Sunday, 28 March 2021
चुकवू नये असं काही!... इटेवन क्लास... विनीत वर्तक ©
Friday, 26 March 2021
आठवणीतले कणगे... विनीत वर्तक ©
आठवणीतले कणगे... विनीत वर्तक ©
गणपतीच्या सुट्टीत किंवा कधी काळी मे महिन्यात गावाला जाणं व्हायचं. मुंबईला अगदी खेटून असलं तरी गावाचा बाज मात्र टिकून होता. आजोबांसोबत बैलगाडी चालवण्याचे धडे पहिल्यांदा तिकडेच मिळाले. वेसण धरायची कशी, ते बैलांना हाकायचं कसं? ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बालमनावर कोरल्या गेल्या त्या कायमच्या! या सुट्टीच्या दिवसात साहजिकच आम्ही सगळी भावंडं एकाचवेळी गावाला अनेकदा असायचो. मग काय, आमच्या सगळ्या चुलत भावंडांसाठी हक्काची जागा म्हणजे माळा. त्या माळ्यावर असणारे ते कणगे.
शेणाने सारवलेला तो लाकडाचा माळा आणि त्यात शेणाने सारवलेले ते कणगे म्हणजे आमची लपाछपीच्या खेळातली हमखास लपण्याची जागा. गावाला माझ्या वडिलांची आणि सगळ्याच काकांची भाताची शेती होती. प्रत्येकाचा स्वतःचा एक कणगा होता आणि त्यात प्रत्येकाच्या शेतात तयार झालेले तांदूळ भरून ठेवलेले असायचे. माळ्यावर असे ८ ते ९ कणगे होते. प्रत्येक कणग्याचा आपलाच एक बाज होता. त्याला येणारा एक प्रकारचा गंध हा पण तसाच. कदाचित तो सारवलेल्या शेणामुळे असेल किंवा त्याच्या बांबूमुळे पण त्या प्रत्येकाची विशिष्ट अशी खासियत होती.
त्याकाळी माझी आणि आम्हा सगळ्या भावंडांची उंची तशी बेताची, त्यामुळे या कणग्यात आत शिरणं म्हणजे एक दिव्य असायचं. मला अनेकदा त्यावेळेला प्रश्न पडायचा, की आतमध्ये तांदूळ भरलेत तर खरे, पण ते बाहेर काढणार कसे? एखादा लपवलेला दरवाजा या कणग्यांना आहे का, या शोधात माझ्या या सगळ्या कणग्यांना अनेकदा प्रदक्षिणा घालून झाल्या होत्या. पण माझ्या बालमनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला अजून मला मिळायचं आहे. तर या कणग्यात लपाछपीच्या खेळात लपण्यासाठी खूप कष्ट करावे लागत. एकतर आपल्यापेक्षा उंच असलेल्या त्या कणग्यात चढायचं, चढताना हातापायाला बांबूंच्या त्या पात्यांनी ओरखडे उठायचे आणि या सगळ्या सर्कशीत कणगा मात्र माझ्या वजनाच्या ओझ्याने आपलं अंग वाकवायचा ते वेगळंच.
आता मधे तर घुसलो, पण बाहेर कसं पडायचं हा दुसरा प्रश्न समोर असायचा. तांदळाच्या त्या राशीमध्ये स्वतःला गुंडाळून घेताना अंगाला खाज सुटायची पण खेळाच्या नादात लक्ष तिकडे जायचेच नाही. बाहेर पडण्याची धडपड ही आत घुसण्यापेक्षा केविलवाणी असायची. कधी उडी मारून, तर कधी कणग्याच्या भिंतींना वाकवून पण! या सगळ्या माळ्यावर चालणाऱ्या लढाईचे आवाज जेव्हा खाली जायचे तेव्हा त्यापेक्षा दुप्पट आवाजाच्या तोफा खालून आमच्या नावाने शिमगा करायच्या आणि आम्ही मात्र हसत हसत अजून जास्ती त्या कणग्यांची वाट लावायचो.
आज ती भात शेती पण थांबली आणि तांदुळाने भरलेले कणगे पण माळ्यावरून हद्दपार झाले. आता सारवलेल्या माळ्याची जागा रंगांनी घेतली आणि कणग्यांची जागा आता मोकळी आहे. आता कधीही गावच्या घरी गेलो की पुन्हा एकदा माळ्यावर जातो. आजही ते क्षण आठवतो आणि आजही तो गंध माझ्या श्वासात भरून घेतो.
फोटो स्त्रोत :- प्राची चुरी पाटील
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Wednesday, 24 March 2021
संपर्काचा नवीन मार्ग क्वांटम कम्युनिकेशन... विनीत वर्तक ©
संपर्काचा नवीन मार्ग क्वांटम कम्युनिकेशन... विनीत वर्तक ©
Tuesday, 23 March 2021
खारे वारे मतलई वारे (भाग ८)... विनीत वर्तक ©
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Monday, 22 March 2021
खारे वारे मतलई वारे (भाग ७)... विनीत वर्तक ©
खारे वारे मतलई वारे (भाग ७)... विनीत वर्तक ©
गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळेच वारे वाहू लागलेले आहेत. अर्थात या वाऱ्यांची चाहूल चाणाक्ष लोकांना आधीच लागली होती पण ते इतक्या वेगाने वाहतील अशी अपेक्षा नव्हती. सध्या ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारण सुरु आहे ते बघता भारताच्या सिंहाने एकाचवेळी ड्रॅगन आणि भिकारी यांना त्यांची जागा दाखवली आहेच पण त्या पलीकडे भारत हा ज्या पद्धतीने नवीन संबंधांना दिशा देतो आहे ते येणाऱ्या काळात निर्णायक ठरणार आहे.
गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान च्या सैन्य प्रमुखांनी अचानक २००३ साली झालेल्या कराराचा मान ठेवत एकमेकांच्या सिमेवर गोळीबार बंद (युद्धबंदी) करण्यासाठी समर्पित असल्याचं नमूद केलं. खरे तर या कायद्याचं उल्लंघन पाकिस्तान कडून होत होतं. भारतीय सेना फक्त उत्तरासाठी गोळीबार करत होती. एकट्या २०२० वर्षात ५१०० वेळा युद्धबंदी कराराचे पाकिस्तान कडून उल्लंघन केलं गेलं आहे. त्यात ३६ लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे आणि १३० लोक जखमी झाले आहेत. पुलवामा इथल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने बालाकोट इकडे हवाई हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात कटुता आली होती. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने सिमेवर कुरापती करतो आहे. त्यातच भारताने कलम ३७० रद्द करताना जम्मू-काश्मीर ची स्वायत्तता काढून घेतली आणि भारताचा एक केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता दिल्यावर पाकिस्तान च्या पायाखालची वाळू सरकली.
पाकिस्तान ने आंतरराष्ट्रीय मंचावर जिवाच्या आकांताने काश्मीर प्रश्न आणि कलम ३७० वरून प्रचंड आकांडतांडव केलं पण आंतरराष्ट्रीय मंचावर युरोपियन देश किंवा अमेरीका तर सोडाच पण आपल्या भाऊ बंधू असलेल्या मुस्लिम राष्ट्रांकडून या गोष्टींची साधी दखल घेण्यात आली नाही. आधीच्या भागात लिहिलं होत त्या प्रमाणे पाकिस्तान ने सौदी अरेबिया विरुद्ध मुस्लिम राष्ट्रात उघडलेल्या आघाडीचं समर्थन उघडपणे केलं आणि सौदीसह अनेक मुस्लिम राष्ट्रांचा रोष ओढवून घेतला. त्यातच भारताने आपल्या चाली खेळताना अरब राष्ट्रांशी आपले संबंध कमालीचे मजबूत केले. इकडे एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारताने अरब राष्ट्रांशी आपले संबंध मजबूत केले तरी त्याचवेळी इस्राईल सारख्या कट्टर विरोधी देशाशी आपले संबंध मजबूत केले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोना च आगमन झालं. कोरोना सोबत लढण्यात भारत व्यस्त आहे असं समजून चीन ने १९६२ सालची चाल पुन्हा एकदा खेळली. पण या वेळेस पट वेगळा होता आणि त्याचा राजा वेगळा होता हे समजायला तो चुकला.
