Wednesday 28 December 2022

एका योगसाधकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका योगसाधकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

१९९७ च वर्ष होतं जेव्हा सौदी अरेबिया मधे एक मुलगी आपल्या आयुष्याशी झगडत होती. वयाच्या १७ व्या वर्षी सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस (एसएलई) या रोगाचं निदान तिला झाल्याचं डॉक्टरांनी निश्चित केलं. एसएलई हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून शरीराच्या अनेक भागांमध्ये निरोगी पेशींवर हल्ला करतात. फुटबॉल च्या जगतात जसा सेल्फ गोल प्रकार असतो तसाच शरीराच्या आत शरीर सेल्फ गोल करायला लागते.यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तिच्या आहारावर नियंत्रण आलं होतं. पचनाच्या समस्या आणि आहारावर असलेल्या नियंत्रणामुळे तीच वजन अतिशय कमी झालं होतं, थकवा आला होता. कुपोषणाने ग्रस्त झाली होती. सांधेदुखी, अशक्तपणा, तीव्र थकवा, त्वचेवर पुरळ, ऍलर्जी, लक्ष कमी होणे, झोपेच्या समस्या आणि कडकपणा अश्या सगळ्या गोष्टी तिच्या रोजच्या आयुष्यात आ वासून समोर उभ्या होत्या. डॉक्टर हतबल होते. औषधे देत होते पण शरीर सेल्फ डिस्ट्रक्शन मोड मधे असल्याने त्याचा हवा तास परीणाम जाणवत नव्हता. अश्या कठीण परिस्थितीत तिला एकच उपाय समोर दिसत होता. तो म्हणजे 'योग'. 

योग शब्दाची मूळ उत्पत्ती संस्कृत मधल्या 'युज' शब्दापासून झालेली आहे. ज्याचा सोप्या शब्दात अर्थ होतो 'एकत्र करणे". मन आणि शरीर या दोघांमधे संवाद निर्माण करणे. कदाचित त्या मुलीला याचीच गरज जाणवत होती. कारण तिच्या मनाचा आणि शरीराचा ताळमेळ फसलेला होता. तिचे वडील अरेबियन लोकांच्या ट्युनिशिया आणि इजिप्त मधे असलेल्या मार्शल आर्ट फेडरेशनचे संस्थापक होते. त्यांच्याकडून तिला पहिल्यांदा योगा बद्दल माहिती सांगणार एक पुस्तक हाताशी लागलं. योगाविषयी आणि एकूणच हजारो वर्षाची परंपरा असलेल्या या शक्ती बद्दल वाचून ती कुठेतरी त्याच्याकडे ओढली जात होती. आपल्या निराशेच्या गर्तेत गेलेल्या आयुष्यात कुठेतरी तिला आशेचा किरण दिसायला लागला. योगा बद्दल अजून जाणून घेण्यासाठी तिने अनेक डी.व्ही.डी. आणि व्हिडीओ टेप्स बघितल्या. इकडूनच सुरु झाला एका योगसाधकाचा प्रवास. 

१९९७ पर्यंत आपल्या आजारपणामुळे अशक्त असलेली आणि सतत चक्कर येऊन बेशुद्ध पडणारी ती मुलगी १९९९ उजाडेपर्यंत शाळेत आणि कॉलेज मधे व्यवस्थित जायला लागली होती. योगाची उपासना केल्यानंतर तिच्या शरीरात होणारे बदल डॉक्टरांनी ही बुचकळ्यात टाकणारे होते. ती मानसशास्त्र हा विषय कॉलेज मधे घेतला कारण तिला योगामुळे मानवी मनावर होणारा परिणामांचा अभ्यास करायचा होता. एका मुस्लिम आणि अरब देशात हिंदू संस्कृतीच्या रचनेचा अभेद्य भाग असलेल्या योगाचा अभ्यास करणारी ती पहिली अरब महिला होती. त्या मुलीचं नाव होतं 'नौफ मारवाई'. 

डॉक्टर हतबल असलेल्या आणि औषधाला दाद न देणाऱ्या तिच्या शरीराशी तिने योगाच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यातून तिने आपल्याला असणाऱ्या आजारावर मात केली होती. योगामुळे शरीरात होणारे बदल नौफ अनुभवत होती. त्यातूनच तिने असा एक निर्णय घेतला जो तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तिच्या शब्दात, 

"मानसिक आणि शारीरिक आरोग्य यातील समन्वय, योगामधले व्यायाम आणि विश्रांती करताना त्या सौम्य व्यायामाचा प्रभाव आणि योगासनांच्या माध्यमातून श्वासोच्छवासावर नियंत्रण यामुळे आरोग्याच्या विकासावर, विशेषत: प्रतिकारशक्ती आणि सायकोसोमॅटिक रोगांवर तणावाचा प्रभाव मला उमजला. त्यानंतर मी योगाच केवळ वाचन, सराव नाहीतर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

