Sunday, 6 December 2020

दोन टोकं अनुभवलेला देव... विनीत वर्तक ©

 दोन टोकं अनुभवलेला देव... विनीत वर्तक © (Repost)

फुटबॉल ह्या खेळाचा चा इतिहास लिहायचा झाला तर दोन टप्प्यात लिहावा लागेल. ३२ वर्षापूर्वी वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिना ह्यांच्या आधीचा इतिहास आणि दुसरा त्या नंतरचा इतिहास कारण ह्या सामन्याने फुटबॉल खेळाच्या इतिहासाची पान पूर्णपणे बदलली ती पाच मिनिटाच्या खेळात. जेव्हा पूर्ण जग हा सामना बघत होतं तेव्हा चांगल – वाईट, सुंदर – घाणेरडा, अप्रतिम – फसवणूक अश्या सगळ्याच अनुभूती जगाने त्या काही मिनटांच्या खेळात अनुभवल्या. ह्या अनुभूती जगाला करवून देणारा खेळाडू होता अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू डिएगो आर्मंडो मॅराडोना. 

अर्जेंटिना चा हा सुपरस्टार खेळाडू आजही जगातील सगळ्या पत्रकार, ह्या खेळातील विशेतज्ञ तसेच त्याच्या समवयस्क आणि आत्ताच्या पिढीतील खेळाडूंकडून पण एक सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. फिफा च्या २० व्या शतकातील सर्वकालिक महान खेळाडूंमध्ये ब्राझील च्या पेले सोबत अर्जेंटिना च्या डिएगो आर्मंडो मॅराडोना चं नाव लिहलेलं आहे. मॅराडोना च लक्ष्य, त्याच खेळातील पदलालित्य, खेळाची जाण तसेच खेळताना इतर खेळाडूंना दिलेल्या संधी तसेच फुटबॉल वरील त्याच नियंत्रण आणि त्याच्यावर असलेली त्याची पकड ह्या सगळ्या गोष्टी जेमतेम ५ फुट ५ इंच उंचीचा मॅराडोना ज्या चपळतेने करायचा ते बघणं म्हणजे साक्षात देवाचा वरदहस्त लागलेला खेळाडू बघणं. त्याच्या कमी उंचीमुळे त्याच सेंटर ऑफ ग्राव्हिटी कमी उंचीवर होतं ह्यामुळेच फुटबॉल च्या बॉल ला लिलया हाताळण्याच कसब त्याच इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वोत्तम होतं. 

डिएगो आर्मंडो मॅराडोना चा जन्म ३० ऑक्टोबर १९६० ला अर्जेंटिनाच्या ब्युनेस आयर्स इकडे झाला. अतिशय गरीब परीस्थितीत त्याच बालपण गेलं. त्याचे वडील हे साधे कामगार होते. तीन बहिणीनंतर झालेलं हे चौथ आपत्य आणि त्या नंतर ही दोन भावंड जन्माला आली. पाच भावडांच्या अतिशय गरीब घरात जन्माला आलेला मॅराडोना एक दिवस आयुष्यात इतके पैसे आणि प्रसिद्धी कमावेल हे तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. लहानपणीच वयाच्या तिसऱ्या वर्षी मॅराडोना ला त्याच्या भावाने फुटबॉल भेट दिला. हा फुटबॉल म्हणजे मॅराडोना चा जीव की प्राण झाला तो शेवटपर्यंत. उठता, बसता ते रात्री झोपेत पण मॅराडोना त्यात रमलेला असायचा. नीट व्यवस्थित धावण्या आगोदर मॅराडोना फुटबॉल सोबत अनेक क्लुपत्या करायला शिकला होता. वयाची ८ वर्ष होईपर्यंत मॅराडोना फुटबॉल खेळायला शिकला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं मॅराडोना च फुटबॉल वरील नियंत्रण अर्जेंटिना च्या ज्युनिअर टीम च्या कोचच्या लक्षात आलं त्यांनी लगेच मॅराडोना ला टीम मध्ये संधी दिली. त्या नंतर मॅराडोना च आयुष्य फुटबॉल ने बदललं ते कायमचं. 