चीन च्या आक्रमणामुळे पाकिस्तान ला आपण आता भारताला दोन्ही बाजूने खिंडीत पकडून झुकवू शकतो असा आत्मविश्वास वाटायला लागला. पाकिस्तान चीन ने इशारा आणि एक पाऊल पुढे टाकण्याची वाट बघत होता. पण भारताने वेगळी चाल खेळली. तू माझा घोडा खायला येशील तर तुझा हत्ती गेला म्हणून समज. हा हत्ती म्हणजे साऊथ चायना सी. भारताने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे चीन च्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवला. क्वाड ग्रुप म्हणजेच (Quadrilateral Security Dialogue) च्या नावाखाली अमेरीका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार मजबूत देश एकत्र आले. या चार देशांचे हितसंबंध आणि वाटचाल किंवा एकूणच या ग्रुप मधून फायदे तोटे वेगळे आहेत. पण चीन ला रोखण्यासाठी या चारही देशांनी एकत्र लढण्याचं ठरवलं. अर्थात या गोष्टी पडद्यामागून सुरु होत्या. त्यामुळेच चीन जेव्हा लडाख मधे भारताशी दोन हात करायला उभा होता तेव्हा जुलै २०२० मधे अमेरीकेच्या दोन बलाढ्य विमानवाहू नौका साऊथ चायना सी मधे डेरेदाखल झाल्या होत्या. नक्कीच यात अमेरीकेचा स्वतःचा फायदा होता पण याची वेळ जी होती ती चीन च्या हत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी होती.
१९६२ चा भारत आणि २०२० मधील भारत वेगळा असल्याची जाणीव चीन ला झाली कारण जर युद्धाचे पडघम वाजले तर अमेरीका एकटी नाही तर भारताची मित्र राष्ट्रे यात कोणत्यातरी कारणाने उडी घेणार हे उघड होत. त्यात कोरोनामुळे चीन ची प्रत कमी झाली होती आणि आर्थिक व्यवहार कमालीचे घटले होते.भारताने चीन वेळकाढूपणा करतो आहे हे लक्षात आल्यावर महत्वाची ठिकाणे युद्धभूमीवर ताब्यात घेऊन १:१ या गुणोत्तरात सैनिक तैनात करून चीन पुढे खूप मोठं आव्हान उभं केलं. युद्ध हा उपाय नाही हे चीन च्या लक्षात यायला सुरवात झाली होती. पण मागे येणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला ठेच लागण हे तो जाणून होता म्हणून अनेक महिने परिस्थिती जैसे थे अशी ठेवून चीन ने काही महिन्यांनी गुपचूप माघार घेतलेली आहे. हा भारताचा राजनैतिकदृष्ट्या खूप मोठा विजय आहे. पण नक्कीच आपण गाफील राहून चालणार नाही याची पुरेपूर कल्पना निदान सध्यातरी भारताला आहे.
हे सगळं सांगण्या मागचं कारण म्हणजे या सगळ्यात पाकिस्तान ची मोठी गोची झाली. जो ठिणगी पडते आणि मी उडी मारतो यासाठी टपून बसला होता त्याला खूप मोठा धक्का बसला. गेल्या काही महिन्यातील पाकिस्तानी टी.व्ही. वरील बातम्या बघितल्या तर एक लक्षात येईल की त्यांचे सगळे कायदेपंडित एकच सांगतात 'जिकडे चीन मागे आला तिकडे पाकिस्तान भारतासाठी किस झड की पत्ती आहे'. याचवेळी पाकिस्तान ला त्याची औकात कळाली. त्यात पाकिस्तान ची आर्थिक स्थिती कमालीची नाजूक झाली आहे. २०२० मधे पाकिस्तानी जी.डी.पी. उणे -०.४ टक्के राहिला आहे. जी.डी.पी. च्या ८७% पेक्षा जास्ती हिस्सा हा कर्जात बुडालेला आहे. इन्फ्लानेशन रेट १०% पेक्षा जास्ती आहे. लोकांना अन्न , वस्त्र, निवारा या साध्या गोष्टी सरकार देऊ शकत नाही आहे आणि त्यात कोरोना ची दुसरी व्हेव पाकिस्तानात लवकर अपेक्षित आहे.
पाकिस्तान ला ही कळून चुकलं की आत्ताच्या परिस्थितीत भारताशी भांडण उकरून काढणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेणं ज्यातून सावरणं आपल्याला शक्य होणार नाही. आर्थिक,सैनिकी आणि जागतिक मुत्सद्देगिरीच्या बाबतीत भारत आपला बाप झाला आहे. खरं तर तो आधीपण होता पण आता बाप असल्याची जाणीव त्याला झाली आहे ही पाकिस्तान ची दुखरी नस आहे. पण आपल्याच देशातल्या मूर्ख असणाऱ्या धर्मांध लोकांच्या गळी ही गोष्ट कशी उतरवायची ही अजून एक अडचण आहे. आधी भारत चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकायचा आणि पाकिस्तान आधी हे करा आम्ही चर्चा करू अश्या अटी घालायचा. आज स्थिती उलट आहे. काश्मीर मधे पुन्हा कलम ३७० लावावं आणि काश्मीर प्रश्न घेऊन मगच चर्चा करावी यावर आपण अडलो तर भारत त्याला काडीचीही किंमत देणार नाही हे त्याला चांगल माहित आहे. कारण भारताने आधीच सांगितलं आहे की आधी तुम्ही तुमची घाण साफ करा मग चर्चेच बघू. या सगळ्यात पाकिस्तान ने मागच्या दरवाजाने चर्चेचे प्रयत्न सुरु केले आहेत.
क्रमशः
पुढल्या भागात पाकिस्तान आणि भारत यांचे तसेच भारत आणि अमेरीका यांचे संबंध तसेच या सगळ्यात मध्यस्थीची भूमिका करणारे यु.ए.इ. आणि हे सगळं राजकारण कुठे जाते आहे त्याचा लेखाजोखा.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Saturday, 20 March 2021
पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग २)... विनीत वर्तक ©
पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग २)... विनीत वर्तक ©
पहिल्या भागात आपण मित्र ताऱ्या बद्दल जाणून घेतलं की कश्या पद्धतीने मित्र तारा एक नसून तीन ताऱ्यांचे कुटुंब आहे. यातील प्रत्येक ताऱ्याच स्वतःच एक अस्तित्व आहे. या तिघांपैकी वैज्ञानिकांच्या रडार वर जो तारा आहे तो म्हणजे प्रॉक्सिमा सेंटौरी. आधी सांगितलं तसं या तिघांमधे प्रॉक्सिमा सेंटौरी आपल्याला सगळ्यात जवळ आहेच पण त्या पलीकडे याच वय ही ४.८५ बिलियन वर्ष आहे जे की आपल्या सूर्याच्या वयाच्या आसपास आहे. (सूर्याचे वय ४.६० बिलियन वर्ष आहे.) तसेच या ताऱ्याच्या भोवती परिक्रमा करणारे दोन ग्रह आढळून आले आहेत. प्रॉक्सिमा सेंटौरी बी आणि प्रॉक्सिमा सेंटौरी सी त्यातील एक ज्याला प्रॉक्सिमा सेंटौरी बी असं म्हंटल जाते तो हॅबिटायटल झोन मधे आहे. त्यामुळेच इकडे सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. ( हॅबिटायटल झोन म्हणजे एखाद्या ग्रहाचे आपल्या ताऱ्यापासून इतकं अंतर की ज्या अंतरावर पाणी द्रव स्वरूपात आढळू शकेल, तिथलं तपमान हे सजीव सृष्टीसाठी पोषक असेल. आपली पृथ्वी सूर्यापासून अश्या हॅबिटायटल झोन मधे येते त्यामुळेच पृथ्वीवर आज सजीव सृष्टी आहे. त्याचवेळी मंगळ ग्रह हॅबिटायटल झोन च्या बाहेर फेकला गेल्यामुळे त्यावरील एकेकाळी असणार पाण्याच आणि कदाचित सजीवसृष्टी च अस्तित्व नष्ट झालं.)
