एका राणीची गोष्ट... विनीत वर्तक ©
राजा राणीच्या अनेक गोष्टी आपण आजवर ऐकलेल्या आहेत. त्यातलीच एका राणीची गोष्ट. साधारण २००० वर्षापूर्वी दक्षिण कोरियात किम सुरो नावाचा एक राजा राज्य करत होता. इतर राजांप्रमाणे त्यानेही लग्न करून आपल्या म्हणजेच करक राज्याचा वंश पुढे वाढवावा अशी इच्छा त्याच्या घरातील जेष्ठ लोकांची होती. पण त्या राजाला अश्या एका राणीची गरज होती जी या भूतलावर एकमेव आणि दैवी आशीर्वाद असलेली असेल. अश्या राणीची वाट बघत असताना त्यांच्या राज्यापासून तब्बल ४५०० किलोमीटर लांब असलेल्या एका राजाच्या स्वप्नात किम सुरो ची इच्छा प्रकट झाली. त्याने आपल्या १६ वर्षाच्या मुलीला दक्षिण कोरिया इकडे किम सुरो शी लग्न करण्यासाठी पाठवलं. किम सुरो च्या स्वप्नातली राजकुमारीला समोर बघताच त्याने नकार देण्याचा प्रश्न नव्हताच. किम ने तिचं नावं ठेवलं 'हिओ वांग ओक'. त्या दोघांच लग्न झालं आणि या दाम्पत्याने पुढे १२ मुलांना जन्म दिला. यातील १० मुलांनी राजाची म्हणजेच किम ची वंशावळ पुढे नेली तर यातील दोन मुलांनी 'हिओ' ही वंशावळ पुढे नेली. आज दक्षिण कोरिया मधील जवळपास ८० लाख कोरियन याच वंशावळेच प्रतिनिधित्व करतात. या वंशावळीतील लोकं इतर कोरियन लोकांच्या मानाने थोडे उंच आणि गहू वर्णीय असतात (इतर कोरियन रंगाने गोरे असतात). तसेच यांच्याकडे वंशपरंपरागत राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. आजही अनेक कोरियन प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडंट हे याच वंशाच प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच त्यांच्या मनात आपल्या वंशाला जन्म देणाऱ्या ४५०० किलोमीटर वरून आलेल्या त्या राणीबद्दल आजही आदर आहे.
पण या दक्षिण कोरियन राणीचा आणि आपला काय संबंध असा प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे. तर ही राणी दुसरी तिसरी कडून नाही तर प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या आणि जगातील समस्त हिंदू धर्मियांचे पवित्र स्थान असलेल्या अयोध्येच्या राजाची मुलगी होती. जिचं नावं होतं 'सुरीरत्न'. त्याकाळी अयोध्येच्या राजकुमारीचा प्रवास हा भारतातून दक्षिण कोरियाच्या गया (ज्याला आज गिम्हे असं म्हंटल जाते) पर्यंत झाला. त्याकाळी समुद्रातून प्रवास करताना बोट उलटू नये म्हणून सुरीरत्न च्या बोटीत अयोध्येतील काही दगड ठेवण्यात आले होते. ज्याचा वापर बोटीला बॅलन्स करण्यासाठी केला गेला. हेच दगड आज दक्षिण कोरियात आज पुजले जातात. दक्षिण कोरियन लोकांच्या संस्कृतीत आज या दगडांना अनन्यसाधारण महत्व आहे. राजा किम सुरो आणि राणी सुरीरत्न हे दोघेही जवळपास १५० वर्ष जगले असं कोरियन इतिहास सांगतो. दक्षिण कोरियाच्या 'समयुग युसा' या पौराणिक ग्रंथात राणी सुरीरत्ना चा उल्लेख केलेला आहे. यात ही राणी 'आयुता' (म्हणजेच आजचं अयोध्या) इकडून आल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे.
कोरियन संस्कृतीत आपला इतिहास आणि वंशावळ याबद्दल खूप आदर असतो. त्यामुळेच आज २००० वर्षानंतर पण आपल्या वंशावळीचा आलेख एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला जातो. याच कारणामुळे राणी सुरीरत्न ( राणी हिओ वांग ओक) आणि राजा किम सुरो यांच्या वंशातील लोकांनी हा पिढीजात इतिहास जपून ठेवला आहे. भारतातील लोकांना भारताच्या इतिहासाबद्दल नेहमीच अनास्था राहिलेली आहे. भारतात इतिहासापेक्षा ते कोणत्या जातीचे होते हे बघण्यात आणि त्यावर मते मांडण्यात इतिहासतज्ञ धन्यता मानत असतात. पण आपल्या इतिहासाबद्दल जागरूक असणाऱ्या आणि अभियान बाळगणाऱ्या कोरियन लोकांनी आपल्या लाडक्या राणीच मूळ गावं शोधून तिच्या आठवणींना पुढे येणाऱ्या पिढीनंपर्यंत पोहचवण्यासाठी भारत सरकारकडे पाठपुरावा केला. त्याचाच भाग म्हणून दक्षिण कोरियातील गिम्हे शहर आणि भारतातील अयोध्या शहरात एक करार झाला. दक्षिण कोरियन सरकारने आपल्या राणीच एक स्मारक अयोध्येत बांधण्यासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली. त्याचाच भाग म्हणून २००१ साली १०० पेक्षा जास्ती इतिहासकार, सरकार अधिकरी ज्यात चक्क भारतातील उत्तर कोरियाच्या वाणिज्य दूतांचा समावेश होता ते शरयु नदीच्या तटावर बांधल्या जाणाऱ्या राणी सुरीरत्न ( राणी हिओ वांग ओक) हिच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी हजर होते.
दक्षिण कोरियाचे भूतपूर्व राष्ट्रपती किम-डे जुंग तसेच दक्षिण कोरियाचे भूतपूर्व पंतप्रधान किम जोंग पिल यांच्यासह दक्षिण कोरियाच्या भूतपूर्व पहिल्या महिला किम जुंग सोक हे सर्व स्वतःला राणी सुरीरत्न ( राणी हिओ वांग ओक) च्या वंशावळीतील मानतात. त्यामुळेच आपल्या राणीचं स्मारक भारतात भव्यदिव्य होण्यासाठी त्यांनी २०१६ साली उत्तर प्रदेश सरकारला खूप मोठी मदत केली. दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्रपती मून जे इन यांनी सपत्नीक म्हणजेच किम जुंग सोक यांच्या सोबत दिवाळीत अयोध्येला भेट दिली. शरयू नदीच्या काठावर त्यांनी अयोध्येतील दीप सोहळा साजरा तर केलाच पण आपल्या वंशाला जन्म देण्यासाठी राणी सुरीरत्न चे आभार ही मानले.
राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या अयोध्येतील संबंधांबद्दल आजही इतिहासकारांत वेगळी मते असली किंवा काही ठोस पुरावे नसले तरी दक्षिण कोरियातील त्यांचे वंशज मात्र भारतातील अयोध्येला आपल्या राणीचं जन्मस्थान मानतात. जिकडे ४०० वर्ष जुन्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर वेगवेगळे दावे केले जातात तिकडे २००० वर्ष जुन्या इतिहासाबद्दल बोलायला नको. कसही असलं तरी राणीचे वंशज मात्र भारतातील आपल्या उगम स्थानाबद्दल ठाम आहेत. त्यामुळेच आजही हजारो कोरियन लोकं अयोध्येत राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या जन्मस्थानाला आठवणीने भेट देतात. ज्यात प्रत्येकी वर्षी भर पडत आहे. त्याचवेळी भारतीय मात्र अयोध्येतील या इतिहासाबद्दल संपूर्णपणे अनभिज्ञ आहेत. किंबहुना असा इतिहास जतन करायचा असतो हे समजण्याची वैचारिक पातळी त्यांनी गाठलेली नाही असं नमूद करावं वाटते. आजही आमचा इतिहास हा प्रभू श्री रामाची जात ते शिवछत्रपतींची जात कोणती या पर्यंत मर्यादित आहे. कारण जातीपातीच्या राजकारणापलीकडे इतिहास शिकण्याची गरज आणि आवड आमच्यात निर्माण झालेली नाही.
राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) आणि तिने दक्षिण कोरियात नेलेल्या अयोध्येतील दगडांची आठवण म्हणून भारतीय टपाल खात्याने २५ रुपयांच एक टपाल तिकीट काढलेलं आहे. ज्यात भारताने आपल्या राणीचा थोडा तरी योग्य सन्मान केला आहे असं वाटते. भारत ते दक्षिण कोरिया हा एका राणीचा प्रवास जसा दक्षिण कोरियन लोकांसाठी खास आहे तसाच तो भारतीयांसाठी असावा अशी मनोमन इच्छा...
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल (पहिल्या फोटोत राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हीच टपाल तिकीट तर दुसऱ्या फोटोत दक्षिण कोरियन राष्ट्रपती आपल्या पत्नीसमवेत राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या मुर्तीसोबत (अयोध्या इकडे ) तर तिसऱ्या फोटोत राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या स्मारकाचं उद्घाटन करताना दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला किम जुंग सोक)
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment