Saturday 17 December 2022

हायपरसॉनिक आणि भारत... विनीत वर्तक ©

 हायपरसॉनिक आणि भारत... विनीत वर्तक ©

भारताने नुकतीच अग्नी ५ या आंतरखंडीय ICBM (Intercontinental Ballistic Missile) बॅलेस्टिक मिसाईल ची चाचणी घेतली. या चाचणीत अग्नी ५ ने रात्रीच्या अंधारात ठरलेल्या मार्गाने ५४०० किलोमीटर पेक्षा जास्ती चा पल्ला पार करून लक्ष्यभेद केला. भारताने ही चाचणी यशस्वी झाल्याचं जागतिक पातळीवर स्पष्ट केलं आहे. या चाचणी नंतर पुन्हा एकदा भारताच्या मिसाईल आणि हायपरसॉनिक क्षमतांबद्दल चर्चा सुरु झालेली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्नांचा घेतलेला आढावा. 

हायपरसॉनिक मिसाईल म्हणजे काय? 

ध्वनीचा वेग आहे १२२५ किलोमीटर / तास ( समुद्रसपाटीवर) या वेगापेक्षा जेव्हा एखादी गोष्ट जास्त वेगात ट्रॅव्हल करते तेव्हा तिच्या वेगाला 'मॅक' या परिमाणात व्यक्त करतात. मॅक १ म्हणजे ध्वनीचा वेग त्याप्रमाणे मॅक २ म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट वेग. तर जेव्हा एखादी वस्तू मॅक १ ते मॅक ५ पर्यंत प्रवास करते तेव्हा   ती वस्तू सुपरसॉनिक आहे असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर भारताचं ब्राह्मोस मिसाईल. ब्राह्मोस मिसाईल साधारण ३७०० किलोमीटर / तास अश्या सुपरसॉनिक वेगाने प्रवास करते. त्याचा हाच वेग त्याला जगातील सगळ्यात वेगवान क्रूझ मिसाईल बनवतो. 

फोर्स (शक्ती) = व्हेलॉसिटी (वेग) X मास ( वस्तुमान)  

हे साधं सूत्र आपण लक्षात घेतलं तर कळेल की ब्राह्मोस मिसाईल का घातक आहे. या सूत्रावरून स्पष्ट होते की जेवढा वेग जास्ती तेवढी मिसाईल ची शक्ती जास्ती. त्यामुळे ब्राह्मोस च वस्तुमान कमी असलं किंवा त्यावर असणारं वॉरहेड कमी असलं तरी ब्राह्मोस ची शक्ती त्याच्या वेगामुळे प्रचंड आहे. त्यामुळेच एक ब्राह्मोस मिसाईल एखाद्या मोठ्या जहाजाचे एका झटक्यात दोन तुकडे करू शकते. 

वेग जेवढा जास्ती तेवढा प्रतिकारासाठी वेळ कमी मिळतो. याचा अर्थ जर आपण एखाद्या मिसाईल चा वेग वाढवत नेला तर त्याची शक्ती आपोआप वाढत जातेच पण त्याला थोपवण्याचा किंवा प्रतिकार करण्याची संधी जवळपास नष्ट होते. त्यामुळेच मॅक ५ या वेगाच्या पुढे प्रवास करणाऱ्या मिसाईल ना हायपरसॉनिक मिसाईल असं म्हंटल जाते. जगातील सगळी आंतरखंडीय ICBM (Intercontinental Ballistic Missile) बॅलेस्टिक मिसाईल ही हायपरसॉनिक आहेत. भारताचं अग्नी ५ हे आपल्या टर्मिनल फेज मधे मॅक २४ म्हणजे २९,६०० किलोमीटर / तास वेगाने लक्ष्याकडे झेपावते. 

पण मग याचा अर्थ भारताकडे हायपरसॉनिक मिसाईल तंत्रज्ञान आहे?

याच उत्तर हो आणि नाही असं आहे. कारण भारताकडे  ICBM आहे , पण त्याचवेळी इतर पद्धतीची मिसाईल नाहीत. आंतरखंडीय ICBM मिसाईल शिवाय तीन वेगळ्या पद्धतीने आपण हायपरसॉनिक वेग गाठू शकतो. 

त्यातील पहिली पद्धत म्हणजे १) एरो बॅलेस्टिक म्हणजे यात ही सिस्टीम म्हणजे मिसाईल विमानातून डागली जाते. डागल्यानंतर रॉकेट च्या साह्याने हायपरसॉनिक वेग गाठला जातो. रशिया - युक्रेन युद्धात रशियाने ज्या किंझ्हल हायपरसॉनिक मिसाईल चा वापर केला ती याच तत्वावर काम करतात.    

२) ग्लाइड व्हेईकल म्हणजे यात या सिस्टीम ला रॉकेट च्या साह्याने वरच्या वातावरणात नेण्यात येते आणि मग तिथल्या वातावरणात ग्लाइड करत आणि आपला रस्ता बदलवत हायपरसॉनिक वेगाने लक्ष्यावर हल्ला करते. चीन च डोन्गफेंग १७ आणि रशियाचे एव्हनगार्ड मिसाईल याच तत्वावर काम करते. गेल्याच आठवड्यात भारताच्या इसरो ने Integrated Defence Staff (HQ IDS) च्या साह्याने हायपरसॉनिक ग्लाइड वेहिकल ची टेस्ट रन केली आहे. भारत यावर अतिशय वेगाने काम करत असून येणाऱ्या काळात भारताकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं असेल किंवा अश्या पद्धतीचं हायपरसॉनिक मिसाईल असेल.  

३) क्रूझ मिसाईल या बाबतीत भारत इतर देशांपेक्षा पुढे असल्याचं अनेक रक्षा संघटनांचा अहवाल आहे. ब्राह्मोस या सुपरसॉनिक मिसाईल च पुढलं व्हर्जन ज्याला ब्राह्मोस २ किंवा ब्राह्मोस के असं ओळखलं जाते. ते जवळपास भारताने बनवलं असल्याचं स्पष्ट होते आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार भारत २०२५ पर्यंत हायपरसॉनिक क्रूझ मिसाईल जे जवळपास १०,००० किलोमीटर / तास किंवा मॅक ८ वेगाने जाणारं असेल ते भारताच्या भात्यात समाविष्ट झालेलं असेल असा अंदाज आहे. इतका प्रचंड वेग गाठण्यासाठी मिसाईल ला पहिल्या टप्यात बूस्टर च्या साह्याने हायपरसॉनिक वेग दिला जातो. त्यानंतर मिसाईल scramjet तंत्रज्ञानाचा वापर करत आपला वेग शेवटपर्यंत ठेवते. यासाठी लागणारं तंत्रज्ञान भारताने रशियाच्या साह्याने मिळवलं असल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालात स्पष्टपणे म्हंटलेलं आहे. 

हायपरसॉनिक क्रूझ मिसाईल जगातील युद्ध निती बदलावणारं असेल असं अनेक तज्ञांचे मत आहे. याला कारण म्हणजे भारताच्या ब्राह्मोस सुपरसॉनिक मिसाईल ची अचूकता आणि दाहकता. जर ब्राह्मोस सुपरसॉनिक वेगात इतका प्रचंड विध्वंस करू शकते तर त्याच्या ३ पट वेगाने विध्वंसाची तीव्रता काय असेल याचा अंदाज बांधून अनेकांना कापरं भरलं आहे. 

२०२५ पर्यंत भारत ३ पैकी २ पद्धतीत तरी हायपरसॉनिक मिसाईल असणारा देश असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जगातील मोजक्या देशांकडे सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहेत. ज्याचा मागोवा घेणं आजही जगातील मिसाईल डिफेन्स प्रणालीना जमलेलं नाही. त्यामुळे अवघ्या २-३ वर्षात भारताकडे येणाऱ्या ब्राह्मोस २ हायपरसॉनिक मिसाईल ला निष्प्रभ करणं अशक्य कोटीतील गोष्ट असणार आहे. 

तूर्तास भारताच्या हायपरसॉनिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा... 

जय हिंद!!! 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



No comments:

Post a Comment