Tuesday 29 December 2020

मराठवाड्याचे डब्बे... विनीत वर्तक ©

 मराठवाड्याचे डब्बे... विनीत वर्तक ©

मराठवाडा म्हणजेच मराठी लोकांचं घर. निजामाच्या काळात मराठी लोकांनी वस्ती केली, तो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जाऊ लागला. आज मराठवाडा महाराष्ट्र राज्याचा भाग आहे. मराठवाड्यात आज महाराष्ट्राचे ८ जिल्हे येतात. ६४,५९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा भाग भारतीय रेल्वेसाठी एक मैलाचा दगड सिद्ध झाला आहे. त्याला कारण आहे, इकडे बांधण्यात आलेली भारतीय रेल्वेची मराठवाडा कोच फॅक्टरी.

भारतीय रेल्वे जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. एकट्या २०१९ या वर्षात भारतीय रेल्वेने तब्बल ८.४४ बिलियन लोकांची ने-आण केली आहे. हा आकडा संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजेच एका वर्षात भारतीय रेल्वेनं संपूर्ण जगाला ने-आण केलं आहे. याच काळात भारतीय रेल्वेने १.२३ बिलियन टन वजनाच्या सामानाचीसुद्धा ने-आण केली आहे. भारतीय रेल्वेच्या १३,५५३ ट्रेन, रोज ७३२१ स्टेशनवरून प्रवाशांचं दळणवळण करतात. याशिवाय ९१४६ सामान नेणाऱ्या गुड्स ट्रेन सामानाचं दळणवळण करतात. हे आकडेच आ वासवणारे आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात लोक आणि सामानांची दळणवळण व्यवस्था बघण्यासाठी भारतीय रेल्वेला तितक्याच प्रमाणात इंजिन, डब्बे आणि इतर साहित्य लागते. भारतीय रेल्वेकडे सध्या ७४,००० पेक्षा जास्ती पेसेंजर ट्रेनचे डब्बे, तर २,८९,१८५ पेक्षा जास्ती सामान वाहून नेणारे डब्बे आहेत. पण संपूर्ण जगाच्या लोकसंख्येइतकं दळणवळण प्रत्येक वर्षी करणाऱ्या रेल्वेला ही संख्या अपुरी पडते. त्याचसाठी भारतीय रेल्वेने ही गरज भागवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर इकडे डब्बे बनवण्याचा कारखाना काढण्याच्या योजनेला मूर्त स्वरूप दिलं.

भारतीय रेल्वे पहिल्यांदा असा कारखाना बांधत होती असं नाही पण महाराष्ट्राच्या दृष्टीने हा पहिला कारखाना असणार होता. फेब्रुवारी २०१८ ला या योजनेचा ठराव मंजूर झाला. एप्रिल २०१८ मध्ये या कामाचं भूमिपूजन झालं तर नोव्हेंबर २०१८ ला कामाला सुरूवात झाली. नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबर २०२० मध्ये या कारखान्यात रेल्वेसाठी पहिला डब्बा तयार झाला आहे. या कारखान्याच्या उभारणीसाठी ५०० कोटी रुपये खर्च आला आहे, तर १२० कोटी रुपये जमीन अधिग्रहण करण्यासाठी खर्च झाले आहेत. सुरूवातीला वर्षाला २५० डब्बे बनवण्याची ह्या कारखान्याची क्षमता असणार आहे, तर पुढे जाऊन ती वाढवण्यात येणार आहे. ३५० एकर जागेवर हा कारखाना असून सर्व सोयी आणि सुविधांनी युक्त आहे.  ह्या कारखान्याची निर्मिती करताना पर्यावरणाचं भान ठेवण्यात आलेलं आहे. कारखानाच्या छतावर सौर पॅनल बसवण्यात आले असून, त्यातून ८०० किलोवॅट ऊर्जा निर्मिती होणार आहे. तर १०,००० झाडांची लागवड करण्यात आली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सारखे प्रकल्प ही या कारखान्याचा भाग आहेत.

आजवर भूमिपूजन झालेले अनेक सरकारी प्रकल्प एकतर बासनात बांधले गेले. जे तयार झाले, त्यांच्या निर्मितीमध्ये इतका वेळ गेला, की त्या प्रकल्पाची किंमत दुप्पट, तिप्पट झाली. चालू झालेले सरकारी प्रकल्प पूर्ण झाल्यावरही लाल फितीत अडकले. अश्या काळात मराठवाड्यातील या रेल्वे कोच फॅक्टरीचा, कागदावरच्या आराखड्यापासून ते प्रत्यक्षात उतरण्यापर्यंतचा झालेला प्रवास अतिशय वेगात आणि लक्षणीय असा झालेला आहे. या फॅक्टरीमधून निघणारे डब्बे येत्या काळात भारतीय रेल्वे आणि भारतीयांचा भार वाहून नेणार आहेत. पुढल्या वेळेस भारतीय रेल्वेने प्रवास करताना कदाचित तुम्ही, आम्ही याच मराठवाड्यात तयार झालेल्या डब्या मधून प्रवास करत असू.

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



2 comments: