Monday, 26 December 2022

एक दुजे के लिये... विनीत वर्तक ©

 एक दुजे के लिये... विनीत वर्तक © 

२९ जून १९८६ चा दिवस होता जेव्हा अर्जेंटिनाने दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकली. या वेळच्या विजयाचा शिल्पकार होता जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेला दिएगो मॅराडोना. यानंतर एका वर्षानी अर्जेंटिनाच्या क्षितिजावर एका नव्या ताऱ्याचा जन्म २४ जून १९८७ रोजी झाला होता. मॅराडोनाप्रमाणेच बेताची उंची आणि त्याच्याच नंबरची जर्सी घालून अर्जेंटिनाला एक दिवस पुन्हा विश्वचषक मिळवून देईल असा अंदाजही त्यावेळी कोणी केला नव्हता. त्याचं नाव होतं लायोनेल मेस्सी. १८ डिसेंबर २०२२ रोजी अर्जेंटिनाने पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घातली. त्यांच्या विजयाचा हिरो होता अर्थातच दोन गोल करणारा मेस्सी. ज्या मेस्सीने आपल्या खेळाने संपूर्ण जगाला वेड लावलं, त्या मेस्सीला वेड लावणारी त्याच्या आयुष्याची साथीदार त्याच्या तीन मुलांसह हा सामना अनुभवत होती. कदाचित तिचं मन पुन्हा एकदा भूतकाळात गेलं असेल, जेव्हा लायोनेल मेस्सी कोणीच नव्हता त्यावेळेस 'मी एक दिवस तुझ्याशी लग्न करेन'. हे त्याने तिला दिलेलं वचन पाळलं. जग जिंकल्यावरही तिच्यासाठी तोच लायोनेल होता, ज्याने लहानपणीच तिला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडलं होतं. 

ही गोष्ट सुरू होते जेव्हा लायोनेल मेस्सी अवघा नऊ वर्षांचा होता. आपला मित्र लुकास स्कॅग्लियाच्या घरी तो व्हिडीओ गेम खेळायला जात असे. असाच एक दिवस खेळत असताना त्याच्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेली अँटोनेला रोकुझो त्यांना काही हवं का हे विचारत आली. अँटोनेलाने पहिल्या नजरेत त्या लहानग्या मेस्सीच्या हृदयाची तार छेडली ती कायमची. त्यावेळी एकदम लाजाळू असलेल्या मेस्सीला आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवता आल्या नाहीत. पण त्याने लुकास कडून त्याच्या घरी असलेल्या या परीची सगळी माहिती काढून घेतली. लुकासची चुलत बहीण असलेल्या अँटोनेलाला भेटण्यासाठी आणि तिच्या सोबत वेळ घालवण्यासाठी लायोनेलच्या फेऱ्या लुकासच्या घरी वाढायला लागल्या होत्या. त्या दोघांची खूप चांगली मैत्री झाली. 

एकीकडे लायोनेलच्या डोक्यात फुटबॉलचं भूत शिरलं होतं तर त्याचं मन सतत अँटोनेलाचा विचार करत असायचं. फुटबॉलच्या सरावातून संधी शोधून लायोनेल सतत लुकासच्या घरी जायचा. या आठवड्यात लायोनेलचं मन थाऱ्यावर नाही याचा अंदाज त्याचे प्रशिक्षक एनरिक डोमिंग्वेझ यांना आला. त्यांनी लुकासच्या वडिलांची भेट घेऊन लायोनेल सारखा तुमच्या घरी तर येतो पण या आठवड्यात तो खूप अस्वस्थ आहे. तुम्हाला याबद्दल काही माहित आहे का? अशी त्यांनी विचारणा केली. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, 

“कारण शनिवार व रविवार येत आहे, लुकासची चुलत बहीण अँटोनेला घरी येणार आहे. लायोनेलला ती खूप आवडते.

लायोनेल आणि अँटोनेला जसे मोठे होत गेले तसे त्यांच्यातील मैत्री अजून घनिष्ट होत गेली. तो काळ फेसबुक, व्हाट्सएपचा किंवा मोबाईलचा नव्हता. त्यामुळे मेस्सी आपल्या मनातल्या अनेक गोष्टी पत्रांद्वारे अँटोनेलाला सांगायचा. अश्याच एका पत्रात त्याने अँटोनेलाला सांगितलं होतं की, "एक दिवस तू माझी जीवनसाथी होशील".    प्रत्येक नातं अनेक बदलांना सामोरं जात असतंच. याच काळात अडचणीचे असे अनेक प्रसंग येतात की जिकडे आपण आपल्या माणसापासून लांब होतो. लायोनेल आणि अँटोनेलाच्या नात्यातही असं एक वळण आलं जेव्हा २००० साली लायोनेलच्या वडिलांनी बार्सिलोना इकडे जाण्याचा निर्णय घेतला. जसं अंतर वाढलं तसं दोघांच्यामध्ये एक दुरावा आला. पण काही असलं तरी लायोनेल अँटोनेलाला विसरलेला नव्हता. एकीकडे फुटबॉलच्या जगात लायोनेल मेस्सी हे नाव गाजायला लागलं होतं पण मेस्सीचं मन मात्र अँटोनेलामधे अडकलेलं होतं. 

२००५ चं वर्ष होतं एका अपघातात अँटोनेलाची एक मैत्रीण एका अपघातात मृत्युमुखी पडली त्यावेळेस अँटोनेला फक्त १७ वर्षांची होती. आपल्या मैत्रिणीच्या अचानक जाण्याने ती कोलमडून पडली. हा धक्का इतका प्रचंड होता की ती कित्येक दिवस कॉलेजलाही जाऊ शकली नाही. या गोष्टीची बातमी लायोनेलला कळताच त्याने आपलं संपूर्ण करिअर बाजूला टाकत अँटोनेलाला भेटण्यासाठी धाव घेतली. लायोनेल नुसता तिला भेटला नाही तर दुःखाच्या त्या दरीतून तिला पुन्हा बाहेर काढलं. हाच काळ होता जेव्हा त्या दोघांमधल्या नात्याला प्रेमाचे धुमारे फुटले. दोघानांही कळून चुकलं की एकमेकांशिवाय ते राहू शकत नाहीत. 

पण आपल्या प्रेमाला लोकांच्या नजरेपासून त्यांनी लपवून ठेवलं. लायोनेलने २१ वर्षांचा होईपर्यंत आपलं नातं संपूर्ण जगापासून लपवून ठेवलं. २० जुलै २००७ रोजी लायोनेलने अँटोनेलासोबत असलेल्या आपल्या नात्याला जगासमोर आणलं. पण लायोनेलला आपल्या करिअर मधलं शिखर गाठायचं होतं. त्याने त्याचं शिखर गाठेपर्यंत अँटोनेलाने लग्नाची घाई केली नाही. या संपूर्ण प्रवासात ती फक्त त्याची सोबत करत राहिली. २०१७ रोजी लायोनेल मेस्सीने अँटोनेला रोकुझो सोबत जन्मगाठ बांधली, ज्याचं वचन त्याने लहानपणी अँटोनेलाला दिलं होतं. 

लायोनेल मेस्सीच्या ज्या फुटबॉलसाठी जग वेडं आहे, त्याचं काहीच अप्रूप अँटोनेलाला नाही असं खुद्द मेस्सीने सांगितलेलं आहे. मेस्सी म्हणतो, 

"तिला माझ्या फुटबॉलचा कंटाळा आला आहे. अनेकदा मी घरी परत येतो आणि सांगतो की, 'आज मी दोन गोल केले किंवा मी हॅटट्रिक केली' तेव्हा तिला त्यात अजिबात रस नसतो.

अँटोनेलाच्या मते ती फुटबॉलचा स्टार असलेल्या लायोनेल मेस्सी वर प्रेम नाही करत तर माझ्या दुःखाच्या काळात सगळं बाजूला टाकून माझ्यासाठी धावून आलेल्या लायोनेलवर प्रेम करते. त्यामुळे तो फुटबॉलमध्ये काय करतो याचा माझ्याशी काहीच संबंध नाही. "

लायोनेल आणि अँटोनेला खरोखर 'एक दुजे के लिये' आहेत हे त्यांच्या मधील केमिस्ट्री वरून कोणीही सांगू शकतो. खरं प्रेम हे नेहमीच शाश्वत असतं. त्यामुळेच आज प्रसिद्धीच्या शिखरावर असला तरी लायोनेलचं मन मात्र फक्त अँटोनेलाचा विचार करतं. त्या दोघांची प्रेमकहाणी अनेकांसाठी एक शिकवण आहे. खरं प्रेम हे तुम्ही कसे दिसता, किती पैसे कमावता किंवा किती प्रसिद्ध आहात यावर अवलंबून नसतं तर ते जाणिवेवर असते. ही जाणीव जोवर जिवंत आहे तोवर काळाच्या कसोटीवर ते नेहमीच खरं उतरतं. संपूर्ण जगापुढे आपल्या अतूट प्रेमाचं एक सुंदर उदाहरण उभं करणाऱ्या लायोनेल आणि अँटोनेलाला त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





No comments:

Post a Comment