनवण्याच्या पद्धती आज गेली कित्येक पिढ्या परंपरेने चालत आलेल्या आहेत. त्यातील एक घटक म्हणजेच 'पापड'. काळाच्या ओघात पापड घरी बनवणं शक्य नसल्याने ते बाजारातून खरेदी केले जातात. बाजारात पापड म्हटलं की एकच नाव समोर येतं ते म्हणजे 'लिज्जत'. लिज्जत ज्याचा अर्थ होतो 'चवदार', हे नाव आता पापडापुरतं मर्यादित नाही तर तो आता एका आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. फक्त ८० रुपये भांडवल टाकून गिरगावातल्या एका गच्चीवर ७ भारतीय महिलांच्या भागीदारीने सुरू झालेला उद्योग आता तब्बल १६०० कोटी रुपयांपेक्षा जास्ती वार्षिक उलाढाल करतो. आज भारतातील १७ राज्यांच्या ८५ शाखांमधून तब्बल ४५,००० भारतीय स्त्रिया आज लिज्जतमुळे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, ज्या जवळपास ४८० कोटी पापडांची निर्मिती करतात जे भारतासोबत जगातील २५ पेक्षा जास्त देशांत चवीने खाल्ले जातात. 

'जसवंतीबेन जमनादास पोपट' या 'लिज्जत'च्या त्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या प्रवासाच्या साक्षी आहेत. संपूर्ण लिज्जत ब्रँड आपल्या मालकीचा करण्याची संधी असतानासुद्धा वयाच्या ९१ व्या वर्षीसुद्धा आपल्या तत्त्वाला त्यांनी जपलं आहे. याच तत्त्वामुळे 'लिज्जत' आज आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे ज्यावर करोडो लोकं डोळे बंद करून विश्वास ठेवतात. व्यवहार हा खरा, सच्चा आणि सचोटीने केला पाहिजे आणि दर्जा आणि गुणवत्ता यावर कधीच तडजोड न करता ग्राहकांचं समाधान हीच आपली पावती हे तत्त्व अंगीकारत ८० रुपयांपासून सुरू झालेला व्यवहार आज १६०० कोटींचा झाल्यावरही आपली तत्त्वं राखून आहे. यामागे आहे त्या दुर्गाशक्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती, खरेपणा आणि प्रचंड मेहनत घेऊन आपल्यासोबत प्रत्येक भारतीय स्त्रीला आत्मनिर्भर बनवत तिला तिच्या पायावर उभी करण्याची तळमळ.    

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड ही भारतीय स्त्रियांची सगळ्यांत जुनी आणि सगळ्यांत पहिली सहकार व्यवस्था आहे जिचा अभ्यास आज मॅनेजमेंट मध्ये केला जातो. कश्या पद्धतीने पापडाचा दर्जा, त्याचं वितरण, त्याची व्यवस्था, नफा-तोटा, अंदाजपत्रक आणि ताळेबंद कोणीही मालक नसताना कसा काय फक्त विश्वासाने वर्षानुवर्षे व्यवस्थित पूर्ण केला जातो, वन रूम मध्ये राहणाऱ्या, सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या आणि अगदी तुटपुंजं शिक्षण असलेल्या भारतीय महिलांनी कश्या पद्धतीने सहकार क्षेत्रात क्रांती घडवून आणली, याचा अभ्यास केला जातो. जसवंतीबेन जमनादास पोपट यांनी शिक्षण नसतानाही व्यवहाराची काही साधी तत्त्वं जपली त्यामुळेच आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. तो झाल्यावरही नफाखोरी करून फक्त स्वतःचा फायदा त्यांनी केला नाही तर भारतातील जास्तीत जास्त स्त्रियांना यात सहभागी करून घेतलं. 

'जसवंतीबेन जमनादास पोपट' यांच्या सहकार क्षेत्रातल्या उत्तुंग कार्यासाठी भारत सरकारने त्यांचा २०२१ साली पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला. एक भारतीय स्त्री ठरवलं तर आपल्या शिलकीतून घराला हातभार लावण्यासाठी सहकार क्षेत्रातील एक उत्तुंग उद्योग उभारून आपल्या सोबत हजारो भारतीय स्त्रियांचं आयुष्य सुखकर करू शकते. आपल्या तत्त्वांना वयाच्या ९१ व्या वर्षी पाळत आणि ती आपल्या पुढल्या पिढीकडे सुपूर्द करत सहकार क्षेत्रात मापदंड ठरलेल्या दुर्गाशक्ती जसवंतीबेन जमनादास पोपट यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्याच्या पुढल्या आयुष्यासाठी खूप खूप 

शुभेच्छा!    