पण संघर्ष संपलेला नव्हता. २००१ साली पुन्हा तिच्या आजाराने डोकं वर काढलं. आयुष्य संपते की काय असे वाटत असताना योगसाधनेने तिने पुन्हा या संकटावर मात केली. ती योगाच्या प्रेमात पडली. पण सौदी अरेबिया सारख्या मुस्लिम राष्ट्रात योग शिकवणारं कोणीच नव्हतं. मग तिने ठरवलं की योग जिकडे जन्माला आला त्या भारतात जायचं आणि त्याचा अभ्यास करायचा. २००३ साली तिने तडक केरळ गाठलं आणि योगाचा अभ्यास करायला सुरवात केली. तब्बल ७ वर्ष योगाचा अभ्यास केल्यावर तिला योग शिकवण्याची परवानगी मिळाली. एक योगसाधक म्हणून तिला जे योगसाधनेच महत्व कळलेलं होतं. ते आपल्या देशात म्हणजेच सौदी अरेबिया इकडे नेण्यासाठी तिने पावलं टाकली. 

सौदी अरेबिया सारख्या मुस्लिम देशात जिकडे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक बंधन आहेत तिकडे योगा शिकवण एक क्रांतिकारी पाऊल होतं. योगा शिकवण्याची संस्था उघडण्यासाठी काय करावं लागते याबद्दल सौदी अरेबिया च्या कायद्यात काहीच लिहलेलं नव्हतं. योगाचे महत्व पोचवायचं होतं  ते अगदी सौदी अरेबिया च्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत. तिने हार मानली नाही. राजघराण्यातील राजकुमारी रीमा बिन बंदर, सामुदायिक क्रीडा महासंघाच्या अध्यक्षा यांनी तिची इच्छा सौदी चे राजा किंग सलमान आणि राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या पर्यंत पोहचवली. या सर्वांच्या होकारानांतर योगाचा समावेश क्रीडा धोरणात करण्यात आला. नौफ मारवाई चा योग शिकवणारी संस्था सौदी अरेबियात उघडण्याचा रस्ता मोकळा झाला. 

योग म्हणजे नक्की काय? योगा नियमित केल्याने काय हाताशी लागते? हा विचार तिने संपूर्ण सौदी अरेबिया मधे नेला. योग शिक्षक, त्याचे फायदे आणि त्याच्यामुळे व्यक्तिमत्वात घडणारे बदल तिने सौदी अरेबिया च्या लोकांना दाखवून दिले.  २०१५ ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करायचा प्रस्ताव युनायटेड नेशन च्या १९३ पैकी १७५ देशांनी एकमुखाने मंजूर केला. त्याच वर्षी नौफ मारवाई ने सौदी अरेबियात 'अरब योगा फाउंडेशन ग्रुप' ची स्थापन केली. नौफ मारवाई च्या मते, 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोक आणि समाजाच्या कल्याणासाठी योग आणि निरोगीपणाचे सर्वात मोठे प्रवर्तक आहेत. या उपक्रमासाठी मी आणि संपूर्ण योग समुदाय त्यांचे खूप आभारी आहोत, कारण त्या दिवशी संपूर्ण जगाने योग दिवस साजरा करण्यावर शिक्कामोर्तब केलं.

गेली दोन दशके सौदी अरेबिया सारख्या मुस्लिम राष्ट्रात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या योगा चा अभ्यास आणि प्रसार करण्यासाठी भारत सरकारने नौफ मारवाई यांना २०१८ साली पद्मश्री सन्मानाने सन्मानित केलं. भारतीय नसताना हा सन्मान मिळवणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी त्या एक आहेत. त्याशिवाय आशियायी योगा फाऊंडेशन तर्फे योग रत्न सन्मान ही प्राप्त झाला आहे. 

एका अरेबिक मुस्लिम राष्ट्रातून असताना पण योग साधनेची कास धरून त्याचा अभ्यास आणि प्रसार करणाऱ्या नौफ मारवाई यांना माझा कडक सॅल्यूट. त्यांनी केलेला योगसाधकाचा हा प्रवास जगातील अनेक लोकांना योगाची कास धरण्यात मदत करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांच्या पुढल्या प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

१) पहिल्या फोटोत भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मश्री सन्मान स्वीकारताना नौफ मारवाई

२) योग रत्न हा पुरस्कार भारताच्या संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून स्वीकारताना नौफ मारवाई 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





No comments:

Post a Comment