एक शून्य शून्य... विनीत वर्तक ©
आजएक भारतीय सैनिक एक शून्य शून्य म्हणजेच वयाची १०० वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांच नाव भारतीयांना दूर दूर पर्यंत माहित असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आमचे हिरो नेहमीप्रमाणे वेगळेच असतात. आज अनेक राजकारणी लोकांचा वाढदिवस आहे. त्यामुळे शुभेच्छांचे रकाने आज त्यांच्यासाठी तुडुंब भरून वाहत असतील. पण देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकाची साधी आठवण ही आमच्या सुशिक्षित आणि प्रगल्भ (आपण तसे आहोत असं अनेकांना वाटते) लोकांना नसेल. आज नको त्या हिरोंसोबत देशाचा खरा हिरो १०० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच नाव आहे कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल.
कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे भारताचे एकमेव सैनिक आहेत ज्यांनी भारताच्या तिन्ही दलात देशाची सेवा केली आहे. वैमानिक, खलाशी आणि सैनिक अश्या तिन्ही दलातून वेगवेगळ्या माध्यमातून देशाची सेवा केली आहे. दुसऱ्या महायुद्धात आपलं योगदान दिलेले कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे रॉयल इंडियन एअर फोर्स, रॉयल इंडियन नेव्ही आणि भारतीय सेनेचा भाग होते. १९६५ च्या भारत- पाकीस्तान युद्धात ही त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल ह्यांनी आपलं शिक्षण शासकीय कॉलेज, लाहोर इकडून पूर्ण केलं. त्यांचे वडील हे त्याकाळी मेजर ह्या हुद्यावर सैन्यात कार्यरत होते. आपल्या सैनिकी प्रवासाची सुरवात त्यांनी वैमानिक म्हणून केली. पण त्याकाळी विमान चालवण्यात धोका असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना त्याच्यापासून परावृत्त केलं. मग त्यांनी नौसेनेत प्रवेश घेतला. दुसऱ्या महायुद्धात खलाशी म्हणून रसद पुरवणाऱ्या जहाजात खलाशी म्हणून काम केलं. त्यानंतर नेव्ही मधून त्यांनी निवृत्ती घेतली. भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी भारतीय सेनेत प्रवेश केला. त्यांची नियुक्ती १ सिख ह्या रेजिमेंट मध्ये झाली. १९६५ च्या युद्धात सियालकोट इकडे आपल्या रेजिमेंट चे कमांडिंग ऑफिसर बनून त्यांनी पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं. पण हा सैनिक भारताच्या सैन्य इतिहासात दुर्लक्षित राहिला. १९७० मध्ये ते भारतीय सेनेतून निवृत्त झाले.
२४ डिसेंबर १९५० साली त्यांचा विवाह परमिंदर कौर ह्यांच्याशी झाला. परमंदिर कौर आज ९३ वर्षाच्या आहेत आणि त्यांच्या लग्नाला आता जवळपास ७० वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. आजही कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे शारीरिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त आहेत. आपल्या ह्या १०० वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यच गुपित सांगताना ते म्हणतात,
“It is rare and it is a secret".
पण त्यांच्या सुनेच्या मते त्यांच्या आयुष्याचं गुपित हे गेली ७० वर्ष ते घेत असलेल्या व्हिस्की मध्ये आहे. अर्थात ह्यातील गमतीचा भाग सोडला तर सैन्यात मिळालेलं शिस्तीचं पालन त्यांनी आजवर केल्यानेच आज एक शून्य शून्य चा दिवस ते बघू शकले आहेत. भारताच्या तिन्ही दलांचा भाग होताना त्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे. अश्या ह्या योध्यास माझा कडक सॅल्यूट. कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल ह्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्व भारतीय तुमचे कायम ऋणी आहोत.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
कोटी कोटी प्रणाम.
ReplyDeleteखरोखरच ही माहिती किती जणांना असेल?सैन्यातील सोडून अन्य कोणीच नसणार.आपण ह्या व अश्या,गोष्टी उजेडात आणित आहात त्याबद्धल आभार
ReplyDeleteThank you.
ReplyDeleteReally great. Salute...
ReplyDelete