Sunday 13 December 2020

खारे वारे मतलई वारे (भाग ५)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ५)... विनीत वर्तक ©

फेब्रुवारी २०१९ चा तो काळ होता त्याचवेळेस भारतात एका पाहुण्याचं आगमन होत होतं. खरे तर अनेक देशातील राजकीय नेतृत्व भारतात येत असतात पण ही  भेट खूप वेगळ्या अर्थाने महत्वाची होती. येणारी व्यक्ती आणि त्याचा देश भारतासाठी खूप महत्वाचा होता. त्याही पेक्षा जी वेळ निवडली होती ती 'बुल्स आय' म्हणता येईल अशी होती. ती व्यक्ती होती सौदी अरेबिया चे युवराज मोहम्मद बिन सलमान (एम.एस.बी.). अमेरीकन पत्रकार जमाल खशोग्गी ह्याच्या हत्येला जबाबदार म्हणून ह्याच एम.एस.बी. वर ठपका ठेवण्यात आला होता. अनेक देशांनी एम.एस.बी. ना त्याकाळी आपल्या देशात येण्यासाठी मज्जाव केला. ह्याच वेळेस भारताने मात्र दूरदृष्टीने एक पाऊल टाकलं आणि एम.एस.बी. च रेड कार्पेट स्वागत भारतात झालं. संपुर्ण जग जेव्हा एम.एस.बी.कडे संशयाने बघत होतं तेव्हा भारत एका मित्रासारखा एम.एस.बी.सोबत उभा राहिला. ह्या मैत्रीच्या पेरलेल्या बी ने आता वटवृक्षाचा आकार घ्यायला सुरवात केली आहे. आज भारताचे सैन्य प्रमुख जनरल एम.एम. नरवणे ६ दिवसांच्या युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) आणि सौदी अरेबिया च्या दौऱ्यावर आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे सैन्य प्रमुख हे गल्फ (अरेबिक) देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. ही गोष्ट ज्याला आमूलाग्र बदल म्हणता येईल अश्या पद्धतीने जागतिक पातळीवर बघितली जात आहे. 

गेल्या काही वर्षात गल्फ क्षेत्रातील (मुस्लिम) राष्ट्रातील राजकारण बदललेलं आहे. ह्याला अनेक कारणं आहेत. सौदी अरेबिया ज्याच्याकडे मुस्लिम राष्ट्राचं नेतृत्व आजवर होतं त्याच्या नेतृत्वाला धक्का देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुस्लिम राष्ट्रांमध्ये गट पडत चालले आहेत. एका गटात पाकीस्तान, तुर्की आणि मलेशिया सारखे देश एकत्र येत आहेत तर दुसरीकडे सौदी अरेबिया, यु.ए.ई. सारखी राष्ट्र आहेत. आपण फेकलेल्या तुकड्यांवर पोट भरणारा पाकीस्तान जेव्हा मालकावर भुंकायला लागला तेव्हा सौदी अरेबिया ने त्याला त्याची जागा दाखवण्याचा चंग बांधला आहे. ह्या सगळ्या गोंधळात सगळ्यात जास्ती फायदा करून घेण्याची संधी कोणाला उपलब्ध झाली असेल तर तो देश म्हणजे 'भारत'. भारतात मुस्लिम समाजावर अत्याचार होत असतात असं पाकीस्तान आजवर बोंबलत होता. काश्मीर प्रश्नावर अनेकदा त्याने ह्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांच समर्थन मिळवलेलं होतं. पण आता वारे उलटे वाहायला लागल्यावर भारताने गरम असलेल्या लोखंडावर बरोबर हातोडा मारला आहे. 

भारताने अरेबिक राष्ट्रांशी असलेले आपले संबंध अजून मजबूत करायला सुरवात केली. २०१६ ला सौदी अरेबिया ने आपल्या सर्वोच्च सन्मानाने भारताच्या पंतप्रधानांचा गौरव केला. २०१७ मध्ये युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) चे युवराज मोहम्मद बिन झायद अल निहान हे प्रजासत्ताक दिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फेब्रुवारी २०१९ ला सौदी अरेबिया चे युवराज मोहम्मद बिन सलमान (एम.एस.बी.) ह्यांनी भारताला भेट दिली. ऑगस्ट २०१९ ला युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) ने त्यांचा सर्वोच्च सन्मान भारताच्या पंतप्रधानांना दिला. २०१५, २०१८ भारताच्या पंतप्रधानांनी यु.ए.ई. ला भेट दिली. २०१९ मध्ये त्यांनी सौदी अरेबिया ला भेट दिली. ह्या सगळ्या गोष्टी क्रमाने बघितल्या तर लक्षात येईल की भारताने आपले संबंध मुस्लिम राष्ट्रांशी घट्ट केले आहेत आणि त्याचीच फळ आता आपण चाखत आहोत. 

भारताच्या सैन्य प्रमुखांची अरेबिक राष्ट्रांना भेट ही साधीसुधी गोष्ट नाही. कारण ह्या भेटीत टेबल वर अनेक गोष्टी आहेत. ही भेट राजकीय नाही त्यामुळे भेटीत घडणाऱ्या गोष्टी ह्या राजकीय नाही तर सैन्याशी आणि सुरक्षिततेशी निगडित असणार आहेत. हाच तो आमूलाग्र बदल आहे. आपण जनरल एम.एम. नरवणे ह्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम बघितला तर खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील. भारताचे सैन्य प्रमुख यु.ए.ई.मध्ये त्यांचे सैन्य प्रमुख मेजर जनरल सालेह मोहम्मद सालेह अल अमेरी ह्यांना भेटले आहेत. तर सौदी अरेबिया मध्ये त्यांचे सैन्य प्रमुख जनरल फहाद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल मूतीर ह्यांना भेटले आहेत. ह्या दोघांसोबत सैन्य भागीदारी ची चर्चा झाली आहे. सैन्य भागीदारी, सैन्य प्रक्षिशण, सैन्य सराव ह्या शिवाय आयुधांची निर्मिती, त्या तंत्रज्ञानाचं आदान प्रदान ह्या सगळ्या गोष्टी चर्चिल्या गेल्या आहेत. भारताच्या 'ब्राह्मोस' मिसाईल साठी दोन्ही देश अतिशय उत्सुक आहेत. ह्या शिवाय हिंद महासागरात दोन्ही देशांच्या नौसेना सोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव ही टेबलावर आहे. ह्या दोन्ही देशांना लागणाऱ्या विविध तंत्रज्ञान आणि आयुधांची निर्मिती करण्यासाठी भारत मेक इन इंडिया मार्फत एक पर्याय म्हणून समोर आला आहे. ह्या सोबत अवकाश तंत्रज्ञाना मध्ये आणि अवकाश क्षेत्रामध्ये भारतासोबत एकत्र काम करण्यास हे दोन्ही देश उत्सुक आहेत. 

भारताच्या सैन्य प्रमुखांची भेट ही राजकीय संबंध नाही तर सैनिकी संबंधांना एका वेगळ्या पातळीवर नेणार आहे. ज्याचा फायदा भारताला येत्या काळात होणार आहे. गेल्या काही महिन्यातील भारतीय सैन्य प्रमुखांच्या भेटी बघितल्या तर भारत कश्या तर्हेने पाकीस्तान आणि चीन ला एकाच वेळेस अडकवतो आहे ते लक्षात येईल. काही आठवड्यांपूर्वी भारताने हिंद महासागरात अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान सोबत मलबार कवायत करून चीन ला आव्हान दिलं आहे. गेल्या काही महिन्यात सैन्य प्रमुखांनी म्यानमार, नेपाळ सारख्या आपल्या शेजारील राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित धोवाल हे श्रीलंकेचा दौरा करून आले आहेत. (अजित धोवाल कधीच रिकाम्या हाताने परत येत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे.) भारताचे प्ररराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या यु.ए.ई, बहरीन आणि सिचेलीस च्या दौऱ्यावर आहेत तर सैन्य प्रमुख यु.ए.ई.आणि सौदी अरेबिया च्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळात सुद्धा भारताच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणातील प्रमुख लोक सध्या विदेश दौऱ्यावर भारताच्या रणनीतील एका वेगळ्या उंचीवर नेण्यात व्यस्त आहेत. 

काळ बदलला आहे आणि वाऱ्यांची दिशा बदलली आहे. पाकीस्तान आणि चीन ज्या मस्तीत जगत होते त्यांना भारताच्या ह्या व्यूहरचनेने धक्का नक्कीच लागला असेल ह्यात शंका नाही. ह्या सगळ्या भेटींचे दूरगामी परीणाम काय दिसून येतात ते दिसायला काही काळ जावा लागेल पण एक नक्की आहे की भारताने आपली बाजू आणि तटबंदी भक्कम केली आहे ह्याबद्दल कोणाच्या मनात दुमत नसेल. 

क्रमशः 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



No comments:

Post a Comment