Friday 23 December 2022

विश्वाची जाणीव (भाग ३)... विनीत वर्तक ©

 विश्वाची जाणीव (भाग ३)... विनीत वर्तक © 

मागच्या भागात आपण बघितलं की कश्या पद्धतीने आईनस्टाईन ने क्वांटम मेकॅनिक्स च्या नियमांना धुडकावून लावलं. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मांडलेल्या ERP थिअरी ला विरोध करण्याचं सामर्थ्य तत्कालीन वैज्ञानिकांमध्ये नव्हतं. खरे तर तांत्रिक बाबतीत आपण तितकी प्रगती केली नसल्याने नक्की खरं कोण या वादाची उकल करणं अशक्य होतं. १८ एप्रिल १९५५ रोजी आईनस्टाईन चा मृत्यू झाला. पण त्या कालावधीपर्यंत क्वांटम मेकॅनिक्स विश्वातल्या अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी योग्य असल्याचं अनेक वैज्ञानिक संशोधनातून पुढे येत होतं. ज्या प्रश्नांची उकल क्लासिकल फिजिक्स मधून होत नव्हती त्याची उत्तर क्वांटम मेकॅनिक्स देत होतं. पण अजूनही बरोबर कोण हा वाद शमलेला नव्हता. क्वांटम मेकॅनिक्स मधील Quantum Entanglement ही संकल्पना वैज्ञानिकांच्या गळी उतरत नव्हती. वैज्ञानिक अजूनही दोन गटात विभागले गेले होते. 

१९६४ साली आयरिश फिजिसिस्ट जॉन बेल यांनी आईनस्टाईन आणि क्वांटम मेकॅनिक्स या वादावर उपाय शोधला. त्यांनी बेल थिअरम नावाचं एक प्रमेय सर्वांसमोर मांडलं. आता हे प्रमेय सोप्या शब्दात आपण समजून घेऊ. बेल ने गणिताच्या भाषेत असं मांडलं की समजा प्रकाशाच्या पार्टीकल मधे काही हिडन व्हेरिएबल्स असतील जसे की आईनस्टाईन ने आपल्या प्रमेयात व्यक्त केले होते तसेच किंवा जर पार्टीकल एक विशिष्ठ मोशन ने पुढे जात असतील तर ते आपली अवस्था बदलणार नाहीत. ते ज्या अवस्थेत आहेत त्याच अवस्थेत राहतील. पण बेल हे प्रयोगातून सिद्ध करायला कमी पडला. 

इकडेच येतात यावर्षी नोबेल पुरस्कार मिळालेले तीन शास्त्रज्ञ. या तीन शास्त्रज्ञांनी प्रयोगातून दाखवून दिलं की क्वांटम मेकॅनिक्स हे बरोबर आहे. आईनस्टाईन चुकीचा आहे. यासाठी आपले पहिले नोबेल पारितोषिक विजेते जॉन क्लाऊसर यांनी एक प्रयोग केला ज्यात त्यांनी तीन लेन्स वापरल्या. एकात जेलच्या दरवाज्याला उभ्या सळया असतात तश्या उभ्या लाईन्स होत्या तर दुसऱ्या लेन्स मधे आडव्या लाईन्स होत्या. या दोघांच्या मधे त्यांनी ४५ अंशात तिसऱ्या लाईन्स ची लेन्स बसवली. जर आईनस्टाईन बरोबर असेल तर पार्टीकल तिसऱ्या लेन्स च्या बाहेर पडणं शक्य नव्हतं. कारण जर निसर्ग अथवा प्रकृती त्यांची दिशा निश्चित करत असेल तर त्यांनी ती बदलण्याचा प्रश्नच नव्हता. पण प्रत्यक्षात पार्टीकल नी आपली दिशा बदलली आणि तिसऱ्या लेन्स मधून बाहेर आले. 

हे समजून घ्यायला आपण काठीच उदाहरण घेऊ. काठी उभी असेल तर ती पहिल्या लेन्स मधून आरपार जाईल. दोन सळ्यांच्या मधे असलेल्या गॅप मधून. पण ती आडवी असेल तर पहिल्याच लेन्स ला अडकेल. काठी जर उभ्यानेच पुढे जात असेल तर ती पुढल्या ४५ अंशात असलेल्या लेन्स मधे अडकायला हवी होती. पण तसं होत नाही. काठी आपली अवस्था बदलते. ती ४५ अंशात कलते आणि लेन्स च्या गॅप मधून पुढे जाते. पुढे तिसऱ्या आडव्या असणाऱ्या जाळीसमोर ती आडवी होते आणि त्यातून पण आरपार जाते. हा प्रयोग संपूर्ण विज्ञान जगताला कलाटणी देणारा ठरला. या प्रयोगातून सिद्ध झालं की काठी प्रमाणे पार्टीकल आपली अवस्था बदलतात. आपली स्थिती ते बदलू शकतात कारण ते कोणत्याच स्थितीत नसतात जशी परिस्थिती समोर येते त्या पद्धतीने त्या स्वरूपात ते स्वतःत बदल घडवतात. हा निष्कर्ष क्वांटम मेकॅनिक्स च्या आपल्या माहितीला कलाटणी देणारा ठरला. 

यातील जे तिसरे वैज्ञानिक होते Anton Zeilinger यांनी तर Quantum Entanglement असलेले पार्टीकल बनवून दाखवले. त्यांनी सप्रमाण हे सिद्ध केलं की हे पार्टीकल कितीही अंतरावर असले तरी एकाने आपलं स्वरूप दाखवलं की दुसरा त्याच क्षणी त्याच्या विरुद्ध स्वरूपात प्रकट होतो. या शिवाय Quantum Entanglement या क्वांटम मेकॅनिक्स च्या नियमाचा आधार घेत त्यांनी Quantum teleportation करून दाखवलं. 

Quantum teleportation is a technique for transferring quantum information from a sender at one location to a receiver some distance away.

येणाऱ्या काळात क्वांटम मेकॅनिक्स आणि त्याच्या पार्टीकल मधलं Quantum Entanglement हे आपल्या संपूर्ण आयुष्याचा कायापालट करणार आहे. याची सुरवात झालेली आहे. दोन पार्टीकल मधे असणारे हे ऋणानुबंध संदेश वहनासाठी एक क्रांतिकारी पाऊल म्हणून पुढे येत आहेत. क्वांटम टेलिपोर्टेशन नंतर आता क्वांटम कॉम्युटिंग ची सुरवात झालेली आहे. तुम्ही वाचून थक्क व्हाल इतक्या अविश्वसनीय वेगाने या गणित करण्याची या कॉम्प्युटर ची क्षमता आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता असलेल्या एखाद्या सुपर कॉम्प्युटर ला एक १५ आकडी पासवर्ड क्रॅक करायला किंवा शोधायला समजा एक महिन्याचा कालावधी लागत असेल. ( इकडे लक्षात घ्या की १५ आकडी  संख्येसोबत जेवढे काही आकड्यांचे कॉम्बिनेशन होतील तेवढे सगळे करून पासवर्ड क्रॅक करायचा आहे.) तर त्या ठिकाणी तुम्ही जर क्वांटम कॉम्प्युटर चा वापर केला तर त्या कॉम्प्युटर ला अवघा १ मिनिट पेक्षा कमी कालावधी पुरेसा आहे. 

याचा अर्थ लक्षात येतो आहे का? आज तुमच्या आमच्या हातात स्थिरावलेले कॉम्प्युटर किंवा प्रयोगशाळा, रिसर्च इन्स्टिट्यूट इकडे असलेले सुपर कॉम्प्युटर हे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. क्वांटम कॉम्प्युटिंग संपूर्ण जगाचा आणि त्यातील इन्फॉर्मेशन चा कायापालट करण्यास सज्ज होते आहे. या वर्षी देण्यात आलेला नोबेल सन्मान याच साठी विशेष आहे. या तिघांनी आईनस्टाईन ला चुकीचं सिद्ध केलं म्हणून ते महान होत नाही तर क्वांटम मेकॅनिक्स च्या एका नवीन वळणापाशी त्यांनी जगाला नेऊन उभं केलं यासाठी ते महान आहेत. 

हे वाचायला सगळं सोप्प वाटलं तरी प्रत्यक्षात उतरायला अनेक दशके लागणार आहेत. १९३८ च्या आसपास पहिला कॉम्प्युटर जन्माला आला. तो भारतात यायला १९६९ साल उजडाव लागलं. तर तो आपल्या घरात यायला १९७८ साल उजाडावं लागलं. खरी कॉम्प्युटर ची क्रांती झाली ती विसाव्या शतकाच्या प्रारंभी. जेव्हा डेस्कटॉप कॉम्युटर लॅपटॉप आणि आय पॅड ते फोन असा आपल्या हाती विसावला. हे सगळं सांगण्याचं कारण इतकच की पहिल्या कॉम्प्युटर पासून आपल्या पर्यंत यायला जवळपास एक शतकाचा कालावधी लागला. तंत्रज्ञान जरी झपाट्याने बदलत आणि प्रगत होत असलं तरी क्वांटम कॉम्प्युटर आपल्या पर्यंत यायला निदान २०-३० वर्षाचा कालावधी लागू शकतो. कारण सध्या ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान काम करते ते आपल्या रोजच्या वापरासाठी उपयोगी नाही. पण रिसर्च लॅब, सुरक्षा, अंतराळातील गणित यासाठी मात्र हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. 

अनेकांच्या मनात प्रश्न येईल आईनस्टाईन ने मांडलेल्या सगळ्या थिअरी चुकीच्या होत्या का मग? आपण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकतो का मग? तर याची उत्तर नाही अशी आहेत. आईनस्टाईन फक्त क्वांटम मेकॅनिक्स च्या नियमांबाबत चुकला पण त्याची थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आजही भौतिकशास्त्राचा पाया आहे.  Quantum Entanglement असलेले पार्टीकल अनंत अंतरावर जरी आपली स्थिती लगेच बदलत असले तरी बदललेल्या स्थितीच अवलोकन हे आपल्याला प्रकाशाच्या वेगानेच होणार आहे. याचा अर्थ काय तर जरी १० बिलियन प्रकाशवर्ष अंतरावर चकती पांढरी झाली तरी ती पांढरी झाली हा संदेश आपल्या पर्यंत यायला १० बिलियन वर्ष लागणार आहेत. याचा अर्थ आईनस्टाईन तिथे योग्य आहे. आपण अजूनही प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने संदेश प्राप्त करू शकत नाही. 

हे सगळं वाचून मी पुन्हा भारतीय संस्कृतीकडे वळतो आहे. अध्यात्म आणि एकूणच वैश्विक जडणघडण यावर आपल्या पूर्वजांनी वेदांमध्ये जे लिहून ठेवले आहे ते पुन्हा एकदा सत्य होताना दिसते आहे. आपले पूर्वज नेहमी सांगत किंवा अध्यात्माचा बेस हाच आहे की प्रकृती, निसर्गाची एकरूप व्हा. हे एकरूप होणं म्हणजे एक प्रकारचं Quantum Entanglement असू शकते असं मला न राहवून वाटते. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कदाचित त्याला बेस नसेल पण जेव्हा तुम्ही एकरूप होता एका वेगळ्या लेव्हल वर तेव्हा तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू शकता. मग ते बर्फाच्या पाण्यात अंघोळ करण्यापासून ते पुरातन काळात देवाने प्रकट होऊन दर्शन देण्यासारखं. हे जे गुंतणं आहे तेच आपल्यापैकी कितीतरी जणांना जाणवणाऱ्या टेलीपथी चा बेस असू शकेल का? असा प्रश्न माझ्या मनात घोळतो आहे. कारण जेव्हा तुम्ही आपल्या माणसासोबत एका वेगळ्या लेव्हल ला गुंतता तेव्हा अनेकदा अंतर किती आहे याचा काहीच फरक पडत नाही. 

अनेकदा घडणाऱ्या गोष्टींची आधीच होणारी जाणीव, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणारी चांगली अथवा वाईट गोष्टीची चाहूल हजारो किलोमीटर लांब असलेली व्यक्ती जेव्हा अचूक सांगते तेव्हा आपण अनेकदा अचंबीत होतो. पण अध्यात्मिक लेव्हल वर आपला ऑरा जर (Entanglement) मधे असेल तर कदाचित त्या दोन व्यक्तींमधील अंतराने काहीच फरक पडत नसतो. अर्थात हे माझे विचार आहेत. मी कोणत्याही धार्मिक गोष्टींना किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. जेव्हा अध्यात्माचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो तेव्हा अनेक गोष्टी जुळून येत असल्याचं मला आजपर्यंत जाणवलेलं आहे. काय माहित कदाचित येत्या काळात काही न उलगडलेल्या प्रश्नांची उत्तर मला मिळतील. 

हे विश्व अनेक रंजक गोष्टींनी व्याप्त आहे. ज्याचा तळ तर सोडाच आपल्याला त्याच्या पसाऱ्याची अजून व्याप्ती समजलेली नाही. त्यामुळे आपण जे बघतो ते खरं यावर आपण आजही ठामपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण आपण जे बघत आहोत ते एक ऑबझर्व्हर म्हणून समोर आलेलं एक स्वरूप ही असू शकते. कारण क्वांटम मेकॅनिक्स चे नियम आज तरी असं होऊ शकते हे आपल्याला सांगत आहे. त्यातील जटिलता इतकी आहे की कदाचित या कल्पना आपल्या पचनी पडायला अजून अनेक दशके जावी लागतील. पण यावर्षीच्या नोबेल सन्मानाने आपण अलिबाबाच्या गुहेसमोर जाऊन उभं असल्याची वर्दी समस्त जगाला दिली आहे. भौतिक शास्त्रातील अनेक शक्यतांवर प्रामाणिकपणे प्रयोग करून त्याचे निष्कर्ष आपल्या समोर मांडणाऱ्या त्या अनाम संशोधकांना माझा कडक सॅल्यूट. विश्वाची जाणीव जी तुम्ही करून दिली आहे. त्यासाठी संपूर्ण मानवजाती तुमची खूप खूप आभारी आहे. 

समाप्त. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





1 comment:

  1. लेखमाला छान झाली आहे. पहिला भाग वाचताना झेपेल कि नाही असं वाटत होतं, पण तुम्ही हा अवघड विषय सोपा करून मांडला आहे.
    यापुढेही असे लेख वाचायला आवडतील.

    ReplyDelete