प्रॉक्सिमा सेंटौरी च्या भोवती जर ग्रह परीक्रमा करतात तर अल्फा सेंटौरी ए आणि बी या ताऱ्यांना ग्रह नाहीत का? असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. तर सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असं आहे. याला कारण म्हणजे अल्फा सेंटौरी ए आणि बी या ताऱ्यांचे एकमेकांपासून असलेलं अंतर. आपण ज्या पद्धतीने ग्रहांचा इतक्या लांबून शोध घेतो त्या पद्धतीमुळे ह्या प्रश्नाचं नक्की उत्तर आज सांगता येत नाही. ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशात, त्याच्या तरंगलांबीत पडणाऱ्या फरकावरून आपण ग्रहांचे अस्तित्व ओळखू शकतो. पण हे दोन्ही तारे अवकाश अंतराच्या मानाने अतिशय जवळ आहेत. त्यामुळे साधारण ४.३ प्रकाशवर्ष अंतरावरून दोन्ही ताऱ्यांकडून येणारा प्रकाश एकमेकात मिसळून जातो. ह्या मिसळण्यामुळे कोणत्याही ग्रहाचे अस्तित्व शोधणं जवळपास अशक्य आहे. तसेच आधी सांगितलं तसं प्रत्येक ८० वर्षात ते एकमेकांच्या अतिशय जवळ येतात आणि नंतर लांब जातात. २०१६ साली ते एकमेकांच्या एकदम जवळ होते आणि सध्या एकमेकांपासून लांब जात आहेत. तंत्रज्ञान आणि टेलिस्कोप मधे जशी प्रगती होत जाईल तसं या ताऱ्यांभोवती ग्रह मिळतील अशी शक्यता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
प्रॉक्सिमा सेंटौरी या ताऱ्याभोवती जे दोन ग्रह परीक्रमा करत आहेत त्यापैकी एक म्हणजे,
प्रॉक्सिमा सेंटौरी सी :- हा ग्रह प्रॉक्सिमा सेंटौरी या आपल्या ताऱ्यापासून २२३,०००,००० किलोमीटर अंतरावरून १९२८ दिवसात परीक्रमा करतो. हा ग्रह नेपच्यून च्या आकाराएवढा आहे. प्रॉक्सिमा सेंटौरी पासून इतक्या दूर आहे की इथलं इक्विलिब्रियम तपमान उणे -२३४ डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. त्यामुळे इथे कोणती जीवसृष्टी असणं अशक्य आहे.
प्रॉक्सिमा सेंटौरी बी:- हा ग्रह साधारण पृथ्वी च्या आकाराचा आहे. (१.१७३ पृथ्वी च्या वस्तुमानाच्या तुलनेत) या ग्रहाचा शोध ऑगस्ट २०१६ मधे लागला. हा ग्रह प्रॉक्सिमा सेंटौरी ताऱ्यापासून साधारण ७,५००,००० किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर त्या ताऱ्याच्या हॅबिटायटल झोन मधे येते. पृथ्वी सूर्यापासून साधारण १४९,५९७,८७० किलोमीटर अंतरावर आहे आणि ती सुर्याच्या हॅबिटायटल झोन मधे येते. अंतरातील ह्या फरकाचे उत्तर ताऱ्याच्या तेजस्वितेत आहे. मागच्या भागात सांगितलं होत की प्रॉक्सिमा सेंटौरी हा थंड तारा आहे त्यामुळे त्याचा हॅबिटायटल झोन हा त्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे प्रॉक्सिमा सेंटौरी बी जरी हॅबिटायटल झोन मधे असला तरी स्टेलर विंडमुळे त्याच्या वातावरणावर पडणारा दाब हा पृथ्वीपेक्षा २००० पट जास्ती आहे. (स्टेलर विंड म्हणजे एखाद्या ताऱ्याच्या पृष्ठभागावरून अवकाशात अणू - मिलन प्रक्रियेत गॅस फेकले जातात त्याला स्टेलर विंड म्हणतात.) या स्टेलर विंड च्या दाबामुळे इथलं वातावरण हे अवकाशात वाहून गेलं असेल असा अंदाज आहे. पण या ग्रहाचे इक्विलिब्रियम तपमान हे उणे -३९ डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. (पृथ्वीचं इक्विलिब्रियम तपमान उणे -१८ डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे.) त्यामुळे जमीनीखाली सजीव सृष्टी असण्याची शक्यता वैज्ञानिक वर्तवत आहेत. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे अंदाज पृथ्वीवरून केलेले आहेत त्यामुळे त्यात प्रत्यक्षात खूप सारे बदल अपेक्षित आहेत.
पृथ्वी सारखी जीवसृष्टी विश्वात कुठे आहे का? या प्रश्नाचं उत्तर मानव खूप काळापासून शोधतो आहे. या शोधात जीवसृष्टी असू शकेल अशी परिस्थिती असणारे अनेक ग्रह सापडले आहेत. पण यापैकी एकावर ही आपण जाऊ शकू असं तंत्रज्ञान आजतरी उपलब्ध नाही. त्यामुळे जर आपण येत्या काळात कोणत्या ग्रहाकडे किंवा आपल्या सौरमाले सारख्या अजून कोणत्या सौरमालेचा विचार करणार असू तर जी आपल्याला सगळ्यात जवळ आहे तिचा नंबर पहिला लागतो. त्यामुळेच अल्फा सेंटौरी हे ताऱ्यांचे कुटुंब आणि प्रॉक्सिमा सेंटौरी बी हा ग्रह शास्त्रज्ञांच्या रडारवर सगळ्यात पुढे आहे. त्यासाठीच मानवाने आपलं लक्ष्य नक्की केलं आहे ते म्हणजे मित्र तारा (अल्फा सेंटौरी).
पुढल्या भागात मित्र तारा (अल्फा सेंटौरी) वर कश्या पद्धतीने आपण जाणार आहोत? कोणतं तंत्रज्ञान वापरणार आहोत? प्रत्यक्षात ते शक्य होईल का? त्यातून आपल्याला काय मिळणार? हे जाणून घेऊ.
क्रमशः
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Thursday, 18 March 2021
पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग १)... विनीत वर्तक ©
पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग १)... विनीत वर्तक ©
शाळेत विज्ञान शिकताना मित्र तार्याचे नाव जवळपास प्रत्येकाच्या कानावर पडलं असेल. आपल्याला सूर्यानंतरचा दुसरा कोणता तारा जवळचा असेल तर तो म्हणजे मित्र तारा किंवा अल्फा सेंटौरी. पण मज्जा अशी आहे की ज्याला आपण मित्र तारा (अल्फा सेंटौरी) असं म्हणतो खरं तर तो तीन ताऱ्यांचा समूह आहे. अल्फा सेंटौरी ही एक ट्रिपल स्टार सिस्टीम आहे. सूर्यापासून जवळपास ४.३७ प्रकाशवर्ष (एक प्रकाशवर्ष म्हणजे साधारण ३ लाख किलोमीटर/ सेकंद या वेगाने एका वर्षात कापलेले अंतर) अंतरावर ही सिस्टीम आहे. यातले सर्वच तारे समान अंतरावर नाहीत. त्यामुळे सूर्याजवळचा सगळ्यात जवळचा तारा हा या तीन ताऱ्यांपैकी एक म्हणजेच प्रॉक्सिमा सेंटौरी आहे. जो साधारण ४.२४ प्रकाशवर्ष लांब आहे. नक्की मित्र तारे कसे आहेत? आणि आपलं पुढलं लक्ष्य ते का असणार आहेत? तसेच इतक्या दूरवर मानवनिर्मित यान येत्या काळात कसं पोहचणार आहे ते जाणून घेणं खूप रंजक आहे.
वर लिहिल्याप्रमाणे मित्र तारे ही ट्रिपल सिस्टीम आहे. याचा अर्थ ह्या सिस्टीम मधे तीन तारे आपसात बांधलेले आहेत. यातील पहिल्या ताऱ्याला अल्फा सेंटौरी ए, दुसऱ्याला अल्फा सेंटौरी बी तर तिसऱ्याला अल्फा सेंटौरी सी किंवा प्रॉक्सिमा सेंटौरी असं म्हंटल जाते. अल्फा सेंटौरी सिस्टीम चा शोध जोहान बेयर ने १६०३ साली लावला. तर प्रॉक्सिमा सेंटौरी हा त्यातला तिसरा तारा रॉबर्ट इंन्स याने १९१५ साली शोधला. त्या दोन ताऱ्यांपेक्षा नवीन शोधलेला तारा जवळ असल्याने त्याने त्याला 'प्रॉक्सिमा' असं नामकरण केलं. प्रॉक्सिमा या शब्दाचा लॅटिन अर्थ जवळ असा होतो. प्रॉक्सिमा सेंटौरी आपल्या दोन भावंडांपेक्षा तब्बल १ ट्रिलियन किलोमीटर (६२० बिलियन माइल्स ) सूर्याच्या जवळ आहे. अल्फा सेंटौरी ए आणि बी हे बायनरी तारे आहेत. हे दोन तारे समान मध्यातून एकमेकांभोवती ८० (७९.९१) वर्षात एकमेकांभोवती फिरतात. ही कक्षा वर्तुळाकार नाही. जेव्हा ते जवळ येतात तेव्हा साधारण सूर्य आणि शनी ग्रहाइतकं त्यामध्ये अंतर असते तर जेव्हा एकमेकांपासून लांब जातात तेव्हा हे अंतर सूर्य आणि प्लूटो इतकं असते. अल्फा सेंटौरी ए आणि बी पासून प्रॉक्सिमा सेंटौरी जवळपास १३,००० पट एस्ट्रोनिमिकल अंतरावर आहे. ( १ एस्ट्रोनिमिकल युनिट म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यातील सरासरी अंतर ) पृथ्वीवरून बघताना मात्र हे अल्फा सेंटौरी ए आणि बी दोन्ही तारे एक आहे असं उघड्या डोळ्यांना दिसते. हे दोन्ही तारे रात्रीच्या अंधारात ३ ऱ्या क्रमांकाचे तेजस्वी तारे आहेत. (सिरीयस आणि कॅनोपस ताऱ्याची तेजस्वीता या ताऱ्यांपेक्षा जास्ती आहे.)
अल्फा सेंटौरी ए :- हा तारा सूर्यापेक्षा १.१ पट वस्तुमानात मोठा आहे. त्याचवेळी त्याची तेजस्विता सूर्यापेक्षा १.६ पट प्रखर आहे. ह्या ताऱ्याच्या पृष्ठभागाचे तपमान साधारण ५५०० डिग्री सेंटीग्रेड आहे. सूर्यापेक्षा हे कमी असलं तरी सूर्यापेक्षा २५% त्याचा पृष्ठभाग जास्ती असल्याने त्याची तेजस्विता सूर्यापेक्षा प्रखर आहे.
अल्फा सेंटौरी बी :- हा तारा सूर्यापेक्षा वस्तुमानात लहान आहे. सूर्यापेक्षा याच वस्तुमान ०.९०७ पट आहे. तर तेजस्विता फक्त ०. ४४५ पट आहे. सूर्याच्या तेजस्वितेच्या अर्ध्याहून कमी. या ताऱ्याच्या पृष्ठभागाचे तपमान साधारण ५००० डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे.
प्रॉक्सिमा सेंटौरी किंवा अल्फा सेंटौरी सी :- हा एक रेड ड्वार्फ तारा आहे. रेड ड्वार्फ पद्धतीचे तारे आपल्या आकाशगंगेत विपुल संख्येने आढळतात. यांना थंड तारे असंही म्हणतात. यांच्या पृष्ठभागाचे तपमान साधारण १५०० ते १८०० डिग्री सेल्सिअस इतकं असते. जे की इतर ताऱ्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. कमी तापमानामुळे यांची तेजस्विता कमी असते. प्रॉक्सिमा सेंटौरी तेजस्वितेत सूर्यापेक्षा २०,००० पट कमी आहे. प्रॉक्सिमा सेंटौरी आपल्याला सगळ्यात जवळचा तारा असला तरी त्याच तेज अतिशय कमी असल्याने नुसत्या डोळ्यांना आकाशात तो दिसून येत नाही.
जे आपल्याला सांगितलं गेलं होत की मित्र तारा जवळचा आहे तर ह्या मित्र तार्याचे तीन भावंडं मिळून एक कुटुंब आहे. ह्या कुटुंबात अजूनही काही माहित असलेल्या तर काही माहित नसलेल्या सदस्यांचा समावेश आहे. ते सदस्य कोण? त्यांच आपल्यासाठी काय महत्व? ते आपण त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी काय करत आहोत हे पुढल्या भागात.
क्रमशः
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Wednesday, 17 March 2021
पाण्यातला हेर - आय.एन.एस.ध्रुव... विनीत वर्तक ©
पाण्यातला हेर - आय.एन.एस.ध्रुव... विनीत वर्तक ©
छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिलं होतं की एखाद्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आयुधांसोबत हेरगिरी किती महत्वाची असते. आजच्या काळात इस्राईल सारखा देश संपूर्ण अरब राष्ट्रांना पुरून उरतो तो त्यांच्या हेरगिरी करण्यात जगात सर्वोत्तम मानल्या गेलेल्या 'मोसाद' या संस्थेमुळे. भारताने आधीच्या काळात अश्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं ज्याचे परिणाम आणि किंमत आपण प्रचंड प्रमाणात मोजली आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारताने तांत्रिक प्रगतीच्या जोरावर पुन्हा एकदा 'स्पाय' म्हणजेच हेरगिरीकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. हेरगिरी चा उपयोग फक्त शत्रूच्या गोटात काय चालू आहे समजण्यासाठी केला जातो असं नाही तर शत्रूची शस्त्रसज्जता बघून आपल्याला त्याप्रमाणे प्रतिकार करण्याची तयारी करता येते. आपण जमीन, आकाशातून आणि अवकाशातून ती क्षमता गेल्या काही वर्षात मिळवलेली आहे. पण पाणी असं एक क्षेत्र होत की जिकडे आजवर आपण थोडे मागे राहिलो होतो. तीच कमतरता भरून काढण्यासाठी एका संशोधन जहाजाचं काम २०१४ साली अतिशय गुप्तपणे सुरु केलं गेलं होतं.
पाण्यातला हेर निर्माण करण्याचं काम हे अतिशय गुप्तपणे करायचं होतं तसेच त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान भारतात विकसित करायचं होतं. त्यामुळे ह्या कामाची धुरा सर्वस्वी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याकडे होती. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाझेशन (NTRO) (ही भारताची तांत्रिक गुप्तचर संस्था असून रॉ, इंटीलिजन्स ब्युरो अश्या भारताच्या गुप्तचर संस्थांप्रमाणे काम करते. या संस्थेची सगळी धुरा ही पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याकडे असते. भारताची तांत्रिक बाबतीत हेरगिरी करणारी ही सगळ्यात महत्वाची संस्था आहे.), डी.आर.डी.ओ., भारतीय नौदल, हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अश्या सर्व संस्थांना एकत्र करून पाण्यातला हेर अतिशय गुप्तपणे निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली. ३० जून २०१४ साली जहाज बांधणीला सुरवात झाली. ऑक्टोबर २०२० मध्ये सर्व चाचण्या पूर्ण करून आय.एन.एस. ध्रुव म्हणजेच VC 11184 ला भारतीय नौदलाकडे गुपचूप सुपूर्द करण्यात आलेलं आहे.
