Friday, 2 December 2022

निष्काम कर्मयोग्याची गोष्ट... विनीत वर्तक ©

 निष्काम कर्मयोग्याची गोष्ट... विनीत वर्तक  ©

अनेकदा आपण असं अनुभवतो की मुंगीएवढी मदत करून ती डोंगराएवढी असल्याचा आव अनेकजण आणत असतात. अनेकजण आपल्या मदतीची जाहिरात करतात. खरे तर डाव्या हाताची मदत उजव्या हाताला कळू द्यायची नसते, पण असं राहणं अनेकांना जमत नाही. पण यालाही अपवाद असतात. काहीजण मात्र मदत करताना काही पथ्यं पाळतात आणि या सर्वांपलीकडे निष्काम कर्मयोगाने काम करणारी माणसं असतात, ज्यांचं संपूर्ण आयुष्य अश्या एखाद्या ध्येयासाठी वेचलं जातं किंवा त्यांनी केलेलं कार्य इतकं महान असतं पण त्याची वाच्यता ते उभ्या आयुष्यात कुठेच करत नाहीत. कारण आपण जे केलं ते कर्तव्य म्हणून अशीच त्यांची भावना असते. ही गोष्ट आहे अश्याच एका निष्काम कर्मयोग करणाऱ्या व्यक्तीची ज्याचं कार्य माणुसकीला एका वेगळ्या उंचीवर नेणारं होतं. त्यांचं नाव आहे 'सर निकोलस विंटन'.

सर निकोलस विंटन यांनी एक दोन नाही तर तब्बल ६६९ मुलांचा जीव आपल्या निष्काम कर्मयोगाने वाचवला. त्यांना एक उज्ज्वल भविष्य देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण इतकं मोठं कार्य करून त्यांनी हे सगळं जगापासून तब्बल पाच दशकं लपवून ठेवलं. कदाचित ते कधीच बाहेर आलं नसतं जर त्यांच्या बायकोने घराच्या एका अडगळीत ठेवलेल्या कागदपत्रांची कुतूहलाने चौकशी केली नसती. घराच्या माळ्यावर एका अडगळीत असलेल्या गठ्ठयात असलेल्या अनेक कागदपत्रे, फोटो आणि नावं बघून १९८८ मध्ये त्यांच्या बायकोने या सर्व गोष्टींची चौकशी त्यांच्याकडे केली. ती कागदपत्रे अशीच आहेत असं सांगून त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या बायकोने त्याचा पाठपुरावा केल्यावर त्यांनी घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली. त्यांच्या या निष्काम कर्मयोगाला जगापुढे आणावं असं त्यांच्या बायकोला वाटलं. तिने बी.बी.सी. च्या एका पत्रकाराला घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर जगाच्या समोर सर निकोलस विंटन यांचं एव्हरेस्ट इतकं मोठं कार्य समोर आलं.

१९८८ साली बी.बी.सी. ने 'That's Life!' नावाच्या कार्यक्रमात सर निकोलस विंटन यांना आमंत्रित केलं.  या कार्यक्रमात त्यांनी वाचवलेल्या आणि एक नवं आयुष्य दिलेल्या ६६९ पैकी हयात असलेली अनेक मुलं त्या कार्यक्रमाला हजर होती, त्याची कोणतीच कल्पना सर निकोलस विंटन यांना दिलेली नव्हती. कार्यक्रमाच्या दरम्यान जेव्हा सर्वांनी एकत्र उभं राहून अभिवादन केलं, तेव्हा एक महान निष्काम कर्मयोगी जगाने पाहिला. ते वर्षं होतं १९३८ चं जेव्हा सर निकोलस विंटन स्विस पर्वत रांगांत स्केटिंग करण्यासाठी जाणार होते. आपल्या मित्रांच्या आलेल्या फोन कॉलनंतर त्यांनी पॅराग्वे इकडे मार्टिन ब्लेक सोबत निर्वासित होणाऱ्या लोकांच्या समस्येसाठी स्वतःला वाहून घेतलं. तो काळ होता जेव्हा हिटलरने नाझी कॅम्पमध्ये ज्यू लोकांवर अमानुष असे अत्याचार सुरू केले होते. नाझी कॅम्प आणि तिथे होणाऱ्या छळांपासून ज्यू लोक जीव मुठीत धरून पळत होते. १९३८ च्या काळात हिटलरने आपला मोर्चा चेकोस्लोव्हाकियाकडे वळवला होता. तिकडे असलेल्या ज्यू लोकांच्या लहान मुलांचं नाझी लोकांपासून संरक्षण करण्याचं काम माणुसकीच्या दृष्टिकोनातून सर निकोलस विंटन यांनी हाती घेतलं.

क्रिस्टलनाच्ट (क्रिस्टलनाच्ट किंवा नाईट ऑफ ब्रोकन ग्लास, ज्याला नोव्हेंबर पोग्रोम देखील म्हणतात, नाझी पक्षाच्या स्टर्माबटेइलुंग निमलष्करी दल आणि शुत्झस्टाफेल निमलष्करी दलांनी ज्यूंच्या विरोधात केलेला पोग्रोम होता.) नंतर ब्रिटनमध्ये १७ वर्षांखालील मुलांना निर्वासित म्हणून घेण्यास काही अटींसह परवानगी दिली. यात अट अशी होती की त्यांना राहायला घर असावं आणि ५० पौंड (३६५० पौंड आजच्या तुलनेने) इतकी रक्कम त्यांनी जमा करावी ज्याचा वापर त्यांना पुन्हा त्यांच्या देशात नंतर नेऊन सोडण्यासाठी केला जाईल.  पण सगळ्यांत मोठी समस्या होती ती नेदरलँड्सची. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतरसुद्धा नेदरलँड्सने आपल्या हद्दीत निर्वासित मुलांना येण्यास मज्जाव केला होता. पण सर निकोलस विंटन यांनी आपलं व्यक्तिगत वजन वापरून आणि ब्रिटनमधील अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करून निर्वासित मुलांना एका नव्या आयुष्याची संधी देण्यासाठी नेदरलँड्सकडून निर्वासितांना प्रवेशाची परवानगी मिळवली.

पण हा प्रवास सोप्पा नव्हता. वेळप्रसंगी लाच देऊन, खोटी कागदपत्रे तयार करून, तर कधी पैसे उसने घेऊन सर निकोलस विंटन यांनी एक-दोन नव्हे तर ६६९ निर्वासित मुलांना ब्रिटनमध्ये घर दिलं. त्यांच्या पुढल्या आयुष्याची सोय केली. त्यांना दत्तक घेण्यासाठी आवाहन केलं. १ सप्टेंबर १९३९ रोजी २५० मुलांची शेवटची बॅच पॅराग्वे इकडून निघण्याआधी हिटलरने आक्रमण केलं आणि त्या २५० मुलांपैकी फक्त २ मुलं त्यात वाचली होती. पण त्याआधी त्यांनी अनेक मुलांना नवीन आयुष्य दिलं होतं. आपल्या आईच्या साह्याने त्यांनी त्याकाळी या मुलांचे फोटो, नावं, कागदपत्रे आणि सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवल्या होत्या. त्यानंतर जे घडलं तो इतिहास सर्व जगाला माहित आहे.

सर निकोलस विंटन यांचं कार्य त्यांनी कधीच जगासमोर आणलं नाही. इतिहासाच्या पानांत ती ६६९ मुलं लुप्त झाली. ना त्यांनी कधी हा विषय पुढे आणला, न त्या मुलांना त्याची आठवण राहिली. त्यांच्या मनावर कोरला गेला तो हिटलर आणि नाझी कॅम्पमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा झालेला छळ. तब्बल ५० वर्षं सर निकोलस विंटन यांनी ही सगळी कागदपत्रे आपल्या घराच्या एका कोपऱ्यात जपून ठेवली होती. जेव्हा त्यांच्या बायकोला ५० वर्षांनी त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काय केलं हे कळलं तेव्हा त्यांनी त्यांचा निष्काम कर्मयोग जगापुढे आणला. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना चेकोस्लोव्हाकिया सरकारने त्यांचा सर्वोच्च सन्मान Order of the White Lion 1st Class (Czech Republic) हा २०१४ साली दिला. तर ब्रिटनच्या राणीने त्यांचा २००३ साली सन्मान केला.

सर निकोलस विंटन यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण वाचवलेल्या त्या ६६९ मुलांचा कधीच उल्लेख केला नाही. त्यातील कित्येकजण आज एक समृद्ध आयुष्य जगले. २०१५ साली या निष्काम कर्मयोग्याने वयाच्या १०६ वर्षी समाधानाने या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी ठेवलेलं निष्काम कर्मयोगाचं उदाहरण आजही जगातील अनेकांना प्रेरणा देणारं आहे. आज जेव्हा मुंगी एवढी मदत करून लोक समाजकार्य केल्याचा आव आणतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की समाजकार्य आणि निष्काम कर्मयोग नक्की काय असतो हे समजून घ्यायचं असेल तर सर निकोलस विंटन यांचं आयुष्य बघा. 

तळटीप :- सर निकोलस विंटन यांच्या त्या बी.बी.सी. कार्यक्रमाची लिंक इकडे शेअर करतो आहे. ज्यावेळेस त्यांनी वाचवलेल्या त्या मुलानांच्या गराड्यात ते बसले आहेत याची जाणीव त्यांना होते तो क्षण अक्षरशः अंगावर काटा आणि डोळ्यांच्या कडा ओल्या करतो. निष्काम कर्मयोग हाच असतो आणि निष्काम कर्मयोगी हाच असतो. सर निकोलस विंटन यांची ही क्लिप नक्की बघा. 

https://youtu.be/PKkgO06bAZk

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment