पिनोचिओ... विनीत वर्तक ©
सध्या 'पिनोचिओ' नावाची एक कोरियन सिरीज बघत आहे. या सिरीज चा मुख्य आशय हा पिनोचिओ नावाच्या अश्या एका प्रकाराशी निगडित आहे. ज्यात या प्रकारची अवस्था असणाऱ्या माणसाने खोटं बोलल्यावर त्याला अथवा तिला उचकी लागते. या सिरीज च्या कथानकात मला जायचं नाही. पण ही सिरीज अतिशय सुंदर रीतीने अतिशय महत्वाच्या विषयाला स्पर्श करते. हा विषय म्हणजे 'समाजमाध्यमांची जबाबदारी'. खरे तर हा विषय इतका महत्वाचा आहे पण त्याबद्दल आपण अजिबात जागरूक नाहीत. आज जेव्हा सोशल मिडिया च्या माध्यमातून समाजातील सर्व घटक अगदी एका टिचकीवर एकमेकांशी जोडले गेले आहोत. तेव्हा या विषया बद्दलची जागरूकता असणं खूप महत्वाचं आहे. आज सोशल मिडिया आणि मेन स्ट्रीम मिडिया म्हणता येईल अश्या माध्यमातून ज्या पद्धतीने अतिशय खालच्या दर्जाने, उपहासात्मक टीका आणि एकद्याचं चारित्र्यहनन केलं जाते ते एखाद्या व्यक्तीच आणि त्याच्या कुटुंबाच आयुष्य देशोधडीला लावू शकते याचा अंदाज आपण लावत नाही आणि त्याची जबाबदारी आपण टाळून लावतो.
एखादा पत्रकार किंवा आजच्या फेसबुक आणि व्हाट्स अप च्या जमान्यात एखाद्या विषयी बोलताना किंवा त्याच्या कुटुंबाविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी, वृत्तीविषयी टिपण्णी करताना आपण आपल्या शब्दांची शहानिशा संपूर्णपणे केलेली असते का? एखादी व्यक्ती चोर आहे, तिचं / त्याच व्यक्तिमत्व योग्य नाही. ती व्यक्ती व्यभिचार करणारी आहे. असं आपण एखाद्याबद्दल बोलून अथवा लिहून जातो तेव्हा त्या निष्कर्षाची चाचणी आपण घेतलेली असते का? कारण तुमच्या - आमच्यासाठी ती एखादी पोस्ट, गॉसिप किंवा बातमी असेल पण त्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी विध्वंस करणारी घटना असू शकते. फेसबुक वर व्यक्तिमत्वावर शिंतोडे उडवल्यामुळे किती जणांचे संसार तुटले गेले आहेत. किती जणांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून गेले आहे. कितीतरी जणांसाठी अशी एखादी घटना, पोस्ट, गॉसिप हे मानसिक संतुलन घालवून बसायला आणि अगदी आत्महत्येसाठी प्रवृत्त करायला ठरलं आहे. या सगळ्याची जबाबदारी घेण्याची किंवा अश्या गोष्टी प्रत्यक्षात जर खऱ्या नसतील तर त्या चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यासाठी आपण गुन्हेगार ठरतो आहोत हे स्वीकारण्याची आणि ती जबाबदारी घेण्याची आपली कुवत आहे का?
पिनोचिओ ही सिरीज हीच गोष्ट अगदी सरळपणे आपल्या समोर मांडते. एक पत्रकार फक्त पिनोचिओ अवस्थेच्या व्यक्तीने केलेल्या वक्तव्याला आधार मानून एका व्यक्तीला अपराधी ठरवते. वस्तुस्थितीची शहनिशा न करता आपल्या शब्दांनी जनमानसात त्याच्या कुटुंबियांना अक्षरशः वाळीत टाकते. न्याय करण्याचं काम हे कोर्टाचं असताना बातमीच्या आधारे न्याय करून त्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत करते. तेव्हा त्या कुटुंबाला ज्या भयंकर परिणामातून जावे लागते ते बघितल्यावर आपल्याला आपल्या शब्दांच्या जबाबदारीची जाणीव होते. पिनोचिओ ही अवस्था किंवा सिरीज महत्वाची नाही. महत्वाची हे आहे की आपण त्यातून काय बोध घेतो. कोणताही पुरावा नसताना अथवा आपल्याला प्रत्यक्ष माहिती नसताना फक्त कोणीतरी सांगितलं किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या मतावरून आपलं मत बनवत ते बिनदिक्कतपणे रेटतो तेव्हा त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव आपल्याला होते का?
एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्या बद्दल आपल्याला काहीही माहिती नसताना त्याच किंवा तीचे अमुक एका सोबत असे संबंध, अमुक एका सोबत लफडं या जोड्या जुळवताना जर या गोष्टी त्यांच्या जोडीदारापर्यंत पोहचल्या तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करतो का? हीच गोष्ट इतर सर्व बातम्या, गोष्टी, गॉसिप, राजकारण, समाजकारण याला लागू आहे. आपले शब्द जेव्हा एका टिचकीवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्याची जाऊ शकतात तेव्हा ते समाजात मांडताना आपण खरं तर अजून जास्ती काळजी घ्यायला हवी. पण असा विचार किती लोकं करतात हा मोठा प्रश्न आहे.
पिनोचिओ मधील कथानक ही खरं तर एक प्रवृत्ती आहे. ब्रेकिंग न्यूज, सबसे तेज, सगळ्यात आधी च्या काळात कोणाच्या मृत्यूची, घटनेची कोणतीही शहानिशा न करता आपण बिनदिक्कतपणे त्यावर मत मांडत असतो. आत्ताची एक ताजी घटना म्हणजे भारताचे नवीन सि.डी.एस. कोण असतील याची कोणतीही घोषणा झाली नसताना लोकांनी अक्षरशः भारतीय सैन्य प्रमुखांची त्या जागी निवड झाल्याची बातमी शेअर करून त्यांच्या शाळेची आणि अगदी जातीचीही कुंडली मांडण्यात उशीर केला नाही. यातील अनेक जण हे प्रगल्भ विचारांचे आहेत. पण सबसे तेज च्या काळात मी कसा अथवा कशी मागे राहू या भूमिकेतून ही बातमी चुकीची का बरोबर याची तपासणी करण्याची गरज ही लोकांना वाटली नाही. पिनोचिओ सिरीज नेमकी हीच वस्तुस्थिती आपल्या समोर मांडते.
मला व्यक्तिशः कोणावर दोषारोप करायचे नाहीत. पण आपण जे लिहितो ते योग्य की अयोग्य, खरं आहे की खोटं याची तपासणी आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवी. अर्थात अपवादात्मक चूक होऊच शकते. पण निदान ते तपासणी करण्याची तसदी आपण घेत गेलो की अश्या चुकांची संख्या ही कमी होत जाते. समाजमाध्यम वापरताना आपली ही जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. जेव्हा आपण ही सुरवात करू तेव्हा अश्या बेजबाबदारपणे बातम्या करणाऱ्या समाजमाध्यमांना आपण आरसा दाखवू शकू. पिनोचिओ च्या निमित्ताने एक चांगला मुद्दा आणि महत्वाचा विषय मांडता आला. कोणाला ही सिरीज बघायची असेल तर नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment