Monday 5 December 2022

एका लोहस्तंभाची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका लोहस्तंभाची गोष्ट... विनीत वर्तक  ©


दिल्लीत गेली कित्येक शतके उभ्या असलेल्या लोह स्तंभाबद्दल जगात कुतुहूल आहे. लोह स्तंभाची उभारणी आणि एकूणच त्याला गंज लागू न देण्याचं तंत्रज्ञान याबद्दल कित्येक वर्ष संशोधन केलं गेलं आहे. या स्तंभाची निर्मिती आर्किओलॉजिस्ट च्या मते साधारण १६०० वर्षापूर्वी चंद्रगुप्त २ च्या काळात झालेली आहे असं निदान त्यावर असलेल्या शिलालेखावरून अंदाज बांधता येतो. १० व्या शतकात आज जिकडे तो उभा आहे तिकडे तो आणला गेला असं इतिहास सांगतो. या लोह स्तंभाच्या उभारणीत नक्की काय तंत्रज्ञान वापरलं गेलं असेल? यावर अनेकांनी आजवर आपली मत मांडलेली होती. 


२०२२ साली वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात या लोहस्तंभाविषयी अनेक गोष्टी समोर आल्या. लोखंडाने बनवलेली कोणतीही गोष्ट वातावरणात असलेल्या आद्रते सोबत संयोग करून आयर्न ऑक्साईड तयार करते, ज्याला गंज म्हणतात. वस्तू गंजल्यामुळे लोखंड खराब होऊन ती वस्तू नष्ट होते. वास्तविक तब्बल १६०० वर्ष उन, वारा, पाऊस आणि वातावरणातील आद्रता झेलत असलेल्या लोहस्तंभाच लोखंड कधीच गंजून नष्ट होणं अपेक्षित असताना आजही तो गंजला जात नाही यामागे भारतीय संस्कृती आणि भारतीयांच धातू विज्ञानाच ज्ञान कारणीभूत असल्याचं सप्रमाण स्पष्ट झालं आहे. 


लोहस्तंभ आद्रते किंवा पाण्यासोबत वेगळ्या पद्धतीने रियाक्ट करतो. पाणी किंवा आद्रतेच्या संपर्कात आल्यावर लोह स्तंभातील लोखंड गंजण्या ऐवजी 'मिसाव्हाईट' नावाचं एक वेगळं संयुग तयार करते. जे आजवर कधी कुठे बघण्यात आलेलं नाही. हे मिसाव्हाईट संयुग लोखंडावर उलट एक अवरोधक लेयर तयार करते की ज्यातून हवेतील आद्रता आतल्या लोखंडाशी संयोग करूच शकत नाही. हे संयुग इथवर थांबत नाही तर लोखंडाच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी मधे वाढ करते. जितकी जास्त आद्रता आणि पाणी याच्या संपर्कात येईल तितक्या जास्त प्रमाणात मिसाव्हाईट संयुग तयार होते. तितका जाडा थर लोहस्तंभाच्या संपूर्ण बाह्य पृष्ठभागावर जमा होतो. याचा सरळ अर्थ लोह स्तंभाच्या आतल्या लोखंडापर्यंत आद्रता शिरूच शकत नाही. त्यामुळे जितक्या जास्त आद्रतेत आणि प्रदूषणात हा लोहस्तंभ असेल तितकी जास्ती लेयर त्याच संरक्षण करणार. 


लोहस्तंभात वापरण्यात आलेल्या धातूचे रासायनिक विघटन केलं तर त्यात ९८% लोखंड १% फॉस्फोरस आणि १% इतर स्पेशल मिश्रण आढळलं आहे. या १% मिश्रणाला 'वज्र संघठ' असं नाव दिलेलं आहे. हे कसं बनते याची माहिती उपल्बध आहे. ज्यात शिशाचे ८ भाग, बेल मेटलचे २ भाग आणि पितळेच्या कालक्सचे २ भाग मिसळून तयार केले जाते. लोहस्तंभात असलेला फॉस्फोरस, वज्र संघठ हवेतील आद्रते सोबत संयोग करून लोखंड, ऑक्सिजन आणि हायड्रोजन च एक संयुग तयार करतात. ज्याच रासायनिक सूत्र  (y-FeOOH) असं येतं. यालाच 'मिसाव्हाईट संयुग' म्हणतात. खरी मज्जा पुढे आहे. आजच्या काळात लोखंड तयार करताना त्यात फॉस्फोरस आधी काढून टाकला जातो. कारण फॉस्फोरस जर लोखंडात असेल तर ते एकजीव होऊ शकत नाही. चांगल्या पद्धतीचं लोखंड तयार होण्यासाठी त्यात फॉस्फोरस नसावा. फॉस्फोरस लोखंडात असेल तर लोखंड तयार होऊ शकत नाही असं आजच तंत्रज्ञान सांगते. पण १६०० वर्षापूर्वी भारतीयांनी तर फॉस्फोरस वापरून लोहस्तंभाची रचना केली. नुसती रचना केली नाही तर काळाच्या कसोटीवर ते लोखंड न गंजता टिकून राहू शकते हे सप्रमाण सिद्ध केलं. 


याचा अर्थ असा होतो की भारतीयांना १६०० वर्षापूर्वी फॉस्फोरस काय करू शकतो याचा अंदाज होता. या शिवाय फॉस्फोरस असल्याने काय नुकसान होतं याचीही कल्पना होती. कारण ती होती म्हणून फॉस्फोरस लोखंडात ठेवून ते लोखंडाला एकजीव करण्याचं तंत्रज्ञान शोधू शकले. आत्ताची रासायनिक सूत्र  (y-FeOOH) किंवा मिसाव्हाईट संयुगांचा फॉर्म्युला त्यांच्याकडे १६०० वर्षापूर्वी असणं शक्यच नाही हेच आपल्या मनावर ठासवलं गेलं आहे. कारण सगळे शोध पाश्चिमात्य देशांनी लावले. भारतात दगड धोंडे होते असच आम्हाला आमच्या संस्कृती विषयी सांगितलं गेलं आहे. पण एकदा विचार करा की आजच तंत्रज्ञान जिकडे फॉस्फोरस लोखंडात ठेवायला घाबरते तिकडे भारतीय लोकांनी फॉस्फोरस ठेवून एकाअश्या स्तंभाची रचना केली जी आजतागायत म्हणजे २००२ साल उजडे पर्यंत जगाला कळलीच नव्हती. 


भारतीय कारागिरांनी फॉस्फोरस बाहेर काढला नाही पण लोखंड एकजीव करण्यासाठी त्याला चारी बाजूने गरम करून त्यावर घाव घातले. यामुळे लोखंडाचे आतल्या भागात एक प्रकारे वेल्डिंग झालं आणि राहिलेला फॉस्फोरस पृष्ठभागावर ढकलला गेला. त्यामुळे आत एकजीव लोखंड तर बाहेर फॉस्फोरस ची एक लेयर तयार झाली. याच तंत्रज्ञानामुळे फॉस्फोरस हवेतील आद्रतेशी संयोग पावून लोखंडावर एक अभेद्य असं कवच तयार करत राहिला. ज्यामुळे आज १६०० पेक्षा जास्त वर्ष उलटून पण लोहस्तंभाला गंज चढलेला नाही. तो येत्या कित्येक शतकात चढणार पण नाही असं आजचं विज्ञान, तंत्रज्ञान सांगते कारण दिल्लीतली हवा कितीही प्रदूषित झाली तरी लोहस्तंभातील मिसाव्हाईट लेअर ला छेद करणं शक्य नाही. 


आज दिल्लीतला कुतुबमिनार आम्हाला सांगितला आणि शिकवला जातो. पण तिथल्या लोह स्तंभात वापरलेल्या तंत्रज्ञानावर मात्र कोणीच काही बोलत नाही. भारताचं धातू ज्ञान न पचणारे तर हा एक अपघात होता असं बोलून मोकळं होतात कारण असं तंत्रज्ञान दुसरीकडे का वापरलं गेलं नाही? या प्रश्नाचा आडोसा घेतात. पण विचार करा की विष्णू मंदिराच्या समोर उभा राहणारा हा स्तंभ उभारताना १६०० वर्षापूर्वी काय तंत्रज्ञान वापरलं गेलं असेल? कसं काय त्यांनी फॉस्फोरस चा शोध लावला? फॉस्फोरस ची टक्केवारी एकदम अचूक त्यात ठेवली? कश्या पद्धतीने लोखंडाला एकजीव केलं? कश्या पद्धतीने इतर १% वज्र संघठ तयार केलं? त्यांना नक्की माहित होतं आपण काय कलाकृती उभारत आहोत. ती किती वर्ष टिकेल. त्यात वापरलं गेलेलं तंत्रज्ञान हे एकमेव असेल यासाठी त्यांनी ते लुप्त केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एकूणच आज दिल्लीत मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या लोहस्तंभाला जेव्हा कधी भेट द्याल तेव्हा त्या १६०० वर्षापूर्वीच्या कारागिरांना एक सॅल्यूट ठोकायला विसरू नका. कारण त्यांच्या नंतर अशी कलाकृती उभी करणं न कोणाला जमलं नाही न आज कोणी करू शकते. 


जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :- गुगल


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment