Thursday 9 December 2021

अमर जवान... विनीत वर्तक ©

 अमर जवान... विनीत वर्तक ©


'लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे...' - बाजी प्रभू देशपांडे.


आजपासून तब्बल ४०० वर्षापूर्वी मराठा साम्रज्याचे सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी हे विधान केलं होतं. आज कित्येक वर्षानंतर ते विधान तितकेच लागू आहे. कालच्या दुर्दैवी घटनेत भारताने आपला लाखाचा पोशिंदा गमावला. त्यामुळेच भारताची या घटनेने न भरून येणारी हानी झाली आहे. कालची घटना सर्व भारतीयांसाठी एक धक्का होती. त्यामुळेच यातून सावरायला बराच कालावधी जाणार आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत , त्यांची पत्नी,  ब्रिगेडिअर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग आणि स्पेशल फोर्स चे जवान आणि एअर फोर्स चे पायलट या सर्वांना भारताने कालच्या दुर्घटनेत गमावलं. 


कारगील युद्धानंतर आलेल्या अनुभवावरून कारगील रिविव्ह कमिटीने भारताने 2 गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली. एक म्हणजे चिफ ऑफ डिफेंस स्टाफ या पदाची निर्मिती करणे, दुसरे म्हणजे स्वदेशी जीपीएस तयार करणे. त्यानुसार डिसेंबर 2019 देशाचे पहिले सीडीएस म्हणून बिपीन रावत यांची नियुक्ती झाली. त्यांच्या कार्याच स्वरूप बघितलं तर त्यांना दोन आघाड्यांवर काम करायचे असते. एक म्हणजे शासकीय पातळीवर आणि दुसरे म्हणजे सरंक्षण दलाच्या पातळीवर समन्वय साधणे. याशिवाय सैन्याशी संबधित सर्व महत्वाचे अधिकार, लष्करी तळाशी संबधित विषय, रणनिती, तिन्ही दलांचा समन्वय, शस्त्रांच्या संदर्भात निर्णय घेणे.हे अधिकार सीडीएस यांना असतात. हे भारतीय सेनेतील  4 स्टार रॅंकिंगचं पद आहे. अतिशय महत्वाच्या पदावरून जनरल बिपीन रावत यांनी भारताच्या तिन्ही दलात आमूलाग्र बदल करण्याची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय सेनेला येत्या काळातील अडचणींसाठी तयार करण्याचं शिवधनुष्य त्यांनी उचललेलं होतं. त्यामुळेच त्यांच्या अचानक जाण्याने झालेली पोकळी भरणारी नाही. 


सीडीएस जनरल बिपीन रावत हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना हा कुन्नूर इकडे हा अपघात घडला. हा अपघात आहे की घातपात यावर अनेक लोकांनी आपली मते मांडायला सुरवात केली आहे. याला कारणे अनेक आहेत. जनरल बिपीन रावत हे ज्या एम आय १७ व्ही हेलिकॉप्टर मधून जात होते ते तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम हेलिकॉप्टर आहे. १३ हजार किलोचा भार उचलून उड्डाण भरण्याची याची क्षमता आहे. ३६ सशस्त्र सैनिक यातून एकाचवेळी प्रवास करू शकतात. याचं कॉकपीट आणि महत्वाच्या भागांवर चिलखती आवरण असते. २५० किलोमीटर / तास वेगाने उड्डाण भरण्यास सक्षम आहे. कोणत्याही प्रकारच्या हवामानात उड्डाण भरू शकते. याची टर्बो इंजिन तब्बल २७०० हॉर्स पॉवर निर्माण करू शकतात आणि हे ६००० मीटर उंचीवरून उड्डाण भरू शकते. अशी ८० हेलिकॉप्टर भारताने १.३ बिलियन अमेरिकन डॉलर ला रशिया कडून खरेदी केली आहेत. जर तांत्रिक दृष्ट्या आपण या हेलिकॉप्टर चा विचार केला तर अतिशय महत्वाच्या व्यक्तींची ने-आण करण्यासाठी हे हेलिकॉप्टर सर्वोत्तम आहे. मग कालचा अपघात कसा झाला? 


सीडीएस या अतिशय महत्वाच्या पदावरील व्यक्ती जेव्हा अश्या प्रकारचा प्रवास करते तेव्हा सगळ्या गोष्टी अनेक वेळा तपासल्या जातात. वैमानिक जायच्या रस्त्यावरून दोन वेळा तरी जाऊन कोणतीही अडचण येत नसल्याची शहानिशा करतात. अनेक छोट्या,मोठ्या जर-तर च्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. अनेक प्रोटोकॉल त्यासाठी ठरलेले असतात. तसेच आणीबाणी च्या काळात एस.ओ.पी. म्हणजेच (स्टॅंडर्ड वर्क इंस्ट्रक्शन) या ठरलेल्या असतात. कोणी काय करायचं हे अगदी प्रत्येकाच्या डोक्यात फिट असते. असं असताना इतकी मोठी दुर्घटना कशी काय घडते? हा प्रश्न सैन्यासोबत भारतातील निर्णय घेणाऱ्या अनेक 

व्यक्तींच्या समोर आज आ वासून उभा आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात चुकचुकणारी शंकेची पाल ही योग्यच आहे. पण याचा अर्थ कोणीतरी घातपात घडवूनच आणला असा होत नाही. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 


हेलिकॉप्टर शेवटी एक मशीन आहे. अभियांत्रिकीशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांना चांगलं माहित असेल की सगळं चांगलं असलं, सगळं तपासलेलं असलं तरी कोणतीही मशीन कधीही दगा देऊ शकते. कुन्नूर मधे काल दाट धुक्याचं साम्राज्य होतं. हेलिकॉप्टर चा प्रवास हा नेहमीच असुरक्षित मानला जातो. मी माझ्या आयुष्यात कामाच्या निमित्ताने निदान २००-३०० वेळा हेलिकॉप्टर चा प्रवास गेल्या १५ वर्षात केला आहे. पण प्रत्येकवेळी हेलिकॉप्टर मधे बसताना आपण सुरक्षित उतरू याची खात्री कोणीही १००% देऊ शकत नाही. जी विमान प्रवासात देता येते. कारण हेलिकॉप्टर चा प्रवास वातावरणातील बदलांवर खूप अवलंबून असतो. बदललेली हवा, धुकं, पाऊस, हवेतील पोकळ्या या सगळ्या एखाद्या प्रवासाची वाट चुकवू शकतात. अगदी रोज सियाचीन वर उड्डाण भरणारे वायुदलातील पायलट सुद्धा हे मान्य करतील. पण असं असूनसुद्धा सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर चा अपघात ही नक्कीच खूप मोठी आत्मपरीक्षण करायला लावणारी घटना आहे. 


कालच्या अपघाताची वेळ ही सुद्धा अनेक अर्थाने महत्वाची आहे. परवाच भारतात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन येऊन गेले. त्यानंतर एका दिवसांनी रशियामध्ये निर्मित हेलिकॉप्टर चा हा अपघात अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारताने चीन ला अनेक आघाड्यांवर शह दिलेला आहे. त्यामुळेच त्यांच काम हे चीनसाठी डोकेदुखी ठरलेलं होतं. या अपघातामागे चीन चा हात असल्याचा एक मोठा प्रवाह आणि वर्ग मानतो. ते काही अंशी घडलेल्या घटनाक्रमावरून जुळतेही. पण अजून बरेच डॉट्स जोडायचे बाकी आहेत. कोणत्याही परकीय शक्तीने जर हा कट केला असेल तर त्यांच्यापेक्षा आपल्याच मातीतील इमान विकणाऱ्या लोकांचा आपल्याला धोका आहे. ती सगळ्यात मोठी चिंता असेल. कारण एक नक्कीच की घरभेदी असल्याशिवाय असा घातपात घडवून आणण शक्यच नाही. जर का असं असेल तर त्यांचा बिमोड करणं, त्यांना सर्वांसमोर आणण हे खूप मोठं आव्हान असेल. 


आज हा लेख लिहीपर्यंत देशातील गुप्तचर संघटना, भारतीय सेनेची तज्ञ कमिटी रात्रंदिवस या अपघाता मागची कारणं शोधून काढण्यासाठी कार्यरत झालेल्या आहेत. त्या या अपघाताच्या मुळापर्यंत नक्कीच पोहचतील अशी आशा आहे. कारण भारताचं सक्षम नेतृत्व अश्या घटना हलक्यात घेणारं नाही. नक्की सगळ्या जर- तर च्या शक्यतांवर उत्तर शोधली जाणार आहेत. ती शोधे पर्यंत आपण आपलं डोकं न लावता संयम बाळगण्याची गरज आहे असं माझं मत आहे. अपघात असो वा घातपात पण भारताने आपल्या लोखांच्या पोशिंदा ला गमावलं हे खूप मोठं नुकसान भारताचं झालेलं आहे. 


कालच्या दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या भारत मातेच्या सर्व सैनिकांना माझा कडक सॅल्यूट. तुम्ही नेहमीच आमच्या मनात अमर रहाल. 


अमर जवान. 


जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :-  गुगल


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

  


1 comment:

  1. खरोखर अपरिमित नुकसान झालं आहे... सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली.... जय हिंद

    ReplyDelete