Tuesday, 8 December 2020

एलियन आणि मोनोलिथ... विनीत वर्तक ©

 एलियन आणि मोनोलिथ... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसापासुन विश्वाचा अभ्यास आणि कुतूहल असणाऱ्या सगळ्यांच्या मनात खळबळ माजली आहे. ह्याला कारण म्हणजे गेल्या एका महिन्यात जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मोनोलिथ ( मोनालिथ म्हणजे सोप्या शब्दात लोखंडाचा खांब)  आढळून येत आहेत. रहसमयरित्या प्रकटलेले हे मोनोलिथ कुठून आले? आत्ताच पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात का आढळून येत आहेत? ह्यातील सगळ्यात आधी शोध लागलेला मोनलिथ कोणी चोरला? ते ह्यामागे विश्वातील परग्रहावरील जिवसृष्टी तर नाही न? अश्या अनेक तर्काना सध्या उधाण आलं आहे. मानवाला नेहमीच एलियन म्हणजे परग्रहावरील जीवसृष्टीच कुतूहल राहिलं आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकारामागे एलियन चा हात आहे अशी एक थेअरी जगमान्य होताना दिसत आहे. मग विश्वात खरच एलियन आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

 उतेह ह्या अमेरीकेच्या एका राज्यातील वाळवंटात नोव्हेंबर २०२० मध्ये काही संशोधकांना प्रिझम सारखा आकार असणारा एक मोनोलिथ हेलिकॉप्टर मधून दिसून आला. साधारण ३ मीटर उंची असलेला ह्या मोनालिथ चा शोध निर्मनुष्य असलेल्या भागात संशोधकांनी घेतल्यावर अनेक प्रश्न समोर उभे राहिले. ह्याची वार्ता जसजशी इंटरनेट वरून पसरत गेली तसतशी हा मोनोलिथ बघण्यासाठी गर्दी जमू लागली. अर्थात ह्यात सगळे बघे ते हौशी प्रकारचे लोक होते. अमेरीकन लोक ही नेहमीच स्वतःला श्रेष्ठ समजत असल्याने जर पृथ्वीवर एलियन कधी अवतरले तर त्यांचा पहिला मुक्काम अमेरीका असणार हे अमेरीकन चित्रपट आणि सिरीज ह्यांनी  जनमानसात बिंबवलं आहे. त्यामुळेच अमेरीकेला लक्ष्य करण्यासाठी किंवा अमेरीकेत उतरण्यासाठी एलियन म्हणजेच परग्रहवासी लोकांनी उतेह च्या वाळवंटात एखादा संदेश देण्यासाठी अथवा दिशादर्शक म्हणून हा मोनोलिथ इकडे प्रकट झाला अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. 

गेल्या एका महिन्यात ह्या नंतर मोनोलिथ आढळण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. उतेह नंतर कॅलिफोर्निया, नेवाडा, कॅनडा, यु.के., स्पेन, जर्मनी, नेदरलँड, रोमानिया ह्या देशात मोनोलिथ आढळून आले आहेत. ह्या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा एलियन बद्दल वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. वैज्ञानिकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर एलियन किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता खुप जास्ती आहे. एलियन विश्वात असू शकतात का हे जाणून घेण्यासाठी आपण विश्व थोडं जाणून घेतलं पाहिजे. 

आपण जे विश्व बघू शकतो ते जवळपास १३.८ बिलियन प्रकाशवर्ष इतकं आहे. तर विश्वाचा व्यास हा ९३ बिलियन प्रकाशवर्ष इतका प्रचंड आहे. आता ह्या विश्वात अंदाजे २०० बिलियन आकाशगंगा सामावलेल्या आहेत. आपण ज्या आकाशगंगेचा म्हणजेच मिल्की वे चा भाग आहोत तिचा व्यास १,००,००० (एक लाख) प्रकाशवर्ष इतका आहे. ह्या एकाच आकाशगंगेत ४०० बिलियन तारे आणि २०० बिलियन ग्रह आहेत. ह्यात पृथ्वीच्या आकाराचे तब्बल ६ बिलियन ग्रह आहेत. म्हणजे ह्यातील प्रत्येक ग्रहावर जीवसृष्टी असण्याची किंवा उत्पत्ती होण्याची शक्यता खूप आहे. नासा ने आत्तापर्यंत जवळपास ४३०० एक्झॉप्लॅनेट शोधले आहेत. एक्झॉप्लॅनेट म्हणजे असे ग्रह जे आपल्या सोलार सिस्टीम च्या बाहेर आहेत. तर ह्या ४३०० मधील जवळपास ५५ ग्रह हे त्यांच्या ताऱ्याच्या हॅबिटायटल झोन मध्ये आहेत. हॅबिटायटल झोन म्हणजे एखाद्या ग्रहाचे त्याच्या ताऱ्यापासून इतकं अंतर ज्यामुळे ग्रहावरील तपमान हे एकदम उष्ण पण नसेल आणि एकदम थंड पण नसेल. पृथ्वीवर जीवसृष्टी चा उगम होण्याचं कारण म्हणजे पृथ्वीचं सूर्यापासून असलेलं अंतर आहे. त्यामुळेच असे ग्रह जे अश्या पद्धतीच्या हॅबिटायटल झोन मध्ये येतात त्यांच्यावरील वातावरण हे जीवसृष्टीची सुरवात करण्यासाठी सर्वोत्तम असते. 

इकडे लक्षात आलं असेल की आपण विश्वात असलेल्या ७०० क्वीनट्रिलियन ( १ क्वीनट्रिलियन म्हणजे एकावर १८ शून्य) ग्रहांपैकी काही हजार ग्रहांची आपल्याला माहिती आहे. त्यातही शेकडो ग्रह पृथ्वी सारखी रचना असणारे आहेत. म्हणजे ह्या क्वीनट्रिलियन ग्रहांमध्ये कितीतरी ट्रिलियन ग्रह असे आहेत जिकडे जीवसृष्टीचा उगम होऊ शकतो अथवा झालेला आहे. तिकडचे एलियन आपल्यापेक्षा प्रगत किंवा मागासलेले दोन्ही प्रकारचे असू शकतात. आपण विचार करतो त्यापेक्षा कित्येक वेगळ्या पद्धतीची जीवसृष्टी आणि संस्कृती ह्या ग्रहांवर अस्तित्वात असू शकते. पण ह्या सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी आजवर आपण अशी जीवसृष्टी शोधू शकलेलो नाहीत किंवा आपलं तंत्रज्ञान अजूनही विश्वाच्या आकारासाठी खूप तोकडं आहे. मोनोलिथ हा त्यापैकी एका जीवसृष्टीचा आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न असू शकतो असं अनेकांना वाटते पण ज्या पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहेत त्यावरून तरी ह्यामागे सनसनाटी निर्माण करण हाच उद्देश निदान मला तरी दिसून येतो आहे. कारण मोनोलिथ च अचानक समोर येणं, त्याची चोरी होणं हे सगळं परग्रहावरून एलियन नाही तर पृथ्वीवरील माणसचं करत आहेत. पण असं असलं तरी भविष्यात एलियन शी गाठभेट होण्याची शक्यता विश्वाचा आकार लक्षात घेता तितकीच जास्त आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



  

No comments:

Post a Comment