अणु चे इलेक्ट्रोन... विनीत वर्तक
माणसाला जर अणु मानल आणि त्याच्या भोवती असलेली नाती म्हणजे इलेक्ट्रोन. जसे इलेक्ट्रोन अणु भोवती फिरतात आणि न दिसणाऱ्या बंधनाने बांधलेले असतात तशीच नाती पण. जेव्हा हे बंध तुटतात किंवा बांधले जातात तेव्हा दोन्ही वेळेस प्रचंड उर्जा बाहेर पडते. नात्यांच्या बाबतीत हि हेच होत कि. जेव्हा ती जोडली जातात किंवा तुटतात तेव्हा दोन्ही वेळेस प्रचंड उर्जा आपल्याला जाणवते ती विधायकपण असते आणि विध्वंसक सुद्धा. अणु विखंडणातून निघणार्या उर्जे पेक्षा अणु बंधनातून निघणारी उर्जा अधिक शक्तिशाली असते. तसच नात्यांच्या जोडण्यातून जास्ती उर्जा मिळते नात्यांच्या तुटण्यापेक्षा.
एकाच अणुभोवती जसे अनेक इलेक्ट्रोन असतात तसे आपल्याभोवती हि अनेक नाती , व्यक्ती असतात. त्यामुळे कोणत एक नात आपल्याला परिपूर्ण करू शकत नाही हे वास्तव आहे. ते स्वीकारण्याची मानसिकता खूप कमी लोकांमध्ये असते. समाजाने बांधलेल्या बंधनात आपण इतके गुरफटून जातो कि वास्तवा पासून आपण सतत पळत रहातो. कोणत्याही नात्यात आपण दुसर कोणी हे सहन करू शकत नाही मग ते नात एका स्त्री पुरूषाच असो, मित्र - मैत्रिणीच असो , नवरा - बायकोच असो किंवा अगदी पालक आणि मुलाचं असो. सगळ्या गोष्टी एकाच नात्यातून आणि एकाच व्यक्तीकडून पूर्ण झाल्या असत्या तर मग आपण स्थिर कधी झालोच नसतो. आपल्या विविध गरजा अनेक वेगळ्या लोकांकडून पूर्ण होत असताना मग ते एकाकडून पूर्ण करून घेण्यासाठी अनेक बंध तोडायला लावतो किंवा तोडतो.
एका तुटलेल्या इलेक्ट्रोन ची अस्वस्तथा अणु ला स्वस्थ बसून देऊ शकत नाही तिकडे आपण कुठून सुटणार. त्यात ते जबरदस्तीने असेल त्यात सहजता नसेल तर विध्वंसक उर्जेचा स्त्रोत बाहेर येणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक इलेक्ट्रोन स्वताचे अस्तित्व घेऊन असतो. जो वर अणु जोडलेला असतो तेव्हा त्याच अस्तित्व जाणवत पण नाही. पण तेच जेव्हा तो तुटतो तेव्हा त्याचा अणु वर असलेला प्रभाव आपल्याला जाणवतो तसच नात्याचं असत नाही का? बंधनातून मुक्त सुद्धा तो राहू शकत नाही. त्याला सोबत लागतेच आज नाही तर उद्या.
आपण कोणता अणु बनायचं ते आपण ठरवायचं. स्थिर असलेला कि अस्थिर असलेला. आपण हि कोणाचे इलेक्ट्रोन असतोच. कोणाला तरी स्थिर करतोच. पण फक्त आपणच हा अट्टाहास कोणत्याही नात्यात नकोच कारण ते शक्य नाही हे कळून समजायला हव. शाळेत विज्ञानात शिकलेल्या गोष्टी आपल्या खर्या आयुष्यात वापरायच्या असतात ह्याच शिक्षण कोणत्याच शाळेत दिल जात नाही. अणु ते इलेक्ट्रोन हा प्रवास समजू शकलो तर कदाचित युरेनियम ते हायड्रोजन हा प्रवास उर्जेच्या सकारात्मक वाटेने करू शकू.
No comments:
Post a Comment