आय.एन.एस. ध्रुव हे १५,००० टन वजन विस्थापित करणार जहाज असून १७५ मीटर लांब आणि २२ मिटर रुंद आहे. यात ९००० किलोवॅट शक्तीची २ कोडॅक इंजिन असून प्रत्येक इंजिन तब्बल १२,००० हॉर्स पॉवर निर्माण करते. पाण्यातून हे जहाज ३९ किलोमीटर/ तास वेगाने जाण्यास सक्षम असून यावर एक हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड आहे. तसेच ३०० जणांचा क्रू यावर काम करू शकतो. आधी सांगितलं तसं या जहाजाचा मुख्य उद्देश समुद्रात हेरगिरी तसेच भारताच्या भूमीवर येणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्र मग ते सुपर सॉनिक असो वा इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल किंवा multiple independently targetable reentry vehicle (MIRV) असो अश्या सगळ्या संकटांची सूचना भारताच्या सुरक्षा यंत्रणांना अद्यावत पुरवणे हा आहे. भारताच्या दिशेने येणाऱ्या कोणत्याही (nuclear missile) आण्विक क्षेपणास्त्राचा शोध घेण्याची क्षमता या जहाजाकडे आहे.
भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्या किंवा भारतावर चाल करून येणाऱ्या क्षेपणास्त्राचा वेध घेण्यासाठी यावर दोन प्रकारची रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे. एक आहे एक्स बँड आणि दुसरं आहे ए.इ.एस.ए. म्हणजेच (S-Band active electronically scanned array (AESA) रडार. एक रडार एक्स बँड मधे काम करते तर दुसरं एस बँड मधे (सोप्प समजायचं असेल तर रेडिओ वर असणाऱ्या ए.एम.आणि एफ.एम. बँड प्रमाणे) यातील एस बँड चा उपयोग हा मोठ्या क्षेत्रातील आकाशाचा वेध घेण्यासाठी होतो. या क्षेत्रात उडत असलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राचा वेध घेऊन त्याच लक्ष्य कोणतं आहे याच आकलन केलं जाते. तर त्याचवेळी एक्स बँड हे हुडकून काढण्यात अतिशय कठीण असलेल्या वस्तूंचा शोध घेते. ज्यात अगदी उपग्रहापासून, MIRV, इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल, आण्विक क्षेपणास्त्र यांचा समावेश होतो. या शिवाय अजून काही प्रगत यंत्रणा यावर बसवल्या गेल्या आहेत ज्या क्लासिफाईड आहेत.
आण्विक क्षेपणास्त्रांचा वेध घेणारी यंत्रणा स्वबळावर निर्माण करणारा भारत जगातील पाचवा देश आहे. अमेरिका, फ्रांस, रशिया आणि चीन नंतर अश्या पद्धतीचं जहाज आता भारताने विकसित केलं आहे. हे जहाज बांधताना शत्रूच्या नजरेत न येण्यासाठी सुक्या गोदीत याची निर्मिती केली गेली आहे, आय.एन.एस.ध्रुव चा उपयोग भारताच्या भविष्यातील क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी पण केला जाणार आहे. या जहाजावर भारतीय नौदलासह, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनाझेशन, डी.आर.डी.ओ. चे वैज्ञानिक आणि संशोधक ही असणार आहेत. त्यामुळे आय.एन.एस.ध्रुव च्या सामाविष्ट होण्याने देशाच्या सुरक्षितेत खूप मोठी वाढ होणार आहे. भारत अश्या पद्धतीच्या दुसऱ्या जहाजाची निर्मिती आणि विकास गुप्तपणे करत असल्याची ही बातमी आहे.
तळटीप :- वर लिहलेली सर्व माहिती पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. लेखामध्ये कोणतीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Tuesday, 9 March 2021
वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©
वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©
"भारताने जगाला कोरोना (COVID-19) पासून वाचवलं"
डॉक्टर पिटर हॉटेझ, अमेरिका
दोन दिवसांपूर्वी डॉक्टर पिटर हॉटेझ, अमेरिका यांनी कोरोना वरच्या वेबिनार मध्ये भारताचं कौतुक केलं आहे. शेती बद्दल किंवा एकूणच भारताबद्दल काडीचं ज्ञान नसलेल्या जगातील काही सामाजिक व्यक्ती आणि कलाकारांच्या मताला अवास्तव महत्व देणाऱ्या मिडिया आणि सोशल मिडिया वरील अनेकांना नक्की डॉक्टर पिटर हॉटेझ कोण आहेत आणि त्यांच मत किती महत्वाचं आहे ह्याचा अंदाज नसेल.
डॉक्टर पिटर हॉटेझ हे प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर, वैज्ञानिक, संशोधक आहेत.National School of Tropical Medicine चे प्रमुख आहेत, याशिवाय बायलॉर कॉलेज ऑफ मेडिसिन मध्ये प्रोफेसर आहेत, American Society of Tropical Medicine and Hygiene या संस्थेच अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. PLOS Neglected Tropical Diseases.ह्या मासिकाचे संपादक आहेत, Texas Children's Hospital चे डायरेक्टर आहेत.
एकूणच काय तर डॉक्टर पिटर हॉटेझ यांच वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्व आणि विषयाचा अभ्यास हा त्यांनी भूषविलेल्या पदांवरून दिसून येतो. जेव्हा एखादी व्यक्ती जागतिक स्तरावरील वेबिनार मध्ये अश्या स्वरूपाचं व्यक्तव्य करते तेव्हा त्या शब्दांना खूप किंमत असते. अर्थात पैश्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या तथाकथित ढोंगी लोकांच्या ट्विट ना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या भारतीयांना डॉक्टर पिटर हॉटेझ यांचे शब्द कधीच दिसणार नाहीत.
डॉक्टर पिटर हॉटेझ यांनी भारताचा गौरव करताना जग भारताच्या प्रयत्नांना कमी लेखत असल्याचं मत ही व्यक्त केलं आहे. ते म्हणतात,
"India's huge efforts in combating global pandemic is a story that's not really getting out in the world."
भारतीयच भारताच्या प्रयत्नांना नावं ठेवतात तिकडे जगाबद्दल काय सांगणार. गेल्या 24 तासात तब्बल 20 लाख भारतीयांनी कोरोना लस घेतलेली आहे. तरीसुद्धा भारतात बातम्या मात्र लस कमी पडते आहे अश्याच येणार. सगळं चांगलं आहे असं नक्कीच नाही पण ज्या पद्धतीने लसीकरण चालू आहे त्याचा आपण अभिमान आणि आदर बाळगायला हवा.
डॉक्टर पिटर हॉटेझ यांच्या शब्दांसाठी त्यांचे आभार आणि आम्ही भारतीय नेहमीच 'वसुधैव कुटुंबकम' ह्या तत्वाला जागत राहू.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Saturday, 6 March 2021
आत्मनिर्भर भारत (एस.एफ़्.डी.आर. तंत्रज्ञान)... विनीत वर्तक ©
आत्मनिर्भर भारत (एस.एफ़्.डी.आर. तंत्रज्ञान)... विनीत वर्तक ©
5 मार्च, 2021 रोजी डी.आर. डी.ओ. ने ओरिसाच्या Integrated Test Range (ITR) चांदीपूर इकडे एस.एफ़्.डी.आर. या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे भारताने एका कठीण तंत्रज्ञानाला आपलंसं केलं आहे, त्याचसोबत आत्मनिर्भरतेकडे पाऊल पुढे टाकलं आहे. जगातील मोजक्या देशांकडे असणाऱ्या या तंत्रज्ञानाला भारताने रशियासोबत विकसित केलं आहे. तर नक्की काय आहे हे एस.एफ़्.डी.आर. तंत्रज्ञान, आणि ते आत्मसात केल्यामुळे जागतिक संदर्भ कसे बदलणार आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. एस.एफ़्.डी.आर. चं पूर्ण नाव Solid Fuel Ducted Ramjet technology असं आहे. नावातून अनेक गोष्टी समजून आल्या असतील. त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॅमजेट तंत्रज्ञान.
कोणत्याही क्षेपणास्त्राला जर हवेत गती द्यायची असेल तर महत्वाचा असतो, तो म्हणजे थ्रस्ट (जोर). शाळेत विज्ञानात आपण जो न्यूटनचा तिसरा नियम शिकलो, तो म्हणजे प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते आणि ती विरुद्ध असते. या नियमाला धरूनच कोणतंही क्षेपणास्त्र हवेतून उड्डाण करत असते. क्षेपणास्त्राच्या इंजिनात वेगाने इंधन जाळले जाते आणि ज्या वेगाने वायू त्यातून बाहेर पडतात त्यावर थ्रस्ट (जोर) अवलंबून असतो. त्या जोरावर क्षेपणास्त्र किती वेगाने पुढे जाणार हे अवलंबून असते. हा जोर निर्माण करण्यासाठी इंधनाचे प्रज्वलन नोझलमधून केले जाते. नोझलमुळे वेग वाढल्याने साहजिक थ्रस्ट वाढतो. पण इकडे एक लक्षात ठेवावे लागते, की इंधनाच्या प्रज्वलनाचा दाब हा बाहेर पडणाऱ्या गॅसपेक्षा अधिक असावा लागतो. आता हा दाब अधिक ठेवण्यासाठी सामान्य इंजिनात हवेला कंप्रेस केले जाते. कंप्रेस केल्यामुळे इंजिनाचा प्रज्वलन दाब हा अधिक रहातो.
सर्वसाधारण क्षेपणास्त्रात इंधनासोबत अजून एका गोष्टीची गरज लागते, ती म्हणजे ऑक्सिडायझर. सर्वसाधारण प्रज्वलनात 20% इंधन असते तर 80% ऑक्सिडायझर यांचे मिश्रण असते. याचा अर्थ इंधनासोबत ऑक्सिडायझरही बरोबर नेणे गरजेचे आहे. क्षेपणास्त्राचा बराचसा भाग या गोष्टींमध्ये व्यापून जातो. त्यामुळे दारुगोळा नेण्यासाठी खूप कमी जागा शिल्लक राहते. त्याशिवाय या इंधन आणि ऑक्सिडायझरचे वजन त्याच्या वेगाला नियंत्रित करते. आता समजा आपण अश्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित केलं, ज्यात हवेतला ऑक्सिजन ऑक्सिडायझर म्हणून काम करेल आणि हवेचा वेग हा हवेत इतका दाब निर्माण करेल की हवेला कंप्रेस करण्याची गरज राहणार नाही. हे तंत्रज्ञान म्हणजेच रॅमजेट तंत्रज्ञान.
रॅमजेट तंत्रज्ञानामध्ये प्रथमतः क्षेपणास्त्राला सुपरसॉनिक वेग दिला जातो. इतक्या प्रचंड वेगात हवेतून जाताना आत येणारी हवाच ऑक्सिडायझरचं काम करून इंधनाचे प्रज्वलन करते. त्यामुळे अजून थ्रस्ट निर्माण होऊन क्षेपणास्त्र ध्वनीपेक्षा 4 ते 5 पट वेगाने हवेतून प्रवास करते. रॅमजेट तंत्रज्ञान एक विशिष्ट गती मिळाल्याशिवाय काम करू शकत नाही, त्यासाठी क्षेपणास्त्राला एक विशिष्ट गती म्हणजेच सुपरसॉनिक वेग देण्यासाठी बूस्टरची गरज लागते. याच बूस्टर आणि रॅमजेट तंत्रज्ञानाला एकत्र करून एस.एफ़्.डी.आर. असे म्हटले जाते.
हे तंत्रज्ञान जमिनीवरून हवेत आणि हवेतून हवेत डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रात वापरले जाऊ शकते. राफेलवर असणाऱ्या मेटॉर क्षेपणास्त्रात याच तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बी.व्ही.आर.एम. ( beyond-visual-range air-to-air missile) क्षेपणास्त्रात हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी पडते. मेटॉरच्या एका क्षेपणास्त्राची किंमत 2.3 मिलियन अमेरिकन डॉलर आहे. आत्तापर्यंत आपल्याला ते आयात करावे लागत होते, पण आता एस.एफ़्.डी.आर. तंत्रज्ञानामुळे अश्या पद्धतीचे क्षेपणास्त्र आपल्याला भारतात बनवता येणार आहे. भारताने विकसित केलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राच्या एम.के. 3 व्हर्जनमध्ये याचा उपयोग केला जाणार आहे. हे क्षेपणास्त्र तब्बल 350 किलोमीटरवरील कोणतंही लक्ष्य 4.5 मॅक वेगाने भेदण्यास सक्षम असणार आहे. याची क्षमता मेटॉरपेक्षा जास्ती असणार आहे. त्यामुळेच युरोपातील अनेक देशांना भारताच्या यशस्वी चाचणीमुळे धक्का बसला आहे.
ज्या तंत्रज्ञानावर युरोपियन देश उड्या मारत होते, त्यापेक्षा चांगले तंत्रज्ञान भारताने विकसित केले आहे. कालच्या चाचणीमुळे भारताने आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने एक मोठा पल्ला पार केला आहे. या तंत्रज्ञानाच्या विकासात संलग्न असलेल्या सर्व वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे शिवाय भारताला आत्मनिर्भर करणाऱ्या डी.आर.डी.ओ. चे विशेष अभिनंदन.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Friday, 5 March 2021
७ मिनिटांचा थरार... विनीत वर्तक ©
७ मिनिटांचा थरार... विनीत वर्तक ©
१८ फेब्रुवारी २०२१ रोजी नासाच्या पेर्सेव्हरन्स रोव्हर ने मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या लँडिंग केलं. नासा च्या ह्या कामगिरीची नोंद मानवाच्या तंत्रज्ञान प्रगती मधील एक महत्वाचा टप्पा म्हणून केली गेली. अनेकांनी हा क्षण 'याची देही याची डोळा' अनुभवला असेल. ह्या अतिशय कठीण मोहिमेचं नेतृत्व एका अमेरिकन - भारतीय संशोधिकेने केलं त्याचा काकणभर जास्त अभिमान भारतीयांना नक्कीच झाला असेल. २०१२ ला क्युरॅसिटी रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्या नंतर वैज्ञानिक समूहाने नासाने मंगळावरील मातीचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने एखादी मोहीम हाती घ्यावी असं सुचवलं. त्यानुसार नासाने पेर्सेव्हरन्स रोव्हर च्या मिशन घोषणा केली. २०१३ ला ह्या मिशन च्या टीम मध्ये भारतीय वंशाच्या डॉक्टर स्वाती मोहन ह्यांची निवड झाली. त्यांना नासाच्या मिशन मार्स २०२० मधे गायडन्स एन्ड कंट्रोल ऑपरेशन लीड ही जबाबदारी देण्यात आली. मंगळाचे वातावरण पृथ्वीच्या वातावरणापेक्षा खूप विरळ आहे. जवळपास १०० पट विरळ असणाऱ्या वातावरणातून एखादी गोष्ट अलगदपणे मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवणे खूप कठीण आहे. म्हणूनच नासाने पेर्सेव्हरन्स रोव्हर च्या त्या प्रवासाला '७ मिनिटांचा थरार' असं नाव दिलं.
आधी सांगितलं त्या प्रमाणे १०० पट विरळ असणाऱ्या वातावरणात १ टन (१००० किलोग्रॅम ) वजन असणार पेर्सेव्हरन्स रोव्हर अलगदपणे, सुरक्षितरित्या उतरवण्यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं होत. मंगळावर त्यावेळी असणारी वातावरणाची स्थिती, धुळीची वादळ, रोव्हर ज्या ठिकाणी उतरणार त्या ठिकाणाचा अभ्यास त्या शिवाय ह्या सगळ्या गोष्टी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करण्याचं प्रभूत्व पेर्सेव्हरन्स रोव्हरला देणं अतिशय गरजेचं होतं. त्याचसाठी गेली ८-९ वर्ष नासाचे अभियंते ह्या मिशनवर दिवस रात्र काम करत होते. १८ फेब्रुवारीला मंगळाच्या वातावरणात पेर्सेव्हरन्स रोव्हर ने हायपर सॉनिक वेगाने प्रवेश केला. जवळपास २०,००० किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने ते मंगळाच्या पृष्ठभागाकडे झेपावले. इतक्या प्रचंड वेगाने वातावरणात प्रवेश करताना रोव्हर च्या खालच्या बाजूला वातावरणाच्या घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली. काही क्षणात तपमान १३०० डिग्री सेल्सिअस वर गेलं. अर्थात नासा च्या अभियंतांना याची कल्पना असल्याने त्यांनी रोव्हर च्या खालच्या बाजूस हिट शिल्ड बसवलेली होती.
पेर्सेव्हरन्स रोव्हर ची हिट शिल्ड ही कार्बन फायबर च्या रेझीन मटेरियल ने बनवलेली होती ज्याला Phenolic Impregnated Carbon Ablator (PICA) असं म्हणतात. हे मटेरियल सुद्धा नासाच्या अभियंत्यांनी निर्माण केलेलं होतं. यानाच्या बाहेर १३०० डिग्री सेल्सिअस तपमान असताना सुद्धा पेर्सेव्हरन्स रोव्हर च्या आजूबाजूला तपमान सामान्य होतं. वातावरणात रोव्हर चा वेग साधारण १६०० किलोमीटर / तास कमी झाल्यावर आणि जमिनीपासून साधारण ११ किलोमीटर उंचीवर २१ मीटर व्यासाचे पॅराशूट उघडलं. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की जेव्हा पॅराशूट उघडलं तेव्हा पेर्सेव्हरन्स रोव्हर चा वेग सुपरसॉनिक होता. इतक्या प्रचंड वेगात यानाचा वेग नियंत्रण करून तो कमी करण्याची जबाबदारी पॅराशूट वर होती. हे पॅराशूट बनवताना काहीतरी वेगळं करण्यासाठी नासाच्या इयान क्लार्क यांनी एक वेगळी कल्पना मांडली. पॅराशूट च्या आत एक सिक्रेट मेसेज त्यांनी कोड केला. जर का आपण यानाचा उतारतानाचा व्हिडीओ पाहिला तर त्यात लाल- पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या दिसतील त्यात बार कोड स्वरूपात एक मेसेज त्यांनी कोड केला. ज्यात लिहिलं होत,
“DARE MIGHTY THINGS.” (पराक्रमी गोष्टी करण्याचा ध्यास धरा)
पॅराशूट उघडल्या नंतर २० सेकंदांनी हिट शिल्ड पेर्सेव्हरन्स रोव्हर पासून विलग झाली. त्याचवेळेस पेर्सेव्हरन्स रोव्हरने मंगळाच्या वातावरणाचा पहिल्यांदा अनुभव घेतला. पेर्सेव्हरन्स रोव्हर योग्य ठिकाणी उतरण्यासाठी त्यात "Terrain Relative Navigation" (TRN) हे तंत्रज्ञान वापरलं गेलं होतं. या तंत्रज्ञानात रोव्हर वरील कॅमेरे आणि कॉम्प्युटर यांनी मंगळाच्या पृष्ठभागाचा आढावा घेऊन त्या प्रमाणे रोव्हर कुठे उतरणार ह्याची निश्चिती केली. पॅराशूट ने यानाचा वेग अलगद उतरता येईल इतका कमी करता येणं शक्य नव्हतं. जेव्हा यानाचा वेग ३०० किलोमीटर / तास इतका झाला तेव्हा पॅराशूट यानापासून विलग झालं आणि साधारण २१०० मीटर उंचीवर पेर्सेव्हरन्स रोव्हर वरील जेट पॅक प्रज्वलित होऊन त्यांनी रोव्हर ला बाजूला केलं. विलग झालेलं पॅराशूट यानाच्या आंगावर पडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अश्या पद्धतीने रोव्हर त्याच्या रस्त्यातून बाजूला झालं.
मंगळाच्या पृष्ठभागा पासून २० मीटर उंचीवर जेट पॅक पासून पेर्सेव्हरन्स रोव्हर विलग होऊन ज्याला 'स्काय क्रेन' म्हणतात त्याचा आधार घेऊन रोव्हर ने मंगळाच्या भूमीला स्पर्श केला. जेट पॅक २० मीटर उंचीवर हवेत तरंगत राहिलं आणि लोखंडी दोरखंडाने रोव्हर जमिनीवर साधारण १.२ किलोमीटर/ तास इतक्या हळुवारपणे उतरलं. रोव्हर च्या चाकांवर रोव्हर च वजन येताच कॉम्प्युटर ने दोरखंड रोव्हर पासून विलग केले. वर तरंगणारे जेट पॅक दोरखंडांसकट दुसरीकडे जाऊन मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं.
पेर्सेव्हरन्स रोव्हरचा हा सगळा प्रवास अवघ्या ७ मिनिटांचा होता पण तो घडवण्यासाठी नासाच्या अभियंतांनी तब्बल ७ वर्ष खर्च केली होती. आता आपण विचार शकतो की अवघ्या ७ मिनिटांच्या ह्या प्रवासात कितीतरी किचकट तांत्रिक घडामोडी घडल्या. त्या सगळ्याच्या सगळ्या योग्य क्षणी घडून येणं गरजेचं होतं. यातील अनेक तंत्रज्ञान हे पहिल्यांदा वापरलं गेलं आहे. त्यामुळे ह्या ७ मिनिटांच्या थरारावर तब्बल २.५ बिलियन अमेरिकन डॉलर खर्चाची मोहीम अवलंबून होती. ह्या सगळ्याच सारथ्य करण्याचा बहुमान एका अमेरिकन भारतीय स्री ला मिळाला ही एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण वयाच्या ९ व्या वर्षी स्टार ट्रेक बघून अवकाशाचे स्वप्न बघणाऱ्या स्वाती ला अमेरिकेत ते पूर्ण करण्याचं पाठबळ मिळालं पण तेच भारतात मिळालं असत का? ह्या प्रश्नाचं उत्तर पण एक भारतीय म्हणून आपण शोधायला हवं. जर ह्याच उत्तर नाही असेल तर ते हो कसं होईल ह्यासाठी प्रयत्न केले जातील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर स्वाती मोहन यांचा भारतीय म्हणून गौरव करण्याच्या पात्रतेचे होऊ.
फोटो स्रोत :- गुगल, नासा
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Thursday, 4 March 2021
आत्मनिर्भर भारत (ब्राह्मोस क्षेपणास्त्र)... विनीत वर्तक ©
आत्मनिर्भर भारत (ब्राह्मोस क्षेपणास्त्र)... विनीत वर्तक ©
२ मार्च २०२१ रोजी भारत आणि फिलिपाईन्स ह्या देशात एक करार झाला. ह्या कराराने दोन्ही देशांनी सरकारी पातळीवर संरक्षण सामुग्री खरेदी- विक्री आणि हस्तांतरण करण्यासाठी स्वाक्षरी केल्या आहेत. ह्या कराराचा अर्थ होतो की दोन्ही देश आता कोणत्याही अडथळ्याशिवाय एकमेकांशी संरक्षण करार करू शकणार आहेत. दोन्ही देश एकमेकांचे मित्र असून अतिशय अद्यावत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास दोन्ही देशांनी एकप्रकारे मान्यता दिली आहे. ह्या करारात असणाऱ्या अटी दोन्ही देशांनी सशर्त मान्य केल्या आहेत. हा करार झाल्या झाल्या फिलिपाईन्स चे संरक्षण सचिव डेल्फीन लोरेंझन ज्यांच्या समोर हा करार झाला त्यांनी अतिशय आनंदाने आणि अभिमानाने एक वक्तव्य केलं आहे. जे खूप सूचक आहे. ते म्हणाले,
"आम्ही ब्राह्मोस खरेदी करत आहोत."
ह्या वाक्यामागचा अर्थ असा होता की, आम्ही कोणाला घाबरत नाही. कोणाला न जुमानता आम्ही कोणत्याही परिस्थितीत आणि भारत सांगेल त्या किमतीला जगातील सगळ्यात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्राह्मोस' खरेदी करणार आहोत.
गेली काही वर्ष फिलिपाईन्स ब्राह्मोससाठी भारताच्या एक प्रकारे मागे लागलेला होता. साऊथ चायना सी मधील चीन च्या दादागिरीला उत्तर जर सरळ मार्गाने आणि शक्तीने देता येत नसेल तर वाकड्यातला मार्ग म्हणजे 'ब्राह्मोस' हे त्यांनी जाणलं होत. त्यामुळेच ब्राह्मोस च्या विक्रीसाठी गेली अनेक वर्ष ते प्रयत्न करत होते. भारत आणि रशिया ह्यांनी संयुक्तपणे निर्माण केलेल्या ब्राह्मोस च्या विक्रीसाठी रशिया ची परवानगी गरजेची आहे. भारत आणि रशिया ह्या दोन्ही देशांचे मित्र देश हे क्षेपणास्त्र विकत घेऊ शकणार आहेत. २ मार्च रोजी झालेल्या कराराने ब्राह्मोस कराराचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भारत आणि फिलिपाईन्स ह्या विक्री कराराची घोषणा करतील. भारताने फिलिपाईन्स ला १०० मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्ती क्रेडिट लाईन दिली आहे. ह्याचा अर्थ वस्तू आत्ता घ्या आणि पैसे हफ्त्याने द्या. फिलिपाईन्स सारखे छोटे देश खूप जास्ती पैसे एकाच क्षेपणास्त्रावर एका वर्षात खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे भारताने आपल्या मित्र देशाची अडचण ओळखून त्यांना हे क्रेडिट दिलं आहे. पण ह्या एका निशाण्यात भारताने अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. हे छोटे देश अश्या करारामुळे भारताच्या छत्रछायेखाली आपोआप येणार आहेत. 'दुश्मन का दुश्मन दोस्त होता हैं' त्याप्रमाणे अश्या सर्व राष्टांची एकजूट चीन ला डोईजड होणार आहे.
फिलिपाईन्स पाठोपाठ थायलंड, इजिप्त, सिंगापूर, साऊथ कोरिया, अल्जेरिया, ग्रीस, साऊथ आफ्रिका, बल्गेरिया, मलेशिया, ब्राझील, चिली सारखे अनेक देश ह्या क्षेपणास्त्रासाठी रांगेत उभे आहेत. अर्थात ह्या सगळ्यांना भारत क्षेपणास्त्र विकेल असं नाही. त्या शिवाय कोणत्या किमतीला विकायचं ह्याचा निर्णय ही भारत घेणार आहे. ब्राह्मोस च सध्याचं व्हर्जन आणि ब्राह्मोस च एन. जी. व्हर्जन ह्या दोघांसाठी हे सगळे देश उत्सुक आहेत. ध्वनीपेक्षा ३.५ पट स्वनातीत वेगाने जाणाऱ्या ब्राह्मोस ला रोखण्याची ताकद सध्या तरी जगातील कोणत्याच प्रणाली कडे नाही. त्याशिवाय ब्राह्मोस ची अचुकता सर्वोत्तम आहे. भारताने आत्तापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांमधून आलेल्या निकषांमधून 'ब्राह्मोस' प्रणाली सर्वोत्तम असल्याच शिक्कामोर्तब झालं आहे.
भारत सध्या ब्राह्मोस २ (के) (ह्यातील के हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांच्या स्मरणार्थ आहे.) हे हायपर सॉनिक क्षेपणास्त्र तयार करत असून तब्बल १००० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा ९८०० किलोमीटर / तास (मॅक ८) ह्या वेगाने खात्मा करण्यास सक्षम असणार आहे. २०२५ पर्यंत मॅक ४ ते ५ आणि २०२८ पर्यंत मॅक ८ ते ९ वेगाने जाणार ब्राह्मोस तयार होणार आहे. भारताकडे तब्बल १४,००० पेक्षा जास्ती ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार असून कोणत्याही क्षणी शत्रूचा वेध घेण्यास ती सक्षम आहेत. ब्राह्मोस एरोस्पेस कडे सध्या १ बिलियन अमेरिकन डॉलर च्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या ऑर्डर आहेत. ह्याच्यापेक्षा जवळपास ३ पट ऑर्डर एकदा भारताने मित्र राष्ट्रांना ब्राह्मोस देण्यास सुरवात केल्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात परकीय चलन भारताला मिळणार आहे. ह्या शिवाय एकेकाळी दुसऱ्या देशांकडून विकत घेणारा भारत आता दुसऱ्या देशांना क्षेपणास्त्र विकणार आहे.
नुकतेच पाकिस्तानी राष्ट्रपती अरिफ अल्वी ह्यांनी उघडपणे आपले ब्राह्मोस २ मुळे धाबे दणाणल्याच कबूल केलं आहे. ९८०० किलोमीटर/ तास ह्या वेगाने भारतातून येणाऱ्या ब्राह्मोस २ च्या अवाक्यात संपूर्ण पाकिस्तान अवघ्या काही सेकंदात नष्ट करण्याची क्षमता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पंजाब पासून १०२ किलोमीटर वर असलेल्या लाहोर मध्ये असलेल्या लक्ष्याला ब्राह्मोस ०.६ सेकंदात नष्ट करू शकते (प्रत्यक्ष मॅक ८ वेग गाठायला वेळ लागला तरीसुद्धा २ ते ३ सेकंदात लाहोर पर्यंत जाण्यास ते सक्षम असेल.) म्हणजे पापणी उघडत नाही तोवर गेम ओव्हर. पाकड्याना दुवा करायला पण वेळ मिळणार नाही इतकं घातक ब्राह्मोस आहे. जमीन, हवा, पाणी, पाण्याखालून कुठूनही ते डागता येऊ शकल्याने पाकिस्तान सकट चीन सुद्धा दबावाखाली आहे.
ब्राह्मोस सह भारताने तेजस, आर्टिलरी गन, ग्रेनेड, के ९ व्रज सारख्या तोफा, आकाश क्षेपणास्त्र सारखी १५२ प्रकारची वेगवेगळी संरक्षण सामुग्री विक्रीसाठी ठेवली आहे. २०२५ पर्यंत यातून जवळपास ५ बिलियन अमेरिकन डॉलर च परकीय चलन भारताला मिळणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्यातून भारताची वाटचाल अतिशय वेगाने आत्मनिर्भरतेकडे होताना दिसत आहे.
जय हिंद !!!
फोटो स्रोत :- गुगल (फोटोत भारताचे फिलिपाईन्स मधील राजदूत आणि फिलिपाईन्स च्या संरक्षण सचिवांचे अधिकारी कराराची देवाणघेवाण करताना)
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.