Wednesday 1 December 2021

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन..घोड्याविना रथ... विनीत वर्तक ©

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन..घोड्याविना रथ... विनीत वर्तक ©


सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक इकडे संपन्न होते आहे. मराठी भाषा इतकी समृद्ध असताना अश्या संमेलनातुन नक्की काय हाताशी लागते या प्रश्नाचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही. लहानपणापासून अनेक संमेलना बद्दल ऐकत आणि वाचत आलो. प्रत्येकवर्षी संमेलनाचा अध्यक्ष कोण यावर ज्या पद्धतीचं राजकारण खेळलं जाते आणि एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप होतात ते संमेलनात काय घडलं यापेक्षा जास्त प्रसिद्ध होतात. मला तरी व्यक्तिशः याच गोष्टींमुळे मराठी साहित्य संमेलन लवकरच होणार आहे याची आजवर बातमी मिळत आलेली आहे. ज्या कारणांसाठी हे संमेलन सुरु केलं गेलं तो उद्देश काळाच्या ओघात कधीच मागे पडला आहे. गेल्या काही वर्षात तर मराठी साहित्य संमेलन हे साहित्याची मंदियाळी न रहात राजकीय आखाडा झालं आहे. पक्ष आणि नेता कोणताही असो. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यासाठीच याचा वापर केला जात आहे. या वर्षीच मराठी साहित्य संमेलन ही याला अपवाद नाही. 


मराठी साहित्य संमलनाचा मूळ उद्देश काय? या प्रश्नाचं उत्तर आज खेदाने आयोजक ही देऊ शकतील का? असा प्रश्न मला अनेकदा पडतो. कारण या आयोजकांचे मराठी साहित्यातलं योगदान काय याचा शोध घेतला तर हाताशी काही लागणार नाही. आज साहित्य संमेलनाची व्याप्ती ही सरकारी अनुदानातून एक समारंभ आयोजित करून भाषण ठोकून चर्चा करणं इतपत राहिली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. संमेलनातून मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी किंवा एकूणच मराठी साहित्याची व्याप्ती वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले गेले? त्यातून काय निष्पन्न झालं? मराठी साहित्याकडे नवीन पिढीला वळवण्यासाठी काय केलं गेलं? नवीन लेखक, लेखिका, कवी, कवियत्री, प्रकाशक, पुस्तक विक्रेते अश्या साहित्य समृद्ध करणाऱ्या घटकांबद्दल एकूणच काय विचार केला गेला याबद्दल माझ्या तरी वाचनात गेल्या २०-३० वर्षात काहीही आलेलं नाही. व्यासपीठावरून ठोकलेले शब्द हवेत विरून गेल्यावर त्याच पुढे काहीच होत नाही हाच प्रत्यय दरवर्षी अनुभवलेला आहे. 


गेल्या २-३ वर्षात तर साहित्य संमलेन हे सोशल मीडियासाठी एक सेल्फी पॉइंट आणि व्यासपीठावर आपली कविता सादर करायला मिळाली हे सांगण्याचं साधन झालं आहे. साहित्य संमेलनात आपल्या लेख, कवितेला ,गझल ला स्थान मिळावं म्हणून साम, दाम, दंड, भेद आणि राजकीय ओळख, वजन वापरून त्याची पोस्ट टाकण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणारे अनेकजण बघितले आहेत. साहित्य क्षेत्रातील मान्यवर लोकांसोबत फोटो घेण्यासाठी साहित्य संमेलनासारखा योग्य सेल्फी पॉईंट आज अस्तित्वात नाही. ज्या प्रमाणे एखाद्या शूटिंगच्या वेळी कलाकारांसोबत फोटो काढण्याची काही वर्ष आधी स्टाईल होती आज तीच स्टाईल संमेलनात वापरली जात आहे. यातून नक्की निष्पन्न काय हे फोटो काढणाऱ्याला आणि ज्या मान्यवरांसोबत फोटो काढला त्या दोघांनाही माहित नसते. प्रश्न हा नाही की सेल्फी काढणं योग्य की अयोग्य. प्रश्न हा आहे की नक्की संमेलनाच्या मुख्य उद्देशापासून आपण कसे भरकटलो आहोत याच हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. 


मराठी साहित्य संमेलनाची आजची स्थिती ही घोड्याविना असलेल्या रथा सारखी आहे. ज्यावर सगळे आसनस्थ होतात पण प्रत्यक्ष तो रथ पुढे कुठे सरकत नाही. एक काळ होता जेव्हा पु.ल., व. पु., भा. रा. भागवत, द.मा. मिरासदार, ग्रेस, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर अश्या एक ना अनेक मराठी साहित्यकरांनी आपल्या शब्दातून मराठी साहित्याची गोडी कित्येक पिढयांना लावली. पण त्यानंतर नाव तोंडात येतील असे किती लेखक, कवी अथवा कवियत्री झाले? मराठी साहित्याला ही जातीचे पंख फुटले. किंबहुना अश्या पद्धतीचं लिखाण करून जनमानसात आपलं नाव मोठं करण्याचा एक ट्रेंड ही आला. तो चुकीचा किंवा बरोबर यावर भाष्य करण्याइतपत माझं कर्तृत्व नाही. पण या सगळ्यात येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याकडे आकर्षित करण्यात आपली पिढी कमी पडली हे महत्वाचं आहे. मराठी साहित्य संमेलन खरे तर अश्या गोष्टींकडे बघता येईल आणि त्यावर मान्यवर लोकांनी एकत्र येऊन पावलं टाकली जावीत यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म होता पण त्यात आपण सपशेल अपयशी ठरलो आहोत हे सत्य आहे. 


आज सोशल मिडिया च्या जमान्यात खरे तर कोरोना काळात जेव्हा तंत्रज्ञानाने आपण जगातल्या कोपऱ्यात वसलेल्या मराठी माणसाशी एका क्षणात जोडू शकतो तेव्हा त्याचा उपयोग न करता प्रत्यक्ष भेटून, करोडो रुपये खर्चून काय साध्य होणार आहे? कारण संमेलनाला येणारी संख्या ३००० हजार इतकी मर्यादित केली गेली आहे. त्यात राजकारणी, त्यांचे सेवक, त्यांचे कार्यकर्ते, मान्यवर व्यक्ती, आयोजक आणि त्यांचे जवळचे लोक हेच मिळून इतकी संख्या होते तर नक्की त्या संमेलनात कोणता साहित्याचा विचार होणार आहे? असा प्रश्न माझ्या मनात आहे. त्यातही भरीस भर म्हणून कोणत्या कमानी ला कोणाचे नाव? निमंत्रण पत्रिकेत कोणाला स्थान आणि व्यासपीठावर बोलावण्यात आलेल्या सन्माननीय व्यक्तींबाबत चाललेलं राजकारण बघितलं की मराठी साहित्य संमेलन करून त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे मला कळलेलं नाही. 


काही कोटी रुपये अनुदान सरकार कडून यासाठी घेतलं गेलं आहे. त्याशिवाय इतर दानशूर व्यक्ती आणि चाहते यांच्याकडून वर्गणी मिळालेली असेल तसेच संमेलनासाठी शुल्कातून काही रक्कम मिळेल. पण एवढा सारा खटाटोप करून नक्की हाताशी काय? हे कोणालाच स्पष्ट नाही. का नाही हे सगळे पैसे संमेलन वर्चुअल भरवून शाळांसाठी लायब्ररी उभारण्यासाठी वापरले जात? आज महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये चांगल्या लायब्ररी नाहीत असल्या तरी त्यात पुस्तक नाहीत. आज का नाही हे पैसे तिकडे वापरले जाऊ शकत? या पैश्यातून का नाही मराठी साहित्यातील उदयोन्मुख लेखक, लेखिका, कवी, कवियत्री आणि प्रकाशक यांना मराठी साहित्य निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात? आज लेखक आणि प्रकाशक यामधील दरी वाढते आहे. प्रकाशाला पुस्तक खपवण कठीण होते आहे तर लेखकाला पुस्तक छापण्याचा खर्च परवडत नाही किंवा त्यांच लिखाण छापण्यासाठी प्रकाशक पुढे येत नाही. मग जर चांगलं साहित्य असं पुढे येणार नसेल तर मराठी साहित्याचा रथ हा जेथे आहे तिथेच राहिला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. 


मराठी साहित्य समृद्ध व्हायचं असेल तर त्याचे घोडे म्हणजे लेखक, प्रकाशक आणि वाचक हे जोपर्यंत साहित्याच्या रथाशी जोडले जात नाही तोवर दरवर्षी करोडो रुपये खर्चून अशी कितीही संमेलन आयोजित केली तरी त्याचा परिणाम शून्य असणार आहे. आता सुरु असलेलं संमेलन ही त्याच रथ नसलेल्या घोड्यांवर शब्दांचे बुडबुडे सोडण्यापलीकडे काही असणार नाही अशी मला खात्री आहे. 


तळटीप :- वर लेखात लिहलेली मते माझी स्वतःची आहेत. ज्यांना पटतात त्यांनी ती घ्यावीत आणि ज्यांना नाही पटत त्यांनी सोडून द्यावीत. या लेखातून कोणत्याही लेखक, आयोजक, अथवा राजकीय व्यक्तींचा अनादर करण्याचा उद्देश नाही तर मनातली खंत इकडे लिहलेली आहे. 

 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment