Thursday, 24 December 2020

आपण सुरक्षित आहोत का?... विनीत वर्तक ©

 आपण सुरक्षित आहोत का?... विनीत वर्तक ©

१५ फेब्रुवारी २०१३ चा दिवस होता. जगात सगळचं सुरळीत सुरु होतं. अचानक चेल्याबिन्स्क, रशिया मध्ये सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी आकाशात आगीचा एक गोळा वेगाने पृथ्वीकडे झेपावला. आयफेल टॉवर पेक्षा जास्ती वजनाचा आणि साधारण २० मीटर चा व्यास असलेला तो गोळा पृथ्वीच्या आकाशात ३० किलोमीटर वर फुटला आणि पृथ्वीकडे त्याचे तुकडे वेगाने झेपावले. त्या गोळ्याच तेज सूर्यापेक्षा प्रखर होत आणि त्या तेजात चेल्याबिन्स्क, रशिया मधील त्या भागाचा आसमंत उजळून निघाला. काय होते आहे आहे कळायच्या आत ते तेज पृथ्वीच्या वातावरणात नष्ट झालं. पुन्हा एकदा काही घडलं नाही ह्या आवेशात पृथ्वी वरील व्यवहार सुरु झाले. पण अगदी काही वेळाने एक जबरदस्त शॉक व्हेव चा तडाखा तिथल्या घरांना बसला. त्या तडाख्यात तिथल्या घरांच्या सगळ्या काचा उध्वस्थ झाल्या, जवळपास १००० पेक्षा जास्ती घरांच्या भिंती कोसळल्या आणि १५०० पेक्षा जास्त लोक ह्यात जखमी झाले. तो आगीचा तेजस्वी गोळा म्हणजेच चेल्याबिन्स्क उल्कापात.  

चेल्याबिन्स्क उल्कापात होई पर्यंत जगातील कोणत्याही उपग्रहाला अथवा नासा, स्पेस एक्स, इसरो, चीन, युरोपियन युनियन, जॅक्सा, खुद्द रशिया च्या अवकाश यंत्रणेला ह्याची  पुसटशी कल्पना पण आली नव्हती. ह्या घटने नंतर अवकाश क्षेत्रात पुन्हा एक प्रश्न ऐरणीवर आला तो म्हणजे आपण सुरक्षित आहोत का? कारण अवकाशात मुक्तपणे संचार करणाऱ्या ह्या लघुग्रहांबद्दल आपल्याला असलेली माहिती ही किती तोकडी आहे हे ह्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं. १९८८ पासून साधारण १२०० अशनी ज्यांचा आकार एक मीटर पेक्षा मोठा होता ते पृथ्वीवर आदळले आहेत. त्यातल्या फक्त ५ अशनी बद्दल जगातील यंत्रणा आधी सांगू शकलेल्या आहेत. ह्या ५ मधील एकही अशनी असा नव्हता ज्याला आपण २४ तासापेक्षा आधी ओळखू शकलो अथवा तो कुठे आदळणार ह्या बद्दल आखाडे बांधू शकलो होतो. वरील आकडे लक्षात घेतले  तर कोणालाही लक्षात येईल की पृथ्वीवर अवकाशातून कोणता लघुग्रह आदळणार आहे? त्याचा आकार कसा? त्याने किती हानी होईल? त्याची  ह्याविषयी माहित देणार २१ व्या शतकातील कोणतीच यंत्रणा सध्यातरी अस्तित्वात नाही. 

लघुग्रहांची निर्मिती आपली सौरमाला जन्माला येताना झाली. आपल्या सौरमालेतील ग्रह बनत असताना ग्रह बनले पण त्याच सोबत काही भाग एकत्र येऊन ग्रहांची निर्मिती करू शकला नाही. हाच तो भाग ज्यातून लघुग्रहांचा एक पट्टा तयार झाला. हा पट्टा आपल्या सौरमालेत मंगळ आणि गुरु ग्रहाच्या मध्ये सामावलेला आहे. ह्याच पट्यातून काही लघुग्रह गुरुत्वाकर्षणामुळे सौर मालेच्या आतल्या भागात खेचले जातात आणि मग त्यांची कक्षा जर का पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ आली तर पृथ्वीकडे खेचले जातात आणि त्यांची टक्कर पृथ्वीशी होते. कोणत्याही लघुग्रहांची कक्षा आपल्याला समजण्यासाठी त्यांच आकलन होणं गरजेचं असते.  ह्यासाठी आकाशाचा वेध वेगवेगळ्या काळात घेतला जातो. एकाच ठिकाणची अनेक छायाचित्र एकत्र केली की एखादी वस्तू जर आपली जागा बदलत असेल तर त्यात दिसते आणि मग त्या बदलण्याच्या परिघावरून त्याच्या कक्षेच गणित केलं जाते. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं शक्य होते जेव्हा हे लघुग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या पलीकडे असतील. कारण तेव्हाच सूर्याचा प्रकाश ह्या लघुग्रहांवर पडतो आणि तेव्हा आपण त्यांचा पृथ्वीवर वेध घेऊ शकतो. ह्यामुळे आपण फक्त १५% आकाश धुंडाळू शकतो. ह्याचा अर्थ ८५% अवकाशात कोण कुठे परिक्रमा करते आहे ह्याचा आपल्याला काहीच अंदाज नाही. 

समजा आपण एखाद्या लघुग्रहाची कक्षा त्याचा अभ्यास करून नक्की केली तरी ती तशीच राहील ह्याचा काहीच नेम नाही. हे लघुग्रह काही मीटर ते किलोमीटर व्यासाचे असतात आणि ह्यांच्यावर सूर्यासह, पृथ्वी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र अश्या सगळ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडत असतो. अगदी चंद्रासारखे उपग्रह सुद्धा एखादया लघुग्रहावर आपला प्रभाव पाडू शकतात. ह्याचा सरळ अर्थ म्हणजेच लघुग्रह कधी कसे आपली कक्षा बदलतील ह्याचा अंदाज बांधण जवळपास अशक्य आहे. जे लघुग्रह आकाराने मोठे आहेत त्यांचा अंदाज आपण बांधू शकतो पण जे लघुग्रह काही मीटर व्यासाचे आहेत म्हणजे साधारण १ किलोमीटर व्यासापेक्षा लहान असलेले त्यांचा काहीच अंदाज आपल्याला नाही कारण त्यांच अस्तित्व विश्वाच्या ह्या पसाऱ्यात इतकं सुक्ष्म आहे की आपण त्यांचा शोध घेऊ शकत नाही. अर्थात ह्या लहान लघुग्रहांच्या टकरीमुळे मानवजातीच अस्तित्व नष्ट होणार नाही. पण एखाद्या शहराचं किंवा देशाचं अस्तित्व संपवून टाकण्या इतपत ही टक्कर नक्कीच संहारक असेल. 

आपण अशी एखादी टक्कर टाळू शकतो का? तर सध्या तरी ह्याच उत्तर नाही असं आहे. पृथ्वी च्या दिशेने येणारा एखादा लघुग्रहाला आपण क्षेपणास्त्र अथवा आण्विक बॉम्ब टाकून त्याची कक्षा अथवा रोख बदलू शकतो असं अनेकजण म्हणत असले तरी ते अशक्य आहे. एकतर अश्या एखाद्या काही मीटर लघुग्रहाची कक्षा ठरवून त्याचा अवकाशात वेध घेणं कठीण आहे. समजा आपण त्याचा वेध घेतला तरी ह्या स्फोटामुळे त्याचे तुकडे होतील पण गुरुत्वाकर्षणामुळे पुन्हा एकदा हे तुकडे एकसंध होतील आणि समोरून येणार संकट टाळता येणं कठीण आहे. जरी त्याचे तुकडे होऊन ते पृथ्वीवर आदळले तरी त्याची तीव्रता काही अंशी कमी होईल पण आपण टक्कर मात्र अडवू शकत नाही. त्यांचा मार्ग बदलण्याचे जे काही पर्याय आज आपल्यासमोर आहेत ते त्याच्या अफाट वेग आणि कायनेटिक शक्तीपुढे फिके आहेत. 

आज मानव कितीही प्रगत झाला तरी अवकाशातून येणाऱ्या आस्मानी संकटाची चाहूल ना आपण आधी ओळखू शकत ना आपण त्याला रोखण्यासाठी काही करू शकत. काही मीटर चा चेल्याबिन्स्क उल्कापात आज, आत्ता कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कोणत्याही भागात होऊ शकतो आणि स्वतःला सर्वात प्रगत समजणारा मानव ह्याकडे हतबलतेने बघण्यापलीकडे काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण किती सुरक्षित हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असाच आहे. 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



3 comments:

  1. चेतन पंडित27 December 2020 at 03:24

    विनय वर्तक - "आपण सुरक्षित आहोत का?" या तुमच्या लेखाचा 90% भाग विज्ञानाची माहीती आहे, आणि उद्बोधक आहे. मात्र, शेवट - "आज मानव कितीही प्रगत झाला तरी अवकाशातून येणाऱ्या आस्मानी संकटाची चाहूल ना आपण आधी ओळखू शकत ना आपण त्याला रोखण्यासाठी काही करू शकत. . . . स्वतःला सर्वात प्रगत समजणारा मानव ह्याकडे हतबलतेने बघण्यापलीकडे काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे." हा समारोप पूर्णपणे अमान्य. काही लोकांना अस वाटत कि विज्ञानाची सर्व प्रगति निरुपयोगी आहे, आणि मानव हतबल(च) आहे अस एकदाच सिद्ध केल की स्वता:च जीवन "साठा उत्तरी सुफल संपूर्ण" झाल. दुर्दैव अस, की अश्या प्रकाराचे विचार मराठीत जास्त वाचायला मिळतात. कशा करता हा खटाटोप ?

    तुमच्या लेखाच्या समारोपा वर अनेक आक्षेप घेता येतील. पहिला आक्षेप - "स्वतःला सर्वात प्रगत *समजणारा* मानव" या वाक्या वर. "समजणारा" ? म्हणजे तुम्हाला म्हणायच आहे की मानव खरोखर सर्वात प्रगत नाही, इतर कोणी तरी प्राणी जास्त प्रगत आहे, आणि मानव फक्त स्वता:ला तसे समजतो? दूसरा आक्षेप - उल्कापात होण्याची चाहूल ओळखणे किंवा त्यास रोखता येणे, हा प्रगती मोजण्याचा मापदंड आहे, हे तुम्हाला कोणी सांगितले? तिसरा आक्षेप - आपण सुरक्षित आहोत का किंवा आपण किती सुरक्षित आहोत, हे दोन्ही प्रश्नच मुळात अर्थहीन आहेत. सुरक्षित आहोत का या प्रश्नाचे चे उत्तर होय/ नाही असे देता येत नाही. जसजशी विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगति होत गेली, अनेक बाबतीत आपण सुरक्षित होत गेलो. पण हा प्रवास न संपणारा आहे. 100 वर्षांपूर्वी मलेरिया, टायफाईड, घटसर्प, देवी, कॉलरा, हे इन्फेक्शन चे रोग; हृदय रोग, अनेक कॅन्सर, सुजलेले अपेण्डिक्स, किडनी फेल्युअर, या सर्व व्याधीत मृत्यू होत असे. आता यातील बहुतेक रोग पूर्ण क्युरेबल आहेत तर काही अंशता: क्युरेबल आहेत. 50 वर्षां पूर्वी विमान प्रवास खूपच धोक्याचा होता. आता विमान प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास साधन मानला जातो. आणि अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

    पण विज्ञानाची प्रगति फोल आहे आणि मानव हतबल(च) आहे असेच येन केन प्रकारेण सिद्ध करायचे असेल तर ते पण सहज शक्य आहे. उल्कापात, भूकंप, भू-स्खलन, अति-वृष्टी या नैसर्गिक घटना तर प्रेडिक्ट करता येत नाहीतच, पण साधे टॅक्सीने पुणे-मुंबई प्रवास करताना अपघात होईल का, बायपास सर्जरी सुरळीत पार पडेल का, पावसाळ्यात रस्त्या वर पाणी तुंबल्या वर उघड्या मॅनहोल मध्ये आपण पडू का, कोणाला कॅन्सर होईल आणि कोणाला नाही, हे सुद्धा प्रेडिक्ट करता येत नाही. तुम्ही घरात बसून मानव कसा हतबल आहे या वर लेख लिहीत असताना उल्काच नव्हे तर विमान तुमच्या घरावर कोसळणे हे सुद्धा होऊ शकते, अनेकदा झालेले आहे. आणि ते सुद्धा ना प्रेडिक्ट करता येत, ना थांबवता येत.

    तर, मानव हतबल(च) आहे असेच सिद्ध करण्याने तुम्हाला कृतकृत्य वाटत असेल, तर फार चांगली गोष्ट आहे, कारण ते करणे खूपच सोपे आहे. माझ्या शुभेच्छा.

    चेतना पंडित cmpandit@yahoo.com

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. चेतना पंडित, is typo. read it as चेतन पंडित

    ReplyDelete