Saturday, 31 October 2020

भूतकाळाला स्पर्श करताना... विनीत वर्तक ©

 भूतकाळाला स्पर्श करताना... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात मानवाने तंत्रज्ञानातील एक मैलाचा दगड अनेक अडथळ्यातून यशस्वीरीत्या पार केला आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा आधार घेऊन त्याने जवळपास आपल्या सौरमालेच्या उत्पत्तीच्या वेळेस तयार झालेल्या एका लघुग्रहाच्या मातीला स्पर्श करून त्याचे नमुने बंदीस्त केले आहेत. ह्या लघुग्रहाच नाव आहे बेनू . बेनूवर नासा ने ८ सप्टेंबर २०१६ रोजी ऑसिरीस-रेक्स (Origins, Spectral Interpretation, Resource Identification, Security-Regolith Explorer (OSIRIS-REx) नावाचं एक यान पाठवलं होतं. जवळपास ३३० मिलियन किलोमीटर च अंतर कापत ह्या यानाने डिसेंबर २०१८ ला बेनू च्या कक्षेत प्रवेश केला. तब्बल दोन वर्ष बेनू च्या पृष्ठभागाचा अभ्यास केल्यावर गेल्या आठवड्यात ह्या यानाने यशस्वीरीत्या 'टच एन्ड गो' हे आपलं मिशन पूर्ण करताना बेनू च्या दगड मातीचे नमुने आपल्या कुपीत बंदिस्त केले. आता हे यान पुन्हा एकदा पृथ्वीच्या दिशेने झेप घेण्यासाठी सज्ज झालं असुन मार्च २०२१ मध्ये आपला प्रवास सुरु करून २४ सप्टेंबर २०२३ ला पृथ्वीवर परत येईल. 

ऑसिरीस-रेक्स ने जे 'टच एन्ड गो' मिशन पूर्ण केलं तो तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड होता. हे यान पृथ्वीपासून इतकं लांब आहे की संदेश वहनाला जवळपास १८.५ मिनिटांचा कालावधी एका बाजूने लागतो. याचा अर्थ ह्या यानावरून निघालेला कोणताही संदेश पृथ्वीवर पोचायला १८ मिनिटे तर पृथ्वीवरून दिलेला संदेश यानाकडे जायला १८.५ मिनिटांचा कालावधी लागतो. ऑसिरीस-रेक्स हे ज्या बेनू लघुग्रहावर पाठवलं आहे तो पण तितकाच खास आहे. हा लघुग्रह अपोलो ग्रुप मधील असून ह्याचा व्यास ४९२ मीटर (+/- १० मीटर) इतका आहे. म्हणजेच साधारण एम्पायर स्टेट बिल्डींग च्या उंचीचा. ह्या बेनूला मानवाने ११ सप्टेंबर १९९९ ला शोधलं. बेनू खरं तर पी.एच.ओ.आहे. म्हणजे पोटेंशीयली हझार्डस ऑब्जेक्ट. ह्याचा अर्थ होतो की ज्या पासून पृथ्वीला धोका आहे. ह्या ऑब्जेक्ट ची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता साधारण ( २१७५ ते २१९९ च्या दरम्यान ) आहे. ही टक्कर पृथ्वीवरील सगळ्या सजीवांचा अथवा प्राणिमात्रांचा अंशतः नाश करण्यात सक्षम असेल. ( ह्याच्या टक्करी मधून निर्माण होणारी शक्ती साधारण ७६,००० पट हिरोशिमा वर टाकलेल्या अणुबॉम्ब पेक्षा जास्ती असेल. ) 

 बेनू २१३५ साली पृथ्वीपासून अगदी चंद्रापेक्षा कमी अंतरावर असणार आहे. ह्या शिवाय २१७५ आणि २१९५ साली अजून जास्ती पृथ्वी जवळून त्याचा प्रवास अपेक्षित आहे. त्या शिवाय हा लघुग्रह अतिशय जुना आहे. ज्याकाळी आपली सौरमाला अतित्वात आली. बेनू हा एखाद्या रेड जायंट ताऱ्याचा अथवा सुपरनोव्हा चा अंश असावा ह्यावर असलेली दगड-माती जवळपास ४.५ बिलियन वर्षापूर्वीची आहे. जे की आपल्या सौरमालेच वय आहे. बेनू च्या दगड माती च्या अभ्यासातून जर त्यात सजीवांची निर्मिती करणाऱ्या गोष्टींच अस्तित्व सापडलं तर ह्याचा अर्थ पूर्ण विश्वात अनेक ठिकाणी सजीवांची उत्पत्ती शक्य असण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ह्यावरील मटेरियल हे कार्बन संयुगानी युक्त आहे. ह्यावर ऑरगॅनिक मॉलिक्यूल, प्लॅटेनियम धातू किंवा पाण्याचे अंश असण्याची पण शक्यता आहे. बेनू च्या अभ्यासामुळे त्याची कक्षा अजून अचूकतेने आपल्याला ठरवता येणार आहे. तसेच बेनू सारखा लघुग्रह आपल्या सौरमालेत कसा अडकला? ह्या प्रश्नांची उत्तर मिळण्यास मदत होणार आहे. 

गेल्या २ वर्षात बेनू भोवती फिरताना ऑसिरीस-रेक्स ने थ्री डी मॅपिंग च्या साह्याने बेनू च्या संपूर्ण पृष्ठभागाचा नकाशा तयार केला. त्यानंतर त्याच्या साह्याने त्याने ४ जागा आपल्या मिशनसाठी नक्की केल्या नाईटअँगल, किंगफिशर, ऑस्प्रे, सॅण्डपायपर अश्या त्या ४ जागा होत्या. त्यातल्या नाईटअँगल ह्या जागेवर यानाच्या  Touch-And-Go Sample Acquisition Mechanism (TAGSAM) नावाच्या उपकरणाने म्हणजेच एका रोबोटिक आर्म ने नायट्रोजन गॅस चा वापर करून ह्या बेनू वरील दगड मातीचा धुराळा उडवला. ह्या धुराळ्यात उडालेली दगडमाती यानाच्या एका कुपीत बंद केली गेली. २८ ऑक्टोबर ला काही अडथळ्यानंतर हे मिशन यशस्वी झाल्याच नासा ने जाहीर केलं. इकडे एक लक्षात घेतलं पाहीजे की ही सगळी यंत्रणा स्वायत्त रीतीने आपलं कार्य करत होती. एखाद्या लघुग्रहाच्या पृष्ठभागावर न उतरता त्याला नुसतं स्पर्श करून पुन्हा उड्डाण भरणं हे अतिशय किचकट तंत्रज्ञान आहे. जवळपास ३३० मिलियन किलोमीटर वर ह्या सगळ्या तांत्रिक बाबी एखाद्या यानाने पार पाडणं म्हणजे तंत्रज्ञानाचा एक सर्वोच्च अविष्कार आहे. त्यातही जवळपास ४०० ग्रॅम वजनाची दगड मातीने भरलेली कुपी बंद करणारी यंत्रणा व्यवस्थित काम न केल्याने ह्यातील काही नमुने हे अंतराळात निसटायला लागले होते. जर कुपी संपुर्ण बंद झाली नसती तर संपुर्ण मोहीम अयशस्वी होण्याचा धोका निर्माण झाला होता. पण नासा च्या वैज्ञानिकांनी दिवस रात्र एक करत अडकलेल्या दगडाचा अडसर दूर करत ही कुपी बंद करण्यात यश मिळवल्याच नासा ने ३० ऑक्टोबर २०२० ला जाहीर केलं. 

ऑसिरीस-रेक्स आता मार्च २०२१ मध्ये पृथ्वी च्या दिशेने आपला परतीचा प्रवास सुरु करेल. २०२३ ला जेव्हा उतेह वाळवंटात उतरेल तेव्हा जवळपास ४.५ बिलियन वर्षाच्या भूतकाळाचे नमुने त्याने पृथ्वीवर आणलेले असतील. गेल्या आठवड्यातील नासा च्या ऑसिरीस-रेक्स मोहिमेतील घटना ह्या मानवाच्या तांत्रिक क्षमतेचा कस बघणाऱ्या होत्या आणि नासा त्यात १००% यशस्वी झाली आहे. हे नमुने NASA's Astromaterials Research and Exploration Science Directorate (ARES) and at Japan's Extraterrestrial Sample Curation Center. इकडे पुढील संशोधनासाठी वैज्ञानिक आणि संशोधकांना उपलब्ध असतील. ९८३ मिलियन अमेरीकन डॉलर खर्चाची नासा ची ही मोहीम मानवाच्या उत्क्रांती सोबत एकूणच विश्वाच्या उत्पत्ती बद्दलची अनेक रहस्य य=उघडणार आहे ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. ह्या मोहिमेत समाविष्ट असलेल्या नासा च्या वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांना माझा कुर्निसात. 

तळटीप :-  ऑसिरीस-रेक्स चा संपूर्ण प्रवास उलगडणारा व्हिडीओ इकडे शेअर करत आहे. लॉकहीड मार्टिन ने ह्याची निर्मिती केली असुन प्रत्येकाने तो आवर्जून बघावा.  

माहिती स्रोत :- नासा, अमेरीका 

फोटो स्रोत :- नासा, अमेरीका 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday, 24 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ९ .. लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ९ .. लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर .. विनीत वर्तक ©


आयुष्यात आपण आदर्श कोणाला मानतो, यावर आपण आपली आयुष्यातली वाटचाल कोणत्या दिशेने करणार हे ठरलेलं असतं. १९२०च्या काळात पुण्यात सरलादेवी खोत (त्यांना अक्कुताई चिटणीस या नावाने ओळखलं जात होतं) नावाच्या डॉक्टर होत्या. त्यांच्या आयुष्याचा डॉक्टर होण्याचा खडतर प्रवास त्यांच्या नातीच्या बालमनावर कोरला गेला होता. आपली आजी वयाच्या दुसऱ्या वर्षी अनाथ झाली, वयाच्या ८व्या वर्षी विधवा झाली पण अश्या परिस्थितीमध्येही ती डॉक्टर झाली होती, ही गोष्ट त्या छोट्या मुलीच्या मनात घर करून गेली होती. १९७८चा काळ होता, दोन लाल शेंड्या बांधलेल्या त्या मुलीने डॉक्टर बनण्याचं नक्की केलं होतं. सी.बी.एस.सी.च्या परीक्षेत देशातून प्रथम आणि नॅशनल सायन्स टॅलेन्ट स्पर्धेत सर्वोत्तम राहिलेल्या त्या मुलीला देशातल्या सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत होता पण तिच्या मनात त्या हिरव्या गणवेशाने केव्हाच घर केलं होतं. पुण्याच्या रस्त्यावर दिसणाऱ्या त्या हिरव्या गणवेशातल्या सैनिकांनी आणि त्यांच्या शिस्तीने तिला कधीच आपलंसं केलं होतं. घरच्या विरोधाला न जुमानता त्या मुलीने पुण्याच्या Armed Forces Medical College (AFMC) मध्ये डॉक्टर बनण्यासाठी प्रवेश घेतला. ती मुलगी म्हणजेच लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर.  

आपल्या एम.बी.बी.एस.च्या अभ्यासक्रमात त्या तिन्ही टप्प्यांवर पुणे विद्यापीठात पहिल्या नंबरमध्ये राहिल्या होत्या. त्यासाठी त्यांना राष्ट्रपती सुवर्ण पदकासोबत अभ्यासाशिवाय सर्व क्षेत्रात अव्वल कामगिरी केल्यामुळे कलिंगा ट्रॉफीनेही सन्मानित केलं गेलं. १९८२ साली ज्या कॉलेजमधून आपली पदवी घेतली, त्याच कॉलेजच्या डीन बनण्याचा बहुमान त्यांनी २०१७ साली मिळवला. १९९० मध्ये त्यांनी बालरोगतज्ज्ञ या विषयात एम.डी. केलं. यानंतर त्यांनी लहान मुलांच्या किडनी विकारांवर दिल्लीच्या एम्स (All India Institute of Medical Sciences) इकडे ट्रेनिंग घेतलं. त्यांना National University Hospital; Singapore, Great Ormond Street Hospital; London आणि Foundation for Advancement of International Medical Education and Research (FAIMER) यांसारख्या मानाच्या संस्थांच्या शिष्यवृत्याही मिळाल्या होत्या. भारतीय सैन्याच्या वैद्यकीय सेवेत पहिला किडनी बालविभाग स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच त्या The Indian Society of Pediatric Nephrologyच्या अध्यक्ष होत्या.

१९८३ पासून लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर भारतीय सैन्याचा भाग असून तब्बल ३७ वर्ष देशाची सेवा करत आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतीय सेनेत अनेक महत्वाची पदे भूषवलेली आहेत. त्या General Armed Forces Medical Services च्या डेप्युटी डायरेक्टर राहिलेल्या आहेत.  याशिवाय भारतीय सेनेच्या नॉर्दर्न कमांड, उधमपूरच्या मेजर जनरल मेडिकल राहिलेल्या आहेत. २०१७ मध्ये त्यांनी पुण्याच्या Armed Forces Medical College (AFMC) येथे डीन आणि उपसंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांची बढती भारतीय सेनेत लेफ्टनंट जनरल या पदावर झाली. भारतीय सेनेच्या थ्री-स्टार रँक असणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत. भारतीय सेनेत त्यांनी दिलेल्या अत्युच्च सेवेबद्दल त्यांना २०१८ मध्ये अतिविशिष्ठ सेवा मेडल, २०१४ मध्ये विशिष्ठ सेवा मेडल आणि पाच वेळा  Chief of the Army Staff Commendation Cardने सन्मानित करण्यात आलं आहे. त्या पंतप्रधानांच्या Science, Technology and Innovation Advisory Council (PM-STIAC)च्या एकमेव डॉक्टर सदस्य आहेत.

१९७८ साली त्यांचे ऋणानुबंध एन.डी.ए. (National Defence Academy) आणि आय.एम.ए. (Indian Military Academy) मधून पास झालेल्या राजीव कानिटकर यांच्याशी जुळले, ते कायमचे. लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर नुकतेच भारतीय सेनेतून निवृत्त झालेले असून भारतीय सेनेच्या इतिहासात लेफ्टनंट जनरल हे थ्री-स्टार पद मिळवणारी ही नवरा- बायकोची एकमेव जोडी आहे. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचा भारतीय सेनेतील प्रवास तसा सोप्पा नव्हता. त्यांचे जोडीदारही भारतीय सेनेत असल्याने अनेकवेळा ते भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी व्यस्त असायचे. अश्या वेळी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांना देशाच्या रक्षणासाठीही त्याच तत्परतेने सजग राहावं लागत होतं. त्यांच्या जोडीदाराची साथ त्यांना नेहमीच आपलं सर्वोत्तम सगळ्या आघाड्यांवर देण्यासाठी लाभली. या यशस्वी संसारामागचं गुपित सांगताना त्या सांगतात, 

"आम्ही ठरवलं होतं,

‘'Let’s Grow Together without Growing Apart"."

त्यांच्या संसारात कसोटीचे अनेक क्षण आले. त्यांच्या पहिल्या बाळंतपणावेळी, त्यांच्या जोडीदाराला सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी रिपोर्ट करण्याचा आदेश होता. सकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या मुलीचा जन्म झाल्यावर ५ व्या मिनिटाला त्यांचे जोडीदार देश रक्षणासाठी रवाना झालेले होते. आपल्या कुटुंबासोबत विदेशात जाण्यासाठी निघालेले असताना कारगिल युद्ध सुरू झाल्यावर, तातडीने आपल्या ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश मिळाले. संपूर्ण ट्रीप अर्धवट सोडून देशरक्षणासाठी त्या आपल्या ड्युटीवर रुजू झालेल्या होत्या.

एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातून डॉक्टर बनताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर देशेसेवेचं आपलं व्रत आजही निभावत आहेत. आपल्या जोडीदाराच्या सावलीखाली दबून न जाता त्याच तोडीने आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि ओळख त्यांनी निर्माण केली. भारतीय सेनेतील दुसऱ्या सर्वोच्च पदावर पोहोचताना त्याचवेळी एक पत्नी, एक आई, एक डॉक्टर, एक प्राध्यापक, एक सेना अधिकारी अश्या सर्वच पातळीवर आपली छाप त्यांनी सोडली आहे. आज त्या The Director General Armed Forces Medical Services (DGAFMS) म्हणून भारतीय सेनेत कार्यरत आहेत. एक सामान्य मराठी स्त्री आपल्या स्वबळावर देशाच्या संरक्षणात त्याच ताकदीने योगदान देऊ शकते हे त्यांनी आपल्या दुर्गाशक्तीच्या रूपातून दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.  
 
जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday, 23 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ८ .. पद्मश्री आरती साहा .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ८ .. पद्मश्री आरती साहा .. विनीत वर्तक ©

१९४० साल होतं. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात होता. त्या काळात कोलकाता इकडे एका बंगाली कुटुंबात आरती साहा यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना पाण्याचं वेड होतं. त्या अवघ्या २ वर्षाच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आपल्या आजीकडे वाढलेल्या आरतीने आपल्या वडिलांसोबत पोहण्याचे प्राथमिक धडे गिरवले. आरतीची पाण्याची ओढ काहीतरी वेगळी आहे हे तिच्या वडिलांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. त्यांनी कोलकाता इकडे आरतीला पोहण्याच्या सरावासाठी पाठवलं. ज्याकाळी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं, त्याकाळी आरती पोहण्याचे धडे कोलकातामध्ये गिरवत होती. वयाच्या ५व्या वर्षी तिने पोहण्यातील पहिलं सुवर्णपदक जिंकलं. १९४६ ते १९५२ या काळात आरतीने पोहण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरावर २२ बक्षीसे जिंकली.

आपल्या अंगभूत गुणांकडे लक्ष देताना आरती साहा यांनी आपल्या पोहण्यावर अजून मेहनत घ्यायला सुरवात केली. आपल्या खडतर परिश्रमाने त्यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान नक्की केलं. त्या १९५२च्या ऑलिम्पिकमधल्या भारतीय चमूतील वयाने सगळ्यात लहान स्पर्धक होत्या. ऑलिम्पिकमध्ये पदकाविना त्यांना भारतात यावं लागलं पण ऑलिम्पिकमधली जगातील सर्वोत्तम स्पर्धकांसोबतची स्पर्धा त्यांना अनुभवसंपन्न करून गेली. ऑलिम्पिकमधून परत आल्यावर त्यांनी आपलं लक्ष क्षमतेकडे केंद्रित केलं. आपली क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी रोज सरावाची मर्यादा वाढवत नेली. गंगा नदीच्या पात्रात लांब पल्ल्याच्या पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. १९५८ साली बांगलादेशच्या ब्रोजेन दास यांनी इंग्लिश खाडी पार करणारा आशिया खंडातील सर्वप्रथम  जलतरणपटू असा मान मिळवला. ब्रोजेन दास यांच्या पराक्रमाने आरती साहा प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी ब्रोजेन दास यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. याचवेळी ब्रोजेन दास यांनी, आपण जे मिळवलं ते तू पण मिळवू शकतेस, असा विश्वास व्यक्त केला.

ब्रोजेन दास तिकडेच थांबले नाहीत, तर त्यांनी आरती साहा यांचं नाव Butlin International Cross Channel Swimming Race या स्पर्धेसाठी स्पर्धा आयोजकांना सुचवलं. आरती साहा यांचं नाव पोहणाच्या स्पर्धेत भारतात गाजलेलं होतं. या स्पर्धेसाठी त्यांना सगळ्यांचा पाठिंबाही मिळत होता, पण मुख्य अडचण होती पैश्याची. या स्पर्धेसाठी, इंग्लंडला जाण्यासाठी लागणारा पैसा उभं करणं त्यांना शक्य नव्हतं. यावेळी आरती साहाची अडचण पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांनी, भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कानावर घातली. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर आरती साहा यांचा या स्पर्धेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

१७ ऑगस्ट १९५९ रोजी फ्रांसमधील केप ग्रिस नेझ ते इंग्लंड च्या सॅण्डगेट इथलं जवळपास ६५.५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी आरती साहा यांनी सुरूवात केली. आपली पायलट बोट वेळेत न आल्याने आरती साहा यांची अमूल्य अशी ४० मिनीटे वाया गेली. सर्वांपेक्षा उशिराने सुरूवात केल्यामुळे त्यांना इंग्लंडच्या तीरावर पोहोचण्याआधी पाण्याच्या उलट प्रवाहाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या तीरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असताना पाण्याच्या उलट प्रवाहामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पण म्हणतात ना,

"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की हार नहीं होती"

इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा आरती साहा यांनी मनाशी चंग बांधला होता. पुन्हा एकदा त्यांनी २९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लिश खाडीत उडी घेतली. तब्बल ६५.५ किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या १६ तास २० मिनिटात पूर्ण करताना इंग्लिश खाडी पोहून जाणारी आशिया खंडातील पहिली महिला होण्याचा मान मिळवला. आपली स्पर्धा संपवून पाण्यातून बाहेर निघताच भारताचा तिरंगा त्यांनी इंग्लंडच्या आसमंतात फडकावला. त्यांचा हा विजय भारतीय खेळासाठी आणि एकूणच भारतीयांसाठी अविस्मरणीय असा होता. या अभूतपूर्व पराक्रमाची नोंद घेताना भारत सरकारने त्यांचा १९६० साली पद्मश्री सन्मानाने गौरव केला. खेळासाठी पद्मश्री सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. यानंतर भारतीय पोस्टाने त्यांच्या सन्मानार्थ १९९६ साली ३ रूपयांचा पोस्टल स्टॅम्प वितरित केला. तर गुगलने २०२० साली त्यांच्या ८०व्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्या दिवशीचं डुडल त्यांच्या नावावर ठेवलं होतं.

ज्यावेळी भारतीय स्त्री चूल आणि मूल यात अडकलेली होती, त्या काळात पोहण्यासारख्या पारंपारिक खेळात प्राविण्य मिळवून आशियामधील इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली स्त्री होण्याचा मान मिळवणाऱ्या आरती साहा या दुर्गाशक्तीचं एक प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय स्त्री आणि भारताची शान संपूर्ण जगात वाढवली होती. त्यांच्या या कार्याला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या स्मृतीस वंदन.

माहिती स्रोत :- गुगल, बेटर इंडिया

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday, 22 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ७ .. समुद्रशास्त्र संशोधिका डॉक्टर अदिती पंत .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ७ .. समुद्रशास्त्र संशोधिका डॉक्टर अदिती पंत .. विनीत वर्तक ©


१८२० साली अंटार्क्टिकाचा शोध लागला. पण आजही तिकडे जाणं म्हणजे हिमालयाला पार करण्याइतपत मोठं काम आहे. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर असलेली ही भूमी वर्षभर बर्फाच्या चादरीत लपेटलेली असते. उणे एकोणनव्वद (- ८९) डिग्री सेल्सिअसपर्यंत उतरणारे तापमान, बोचरी थंडी, थंड वारे यांमुळे इकडे जाणे हेसुद्धा एक मिशन असते. भारताने १९८१ साली अंटार्क्टिका ट्रीटी स्वीकारल्यावर आपलं पहिलं मिशन या खंडावर पाठवलं होतं. इथलं वातावरण, इथे असणारी नैसर्गिक संपत्ती याचा अभ्यास करण्यासाठी भारताने इकडे १९८३ साली 'दक्षिण गंगोत्री' नावाचा एक संशोधन तळ उभारला. १९८३ साली पृथ्वीच्या अंटार्क्टिका खंडावर पाय ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री, या मराठी म्हणजेच महाराष्ट्राच्या विदर्भातील (नागपूरातील) डॉक्टर अदिती पंत.

लहानपणापासून ट्रेकिंग, हायकिंगची आवड जोपासणाऱ्या अदिती पंत यांचे आदर्श त्यांचे वडील होते. 'काय करते आहेस ते लक्षपूर्वक कर आणि जे करशील ते सर्वोत्तम कर' असं सांगणारी आई, आणि 'मुक्तपणे जग' असं सांगणारे वडील अश्या दोघांच्या विचारांचा पगडा अदिती पंत यांच्या विचारांवर होता. त्यामुळेच जेव्हा आपलं कार्यक्षेत्र निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं 'स्वातंत्र्य'. वडिलांच्या मित्रांनी कॉलेजला दिलेल्या एका पुस्तकाने त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली. त्या पुस्तकाचं नाव होतं 'द ओपन सी', लेखक सर ऍलिस्टर हार्डी. पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. केल्यावर पुढे काय हा प्रश्न उभा होता. मुलींनी उच्च शिक्षण घेणं त्याकाळी समाजात रुजलेलं नव्हतं. याशिवाय विदेशात जाऊन उच्च शिक्षण खूप खर्चिक होतं. हा खर्च त्यांच्या कुटुंबाला परवडणारा नव्हता, पण उच्च शिक्षण घ्यायची इच्छा मात्र मनात होती. त्याचवेळी अमेरिकन सरकारने त्यांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली.

सागरी विज्ञान या विषयात त्यांनी आपलं एम.एस. हवाई विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यापुढच्या शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठलं. वेस्टफील्ड कॉलेज, लंडन विद्यापीठातुन सागरी शैवाल या विषयात डॉक्टरेट घेतली. डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर 'पुढे काय?', असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. १९७१-१९७२चा तो कालावधी होता. भारतीयांच्या अमेरिका स्वप्नांच्या सुरूवातीचा तो काळ होता. जगातील प्रतिष्ठित अश्या विद्यापीठातल्या पदव्या डॉक्टर अदिती पंत यांच्याकडे होत्या. पैसा, मान- सन्मान, प्रतिष्ठा ते अमेरिकेचं नागरिकत्व असं सगळं समोर असताना त्या भारतात परत आल्या. भारतात आल्यावर त्यांनी National Institute of Oceanography, (NIO) Goa इकडे आपल्या कार्याला सुरवात केली. 'द ओपन सी' प्रमाणे, त्यांच्यासमोर भारताला लाभलेली ७५०० किलोमीटरची किनारपट्टी अभ्यासाला होती.

National Centre for Polar and Ocean Research या भारत सरकारच्या उपक्रमाने भारताच्या अंटार्क्टिकावरील संशोधनाचा श्रीगणेशा झाला होता. याच मोहिमेचा भाग म्हणून १९८३ साली सुदिप्ता सेनगुप्ता यांच्या सोबत डॉक्टर अदिती पंत यांनी अंटार्क्टिकाकडे कूच केलं. अंटार्क्टिकावर जाऊन तिथल्या महासागरातल्या जैव विविधतेच्या अन्नसाखळीचा अभ्यास करणं, हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं. याआधी कोणत्याही भारतीय स्त्रीने अश्या प्रतिकूल वातावरणात पाऊल ठेवलं नव्हतं. त्यामुळे अश्या वातावरणात राहणं, अभ्यास करणं हे खूप कठीण उद्दिष्ट त्यांच्यासमोर होतं. तब्बल ४ महिने अंटार्क्टिकाच्या प्रतिकूल वातावरणात राहून तिथल्या नैसर्गिक साखळीचा अभ्यास करताना डॉक्टर अदिती पंत यांनी अनेक शोध लावले. याशिवाय दक्षिण ध्रुवापासून २५०० किलोमीटर अंतरावर भारताचा पहिला संशोधन तळ 'दक्षिण गंगोत्री' ची स्थापना केली. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा त्या १९८४ साली अंटार्क्टिकावर संशोधनासाठी गेल्या होत्या. यानंतर त्यांनी पुण्याच्या  National Chemical Laboratory. (एन.सी.एल.) इकडे आपलं पुढील संशोधन सुरु ठेवलं.

डॉक्टर अदिती पंत यांनी अंटार्क्टिकाच्या अभ्यासात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना अंटार्क्टिका सन्मान दिला. डॉक्टर अदिती पंत यांच्या नावावर जागतिक पातळीवर संशोधनातील ५ पेटंट आणि ६७ पब्लिकेशन्स आहेत. एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून उच्चशिक्षण घेताना सर्व अडीअडचणींवर त्यांनी मात केली. अंटार्क्टिकासारख्या खडतर मोहिमेमध्ये न घाबरता, एखाद्या लढवय्याप्रमाणे तिथल्या प्रतिकूल वातावरणात त्या राहिल्या होत्या. एक भारतीय स्त्री, जगण्यासाठी आव्हान असलेल्या खंडावर, पृथ्वीच्या टोकावर जाऊन, संशोधन करून तिकडे भारताचा तिरंगा फडकावते, अश्या दुर्गाशक्तीस माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासाला माझ्या शुभेच्छा.

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत:- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.







Wednesday, 21 October 2020

दुर्गाशक्ती भाग ६ .. पद्मश्री गोदावरी दत्ता .. विनीत वर्तक ©

 दुर्गाशक्ती भाग ६ .. पद्मश्री गोदावरी दत्ता .. विनीत वर्तक ©

भारतात आजही अनेक ठिकाणी मुलगी वयात आली की लगेच तिचे लग्न केले जाते. वयात येण्याचे वयही अवघे १२-१३ वर्षे असते. ज्या वयात खरं तर शाळेत जाऊन  शिकायचे असते, त्या वयात संसाराची जबाबदारी स्वीकारावी लागते. स्त्रीच्या आवडीनिवडी तर बाजूलाच राहिल्या, पण साधं चांगलं आयुष्यही वाट्याला येत नाही. पण अश्या परिस्थितीतही स्वतःला सिद्ध करत, समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हे किती कठीण असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. बहादूरपूर, बिहार इथल्या एका गावात गोदावरी दत्ता यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं. काही वर्षांतच त्यांना बालविवाहाच्या बंधनात अडकवलं गेलं. काही वर्षांत एका मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली. ज्याच्यासोबत आयुष्यात पुढे जगायची स्वप्नं बघितली, तोच सोडून दिल्लीला निघून गेला, परत न येण्यासाठी. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, एका मुलाची जबाबदारी अश्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कामी आली ती रंगांची साथ.

वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी गोदावरी दत्ता यांना चित्रकलेची आवड लागली. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला होता. बिहार मधल्या या भागात प्रत्येक मुलीला 'मधुबनी' चित्रकला शिकणं हे गरजेचं होतं. मधुबनी चित्रकला ज्याला 'मिथिला चित्रकला' असेही म्हटले जाते, कारण चित्रकलेचा हा प्रकार बिहारमधल्या मिथिला भागात गेली तब्बल २५०० पेक्षा जास्त वर्षे पिढ्यानपिढ्या वारसा रूपाने जोपासला गेला आहे. असे म्हटले जाते की, जनक राजाने राम आणि सीतेच्या लग्नाच्या वेळी तो प्रसंग काही कलाकारांना चित्ररूपाने काढायला सांगितला होता. हीच चित्रकला एखाद्या सणाच्या दिवशी, समारंभात, चांगल्या दिवशी घराच्या भिंतीवर, जमिनीवर चितारली जाऊ लागली. आज अडीच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावरही या भागातील प्रत्येक आई आपल्या मुलीला हा परंपरेचा वारसा देत आली आहे. गोदावरी दत्ता यांनी सुद्धा आपल्या आईकडून या चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले होते.

स्वतःवरती ऐन तारुण्यात संकटांची मालिका कोसळली, तरी गोदावरी दत्ता यांची आई त्यांच्यासोबत आधारवडाप्रमाणे राहिली. गोदावरी दत्ता यांच्या आई सुभद्रादेवी या त्या भागात मधुबनी चित्रकलेसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांना अनेकदा रामायण, महाभारत यांतले प्रसंग चित्रित करण्यासाठी बोलावलं जायचं, त्याच वेळेस गोदावरी दत्ता यांनी या चित्रकलेचे धडे आत्मसात केले. आपल्या आईची कलाकारी त्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर चित्रित करायला सुरवात केली. बिहार मधल्या या भागात 'कोहबर घर' नावाची एक प्रथा आहे. नवविवाहित दाम्पत्याने या खोलीत (घरात) तीन रात्री एकत्र घालवायच्या असतात. या घराच्या भिंतीवर आणि जमिनीवर मधुबनी चित्रकला प्रेम, जुन्या कथेतील प्रसंग, फूल, प्राणी या सगळ्यांतून चित्रित केलेली असते. या चित्रांच्या सान्निध्यात ३ रात्री घालवल्यानंतर चौथ्या दिवशी लग्न हे परिपूर्ण समजले जाते. अश्या खोलीत मधुबनी चित्र रंगवण्यासाठी त्यांच्या आईला बोलावलं जात असे. एकही पैसा न घेता त्यांच्या आईने ही चित्रकला एक परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून जपली. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी दत्ता यांनी यातील बारीक कलाकुसर आत्मसात केली. चित्रकलेचा हा वारसा आपण पैश्यासाठी नाही, तर आपला सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी जपत आहोत असं त्यांचं मत होतं.

गोदावरी दत्ता यांनी मधुबनी चित्र काढताना कधीच ब्रशचा वापर केला नाही. हात, अंगठा, बांबूचे टोक, पेन, आगपेटीच्या काड्या ह्याचा वापर करत त्यांनी मधुबनी चित्रकलेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. All India Handicrafts Board ने त्याकाळी भारताच्या ग्रामीण भागात जपलेल्या या चित्रकलेला देश आणि जगासमोर आणलं. गोदावरी दत्ता यांनी त्याचा उपयोग करून मधुबनी चित्रकलेला जागतिक पातळीवर प्रसिद्ध केलं. एकेकाळी भारताच्या एका भागात जपलेल्या चित्रकलेला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. गोदावरी दत्ता यांनी अनेक प्रदर्शनांमधून जर्मनी, जपान सारख्या देशांमध्ये या चित्रकलेला एक मानाचं स्थान मिळवून दिलं. मिथिला म्युझिअम टाकोमची, जपान इकडे उभारलं गेलं, ज्यात जवळपास ८५० पेक्षा जास्त मधुबनी चित्र, २५०० वर्ष जुन्या भारतीय चित्रकलेचा वारसा म्हणून आज बघता येतात. या कामासाठी जवळपास ७ वर्ष लागली. यात गोदावरी दत्ता यांचं योगदान अमूल्य आहे. जपानमधील ओसाका, टोकियो, कोबे यासारख्या अनेक शहरात मधुबनी चित्रकला, भारताच्या अभिजात संस्कृती आणि परंपरेचं दर्शन लोकांना घडवण्यासाठी उपलब्ध आहे.

मधुबनी चित्रकलेत पारंपारिक रंगांचा वापर करताना गोदावरी दत्ता यांनी त्यातील प्रत्येक रेष न् रेष शिकण्यासाठी तासन् तास घालवले आहेत. आपली कला आणि वारसा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थी, शिक्षक यांना ही कला शिकवण्याची सुरूवात केली. गेल्या ३५ वर्षात त्यांच्या हाताखालून तब्बल ५०,००० पेक्षा जास्त लोकांनी मधुबनी चित्रकला आत्मसात केली आहे. एकेकाळी लुप्त होणाऱ्या भारताच्या चित्रकलेला आज जागतिक वारसा बनवण्यासाठी गोदावरी दत्ता वयाच्या ९३व्या वर्षी सुद्धा प्रयत्न करत आहेत. आपल्या समाजातील मुलींनाही चित्रकला शिकवण्यासोबत त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठींबा देत आहेत. गोदावरी दत्ता यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने १९८० साली राष्ट्रीय पुरस्कार तर २०१९ साली पद्मश्री सन्मानाने त्यांचा गौरव केला आहे. भारताच्या भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना 'शिल्प गुरु' हा आदरयुक्त सन्मान दिला आहे.

 गरीबी, बाल विवाह, आणि  हलाखीच्या परिस्थितीमध्ये  असूनही २५०० वर्षाचा इतिहास असणाऱ्या चित्रकलेला आणि भारताच्या सांस्कृतिक वारश्याला त्यांनी आज जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. आज पारंपरिक रंगांची जागा ऍक्रेलिक रंगानी आणि बांबूच्या देठांची जागा ब्रशने घेतली असली तरी मधुबनी चित्रकलेचा तो आत्मा आजही त्यांनी जिवंत ठेवला आहे. मधुबनी चित्रकलेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गोदावरी दत्ता यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

माहिती स्रोत :- बेटर इंडिया, गुगल

फोटो स्रोत :- गुगल.

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.






Tuesday, 20 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ५ ... वैज्ञानिक रोहिणी गोडबोले... विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ५ ... वैज्ञानिक रोहिणी गोडबोले... विनीत वर्तक ©

चूल आणि मूल यांत रमणारी भारतीय स्त्री जरी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली, तरी तिच्यासाठी काही क्षेत्रांचा विचार करणं शक्यच नव्हतं. काही क्षेत्रांत पुरुषांची मक्तेदारी होती. अश्या एखाद्या क्षेत्रात एखाद्या स्त्रीने प्रवेश करून, त्यात आपलं स्थान निर्माण करणं हा भाग तर दूरच पण अश्या एखाद्या क्षेत्रात काम करणं हा विचार पण क्रांतिकारी होता. मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं रहावं अशी पुढारलेली विचारसरणी असलेल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रोहिणी गोडबोले यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. मुलींसाठी असणाऱ्या शाळेत शिकताना तिकडे विज्ञान हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नव्हता, त्यामुळे स्कॉलरशिपसारखी परीक्षा देऊन विज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांतून शिकून त्यात कारकीर्द होऊ शकते हे त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हतं. गणितात गोडी वाढवण्यासाठी एखादी शिकवणी लाव, हा त्यांच्या शिक्षकांनी दिलेला सल्ला त्यांनी पाळला आणि गणित या विषयातली त्यांची आवड अजून वाढली. गणितज्ञ होऊन आपल्याला नोकरी मिळेल की नाही याची शंका वाटल्याने त्यांनी आपलं लक्ष भौतिकशास्त्राकडे वळवलं.

पुण्याच्या परशुरामभाऊ कॉलेज मधून बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई आय.आय.टी. मधून केलं. आपल्या विज्ञानातील अभ्यासाला पुढे नेण्यासाठी त्यांनी कण-भौतिकशास्त्राची (particle physics) निवड केली. कण-भौतिकशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्रतिष्ठित अश्या स्टोनी ब्रुक इथल्या न्यूयॉर्क विद्यापीठातून मिळवली. अमेरिकेत पुढे संशोधन करण्याची संधी असतानासुद्धा त्या १९७९ साली भारतात परत आल्या. भारतात आल्यावर त्यांनी टी.आय.एफ.आर. (Tata Institute of Fundamental Research) इकडे प्राध्यापक म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर १९८२ ते १९९५ त्या मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक होत्या. १९९८ पासून त्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगळुरू इकडून प्राध्यापक म्हणून आपलं काम सुरु ठेवलं आहे. या सर्व काळात त्यांनी जवळपास १५० पेक्षा जास्ती शोधप्रबंध लिहीले आहेत, तर अजून १५० पेक्षा जास्ती शोधप्रबंधांमध्ये त्या सहकारी आहेत.  

कण-भौतिकशास्त्रातील महत्वाचा शोध मानल्या गेलेल्या हिग्स-बोसॉन हा कण शोधण्यासाठी गेली ३० वर्ष त्यांनी संशोधन केलं आहे. त्यांच्या या संशोधनामुळे त्यांना,

 International Detector Advisory Group (IDAG) for the International Linear Collider at the European research lab, CERN 

या जगातील अतिशय आघाडीच्या भौतिक विज्ञानातील संशोधकांच्या ग्रुपचं मानद सदस्यत्व प्राप्त झालं आहे. भौतिक शास्त्रातील स्टॅंडर्ड मॉडेल ज्यात प्रोटॉन, फोटॉन, न्यूक्लिअस अश्या कणांवर त्यांनी संशोधन आणि अभ्यास केला आहे. याशिवाय भौतिकशास्त्रातील हाय एनर्जी कोलायडरमधून नवीन कणांच्या निर्मितीसाठी त्यांनी आपलं योगदान दिलं आहे.

२००२ साली जगातील भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या स्त्रियांच्या परिषदेसाठी पॅरीस इकडे जाण्याचा बहुमान मिळालेला आहे. (International Conference on Women in Physics) पॅरीस इथे गेले असताना स्त्रियांना या क्षेत्रात काम करण्यासाठी समाजाची मानसिकता जागतिक पातळीवर आणि भारतात किती संकुचित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपले सहकारी रामकृष्ण रामास्वामी यांच्या सोबत "Lilavati’s Daughters: The Women Scientists of India" हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकाचं नावही त्यांनी भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या गोष्टीवरून ठेवलं आहे. भास्कराचार्य ज्याप्रमाणे आपल्या गणितातील अडचणी मुलगी लीलावतीशी बोलत असत, त्याप्रमाणे या पुस्तकात भारताच्या स्त्री संशोधकांचा प्रवास लिहलेला आहे. भारतीय स्त्री वैज्ञानिकांचा हा प्रवास, या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी भारतातील स्त्रियांना प्रोत्साहन देईल.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून परदेशी संशोधन करण्याची संधी उपलब्ध असतानासुद्धा भारतातच राहून, कण-भौतिकशास्त्रात आपलं भरीव योगदान त्यांनी भारतासाठी दिलं. नुसतं संशोधनापुरतं मर्यादीत न राहता आपल्या लिखाणातून, मार्गर्शनपर भाषणांतून भारतातील अनेक स्त्रियांना संशोधन क्षेत्रात येण्यासाठी तसेच सन्मानाने वागणूक मिळवून देण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांचा जागतिक पातळीवर गौरव झालेला आहे. भारत सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेताना त्यांना २०१९ साली पद्मश्री सन्मानाने गौरवलं आहे. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठू शकतात हे सिद्ध करताना वैज्ञानिक, प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांनी दुर्गाशक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण भारतातील सगळ्याच स्त्रियांसमोर ठेवलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा नमस्कार आणि पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

माहिती स्रोत :- रोहिणी गोडबोले पेज, गुगल

फोटो स्रोत :- गुगल  

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Monday, 19 October 2020

दुर्गाशक्ती भाग ४ .. समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे .. विनीत वर्तक ©

 दुर्गाशक्ती भाग ४ .. समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे .. विनीत वर्तक ©

दोन अपूर्णांक मिळून एक पूर्णांक होतो हे कितीही खरं असलं तरी आज आपल्याला पूर्ण करणाऱ्या त्या अपूर्णांकांची निवड करण्याचे निकष बदललेले आहेत. स्वभावाआधी बँक बॅलन्स आणि माणसाआधी फ्लॅट महत्वाचा झाला आहे. पगार किती, कंपनी कोणती हे बघून प्रेमात पडणारे अनेक जण आहेत. अर्थात हे निकष चुकीचे अथवा बरोबर हे ज्याचं त्यानं ठरवावं. पण आपलं सर्व सुखसंपन्न; आरामाचं आयुष्य सोडून अश्या एखाद्या जंगलात जिकडे जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक गोष्टी उपलब्ध नाहीत, तो भाग आयुष्याच्या रंगीत स्वप्नांपासून कोसो दूर आहे, अश्या एखाद्या ठिकाणी आपल्या जोडीदारासोबत आपल्या जीवनातल्या नवीन वळणाची सुरूवात करावी हा निर्णय घेणं, आणि तो गेली ४८ वर्षांपेक्षा जास्त काळ निभावून नेणं हे एखाद्या तपश्चर्येएवढंच कठीण आहे. हे सगळं करत असताना सर्व आघाड्यांवर आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून समाजसेवेचं अविरत व्रत आजही निभावणाऱ्या दुर्गाशक्ती म्हणजेच डॉक्टर मंदाकिनी आमटे.

विश्व हिंदू परीषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका सधन कुटुंबातून त्यांनी आपलं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. भूलतज्ञ म्हणून आपलं पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सर्जन असलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी एकत्र काम करत असताना दोघांचे ऋणानुबंध जुळले ते कायमसाठी. पण खरी अडचण पुढे होती. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच बाबा आमटे यांचं कार्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आनंदवन म्हणजेच चिखलदरा सारखं एखादं थंड हवेचं ठिकाण असावं असा विचार करणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटेंसाठी हे सगळं अतिशय नवीन होतं. त्यातही बाबा आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाची जबाबदारी प्रकाश आमटे यांच्यावर टाकली होती. कुष्ठरोगाने पिडीत असलेल्या लोकांना समाजाने वाळीत टाकलेलं होतं, अश्या लोकांसोबत काम करणाऱ्यांना आपली मुलगी देणं हे त्यांच्या घरच्या लोकांना रूचलं नव्हतं. त्यातही अश्या लोकांच्या कल्याणासाठी, त्यांनतर पर्यायाने एका जंगलात आयुष्य काढण्याचा निर्णय स्वीकारून मंदाकिनी आमटे यांनी एका वेगळ्या पाऊलवाटेवर आपला प्रवास सुरु केला.

दार नसलेलं घर, इलेक्ट्रीसिटी; पाणी अशी कोणतीही व्यवस्था नसलेल्या ठिकाणी त्यांनी एका नवीन जीवनाची सुरूवात केली. माडीया-गोंड जमातीतील आदिवासी लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो लांब होते. भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धा अश्या विळख्यात अडकलेल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं शिवधनुष्य पेलणं खूप कठीण काम होतं. एकतर हे लोक दुसऱ्या लोकांच्या जवळ जायला घाबरत असत याशिवाय त्यांची भाषा वेगळी होती. भाषा शिकून त्याचवेळी कोणत्याही सुविधांपासून वंचित असलेल्या ठिकाणी घर चालवणं हे त्याहून कठीण काम होतं. जेवायला लागणारी भाजी स्वतः पिकवण्यापासून ते नाल्यामधील पाणी हंड्यात भरून आणून त्याला चुलीवर उकळवून पिण्यायोग्य बनवेपर्यंत सगळंच कोणत्याही सुविधांशिवाय करायला लागायचं. साप, विंचू, जंगली श्वापदं, पाऊस, थंडी या सगळ्या काळात वीजेशिवाय चुलीवर संसार करताना त्याचवेळी एक डॉक्टर बनून समाजसेवेचं आपलं व्रत चालू ठेवणं हे कल्पनेपलीकडलं आहे. हे सगळं करूनसुद्धा पत्नी, आई या सगळ्या भूमिका सुद्धा त्याच निष्ठेनं निभावणं याची कल्पना पण आपण करू शकत नाही.

डॉक्टर प्रकाश आमटे यांनी, आपण आपल्या पत्नीला साधी एक साडी घेऊ न शकल्याची खंत केबीसीसारख्या कार्यक्रमात बोलून दाखवली होती, यावरून कोणीही विचार करू शकेल की, आपल्या जोडीदाराबरोबर त्याच्या सगळ्या निर्णयात ठामपणे उभं राहून समाज सेवेचं अविरत व्रत स्वीकारण्यासाठी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी किती त्याग केला असेल. १९९५ साली मोनॅको या देशाने डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेताना त्यांच्यावर एक पोस्टल स्टॅम्प काढला. असा सन्मान मोनॅको या देशाकडून मिळवणारं आमटे कुटुंब हे जगातील दुसरं व्यक्तिमत्व होतं. २००८ साली त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर प्रकाश आमटे सोबत डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना मॅगसेसे कमिटीने म्हटलं होतं,

"In electing Prakash Amte and Mandakini Amte to receive the 2008 Ramon Magsaysay Award for Community Leadership, the board of trustees recognizes their enhancing the capacity of the Madia Gonds to adapt positively in today's India, through healing and teaching and other compassionate interventions."

आज हेमलकसा येथील 'लोकबिरादरी प्रकल्प' निष्काम कर्मयोग आणि समाजसेवेसाठी जागतिक पातळीवर नावाजलेला आहे. आज आमटे कुटुंबियांची तिसरी पिढी हा समाजसेवेचा वसा पुढे नेते आहे. पण एकेकाळी जेव्हा या भागात माणूस म्हणून जगणं अशक्य होतं, अश्या काळात त्यांनी आपल्या जीवनाच्या सोनेरी वळणाची सुरूवात या जंगलातून केली. आज समाजात इतकी उंची गाठल्यावर पण गर्वाचा लवलेश किंवा अभिमान त्यांच्या चालण्याबोलण्यात कुठेच दिसत नाही. एक सामान्य स्त्रीसुद्धा आपल्या कर्तृत्वाने असामान्य कामगिरी करू शकते, एकाचवेळी अविरत समाजसेवेचं व्रत करताना असंख्य अडचणींना सोडवत सगळ्याच पातळीवर एक आदर्श जीवन जगू शकते. संपूर्ण भारतापुढेच नाही, तर जगापुढे एक दुर्गाशक्तीचं असामान्य उदाहरण ठेवणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.

माहिती स्रोत :- गुगल 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Sunday, 18 October 2020

दुर्गाशक्ती भाग ३ .. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग .. विनीत वर्तक ©

 दुर्गाशक्ती भाग ३ .. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग .. विनीत वर्तक ©

आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरासोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

हे गीत अनेकांनी आजवर ऐकलं असेल, पण त्या सोन्याच्या पिंजऱ्यातून निघून आकाशी झेप घेण्याची महत्वाकांक्षा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग मात्र खूप कमी जण करतात. शिवांगी सिंगचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आपल्या आजोबांसोबत दिल्लीला एअरफोर्स म्युझिअम पाहायला गेलेल्या लहान शिवांगीला तिथली विमानं आणि हेलिकॉप्टर बघून एका वेगळ्याच स्वप्नांचं लक्ष्य गवसलं. घरी परत आल्यावरपण त्या निळ्या गणवेशाचं गारुड तिच्या मनातून कमी झालं नाही. मोठं होऊन त्याच निळ्या आकाशात झेप घेण्याचं तिनं ठरवलं. कितीही अडचणी समोर आल्या तरी आपलं लक्ष्य तिला साध्य करायचं होतं. अर्थात हा प्रवास तितकाच कठीण असणार होता याची जाणीवही तिला तितकीच होती.

आपल्या भावंडांसोबत गल्लीत क्रिकेट खेळणारी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शिवांगीने आकाशात भरारी घेण्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरवात केली. १०वी आणि १२वीच्या परीक्षा ती ९०% पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाली. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी आता तू पुढे काय करणार? असे प्रश्न विचारायला सुरवात केली. तेव्हा शिवांगीचं उत्तर असायचं, मला आकाशाला स्पर्श करायचा आहे. त्यासाठी तिने बनारस (वाराणसी) हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिकडून तिने आपले पुढचं शिक्षण पूर्ण करत भारतीय वायूदलात प्रवेश केला. वाराणसीमधली शिवांगी सिंग आता भारतीय वायुदलाच्या १७ नंबर "गोल्डन ऍरोज" स्क्वाड्रनचा भाग झाली. भारतीय वायुदलाने आपले दरवाजे लढाऊ वैमानिक म्हणून स्त्रियांसाठी खुले केल्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये शिवांगी सिंगचं स्वप्न प्रत्यक्षात खरं ठरलं.

भारतीय वायुदलाच्या १७ नंबर गोल्डन ऍरोज स्क्वाड्रनकडे मिग २१ बायसन या लढाऊ विमानांचं सारथ्य होतं. मिग २१ बायसन ही जवळपास ६ दशकं जुन्या असलेल्या विमानांचा भाग आहेत. भारताने रशियन Mikoyan-Gurevich MiG-21 मध्ये खूप सारे बदल करून मिग २१ बायसन विमान अजूनही वापरात ठेवलं आहे. ही विमानं चालवणं म्हणजे वैमानिकासाठी एक आव्हान आहे. एकतर ही विमानं खूप जुनी झाली आहेत, त्यात मिग २१ बायसनचा उड्डाण भरतेवेळी आणि उतरतेवेळी वेग हा जवळपास ३४० किलोमीटर/ तास असतो. त्यामुळे यांचं सारथ्य करणं हे खूप जिकीरीचं काम आहे. अश्या विमानांचे सारथ्य करण्याची संधी फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगला २०१७ साली प्राप्त झाली. ''नभः स्पृशं दीप्तम्'' या शब्दांना खरं करत तिने आकाशाला गवसणी घातली. भारताचा प्रसिद्ध लढाऊ वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सोबत उड्डाण भरण्याची संधी फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगला मिळाली.

१७ नंबर गोल्डन ऍरोज स्क्वाड्रनला आधुनिक बनवताना भारतीय वायुदलाने भारताच्या सगळ्यात आधुनिक आणि बहुचर्चित अश्या राफेल लढाऊ विमानांची जबाबदारी सोपवली. १६०० कोटी रुपये प्रत्येकी किंमत असणारं राफेल जगातील अत्याधुनिक आणि अतिशय प्रगत विमानात गणलं जातं. एकेकाळी जगातील सगळ्यात जुनी लढाऊ विमानं चालवणारी वैमानिक ते भारतातील सगळ्यात आधुनिक लढाऊ विमान चालवणारी वैमानिक हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. एक लढाऊ वैमानिक बनणं अतिशय खडतर प्रवास आहे. शारिरीक तसंच मानसिक अश्या दोन्ही पातळ्यांवर तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम रहावं लागतं. अतिशय अडचणीच्या काळात सुद्धा डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक लढाऊ विमान हे चालवण्यास वेगळं असतं याशिवाय त्याची रडार प्रणाली आणि इतर तंत्रज्ञान वेगळं असतं. हे सर्व आत्मसात करून अतिशय सहजतेने वापरता येणं अतिशय गरजेचं असतं. भारतीय वायुदलाला एक लढाऊ वैमानिक तयार करण्यासाठी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. अश्या वैमानिकाच्या हातात जवळपास १६०० कोटी रुपयांचं लढाऊ विमान दिलं जातं तेव्हा त्याचं कौशल्य हे असामान्य असंच असतं.

फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगने समाजाच्या चाकोरीतल्या जीवनाचा पिंजरा सोडत आकाशात भरारी घेतली आहे. सध्या ती मिग बायसन २१ ते राफेल या मधला प्रशिक्षणाचा प्रवास करत आहे. लवकरच आपलं प्रशिक्षण संपवून भारताच्या सर्वात आधुनिक आणि शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या राफेल विमानाचं सारथ्य करेल. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी भारताचं सगळ्यात जुनं लढाऊ विमान ते भारताचं सगळ्यात अत्याधुनिक लढाऊ विमानाचं सारथ्य करणे असा पल्ला गाठला आहे. हा पल्ला गाठणारी ती पहिली भारतीय महिला आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगने सर्वच भारतीयांसमोर आपल्या कर्तृत्वाने दुर्गाशक्तीचं एक वेगळं रूप समोर ठेवलं आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगच्या कर्तृत्वाला माझा सलाम आणि तिच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप शुभेच्छा.

जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत:- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday, 17 October 2020

दुर्गाशक्ती भाग २ .. पद्मभूषण डॉक्टर त्सेरिंग लांडोल .. विनीत वर्तक ©

 दुर्गाशक्ती भाग २ .. पद्मभूषण डॉक्टर त्सेरिंग लांडोल .. विनीत वर्तक ©

भारतात अनेकांना काही प्रदेश हा भारताचा हिस्सा आहे, हेच मुळात माहीत नसते. भारताची अतिपूर्वेकडील राज्यं किंवा भारताच्या उत्तरेकडील काही भाग यांची मुख्य भारताशी नाळ तशी तुटलेली आहे. अनेकदा इकडे राहणाऱ्या लोकांना आपण भारतीय पण मानत नाही. लडाख हा भारताचा असाच एक भाग. सध्या लडाख भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पटलावर प्रसिद्ध झाला आहे. लडाख इथलं वातावरण मानवी वस्तीसाठी प्रतिकूल आहे. थंडीच्या काळात पारा उणे ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जातो. बाकीच्या भागाशी संपर्क तुटतो. अश्या गोठवणाऱ्या थंडीत अतिउंचीवर असणाऱ्या विरळ हवा, ऑक्सिजनची कमतरता तसेच बोचऱ्या थंडीचा सामना करत जगणंच जिकडे एक युद्धासमान आहे तिकडे वैद्यकीय सेवा वगैरेबद्दल सगळा आनंदी आनंद असताना या भागातील एक मुलगी, आपल्या भागातील गरोदर स्त्रियांचं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी असं एक शिवधनुष्य आपल्या खांद्यावर उचलते ज्याचा विचार करणंही क्रांतिकारी होतं. ते शिवधनुष्य नुसतं उचलूनच नव्हे तर समर्थपणे पेलून आपलं संपूर्ण आयुष्य लडाखमधील तब्बल तीन पिढ्यांच्या सेवेत घालवताना अनेक नवीन आयुष्यांना आकार देणारी ती स्त्री म्हणजेच "पद्मभूषण डॉक्टर त्सेरिंग लांडोल".

त्सेरिंग लांडोल यांचा जन्म लेह इथे, जिकडे शिक्षणाचा गंध पण पोहोचला नव्हता अशा ठिकाणी  एका सर्वसाधारण कुटुंबात झाला,६ भावंडांत त्या एक होत्या. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे काय, या विचारात असताना लेह इकडे आलेल्या एका असिस्टंट डॉक्टरच्या गळ्यात अडकवलेला स्टेथोस्कोप पाहून त्यांना आपला मार्ग मिळाला. आपणही कधीतरी असा स्टेथोस्कोप गळ्यात घालून लोकांची सेवा करावी असं त्यांच्या मनाने ठरवलं. स्वप्न बघणं सोप्पं असतं पण लक्ष्याकडे प्रत्यक्ष वाटचाल करणं तितकंच कठीण असतं. त्सेरिंग लांडोल यांच्यापुढे साक्षात हिमालय उभा होता. लेहसारख्या दुर्लक्षित प्रदेशात जिकडे शिक्षणाची वानवा होती तिकडून संशोधन करण्यासाठी किंवा डॉक्टर होण्यासाठी कोणतेच पर्याय नव्हते. याशिवाय मोठी अडचण होती ती भाषेची. जिकडे बोली भाषा ही लडाखी, उर्दू होती तिकडे पुढला अभ्यासक्रम हा इंग्रजी भाषेतून होता. पण त्सेरिंग लांडोल मागे हटणाऱ्या नव्हत्या. भाषेच्या अडचणींवर मात करून वैद्यकीय अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश घेतला. लेह-लडाख भागात शिक्षणाचा अभाव असल्याने खुळ्या समजुतींचा पगडा इथल्या समाजावर खूप मोठा होता.

थंड हवामानामुळे इथल्या भागातील लोक आंघोळ आठवड्यातून एखाद्या वेळेस करत. शारीरिक स्वच्छता तसेच मासिक पाळी, गरोदरपणात निष्काळजीपणामुळे अनेक स्त्रियांना आणि नवजात बाळांना आपले प्राण गमवावे लागत होते. अंधश्रद्धा, खुळचट समजुती यांमुळे स्त्रियांना खूप त्रासातून दिवस काढावे लागत होते. वैद्यकीय अभ्यास शिकताना त्सेरिंग लांडोल यांना याच क्षेत्रात लेह-लडाख इथल्या स्त्रियांना काहीतरी मदत करण्याची गरज आहे याची जाणीव झाली. त्यांनी स्त्रीरोगतज्ञ बनण्याचं नक्की केलं. १९७९ साली जेव्हा एक स्त्रीरोगतज्ञ बनून त्यांनी लेह-लडाख इकडे आपली सेवा सुरू केली, तेव्हा खूप साऱ्या अडचणी त्यांच्यासमोर होत्या. इथले वातावरण जे अनेकदा शून्याच्या खाली जात असते, त्यामुळे प्रसूतीच्या वेळेस अनेक अडचणींचा सामना डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांना करावा लागत होता. प्रसूतीच्या वेळेस इथलं तापमान उबदार आणि योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी लाकडाच्या चुलीचा वापर केला जात होता. यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे नवजात शिशूंच्या जीवाला धोका होता.  डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांनी अभिनव पद्धतीचा वापर करत प्रसूतीगृहाचं तापमान उबदार ठेवलं. ऑक्सिजनची कमतरता प्रसूती काळात जाणवू नये यासाठी त्यांनी स्थानिक आणि सरकारी पातळीवर प्रयत्न केले. प्रसूती आणि एकूणच स्त्रियांशी निगडित सगळ्याच वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी सरकार, प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निष्पक्ष पद्धतीने डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांनी प्रयत्न केले.

लेह-लडाख इथल्या प्रतिकूल हवामानासोबत सगळ्यात मोठी अडचण डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांच्या समोर होती, ती म्हणजे इथल्या स्त्रियांशी संवाद साधणं. अशिक्षितपणा, सामाजिक रूढींचा पगडा इथल्या स्त्रियांवर खूप जास्ती होता. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल एखाद्या डॉक्टरला सांगायला त्यांच्याशी खूप जास्ती संवाद गरजेचा होता. डॉक्टरच्या भूमिकेतून एका मैत्रिणीच्या, एका आईच्या, एका सखीच्या भूमिकेत उतरणं डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांना गरजेचं होतं. गेली ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी लेह-लडाखसोबत कारगिल इथल्या अनेकांच्या प्रसूतीत डॉक्टरच्या भुमिकेतून आपलं योगदान  दिलं आहे. डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांनी फक्त इथवर न थांबता सामाजिक जाणिवेतून शाळा, कॉलेज, गाव इथल्या मुलींशी, स्त्रियांशी संवाद साधून मासिक पाळी, प्रसूती, लैंगिक समस्या यांवर समाजाला जागृत करण्याचं आपलं कार्य सुरु ठेवलं आहे. आज वयाच्या ७५व्या वर्षीसुद्धा त्यांनी आपलं कार्य सुरु ठेवलं आहे. डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांच्या या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने २००६ साली पद्मश्री सन्मानाने त्यांचा गौरव केला. पद्मश्री मिळाल्यावरही त्यांनी आपल्या कार्याचा प्रवास असाच सुरु ठेवला. आज त्यांनी प्रसूती केलेल्या स्त्री/पुरुषांच्या नातवंडांची प्रसूतीही डॉक्टर त्सेरिंग लांडोल त्याच तन्मयतेने आणि सामाजिक भावनेने करत आहेत. भारताच्या अतिशय प्रतिकूल भागातील स्त्रियांचं आयुष्य सुखकर बनवणाऱ्या डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांच्या कार्याचा सन्मान करताना २०२० साली भारत सरकारने त्यांना "पद्मभूषण" सन्मान दिला.

लेह-लडाखसारख्या दुर्गम भागात सामाजिक रूढी, प्रथा मोडत पहिल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर बनून समाजातील प्रत्येक स्त्रीचं आयुष्य सुखकर बनवत तिला आत्मनिर्भर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर त्सेरिंग लांडोल या दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत. पैसा, पद, प्रतिष्ठा, मान-सन्मान याच्यामागे न धावता ज्या समाजातून आपण आलो, त्या समाजाला माणुसकीच्या, विकासाच्या पथावर घेऊन जाण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांना माझा नमस्कार आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा.

माहिती स्रोत :- गुगल 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    




Friday, 16 October 2020

#दुर्गाशक्ती भाग १ .. सर्प नर्तिका पद्मश्री गुलाबो सपेरा .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग १ .. सर्प नर्तिका पद्मश्री गुलाबो सपेरा .. विनीत वर्तक ©

आज आपल्या माउसने जगाला नाचवणारा देश अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे. पण काही दशकांआधी भारताची ओळख साप आणि गारूड्यांचा देश अशी होती. अश्याच एका गारूड्याच्या घरात गुलाबोचा जन्म झाला. गरिबीच्या खाईत आणि जातीपातीच्या समाजव्यवस्थेत मुलगी म्हणून जन्माला येणं एक पाप मानलं जात होतं. त्यात गुलाबो सातवं अपत्य. सातवी मुलगी म्हणून गुलाबोला गावातल्या समाजाने जिवंतपणी जमिनीत गाडून टाकलं. स्त्री म्हणजे साक्षात दुर्गा, पण दुर्गेला मुलगा हवा या अट्टाहासापायी जिवंतपणी मरणाच्या यातना अवघ्या पहिल्या दिवशी भोगाव्या लागल्या. पण गुलाबो जन्मापासून काहीतरी वेगळं नशीब घेऊन जन्माला आली होती. साक्षात दुर्गेचा वरदहस्त तिच्या डोक्यावर होता. तब्बल सात तासांनी एक दिवसाच्या गुलाबोला तिच्या काकीने जमिनीतून उकरून बाहेर काढलं, तोवर गुलाबो जिवंत होती. ज्या कालबेलिया समाजाने मुलगी म्हणून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच समाजाची ख्याती तिने जगातील तब्बल १६५ देशात पसरवली आहे. आज युनोस्कोने कालबेलिया या जातीच्या पारंपारिक नृत्य आणि गाण्यांना जागतिक वारश्याचा दर्जा दिला आहे त्यामागे गुलाबोचा वाटा सिंहाचा आहे.

लहानपणीच मृत्यूला स्पर्श करून आलेल्या गुलाबोचं बालपण सापांच्या सोबत सुरू झालं. तिचे वडील गारुड्याचे खेळ जागोजागी रस्त्यावर करत फिरत असत आणि त्याच कमाईवर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. लहानपणीच पुंगीच्या तालावर सापांच्या त्या लयबद्ध हालचाली गुलाबोने आत्मसात केल्या. ती सुद्धा सापांप्रमाणे आपल्या शरीराच्या अश्या काही हालचाली लयबद्ध पद्धतीने करायला लागली ज्याचा आजवर कोणी विचार केला नव्हता. लहानपणीच आत्मसात केलेल्या हालचाली जागतिक पटलावर तिची ओळख बनतील याचा विचार ना तिने कधी केला ना तिच्या घरच्यांनी. वयाच्या ७ व्या वर्षी गुलाबोने सापांसोबत आपल्या नृत्याची कला दाखवायला सुरवात केली. वयाच्या १० व्या वर्षी पुष्करच्या जत्रेत पुंगीच्या तालावर आणि सापांच्या डोलण्यावर तश्याच हालचाली करणारी ही मुलगी लोकांच्या नजरेत भरली. पहिल्यांदा गुलाबोला आपण मुलगी असल्याचा अभिमान वाटला कारण जे काही ती करत होती त्याला लोक टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. आजवर मुलगी म्हणून नेहमीच कमी लेखल्या गेलेल्या गुलाबोच्या बालमनाला तो प्रतिसाद एक वेगळं समाधान देत होता.

गुलाबोचं सर्पनृत्य तिकडे आलेल्या राजस्थानच्या पर्यटन विभागाच्या तृप्ती पांडे आणि हिंमत सिंग ह्यांच्या नजरेत भरलं. गुलाबोच्या नृत्याचा तो आविष्कार जगावेगळा होता. त्यांनी तिला जयपूर इकडे आमंत्रित केलं. जयपूर सारख्या शहरात आल्यावर तिने आपल्यातल्या नृत्याच्या अंगभूत गुणांना एक वेगळी जोड दिली. नृत्यासोबत आपला पेहराव म्हणजेच घागरा चोळी तसेच त्यावर असणारे छोटे आरसे या विशिष्ट आकर्षित करणाऱ्या पेहरावाला तिने आपलंसं केलं. आपल्या नृत्याला एका साच्यात न बसवता तिने शरीराच्या लयबद्ध हालचालीने पारंपारिक नृत्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं. तिच्या या मेहनतीमुळे तिला १९८५ साली भारत सरकारतर्फे अमेरिकेत वॉशिंग्टन डी. सी. इकडे जाण्याची संधी मिळाली. पण पुन्हा एकदा समाज तिच्या विरूद्ध उभा राहिला. एका मुलीने असं नाचायला साता समुद्रापार जाणं समाजाला मान्य नव्हतं पण गुलाबोने कोणाचं ऐकलं नाही. अमेरिकेला जाण्याच्या आधी एक दिवस तिच्या वडिलांचं निधन झालं. पण गुलाबो डगमगली नाही. आपल्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं.

अमेरिकेची ही वारी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकू शकते हे गुलाबोला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे अश्या कठीण परिस्थितीत पण तिने अमेरिका गाठली. तब्बल दोन महीने तिने अमेरिकेत आपल्या नृत्याचा आविष्कार दाखवला. तिच्या नृत्याची मोहिनी अमेरिकेवर इतकी चढली की असं नृत्य आपल्या नागरिकांना शिकवण्यासाठी अमेरिकेने गुलाबोला आपल्या देशाचं नागरिकत्व देऊ केलं. ज्या भारतीयांनी तिला मुलगी म्हणून हिणवलं, तिला जिवंत गाडलं तरी आपल्या देशाशी असलेली नाळ तोडण्यास तिने तितक्याच नम्रतेने नकार दिला. पुन्हा एकदा गुलाबो अमेरिकेतून भारतात परतली. भारतात परत आल्यावर ज्याप्रमाणे दुसऱ्या देशाने कौतुक केल्यावर भारतीयांना आपल्या हिऱ्याची पारख होते त्याप्रमाणे भारतीय मिडियाने गुलाबो सपेराला डोक्यावर घेतलं. गुलाबो सपेरा आता एक ब्रँड म्हणुन अस्तित्वात आला. ज्या समाजाने तिला गाडलं त्याच समाजाची आता ती अध्यक्ष बनली.

गुलाबोने आपल्याच समाजातील इतर स्त्रियांचं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणजे ''गुलाबो सपेरा संगीत संस्थान'' या संस्थेची निर्मिती केली. आपल्या सर्पनृत्याचे कार्यक्रम तिने जगभर सादर केले. जवळपास १६५ देशांना गुलाबो सपेराच्या सर्प नृत्याची मोहिनी पडली आहे. युनोस्कोसारख्या जागतिक संघटनेला तिच्या अभिजात कलेची दखल घ्यायला लागली, ह्यात सगळं आलं. ही कला आपल्या पुढल्या पिढीत आणि आपल्या समाजात चालू ठेवण्यासाठी गुलाबो सपेराचे आजही प्रयत्न सुरु आहेत. आज गुलाबो सपेरा एक सेलिब्रेटी नृत्यांगना म्हणुन जगात प्रसिद्ध आहे. भारतातील पारंपारीक नृत्याला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री सन्मानाने तिचा गौरव केला आहे.

गरीबी, कष्ट, अवहेलना, कुचंबणा ह्यातून जागतिक मंचावर एक सेलिब्रेटी होण्यापर्यंतचा गुलाबो सपेराचा प्रवास थक्क करणारा तर आहेच पण दुर्गाशक्तीचं एक वेगळं रूप दाखवणारा आहे. तिच्या या प्रवासावर दोन फ्रेंच लेखकांनी  "Gulabo Sapera, danseuse gitane du Rajasthan (Gulabo sapera, the gypsy dancer from Rajasthan)" नावाचं पुस्तकही लिहीलं आहे. आजही भारतात अनेक ठिकाणी मुलगी होणं म्हणजे पाप समजलं जातं. मुलगी आईच्या पोटात असताना भ्रूणहत्येसारखी कृत्यं आजही केली जातात. आजही पैसे भरून लिंग ओळख करून देणाऱ्या लॅब भारतात मागच्या दाराने सुरू आहेत. आजही भारतात स्त्रीला तिचा सन्मान दिला जात नाही. आज दुर्गेचा उत्सव साजरा होत असताना दुर्गाशक्तीच्या स्त्री रूपाचा आदर आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा. मृत्यूच्या दाढेतून परत येऊन आपला मानसन्मान मिळवताना भारताचा तिरंगा अटकेपार रोवणाऱ्या पद्मश्री गुलाबो सपेरा यांना माझा कुर्निसात आणि त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

माहिती स्रोत :- गुगल 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Wednesday, 14 October 2020

पद्मश्री मिळवणारे जपानी प्रोफेसर... विनीत वर्तक ©

 पद्मश्री मिळवणारे जपानी प्रोफेसर... विनीत वर्तक ©

१५० वर्षानंतर इंग्रजांच्या गुलामीतुन भारताला स्वातंत्र्य तर मिळालं पण जाता जाता आपल्याच भाषेला इंग्रज चिकटवून गेले. आज त्या इंग्रजी भाषेचा पगडा भारताच्या येणाऱ्या पिढ्यांवर इतका बसला आहे की आपल्याच मातृभाषेतून बोलणं भारतीय मागासलेपणाचे लक्षण समजतात. इंग्रजी ही जागतिक पटलावर अभ्यासाची, संवादाची आणि बोलली जाणारी भाषा आहे ह्यात दुमत नक्कीच नाही. त्यामुळे ती शिक्षण आणि आत्मसात करणं हे गरजेचं नक्कीच आहे पण हे करताना आपल्या मातृभाषेला दुय्यम दर्जा देणं हे तितकच चुकीचं आहे. भारतामध्ये विविधतेत एकता आहे. भारतात २२ प्रमुख भाषा तर जवळपास १९,५०० बोली भाषा बोलल्या जातात. ह्या सगळ्यांना जपण्यासाठी त्यांचा वापर होणं गरजेचं आहे. आज इंग्रजीच्या पुढाकारात ह्यातील अनेक भाषांची गळचेपी  होते आहे. भारतीयांना भारताच्या भाषांच महत्व सांगून कित्येक भारतीय भाषा आत्मसात करून त्याच महत्व जपान आणि जागतिक पातळीवर सांगुन जपान आणि भारत ह्यांच्या संबंधातील एक महत्वाचा दुवा ठरलेले जपानी प्रोफेसर 'टॉमीओ मिझोकामी'. 

टॉमीओ मिझोकामी ह्यांचा जन्म १९४८ साली कोबे, जपान इकडे झाला. लहानपणापासून त्यांच्या मनात भारताविषयी कुतूहल निर्माण झालं. भारताच्या विविध भाषा आणि संस्कृती ह्याबद्दलच सुप्त आकर्षणाने त्यांना भारताकडे ओढत नेलं. आपलं शिक्षण पुर्ण करत असताना त्यांनी दिल्ली विद्यापीठातुन हिंदी भाषेवर अभ्यास करून त्यात मानाची डॉक्टरेट मिळवली. हिंदी भाषेतुन डॉक्टरेट नुसती मिळवून ते थांबले नाहीत तर हिंदी भाषा त्यांनी आत्मसात केली. आजही ज्या अस्खलितपणे हिंदी भाषा बोलतात की ऐकणाऱ्याला त्यांची मातृभाषा कोणती असा प्रश्न पडेल. हिंदी सोबत उर्दू, पंजाबी ह्या भारतीय भाषा शिकुन त्यांनी आत्मसात केल्या. भारतीय भाषांसोबत फ्रेंच भाषेवर ही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. 

भारतीय भाषांवर प्रेम आणि प्रभुत्व मिळवल्यावर त्यांनी जगभर ह्याचा प्रसार सुरु केला. मानाच्या अश्या केलिफोर्निया विद्यापीठ, अमेरीका इकडे पंजाबी शिकवणारे शिक्षक म्हणून काम केले. ह्याशिवाय ओसाका विद्यापीठ, जपान इकडे भारतीय भाषांचे शिक्षक म्हणुन आयुष्यभर अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. आपल्या निवृत्ती नंतर ही एमिरेट्स म्हणजेच सन्मानीय शिक्षक म्हणून ओसाका विद्यापीठात आजतागायत कार्यरत आहेत. पंजाबी भाषेत संशोधन करताना त्यांनी 'जपजी साहेब' ह्या शिखांच्या प्रार्थनेच जपानी भाषेत अनुवाद केला आहे. जपान आणि भारत ह्यांच्या बद्दल बोलताना ते नेहमी सांगतात की दोन्ही देशांना खुप जुनी संस्कृती, परंपरा आहे. दोन्ही देशांच्या संस्कृतीत मानवी नितीमूल्य जपली गेली आहेत. हिंदी भाषेवर नाही तर हिंदी गाण्यांवर ही त्यांच खुप प्रेम आहे. 

I like "unity in diversity". India is multilingual and multicultural. In spite of so much diversity, there is Indianess. I like old Hindi songs. Mera juta hai japani.  

टॉमीओ मिझोकामी जवळपास एक वर्ष पुण्यात वास्तव्यास होते. ह्या कालावधीत आपण मराठी पुर्णपणे न शिकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. आपल्या संस्कृतीचा गाभा हाच मुळी आपली भाषा आहे. जरी इंग्रजी रोजच्या व्यवहाराची भाषा असली तरी संवाद हा मातृभाषेतून व्हायला हवा असं त्यांच प्रांजळ मत आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान ला दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी मोदींना खास पत्र लिहुन जपान मध्ये हिंदीतुन संवाद करण्याची विनंती केली होती. हिंदी किंवा कोणत्याही मातृभाषेतुन बोलणं जेव्हा भारतीय कमी पणाच समजतात तेव्हा मिझोकामी म्हणतात, 

“I get angry when Indians speak to each other in English. They seem to look down upon Hindi speakers". 

 एका जपानी प्रोफेसर च भारतीय भाषांवरील प्रेम हे जगावेगळं आहे. आपली जापनीज संस्कृती जपताना त्यांनी भारतीय भाषांचा प्रसार आणि त्याच महत्व जागतिक पटलावर विषद केलं आहे. भारतीय भाषा शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. भारतात भारतीय भाषांच्या प्रसारासाठी त्यांनी अमुल्य योगदान दिलं आहे. अश्या जपानी प्रोफेसर टॉमीओ मिझोकामी ह्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेताना त्यांना २०१८ साली पद्मश्री सन्मानाने गौरवांकित केलं आहे. पद्मश्री सन्मान मिळाल्यानंतर ही त्यांचे शब्द खुप काही सांगुन जातात, 

I don't know why I was chosen (smiles), at least I contributed something to Hindi and other Indian languages.

भारतीयांना भारतीय भाषांची ओळख करून देताना इंग्रजीच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपल्या संस्कृतीची, भाषांच स्वातंत्र्य चिरायू ठेवण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमुल्य असच आहे. एक जपानी प्रोफेसर भारतीयांना सांगतो की आपल्याच भाषेतुन बोलणं, संवाद करणं म्हणजे मागासलेपणाच लक्षण नाही तर ते आपल्या अमुल्य ठेव्याच लक्षण आहे. त्यामुळे पुढल्या वेळी संवाद करताना आपल्या भाषेतुन करा कारण आपल्या संस्कृतीला हजारो वर्षाचा वारसा आहे आणि तो जपणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भारतीयांना भारताच्या संस्कृतीची, भाषेची ओळख करून देणाऱ्या जपानी प्रोफेसर टॉमीओ मिझोकामी ह्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच हे पवित्र कार्य शेवटपर्यंत चालण्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा. 

जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल, भारत सरकार  

फोटो स्रोत:- गुगल     

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Sunday, 11 October 2020

द लास्ट गर्ल....(नादिया मुराद)... विनीत वर्तक ©

 द लास्ट गर्ल....(नादिया मुराद)... विनीत वर्तक ©


नादिया मुराद हे नाव सामान्य लोकांना माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही! आपल्या आयुष्यातले आदर्श हे सिनेमा आणि राजकारणापलीकडे जात नाहीत म्हणून ही नावं आपल्या ध्यानीमनी ही नसतात. स्त्री मुक्ती चळवळ, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री समानता ह्याची आवई उठवून त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेकांना पण हे नावं माहित नसेल.

कोण आहे ही नादिया मुराद? असं काय केलं आहे तिने की ज्याच्यासाठी तिला जगातील सगळ्यात प्रतिष्ठित अशा २०१८ च्या नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नादिया मुराद चं आयुष्य म्हणजे मानवतेला काळिमा फासणाऱ्या पण त्याचवेळी त्यातून पुन्हा बाहेर येऊन जगाच्या पातळीवर स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती आणि स्त्री समानता ह्या गोष्टींचं एक जिवंत उदाहरण आणि प्रतिबिंब आहे. 

पुरुषाने स्त्री ला कसं आपलं खेळणं म्हणून वापरलं आहे, कसे तिच्यावर अत्याचार केले आहेत हे सर्व नादिया मुराद च्या शब्दातून वाचलं, तर मला आणि माझ्यासोबत इतर अनेक पुरुषांना आपण पुरुष असल्याची लाज वाटेल इतकं हे भयावह आहे! ह्या सगळ्यातून नादिया मुराद ने केलेला प्रवास एकीकडे डोळे ओले करतो. चीड आणतो तर दुसरीकडे माणूस माणुसकी विसरला आहे ह्याची जाणीव करून देतो. ह्या सर्व गोष्टीतून पुन्हा एकदा उभं राहून आपल्यावर झालेल्या ह्या भीषण कृत्यांची सर्व जगाला जाणीव करून देताना नादिया मुराद ने अनेक स्त्रियांच्या मनातलं दु:ख जागतिक पटलावर तितक्याच प्रभावीपणे मांडलं आहे. 

नादिया मुराद, 'कोचो, सिंजर, इराक' येथे १९९३ साली जन्माला आली. ती इराक मधल्या 'याझीदी' ह्या जमातीत. तिचं कुटुंब शेती करून आपली गुजराण करत होतं. आपली आई व ६ सख्खे आणि चुलत भावांसोबत आयुष्य सुरळीत चालू होतं. पण १५ सप्टेंबर २०१४ ला सगळं आयुष्य बदललं. इस्लामिक स्टेट इराक (इसिस) ने त्यांच्या गावावर कब्जा केला. जवळपास १५० पेक्षा जास्त स्त्रियांना बंदी बनवलं गेलं. त्यात नादिया मुराद ही एक होती. मग सुरु झाला एक नरकापेक्षा वाईट असणारा प्रवास. ज्याची कल्पना आपण एक वाचक म्हणून केली तरी अंगावर शहारे उभे राहतात. नादियाला बंदी बनवून 'मुसोल' इकडे आणलं गेलं. अमानुष अत्याचार तिच्यावर आणि सगळ्या बाकीच्या स्त्रियांवर करण्यात आले. तिला मारण्यात आलं. अनेकदा बलात्कार करण्यात आला. पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून गैंग रेप करण्यात आला. अनेकदा तिला विकण्यात आलं.  सिगरेट चे चटके देण्यात आले. त्याही पलीकडे जी अमानवीय वागणूक दिली गेली ते लिहिण्यासाठी शब्द कमी पडतील इतकी क्रूरता आहे त्यात!!

इस्लामिक स्टेट इराक (इसिस) च्या कैदेतून नादिया कशीबशी निसटली. उत्तर इराक च्या एका शरणार्थी शिबिरात तिने आश्रय घेतला. फेब्रुवारी २०१५ ला तिने एका बेल्जियन वृत्तपत्राच्या वार्ताहराला आपली कथा सांगितली. २०१५ ला १००० शरणार्थीना जर्मन सरकारने आपल्या देशात राहण्याची मुभा दिली. त्यात एक नादिया होती. डिसेंबर २०१५ ला नादियाने 'युनायटेड नेशन' च्या सिक्युरिटी कौन्सिल मध्ये मानवी तस्करी आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात वाचा फोडली. तिने मानवतेला काळिमा फासणाऱ्या क्रूर पद्धतींना जगाच्या अनेक पातळीवर वाचा फोडली. ह्यासाठी तिला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या ही आल्या. पण तिने आपला लढा सुरु ठेवला. ह्यानंतर जे झालं तो इतिहास आहे. नादिया मुराद चा हा संघर्ष आणि स्त्रियांवर इस्लामिक स्टेट 'इराक' म्हणजेच 'इसिस'ने केलेले अमानुष अत्याचार ऐकून पूर्ण युनायटेड नेशन ढवळून निघालं. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी तिला जगातील सगळ्यात प्रतिष्ठित अशा नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

नादिया मुराद ने जेव्हा ते काळेकुट्ट क्षण जगासमोर आपल्या शब्दात मांडले तेव्हा खरंच माणुसकी हरली. नादिया सांगते, 

“रात्रीच्या वेळी बाजार सुरु व्हायचा. सैन्यातील लोक खालच्या मजल्यावर आपली नाव नोंदणी करायचे. थोड्या वेळाने एक जण आत यायचा. त्या पाशवी नजरेने आम्हा सगळ्यांना बघायचा. त्याची नजर आमच्या चेहऱ्यापासून ते पायापर्यंत सगळ्याच उभारांकडे जायची. त्यातल्या त्यात चांगल्या दिसणाऱ्या मुलीवर त्याची नजर थांबायची. मग तो विचारायचा, किती वर्षाची आहेस? सगळ्या मुली ओरडत, रडत असायच्या. दयेची भीक मागायच्या पण त्या हपापलेल्या नजरांना वासनेशिवाय काहीच दिसत नव्हतं. तो तिकडे पहारा देणाऱ्या रक्षकाला विचारायचा, “ही वर्जिन आहे न?” मग एक एक जण एकेकीला उचलून घेऊन जायचा. त्यानंतर जे व्हायचं ते शब्दांपलीकडचं, अमानुष आहे. सिगरेटचे चटके, मारहाण, पाशवी बलात्कार तर रोजचं होतं.”

I wanted to tell them that so much more needed to be done. We needed to establish a safe zone for religious minorities in Iraq; to prosecute Isis – from the leaders down to the citizens who had supported their atrocities – for genocide and crimes against humanity; and to liberate all of Sinjar. I would have to tell the audience about Hajji Salman and the times he raped me and all the abuse I witnessed. Deciding to be honest was one of the hardest decisions I have ever made, and also the most important. 

नादिया मुराद चे शब्द मला निशब्द करून गेले. युनायटेड नेशन मध्ये दिलेल्या भाषणात ती म्हणते,

I told them about how I had been raped and beaten repeatedly and how I eventually escaped. I told them about my brothers who had been killed. It never gets easier to tell your story. Each time you speak it, you relive it. When I tell someone about the checkpoint where the men raped me, or the feeling of Hajji Salman’s whip across the blanket as I lay under it, or the darkening Mosul sky while I searched the neighbourhood for some sign of help, I am transported back to those moments and all their terror.

तिचा प्रत्येक शब्द कुठेतरी आतून येतं होता. कुठेतरी मला आत पोखरत होता. त्या शब्दांनी सगळ्या भावना, राग, चीड सगळंच असं आतवर खोलवर जखम करून गेलं. नादिया मुराद ला हे सगळं पुन्हा एकदा जगापुढे सांगताना किती कठीण गेलं असेल?

 तिचे ते शब्द, 

“Deciding to be honest was one of the hardest decisions I have ever made, and also the most important”. 

मला कुठेतरी निशब्द करून गेले. तो त्रास, त्या यातना काय असतील ह्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही! पण ह्या सगळ्यातून 'नादिया मुराद' ने आपली आणि संपूर्ण याझिदी स्त्रियांवर झालेला अमानुष अत्याचार जगापुढे मांडला आणि जगाला विनंती केली,

When I finished telling my story, I continued to talk. I told them I wasn’t raised to give speeches. I told them that every Yazidi wants Isis prosecuted for genocide, and that it was in their power to help protect vulnerable people all over the world. I told them that I wanted to look the men who raped me in the eye and see them brought to justice. More than anything else, I said, I want to be the last girl in the world with a story like mine.

तिच्या ह्या लढ्याला यश येईलच; पण तिची कथा मला स्वतःला कुठेतरी अस्वस्थ करून गेली आहे. तिने आपली ही कथा एका पुस्तकात मांडली आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे...

'The Last Girl: My Story of Captivity and My Fight Against the Islamic State.'

तिचं पुस्तक तर मी वाचणार आहेच पण नादियाचं स्वप्न की ह्या सगळ्या यातनातून जाणारी मी शेवटची मुलगी / स्त्री असो. हे पूर्ण करण्याची जबाबदारी नकळत एक पुरुष म्हणून मला जाणवली. कुठेतरी स्त्री ला वस्तू पलीकडे बघण्याची मानसिकता समाजात निर्माण करण्यात आपण कमी पडतो आहोत हे निश्चित !त्याशिवाय इतक्या क्रूरतेची मानसिकता ठेवणारे आणि त्याचं समर्थन करणारे ह्या जगात ताठ मानेने वावरू शकतात ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. 

नादिया, तुझ्या लढ्याला माझा सलाम! तुझं पुस्तक माझ्या घरी आलं असलेच. तुझा हा लढा अनेक स्त्रियांना स्फूर्तीदायक ठरेल ह्यात शंकाच नाही.तुझ्या अभूतपूर्व साहसाला नमन....

माहिती स्त्रोत :- नादिया मुराद, गुगल, द गार्डियन, युनायटेड नेशन 

फोटो स्त्रोत :- गुगल, युनायटेड नेशन

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Friday, 9 October 2020

माणूस असलेला सुपरमॅन .. विनीत वर्तक ©

 माणूस असलेला सुपरमॅन .. विनीत वर्तक ©


लहानपणी अनेक काल्पनिक हिरोंनी माझ्यासोबत अनेकांचं बालपण समृद्ध केलं होतं. असामान्य शक्ती असणारी, नेहमीच लोकांच्या चांगल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढणारी कितीतरी काल्पनिक पात्रे कॉमिक पुस्तकांच्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध झाली. पण यातल्या काही पात्रांनी जगभरातील बालमनावर गारूड केलं. पुढे याच काल्पनिक पात्रांवर चित्रपट आले. आज  'ऍवेन्जर' सारख्या चित्रपटांनी तिकीटबारीवर अनेक विक्रम केले. आज यांतील प्रत्येक पात्रावर वेगळा चित्रपट आलेला आहे आणि काही पात्रं अजरामर झालेली आहेत. त्यातील एक म्हणजेच 'सुपरमॅन'. निळ्या रंगाचा कपडा त्याला मागे लाल रंगाची उडती झालर असा पोषाख घालून हवेत झेपावणारा सुपरमॅन. त्याचे ते घारे डोळे आणि त्या डोळ्यातून निघणारं तेज हे सगळंच आकर्षित करून घेणारं होतं. हा सुपरमॅन पडद्यावर साकारणारा कलाकार होता ख्रिस्तोफर रीव्ह. सुपरमॅनच्या भूमिकेने त्याला अजरामर केलं. पण पडद्यावर असामान्य आयुष्य साकारणारा ख्रिस्तोफर खऱ्या आयुष्यात मात्र जगण्यासाठी आयुष्यभर लढला. त्याच्या आयुष्यात आलेल्या एका वळणावर त्याचं संपूर्ण आयुष्य उध्वस्त झालं, पण हारेल तो सुपरमॅन कसला! ..

१० ऑक्टोबर १९७८ला सुपरमॅन नावाचं वादळ चित्रपटगृहांवर धडकलं. धडकताच तिकीटबारीवरचे सगळे विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले. सुपरमॅन हा वॉर्नर ब्रदर्सचा त्या काळातला सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला. ६ फूट ४ इंच उंची, भरदार शरीरयष्टी आणि निळेशार डोळे असणारा ख्रिस्तोफर रीव्ह सर्व जगात प्रसिद्ध झाला. त्यानंतर येणाऱ्या सुपरमॅनच्या अनेक भागांनी ख्रिस्तोफर रीव्हची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली.  या सगळ्या लाटेत त्याच्यातला कलाकार उपाशीच राहिला. लोक त्याला सुपरमॅनपलीकडे बघूच शकले नाहीत. लोकप्रियतेच्या शिखरावर असूनसुद्धा ख्रिस्तोफर रीव्ह कुठेतरी हरवलेला होता. त्याला घोड्यावर स्वारी करायला खूप आवडायची. घोड्यावर बसून अडथळ्याची शर्यत तो व्यावसायिकपणे करायचा. २७ मे १९९५  हा दिवस ख्रिस्तोफर रीव्हच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. अश्याच एका शर्यतीत भाग घेतला असताना एका अडथळ्याजवळ त्याचा घोडा थांबला आणि त्याच्या पाठीवर बसलेला ख्रिस्तोफर डोक्यावर पडला. या धक्याने त्याच्या मानेवर संपूर्ण शरीराचं वजन आलं त्यामुळे पाठीचा कणा आणि मेंदू यांना जोडणारी यंत्रणा खराब झाली.

एकेकाळी हवेत उडणारा सुपरमॅन आता संपूर्ण आयुष्यासाठी जायबंदी झाला होता. डॉक्टरांनी त्याचे प्राण तर वाचवले पण संपूर्ण आयुष्य त्याला व्हीलचेअर वर काढावं लागणार होतं. जो सुपरमॅन दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायचा त्यालाच आता कोणाच्या मदतीशिवाय एक क्षण सुद्धा जगता येणार नव्हतं. ख्रिस्तोफर रीव्हसाठी हा धक्का खूप मोठा होता. नशिबाने हवेत उडणाऱ्या सुपरमॅन ला कायमचं पिंजऱ्यात बंदिस्त केलं. पण सुपरमॅन हरला असला तरी माणूस म्हणून ख्रिस्तोफर हरला नव्हता. ख्रिस्तोफर रीव्हच्या सोबत त्याची पत्नी उभी राहिली. एका वेळेस आपलं आयुष्य संपवण्याचा विचार करणारा सुपरमॅन कुठेतरी आपल्या आत  पुन्हा आयुष्यात रंग भरण्याचा विचार करत होता. आपल्या जिद्दीच्या जोरावर तो नुसता आयुष्य जगला नाही तर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतुन पुन्हा एकदा त्याने उंच भरारी घेतली. आपल्यासारखं प्रत्येक दिवशी जगण्यासाठी लढा देणाऱ्या व्यक्तींसाठी तो पुढे आला. त्यांना मदत करण्यासाठी त्याने ख्रिस्तोफर आणि डॅना रीव्ह फाउंडेशनची स्थापना केली. त्याने अश्या आजारांवर उपचाराच्या संशोधनासाठी तब्बल १३० मिलियन अमेरीकन डॉलर उभे केले. त्याच्या या मदतीतून जवळपास १ लाख लोकांना फायदा झाला.

या जीवघेण्या अपघातापुढे कोणीही हरलं असतं पण शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांच्या मदतीसाठी लढणारा सुपरमॅन ख्रिस्तोफर रीव्ह खऱ्या आयुष्यात पण शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांसाठी लढला. १० ऑक्टोबर २००४ साली हृदयविकाराच्या झटक्याने माणूस म्हणून जगलेला सुपरमॅन अनंतात विलीन झाला. चार दशकांनंतरही त्याने साकारलेल्या सुपरमॅनची मोहिनी कित्येक लोकांच्या मनावर आजही आहे. माणूस म्हणून जगलेल्या सुपरमॅनच्या स्मृतीस माझं अभिवादन आणि मला खात्री आहे की येणाऱ्या अनेक पिढयांच्या मनात हा सुपरमॅन घर करेल, पण त्याचवेळी कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये माणूस म्हणून आयुष्य जगण्याचं बळ देईल.  
 
फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday, 3 October 2020

स्वाती... विनीत वर्तक ©

 स्वाती.... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात अर्मेनिया आणि अझरबैजान ह्यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या बातम्या भारतात झळकल्या. खरे तर ह्या युद्धाशी भारताचा तसा थेट संबंध नव्हता. पण ह्या बातम्याना भारतात महत्व दिलं गेलं त्यामागे कारण आहे भारताचं 'स्वाती रडार'. ह्याच रडार चा उपयोग करून अर्मेनिया ने काही हेलीकॉप्टर, ड्रोन पाडल्याच्या बातम्या फेसबुक आणि व्हाट्स अप वर फिरत होत्या. पण भारताने अजुन ही सिस्टीम अर्मेनिया ला दिलेली नाही (As of August 2020). अर्मेनिया ह्या देशाने मार्च २०२० ला भारताशी ४० मिलियन अमेरीकन डॉलर चा करार करताना ४ स्वाती रडार खरेदी केले आहेत. अजुन ह्या सगळ्या सिस्टीम अर्मेनियाला आपण द्यायच्या असुन नुकत्याच झालेल्या हल्यात अमेरीकन डिफेन्स चा हात होता. पण तरीसुद्धा स्वाथी रडार च महत्व कमी होत नाही. भारताने रशिया, पोलंड सारख्या देशांना मागे टाकत अर्मेनिया या देशासोबत सैनिकी करार केला आहे. स्वाती रडार हे ह्या दोन्ही देशांच्या रडार सिस्टीम ला मागे टाकत अर्मेनिया च्या पसंतीला उतरलं आहे. स्वाती रडार यंत्रणा नेमकी काय आहे आणि ह्याच महत्व का आहे हे आपण भारतीय म्हणुन जाणून घेतलं पाहिजे.

स्वाती रडार ही कुठे ही नेऊन तैनात करता येईल अशी वेपन लोकेटिंग रडार यंत्रणा आहे. स्वाती रडार शत्रुच्या लपलेल्या मारा करणाऱ्या यंत्रणांचा शोध घेते. एकदा शोध घेतला की त्याची सगळी माहिती आपल्या यंत्रणेला पुरवते. ही माहिती मिळाल्यावर आपण शत्रुच्या ठिकाणावर अगदी अचुकतेने मारा करून त्याचा विनाश करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर पाकीस्तान चे सैनिक हे आपल्या सिमारेषेजवळ जंगलात, डोंगरात लपून आपल्या सैनिकी पोस्ट आणि जवळच्या गावांवर मोर्टार अथवा शेलिंग करून हल्ला करत. अनेकदा हल्ला कुठून होतो हे कळत नसल्याने आपला प्रतिहल्ला अचुक होत नसे. भारताने स्वाती रडार यंत्रणा सिमारेषेजवळ तैनात केल्यावर पाकीस्तान च कंबरड मोडलं आहे. स्वाती रडार यंत्रणा ज्याला पिन पॉईंट अचुकता म्हणतात त्या अचुकतेने जिकडून मारा होतो आहे त्या स्थानाची माहिती भारतीय यंत्रणेला देते. मग आपल्या बोफोर्स अथवा इतर तोफा पाकीस्तान च्या लपलेल्या तोफांचा सुपडा साफ करत आहे. स्वाती रडार ची अचुकता हेच त्याच बलस्थान आहे. ह्यामुळेच सिमारेषेजवळ शेलिंग आणि मोर्टार च्या माऱ्यात खुप कमतरता ही यंत्रणा भारताने बसवल्यावर आली आहे.

स्वाती रडार ची निर्मिती Defence Research and Development Organization’s (DRDO) Electronics Research and Development Establishment (LRDE) laboratory and Bharat Electronics Limited (BEL) ह्या तिन्ही संस्थांनी मिळून केली आहे. स्वाती रडार हे passive electronically-scanned array radar आहे. ह्याचा अर्थ स्वाती रडार आपल्या लक्ष्या ला लॉक करून टाकते त्यासाठी ट्रान्समिटर ला त्या दिशेत फिरवण्याची गरज भासत नाही. स्वाती रडार एकाचवेळी ७ लक्ष्याना लॉक करू शकते. त्या ७ लक्ष्याची प्रत्येक हालचाल स्वाती च्या नजरेतून सुटत नाही. स्वाती रडार कोणत्याही वातावरणात काम करण्यास सक्षम असुन १६,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर ही लक्ष्यभेद करू शकते. ह्याच्या ह्या वैशिष्ठ्यामुळे पाकीस्तान आणि चीन ह्या दोन्ही सिमांवर स्वाती देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास समर्थ आहे. स्वाती रडार मध्ये constant false alarm rate (CFAR) वापरलं गेलं आहे. ह्या यंत्रणेमुळे परत येणारी माहिती म्हणजेच सिग्नल किती स्ट्रॉंग अथवा विक आहे त्याला फिल्टर करून मग त्याची माहिती तपासली जाते. ह्यामुळे स्वाती च्या अचूकतेत वाढ झालेली आहे.

आकाश हे क्षेपणास्त्र विकसित करत असताना DRDO च्या संशोधकांना त्यामध्ये असलेलं राजेंद्र नावाचं रडार हे आसपास असलेल्या शेलिंग ला ही ओळखत असल्याच आढळून आलं. मग ह्याच राजेंद्र रडार ला अजून विकसित करताना त्यांनी स्वाती रडार ची निर्मिती केली. स्वाती रडार २० ते ४० किलोमीटर च्या पट्यातील मोर्टार, आर्टिलरी, शेलिंग अश्या सगळ्यांचा शोध घेऊ शकते. आपल्या चोहोबाजूने मारा कुठून होतो आहे ह्याचा अचुकतेने शोध घेण्याची क्षमता आहे.

स्वाती रडार च्या माध्यमातुन भारताने मेक इन इंडियाला जगाच्या पटलावर एक मार्केट उपलब्ध करून दिलं आहे. युरोप आणि रशिया सारख्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत अर्मेनिया ने केलेली स्वाती ची निवड भारताच तंत्रज्ञान सर्वोत्तम असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. स्वाती रडार च्या पुढल्या पायरीवर ही DRDO च संशोधन सुरु असुन जवळपास २ अब्ज रुपयांच्या ह्या करारामुळे ह्या संशोधनासाठी पैसे उपलब्ध होणार आहेत.

स्वाती रडार च्या निर्मितीमागे असणाऱ्या सगळ्या अभियंते, संशोधक , वैज्ञानिक ह्यांच अभिनंदन.

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Friday, 2 October 2020

छाटलेले पंख .. विनीत वर्तक ©

 छाटलेले पंख .. विनीत वर्तक ©


प्रिया एक आय. टी. कंपनीमधे मॅनेजर होती. अतिशय सुशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली प्रिया तिच्या व्यक्तिमत्वामुळे सगळ्यांची लाडकी होती. कामाच्या निमित्ताने अनेकदा तिला घरी जायला उशीर होत असे. तिच्या कामाच्या वेळा अनेकदा १२ च्या पलीकडेही जात असत. प्रोजेक्ट डेडलाईन मुळे अनेकदा उशिरा घरी येणं आता घरच्यांनाही अंगवळणी पडलं होतं. एक रात्र मात्र तिच्यासाठी काळरात्र ठरली. होत्याचं नव्हतं व्हायला काही तास पुरले. घरी येताना एका नराधमाने त्याचा डाव साधला. काही कळायच्या आत सगळं संपलं होतं. कशीबशी ती घरी आली. घरच्यांनी पोलीस केस केली. पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या. यथावकाश त्याला शिक्षाही झाली. काळाच्या ओघात शरीराच्या जखमा भरून आल्या, पण प्रियाचे पंखच छाटले गेले होते. आजूबाजूचं सगळं विश्व तिच्यासाठी आणि आजूबाजूच्या विश्वासाठी ती याचे सगळे संदर्भ बदलून गेले होते. छाटलेल्या पंखांना सहानुभूतीचे टाके घातले तरी त्यानं उडता थोडंच येणार  होतं? 

अशीच व्यथा आज प्रत्येक बलात्कारीत स्त्रीची आहे. प्रिया तर एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. बलात्कार किंवा फोर्सड् सेक्स एक असं कृत्य आहे ज्याची शिक्षा फाशीपलीकडे आहे कारण ते करताना ज्या शारीरिक आणि मानसिक यातना स्त्रीला होतात त्याचा विचार करून पण एक पुरुष म्हणून मला अंगावर काटा येतो. काळाच्या ओघात शारीरिक यातना भरून आल्या तरी मानसिक जखमा तश्याच खोलवर ओल्या राहतात. काळाचं औषध तिकडे चालत नाही. भरून न येणारं नुकसान आणि एक मानसिक धक्का बसलेला असताना समाजाकडून मिळणारी वागणूक आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. समाज अश्या घटनांकडे अतिशय वेगळ्या नजरेने बघतो. बलात्कारी स्त्रीबद्दल सहानुभूती आणि त्या नराधमाबद्दल समाजाच्या सगळ्याच पातळीतून टिका झाली तरी कायद्याने दिलेल्या शिक्षेनंतर तो नराधम सगळ्यांच्या विस्मरणात जातो. पण बलात्कार झालेली स्त्री नेहमीच लक्षात राहते किंबहुना तिच्यावर अत्याचार आणि बलात्कार झाला आहे असं लक्षात आणून दिलं जातं. 

समाज बनतो तो तुम्ही, आम्ही सगळे मिळून. समाजाच्या जडणघडणीमध्ये आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्या समाजाचा भाग म्हणून आपण अश्या स्त्रियांकडे कसे बघतो, याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आत डोकावून करावा. बलात्काराची घटना झाल्यावर स्त्री सर्व बाजूंनी उध्वस्त झालेली असताना तिला फक्त सहानुभूतीच्या टेकूची गरज असते का? अनेकदा तिची चूक काढण्यात समाज धन्यता मानत असतो. पुरुषाला शिक्षा झाली की समाज अश्या नराधमांना सहज विसरून जातो. काळाच्या ओघात शिक्षा होऊन असे लोक समाजात पुन्हा मिसळून जातात. पण त्या स्त्रीला छाटलेल्या पंखांची  नेहमीच आठवण करून दिली जाते. बलात्कार झालेली स्त्री जर आपल्या घराचा, कुटुंबाचा भाग असेल तर कोणत्याही नात्यात एक स्त्री/पुरुष म्हणून आपली वागणूक आणि आपला दृष्टीकोन कसा असेल याचा आपण एक क्षणभर विचार तरी करतो का? 

उदाहरण दिलेली प्रिया जर माझी बायको असेल तर मी तिला पुन्हा त्याच पद्धतीने प्रेम करू शकतो का? तिच्या सोबत मानसिक, शारीरिक पातळीवर एकरूप होऊ शकतो का? हे एकरूप होणं म्हणजे नुसतं प्रेम किंवा सेक्स नव्हे तर आपल्या घरात तिचं असलेलं स्थान आपण पुन्हा देऊ शकतो का? एक मुलगी म्हणून आपण तिला तेच प्रेम देऊ शकतो का? एक बहीण म्हणून तिला आपलं मानू शकतो का? एक प्रेयसी म्हणून तिच्याशी लग्न करू शकतो का? एक मित्र म्हणून तिच्याशी तशीच निखळ मैत्री करू शकतो का? एक ऑफिस कलीग म्हणून आपल्या प्रोजेक्ट टीमचा भाग ती पुन्हा बनू शकते का? एक स्त्री म्हणून याकडे बघताना आपल्याच बलात्कार झालेल्या मैत्रिणीला पुन्हा एकदा आपल्यात सामावून घेऊ शकतो का? एक आई म्हणून तिला पुन्हा तितकंच प्रेम करू शकतो का? एक बहीण म्हणून पुन्हा एकदा तिच्याशी त्याच मस्तीत खेळू शकतो का? एक सासू म्हणून तिला सुनेचा मान-सन्मान देऊ शकतो का? एक स्त्री म्हणून आपण त्या स्त्रीला कोणत्याही नात्यात आपलं म्हणून शकतो का? एक समाज म्हणून आपण तिला हळदीकुंकू, पूजा-अर्चा, लग्न, सण समारंभ अश्या सगळ्या परिस्थितीत एक सामान्य स्त्रीचा दर्जा देऊ शकतो का? तिचा बलात्कार झाला म्हणून प्रियाच्या छाटलेल्या पंखांच्या जागी आपण एक स्त्री किंवा पुरुष म्हणून कोणत्याही नात्यात आपले पंख तिला देऊ शकतो का? हा विचार आपण करायला हवा.   

आज समाजात काय किंवा वैयक्तिक काय, वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाही म्हणूनच येतात. जो समाज स्वतःला पुढारलेला आणि सशक्त मानतो, तो अश्या गोष्टींचा विचार तरी करतो का? बलात्कार झालेल्या स्त्रीला अनेकदा चौकशीला सामोरे जायची नामुष्की येत असते. तू असेच कपडे का घातलेस? ते, तू याची वाच्यता कुठे करू नकोस! हे तिला ऐकवले जाते. समाजात त्या स्त्रीने न केलेल्या चुकांसाठी प्रायश्चित स्वीकारण्याची वेळ तिच्यावर येते! बलात्कार झाला म्हणून ती कोणत्या तरी रोगाने पिडीत झाली किंवा निदान आता ती पांढरपेशा समाजाचा घटक नाही असेच सतत बिंबवले जाते. एक समाज म्हणून आपण बलात्कार करणाऱ्या मानसिकतेला विकृती मानतो पण जिच्यावर तो केला जातो तिलाही त्यासाठी जबाबदार धरण्याची भूमिका नक्की कोणत्या समाजाचं आणि प्रगल्भ दृष्टीकोनाचं प्रतिनिधित्व करत आहे?

एका सशक्त, प्रगल्भ समाजातील एक संवेदनशील घटक म्हणून आपण स्वतःकडे जेव्हा बघतो तेव्हा एका बलात्कार झालेल्या स्त्रीच्या संवेदना आपण ओळखू शकतो का? आज बलात्काराच्या घटनेत कित्येक पटींनी वाढ झाली आहे. त्याची कारणे अनेक असतील. कायदा योग्य ती शिक्षा देईलच पण आपण समाजाचा भाग म्हणून अश्या घटनांकडे फक्त आणि फक्त सहानुभूतीच्या नजरेतून बघणार का? आज दुसऱ्यांच्या कुटुंबात असलेली ती स्त्री उद्या आपल्या कुटुंबातील भाग असू शकते अश्या वेळेस आपली वागणूक काय असणार आहे? उद्या मी एक स्त्री/पुरुष म्हणून त्या छाटलेल्या पंखांना आपले पंख जोडून पुन्हा एकदा त्यांना समाजात सामान्य प्रवाहात आणण्यात सक्षम आहे का याचा विचार आज प्रत्येकाने करण्याची गरज आहे. समाजातील अश्या घटना दुर्दैवी असल्या तरी समाज आणि त्या समाजाचा भाग म्हणून  अश्या घटनांना आपण कसे सामोरे जातो ते आपण त्या छाटलेल्या पंखांना बळ देतो की त्या छाटलेल्या पंखाना अजून छाटतो त्यावर अवलंबून आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.