जय हिंद !!!      

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday, 6 October 2021

#दुर्गाशक्ती_२०२१ पहिलं पान... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती_२०२१ पहिलं पान... विनीत वर्तक ©


२०१९ च्या वर्षातला शेवटचा महिना सुरू होता. संपूर्ण जगात लोक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या तयारीत व्यस्त होते. त्याचवेळेस जगाच्या एका कोपऱ्यात संपूर्ण जगाचं स्वरूप बदलवून टाकणाऱ्या एका विषाणूने आपलं अस्तित्व दाखवायला सुरूवात केली. हुबाई या चीनमधल्या प्रांतातील वुहान या शहराच्या एका मच्छीबाजारात एका वेगळ्या विषाणूने आपलं खातं उघडलं. साम्यवादी असणाऱ्या चीनने याचं अस्तित्व लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण या विषाणूने हळुहळू आपला प्रसार वाढवायला सुरूवात केली. २०२० हे वर्षं उजाडलं ते नवीन स्वप्नांसोबत जगाचं भविष्य बदलवणाऱ्या या खतरनाक विषाणूच्या जागतिक वर्दीने. बघता बघता या विषाणूने जगाच्या २१५ पेक्षा जास्त देशांत जवळपास २३ कोटी लोकांना गेल्या दोन वर्षांत लक्ष्य केलं असून हा लेख लिहेपर्यंत जवळपास ४८ लाख लोकांना आपले प्राण या विषाणूमुळे गमवावे लागले आहेत. 

COVID-19 असं या विषाणूचं नामकरण करण्यात आलं. यातील  'CO' म्हणजे 'कोरोना' तर VI म्हणजे व्हायरस (विषाणू) आणि D म्हणजे डिसीज (आजार) आणि १९ म्हणजे २०१९ साली त्याचं अस्तित्व दिसून आलं. तर या कोरोनाने भारतीयांनाही आपल्या कवेत घेतलं. भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात याचा प्रसार वेगाने झाला. भारतात वैद्यकीय सेवांवर याआधी दुर्लक्ष झालेलं होतं आणि ज्या काही होत्या त्या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीला पुरं पडण्यास संपूर्णपणे अपयशी ठरत होत्या. सप्टेंबर २०२० येईपर्यंत भारतात जवळपास ९० हजार ते १ लाख लोक दररोज कोरोना विषाणूच्या जाळ्यात सापडत होते. वैद्यकीय सेवांवर अतिप्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभर लसीसंदर्भात संशोधन सुरू झालं. नेहमीप्रमाणे जगातील प्रगत देश ही लस शोधणार आणि भारताला नेहमीप्रमाणे प्रगत देशांकडून ती विकत घ्यावी लागणार आणि तोवर किती भारतीय लोकांचे बळी हा विषाणू घेणार असा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात होता. 

८ डिसेंबर २०२० रोजी इंग्लंडमध्ये कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. भारताला पुन्हा एकदा प्रगत देशांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागणार असंच वाटू लागलं होतं, पण हे चित्र बदलून 'ये नया आत्मनिर्भर भारत है' असं चित्र उभं करण्यासाठी भारतातील डॉक्टर, संशोधक आणि लस बनवणाऱ्या कंपन्या या सगळ्या रात्रंदिवस कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीच्या संशोधनावर काम करत होत्या. एप्रिल २०२० मध्येच 'भारत बायोटेक' या हैद्राबाद स्थित कंपनीने आपण कोरोना लसीवर काम करणार असल्याचं जाहीर केलं. मे २०२० मध्ये  Indian Council of Medical Research's (ICMR's) National Institute of Virology ने आपण लसीवर काम करण्यासाठी कोरोनाचे स्टेन देण्याचं मान्य केलं. मग सुरूवात झाली एका कठीण अश्या कामगिरीला, ज्यात जगाची आणि भारताची प्रतिमा बदलविण्याची ताकद होती. अश्या कामगिरीची सूत्रं देण्यात आली 'डॉक्टर सुमती के' यांच्या हाती. तब्बल ६ महिने वेगवेगळ्या चाचण्यांतून पार पडल्यानंतर भारताने ३ जानेवारी २०२१ ला 'कोव्हीशील्ड'सोबत भारताने भारतात निर्माण केलेल्या भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन'ला मान्यता दिली. 

भारत स्वबळावर जगाच्या तोडीस तोड लस बनवू शकतो हा विश्वास भारताला या लसीच्या यशस्वी निर्मितीमुळे आला. १६ जानेवारी २०२१ पासून भारताने 'कोव्हॅक्सिन' लस भारतीयांना द्यायला सुरूवात केली. आज भारतातील ९० कोटींपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण झालेलं आहे. यात सिंहाचा वाटा भारत बायोटेकने निर्माण केलेल्या 'कोव्हॅक्सिन'चा राहिलेला आहे. भारताच्या पंतप्रधानांनी ही लस घेऊन तिच्या क्षमतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं आहे. 'डॉक्टर सुमती के' यांनी जे. एन. यु. दिल्लीमधून लाईफ सायन्स या विषयात डॉक्टरेट मिळवली. भारत बायोटेकमध्ये काम करत असताना त्यांनी चिकनगुनिया आणि झिका विषाणूपासून जीव वाचवणारी लस तयार करण्यात भरीव योगदान दिलेलं आहे. त्यामुळेच भारताचं भवितव्य बदलवणाऱ्या क्रांतिकारी लसीच्या निर्मितीची जबाबदारी 'डॉक्टर सुमती के' यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला सार्थ करताना त्यांनी कोरोना लसीमध्ये भारताला स्वयंपूर्ण करताना करोडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. 

गेली अनेक दशकं चूल आणि मूल यांत रमलेली भारतीय स्त्री आजच्या नव्या भारतात भारतीयांना कोरोनासारख्या महामारीमधून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. नवरात्रात आदिशक्ती म्हणून पूजली जाणारी दुर्गा, तिचं या आत्मनिर्भर नव्या भारताचं प्रतीक म्हणजे 'डॉक्टर सुमती के'. कोरोनाच्या महामारीत भारताला स्वयंपूर्ण करत करोडो भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या दुर्गाशक्तीच्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 4 October 2021

'एव्हरग्रँडे' चिखलात रुतलेला चीन चा पाय... विनीत वर्तक ©

 'एव्हरग्रँडे' चिखलात रुतलेला चीन चा पाय... विनीत वर्तक ©

एव्हरग्रँडे ही चीन ची घर बांधणारी कंपनी सध्या जगभर चर्चेचा विषय आहे. अमेरिकेच्या घरांचा फुगा जसा २००८ साली लेहमन ब्रदर्स च्या रूपाने फुटला आणि त्याचे आर्थिक हादरे संपूर्ण जगाला भोगावे लागले त्याच रस्त्यावर सध्या चीन मधील एव्हरग्रँडे वाटचाल करत आहे. एव्हरग्रँडे ही कंपनी नक्की काय करते? ती दिवाळखोरीच्या वाटेने जाण्यासाठी नक्की असं काय घडलं? या सर्वाचा चीन आणि जगावर काय परिणाम होणार हे जाणून घ्यायची गरज आहे. कोरोना नंतर पुन्हा चीन एव्हरग्रँडे च्या रूपाने जगातील अर्थव्यवस्थांना हादरे देणार असं बोललं जात आहे. एव्हरग्रँडे च्या रूपाने चीन चा एक पाय चिखलात खोल रुतत चालला आहे आणि येणाऱ्या काळात तो चीन च्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीला खीळ ठोकणार आहे. 

एव्हरग्रँडे ही चीन मधील घर, वसाहती यांच बांधकाम करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. १९९७ साली सुरु झालेल्या या कंपनीने अल्पावधीत चीन च्या जवळपास २८० शहरात आपले हातपाय पसरले. या कंपनीने १३०० पेक्षा जास्ती बिल्डिंग आणि वसाहतीचे बांधकाम पूर्ण केलेलं आहे. दोन लाखापेक्षा जास्ती लोक एव्हरग्रँडे कंपनीत नोकरीला आहेत. बांधकाम क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम केल्यावर कंपनीने इतर क्षेत्रात कंपनीने आपला व्यवसाय वाढवला. विमा, चित्रपट, खाद्य अश्या विविध क्षेत्रात कंपनी उतरली. अगदी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती मधे २०१९ ला या कंपनीने शिरकाव केला. पण या सगळ्या छान दिसणाऱ्या चित्राच्या मागे कंपनीने कर्जाचा डोंगर उभा केला होता. २०२१ उजडे पर्यंत कर्जाचा हा डोंगर ३०० बिलियन (३०,००० कोटी) अमेरिकन डॉलर च्या पलीकडे गेला.   कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कंपनीने अजून कर्ज घेण्यास सुरवात केली. जे घर अजून बांधल गेलेलं नाही ते आधीच विकायला सुरवात केली. कर्जाचे पैसे उभे करण्यासाठी कागदावरची ही घरे २०% सवलतीसह ग्राहकांना देण्यास सुरवात केली. तब्बल १५ लाख घरांवर इन्वेस्टर आणि ग्राहकांनी ती बनवली गेली नसताना आधीच एव्हरग्रँडे ला पैसे देऊन मोकळे झाले. 

कर्जाचा हा फुगा कधीतरी फुटणार ही काळ्या दगडावरची रेष होती. २०२१ च्या मध्यावर कंपनीकडे घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नसल्याचं स्पष्ट झालं. २०२२ मधे कंपनीला तब्बल ७.४ बिलियन (७४० कोटी) अमेरिकन डॉलर इतक्या मोठ्या स्वरूपात कर्जाचा हप्ता द्यावा लागणार आहे. पण हे पैसे कुठून आणणार याबद्दल कंपनी उत्तर देण्यास असमर्थ असल्याने कंपनीत गुंतवणूक केलेल्या सर्वानी आपले पैसे डुबण्यापासून वाचवण्यासाठी कंपनी मधून निर्गुंतवणूक करायला सुरवात केली. या कंपनीचा शेअर जवळपास ८५% गडबडला. कंपनीवर दिवाळखोरीचे वादळ घोंगावू लागलं. कंपनीने २५% सवलतीने घर विकण्यास सुरवात केली. पण लोकांचा विश्वास गमावल्यामुळे घराची विक्री पेक्षा ज्यांनी घर घेण्यासाठी पैसे गुंतवले होते त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावायला सुरवात केली आहे. चीन च्या आर्थिक प्रगतीत झटपट पैसे कमावण्यासाठी अनेक चिनी लोकांनी यात आपल्या आयुष्याची कमाई गुंतवली होती. पण त्यांची आयुष्यभराची कमाई आता बुडीत खात्यात जमा होण्याच्या वाटेवर आहे. 

चीन च्या आर्थिक प्रगतीत बांधकाम व्यवसायाचा वाटा जवळपास २९% आहे. त्याच बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेली एव्हरग्रँडे कंपनी जर दिवाळखोरीत गेली तर चीन च्या आर्थिक महत्वकांक्षेला हादरा बसणार आहे. या दिवाळखोरीचे परिणाम चीन पुरती मर्यादित न राहता त्याचा संपूर्ण जगावर प्रभाव अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडणार आहे. एव्हरग्रँडे कंपनीला लागणाऱ्या अनेक गोष्टींचा पुरवठा हा जगातील इतर देशातून केला जात होता. साहजिक त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगांना याचा चटका बसणार आहे. भारतातून एव्हरग्रँडे कंपनी ला स्टील, लोखंड यांचा पुरवठा होत होता. एव्हरग्रँडे दिवाळखोरीत गेल्यावर त्याचा फटका भारतातील स्टील उद्योगाला बसणार आहे. ३ ऑक्टोबर २०२१ ला एव्हरग्रँडे ला हाँगकाँग शेअर बाजारात व्यवहार करण्यापासून निलंबित करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट एव्हरग्रँडे च्या रसातळाला जाण्याच्या प्रवासाकडे झालेली वाटचाल स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. 

एव्हरग्रँडे च दिवाळखोरीत जाण चीन ला परवडणारं नाही. त्यामुळे चीन चं सरकार यात मध्यस्ती करून एव्हरग्रँडे चा वाचवेल असा अनेकांचा कयास आहे. पण तूर्तास असं कोणतंही पाऊल चीन सरकारने उचललेलं नाही. पण जरी चीन ते पाऊल टाकलं तरी एव्हरग्रँडे चिखलात रुतलेला चीन चा पाय हा चीन ची प्रगती रोखणार हे स्पष्ट आहे. याचसोबत ज्या लोकांनी घराची स्वप्न बघून पैसे गुंतवले होते त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होणार हे पण ठरलेलं आहे.  

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.