ह्या टीम ने १९७२ मध्ये सलग १४० गेम जिंकले आणि त्याच वर्षीचा ज्युनिअर किताब ही ह्याच टीम ला मिळाला आणि ह्याच सर्व श्रेय जाते ते मॅराडोना च्या जादुई फुटबॉल खेळण्याला. ह्यासाठी मॅराडोना ला १० नंबरची जर्सी देण्यात आली जो नंबर फुटबॉल स्टार पेले च्या जर्सी चा होता. सगळ्यात कमी वयात मॅराडोना ने देशाच्या ज्युनिअर टीम मध्ये आपलं नाव जोडलं. १९८२ च्या वर्ल्ड कप मध्ये मॅराडोना फारशी चमक दाखवू शकला नाही. पण त्याचा चाहतावर्ग वाढत होता. मॅराडोना च्या जादुई खेळाने सगळ्यांना भारावून सोडलं होतं. बार्सिलोना ह्या क्लब ने मॅराडोना त्यांच्या क्लब सोबत खेळण्यासाठी प्रचंड असे ७.७ मिलियन अमेरिकन डॉलर मोजले. फुटबॉल इतिहासातील हा एखाद्या खेळाडूसाठी केला जाणार सगळ्यात मोठा सौदा ठरला. मॅराडोना च वय तेव्हा अवघं २१ वर्ष होतं. कमी वयात प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मॅराडोना ला मिळाली. अतिशय गरिबीतून अचानक हाती लागलेला पैसा त्याच्यासोबत अनेक वाईट गोष्टी ही घेऊन आला. ह्यातच मॅराडोना ने कोकेन ची चव चाखली आणि त्याच व्यसनात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही. 

१९८६ चा वर्ल्ड कप मॅराडोना ला दैवत्व देऊन गेला. वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिना चा सामना संस्मरणीय ठरला तो मॅराडोना च्या दोन गोलमुळे. ह्या स्पर्धेला इंग्लंड आणि अर्जेंटिना मध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे एकमकांचे उट्टे काढण्याचा चंग दोन्ही संघांनी बांधला होता. पहिल्या गोलच्या वेळी मॅराडोना च्या हाताला लागून फुटबॉल इंग्लंड च्या जाळ्यात शिरला. फुटबॉल ला हात लावणे हे खरे तर ह्या खेळात चूक मानली गेली आहे पण रेफ्री नी हा गोल अर्जेंटिना ला बहाल केला. त्यावेळी बोलताना मॅराडोना म्हणाला होता, 

“ ह्या गोल मध्ये मॅराडोना च थोडं डोकं आणि देवाचा थोडा हात आहे” 

म्हणून ह्या गोल ला “ह्यांड ऑफ गॉड” असं म्हंटल गेलं. २२ ऑगस्ट २००५ ला मॅराडोना ने आपण मुद्दामून हा बॉल हाताने जाळ्यात ढकलल्याचा खुलासा केला. हा गोल फिफा च्या इतिहासातील सगळ्यात लाज वाटावी असा आणि नियमांची पायमल्ली केलेला गोल म्हणून प्रसिद्ध झाला. ह्या नंतर मात्र ४ मिनिटांच्या अवधीत मॅराडोना ने जो गोल केला त्या गोल ला “गोल ऑफ द सेंच्युरी” हा किताब २००२ साली फिफा ने दिला. मॅराडोना ला आपल्या बाजूमध्ये फुटबॉल च नियंत्रण मिळालं. त्याने एकट्याने ११ वेळा बॉल ला स्पर्श करत इंग्लंड च्या पाच खेळाडूंना चकवत इंग्लंड च्या जाळीकडे धाव घेतली. शेवटी त्यांचा गोलकीपर पीटर शिल्टन ह्याला चकवत मॅराडोना ने डाव्या पायाने मारलेला फुटबॉल जाळ्यात अडकला तेव्हा पूर्ण जगाने खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोल बघितला होता. म्हणूनच त्या काही मिनिटांन च्या खेळामध्ये फुटबॉल खेळाचे अनेक नियम ते फुटबॉल खेळातील अजरामर गोल अस सगळच बदलून गेलं. म्हणून आज फुटबॉल चा इतिहास ह्या स्पर्धेच्या आधीचा आणि ह्या नंतरचा असा सांगितला जातो. 

१९८२ नंतर मॅराडोना चा खेळ बहरत असला तरी त्याच व्यसन त्याला निराशेच्या गर्तेत ढकलत होतं.त्याचा स्व त्याच्या खेळापेक्षा मोठा होऊ लागला. मॅराडोना  दिवसेंदिवस अतिशय उर्मट होऊ लागला. त्याच्या बार्सिलोना कल्ब ला ही त्याचे चटके बसायला लागले. पण मॅराडोना ने त्याच्या बळावर बार्सिलोना ला त्या वर्षीच जेतेपद मिळवून दिलं. बार्सिलोना ने मॅराडोना ला १२ मिलियन अमेरिकन डॉलर ला नापोली क्लब ला विकलं. १९८८ पर्यंत मॅराडोना ने नापोली क्लब मधून खेळताना आपल्या खेळाचा करिष्मा दाखवून दिला. ह्या कल्बसाठी सर्वाधिक ११५ गोल त्याने केले. पण मॅराडोना च व्यक्तिगत आयुष्य मात्र डळमळीत व्हायला लागलं होतं. कोकेन च व्यसन त्याला आतून पोखरत होतं. 

१९९० च्या वर्षी मॅराडोना ने पुन्हा अर्जेंटिना च नेतृत्व वर्ल्ड कप मध्ये केलं पण आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मॅराडोना करू शकला नाही. एकेकाळी अशक्य वाटणारे गोल केलेला देव आज पेनल्टी किक वर साधे गोल करायला ही कमी पडू लागला. अर्जेंटिना जर्मनी कडून ह्या वेळेस पराभूत झाली. मॅराडोना ला पराभवाला आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. त्यातच मॅराडोना व्यसनाधिनता वाढत जात होती. त्याचे परिणाम आता दिसायला लागले होते. त्याच वजन वाढत गेलं आणि चपळाई कमी होत गेली. खेळाकडे दुर्लक्ष झालं. १७ मार्च १९९१ ला मॅराडोना उत्तेजकद्रव्य चाचणीत दोषी आढळला. कोकेन चे अंश त्याच्या रक्तात मिळाले. १५ महिन्यांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली. एकेकाळी दैवत्व प्राप्त झालेला हा देव आता लोकांच्या नजरेत उतरला होता. कोकेन ला सोडण्यात मॅराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. १९९४ च्या वर्ल्ड कप मधील उत्तेजक द्रव्य चाचणीत मॅराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. अस्ताला जात असलेलं वैभव मॅराडोना ला दिसत होतं. चाहत्यांना ही एकेकाळी डोक्यावर घेतलेल्या खेळाडूची फुटबॉल खेळातून अशी पीछेहाट चटका लावून जात होती. पण नशेच्या आहारी गेलेला देव पाण्याखाली गेला तो कायमचा. तिसऱ्यांदा मॅराडोना उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. ह्या नंतर मात्र वयाच्या ३६ वर्षी त्याने पुन्हा एकदा ह्या सगळ्यातून बाहेर येऊन फुटबॉल साठी कसून सराव केला पण तोवर कोकेन ने त्याच्या शरीराची आतून वाट लावली होती. सगळ्याला कंटाळून मॅराडोना ना ने ऑक्टोबर १९९७ ला फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली. 

एकेकाळी गरिबीची झळ सोसलेला डिएगो आर्मंडो मॅराडोना फुटबॉल चा सम्राट झाला. ज्या गोष्टींची स्वप्न कधी बघितली नव्हती त्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळत होत्या पण अचानक मिळालेला पैसा आणि प्रसिद्धी ह्याचा ताळमेळ राखायला मात्र डिएगो आर्मंडो मॅराडोना हरला. एकेकाळी देव असलेला हा स्टार फुटबॉलपटू त्याच्याच तेजात उध्वस्थ झाला. डिएगो आर्मंडो मॅराडोना च आयुष्य आपल्या प्रत्येकासाठी एक धडा आहे. आयुष्याची दोन टोक अनुभवलेला हा देव प्रसिद्धी आणि यशाची हवा डोक्यात जाऊन वाईट संगतीला, व्यसनांना जवळ केल्यावर होणाऱ्या आपल्याच ऱ्हासाच मूर्तिमंत उदाहरण म्हणून नेहमीच लक्षात राहील.         

 माहिती स्त्रोत :- गुगल 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment