एका प्रवासाचा प्रवास... विनीत वर्तक ©
काही आठवड्यापूर्वी संपूर्ण खगोल शास्त्रज्ञांचे आणि वैज्ञानिकांचे डोळे एका घटनेकडे एकटवले होते. ह्या घटनेमध्ये आपल्याला आजवर ज्ञात असणाऱ्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची दृष्टी मिळणार होती त्याचसोबत अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात होण्याची क्षमता होती. त्यामुळेच ही घटना मानवाच्या तांत्रिक क्षमतेचं एक पुढलं पाऊल होत. जपान देशाचं हायाबुसा २ हे यान ६ डिसेंबर २०२० ला ऑस्ट्रेलिया च्या भागात एक कॅप्सूल घेऊन उतरलं. ह्या कॅप्सूल च्या कुपीमध्ये दडलेला होता 'एका प्रवासाचा प्रवास'.हायाबुसा २ ला ३ डिसेंबर २०१४ ह्या दिवशी जपान च्या जॅक्सा ने एका रोमांचकारी प्रवासाला रवाना केलं. हायाबुसा २ अश्या एका प्रवासाला निघालं होत ज्यात ते अश्या एका लघुग्रहाला भेट देऊन त्याच्यावर असणारे दगड मातीचे नमुने घेऊन ६ वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर परतणार होतं. २७ जून २०१८ ला हायाबुसा ने आपल्या लक्ष्याच्या कक्षेत प्रवेश केला. रायगु नावाचा एक लघुग्रह हा त्याचा लक्ष्य होता. रायगु हा अपोलो ग्रुप मधला एक लघुग्रह सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा करत आहे. रायगु ४७४ दिवसात सूर्याभोवती प्रदक्षिणा करतो. रायगु ची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या ९५,४०० किलोमीटर अंतरावरून जाते. त्यामुळे रायगु हा 'पोटेंशियल हझार्डस ऑब्जेक्ट' म्हणजेच पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता असलेल्या लघुग्रहांपैकी एक आहे. अर्थात ह्याची शक्यता नजीकच्या भविष्यात नाही. पण समजा काही गोष्टींमुळे त्याची कक्षा बदलली आणि त्याची पृथ्वीशी टक्कर झाली तरी टक्कर होणारं शहर बेचिराख होईल पण संपूर्ण मानवजातीला त्यामुळे धोका नसेल.
रायगु च वय साधारण ९ मिलियन वर्ष (+,- २. ५ मिलियन वर्ष ) असावं असा प्राथमिक अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. रायगु च्या पृष्ठभाग हा अनेक मोठ्या खडकांनी भरलेला आहे. त्यावर ४४०० पेक्षा जास्ती असे मोठे बोल्डर (खडक) आहेत. रायगु चा व्यास साधारण ०.८७ किलोमीटर आहे. ह्या रायगु च्या कक्षेत प्रवेश केल्यावर हायाबुसा २ ने त्याचा अभ्यास केला. अनेक फोटो आणि त्याच्या पृष्ठभागाचा अंदाज आल्यावर त्याने आपल्या रोबोटिक आर्म ने त्यावरील नमुने घेण्यास सुरवात केली. ११ जुलै २०१९ ला त्याने रायगु वरील मातीचे नमुने आपल्या कुपीत बंदिस्त केले. आपलं मिशन संपवून १३ नोव्हेंबर २०१९ ला पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरु केला.
एक वर्षभर प्रवास केल्यानंतर हायाबुसा २ पृथ्वी च्या कक्षेत पुन्हा एकदा परत आलं. पण कसोटीचा क्षण आता येणार होता. आपल्या आत अतिशय जपून आणलेल्या कुपीत हायाबुसा २ ने तब्बल ९ मिलियन वर्षाचा विश्वाचा प्रवास बंदिस्त केलेला होता. हा प्रवास पृथ्वीवर सुरक्षितरीत्या उतरवणं हे खूप मोठं शिवधनुष्य अजून बाकी होतं. ६ डिसेंबर २०२० ला ऑस्ट्रेलिया इकडे हायाबुसा २ ने सोडलेली कुपी सुरक्षरीत्या पृथ्वीवर उतरली. मानवाच्या तांत्रिक प्रगतीच्या इतिहासात हा दिवस सोनेरी अक्षराने नोंदला गेला. ही कुपी जॅक्सा च्या वैज्ञानिकांनी जपान ला नेऊन उघडल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण समोर दिसत होता तो 'एका प्रवासाचा प्रवास'.
रायगु वरून आणलेल्या मातीत कार्बन असणारी संयुग आहेत. ह्याच संयुगांच्या अभ्यासावरून पृथ्वीवर पाणी, जीवसृष्टी आणि इतर गोष्टी कश्या अस्तित्वात आल्या ह्या रहस्याचा गुंता सोडवण्याची वैज्ञानिकांना आशा आहे. जपानी लोकांच तंत्रज्ञान इतकं उच्च प्रतीचं आहे की हायाबुसा २ ने कुपी यशस्वीरीत्या पृथ्वीवर पाठवल्यानंतर जवळपास ६ वर्ष कित्येक हजारो किलोमीटर चा प्रवास केल्यावर ही त्यावर जवळपास ३० किलो इंधन बाकी आहे. हायाबुसा २ वरील सर्व यंत्रणा आजही व्यवस्थितरीत्या काम करत आहेत. जपान (जॅक्सा) ने पुन्हा एकदा अवकाशातून हायाबुसा २ ला दुसऱ्या एका मिशनची कामगिरी सोपवली आहे. हायाबुसा २ आता 1998 KY26 ह्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी प्रवास करणार आहे. हा लघुग्रह फक्त ३० मीटर आकाराचा आहे. हायाबुसा २ जुलै २०३१ मध्ये ह्या लघुग्रहाचा वेध घेईल. ह्या प्रवासात जाता जाता ते शुक्राचा आणि 2001 AV43 ह्या लघुग्रहाचा सुद्धा वेध घेणार आहे.
हायाबुसा २ ने आणलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्याची संधी जगभरातील संशोधकांना उपलब्ध होणार आहे. ह्या अभ्यासातून विश्वाच्या प्रवासाची अनेक रहस्य उलगडण्याचा शक्यता वैज्ञानिकांना वाटत आहे. ह्या संपूर्ण प्रवासाचा वेध घेणाऱ्या जपान च्या वैज्ञानिकांना, संशोधकांना आणि जॅक्सा च्या तांत्रिक प्रगतीला माझा साष्टांग नमस्कार.
माहिती स्रोत :- गुगल, जॅक्सा
फोटो स्रोत:- गुगल, जॅक्सा ( फोटोमध्ये हायाबुसा २ ने पृथ्वीवर पाठवलेली कुपी आणि दुसऱ्या फोटोत त्या कुपीतील मातीचे नमुने ज्यात कित्येक मिलियन वर्षाचा प्रवास बंदिस्त आहे. )
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment