दृष्ट काढणारी मंजम्मा जोगाठी... विनीत वर्तक ©
या वर्षीचा पद्म सोहळा अनेक अर्थाने वैशिष्ठपूर्ण आणि नेत्रदीपक असा झाला. भारताने पद्म सन्मानाची सुरवात केल्यापासून माझ्या मते हा सर्वोत्तम सोहळा असेल हे अनेकजण मान्य करतील. या सोहळ्यात ज्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला ते सगळेच भारतातील सामान्य माणसांमधील असामान्य लोकं होते. त्यामुळेच भारतातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुद्धा पद्म सन्मानाच्या कक्षेत येऊ शकते हा विश्वास भारतीयांमध्ये बळकट झाला. नक्कीच यामुळे पद्म सन्मानाची उंची वाढली आहे. या नेत्रदीपक सोहळ्यात सर्वांच्या नजरेत भरलेली एक कृती म्हणजे भारताचे प्रथम नागरिक म्हणजेच भारताचे राष्ट्रपती यांची पद्मश्री सन्मानाने पुरस्कृत भारतातील पहिल्या तृतीयपंथी व्यक्ती 'मंजम्मा जोगाठी' यांनी काढलेली दृष्ट.
भारतामध्ये खूप काळापासून ज्या प्रथा प्रचलित आहेत त्यातील एक म्हणजेच दृष्ट काढणे. वाईट नजर, वाईट प्रवृत्ती आणि वाईट विचार यापासून एखाद्या व्यक्तीच संरक्षण करण्यासाठी आणि त्या व्यक्तीला भविष्यात सगळं मंगलमय आणि शुभ होईल यासाठी ती काढली जाते. भारतात तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या चौकटीत स्थान नाही. त्यामुळेच त्यांना समाजच्या वेशीबाहेर अत्यंत कठीण परिस्थितीत, अनेक यातना सहन करून आयुष्य जगावं लागते. असं म्हंटल जाते की त्यांच्या निधनानंतर शोक नाही तर आनंद व्यक्त केला जातो. तो यासाठीच की पुन्हा असा जन्म नको. समाजाकडून आयुष्यभर मिळालेली वाईट वागणूक, पांढरपेशा समाजाकडून सतत रोखलेल्या घाणेरड्या नजरा, त्रास हे सगळं सहन करून ज्या वेळेस एखादी तृतीयपंथी व्यक्ती समाजाच्या चौकटीत बसणाऱ्या व्यक्तीला मनापासून आशीर्वाद देते आणि एक प्रकारे तिची दृष्ट काढते तेव्हा ते खूप पवित्र तर जेव्हा शाप देते तेव्हा तो खूप वाईट समजला जातो. म्हणूनच राष्ट्रपती भवनात अगदी आनंदाने मंजम्मा जोगाठी ने सहजतेने राष्ट्रपतींची दृष्ट काढली आणि आशिर्वात दिला तेव्हा माझ्या मते समाजाला मग तो भारतातील असो वा विदेशातील तृतीयपंथी लोकांच्या आयुष्याचा एक आरसा दाखवला.
मंजम्मा जोगाठी यांचा एक तृतीयपंथी असल्याच्या जाणिवेपासून राष्टपती भवनाच्या रेड कार्पेट पर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. माझ्या मते पद्म सन्मानाच्या इतिहासातील सगळ्यात कठीण प्रवास जर कोणत्या व्यक्तीने केला असेल तर तो मंजम्मा जोगाठी यांचा आहे. मंजम्मा जोगाठी यांच मूळ नाव 'मंजूनाथा शेट्टी' असं होतं. १० इयत्तेत असताना तारुण्याच्या उंबरठ्यावर वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना आपण तृतीयपंथी असल्याची जाणीव झाली. स्री वेष, कपडे तसेच एकूणच ते व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्याचा भाग बनायला लागलं. सहाजिक समाजाच्या चौकटीत हे प्रकार निषिद्ध होते. त्यांना आपल्या भावांकडून मार खावा लागला. त्यांच्या वडिलांसाठी तर त्यांच हे मुलं मेलेलं होतं. कुटुंबाकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांना सहन होतं नव्हता. त्याच वर्षी त्यांच्या घरच्यांनी त्यांच लग्न रेणुका यल्लमा देवीशी करून त्यांना देवदासी बनवलं. देवदासी बनल्यावर घरी परतण्याचा खरे तर समाजाच्या चौकटीत परतण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी रस्त्यावर भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यात त्यांना पांढरपेशा समाजातील लोकांकडून केल्या गेलेल्या लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं. या सगळ्याचा धक्का इतका होता की त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं.
आयुष्याचा कडेलोट करून संपवण्याच्या टोकावर असलेल्या मंजम्मा जोगाठी यांची भेट जोगट्टी हे लोकनृत्य करणाऱ्या 'मत्तिकाल बसाप्पा' यांच्याशी झाली. हाच क्षण त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी बसाप्पा यांच्याकडून नृत्याचे धडे शिकले. बसाप्पाच्या निधनानंतर जोगट्टी ही लोकनृत्य कला त्यांनी निर्धाराने पुढे नेली. बघता बघता जोगट्टी लोकनृत्य कला ज्या समाजाने त्यांना नाकारलं होतं त्याच पांढरपेशा समाजात नावारूपाला आली. या लोकनृत्याची मोहिनी जनमानसात आणि संपूर्ण भारतात इतकी पसरली की कर्नाटक सरकारला यासाठी (Karnataka Jaanapada Academy) कर्नाटक जनपाडा एकेडमी ची स्थापना करावी लागली. या संस्थेचे पहिला अध्यक्ष म्हणून तृतीयपंथी मंजम्मा जोगाठी यांची एकमताने निवड केली गेली. कर्नाटक मधील ही संस्था नृत्यासाठी सगळ्यात सर्वोच्च मानली जाते. त्या संस्थेचे अध्यक्षपद मंजम्मा जोगाठी ना मिळणे हे नियतीने समाजच्या तोंडावर दिलेली एक थोबाडीत होती.
मंजम्मा जोगाठी यांनी समाजाच्या वाईट, कुत्सित, बोचऱ्या, अपमानास्पद, दुष्ट अश्या सगळ्या प्रवृत्तींना बाजूला टाकत जोगट्टी नृत्य कलेच्या अविष्काराचा जगभर प्रसार केला. त्यामुळेच त्यांच हे कार्य पद्म सन्मानासाठी ग्राह्य धरलं गेलं. पद्म सन्मान कोणाला मिळायला हवी याची निवड जर लोकांमधून केली गेली नसती तर कदाचित आज मंजम्मा जोगाठी भारताच्या एका कोपऱ्यात अश्याच दुर्लक्षित राहिल्या असत्या. पण पद्म सन्मान निवडण्याची प्रक्रिया बदलली गेली आणि आज मंजम्मा जोगाठी जगात प्रसिद्ध झाल्या. राष्ट्रपती भवनात त्यांनी राष्ट्रपतींची काढलेली दृष्ट ही आपल्या समाजाच्या तोंडावर मारलेली एक चपराक आहे. ज्या समाजाने अनेक अत्याचार त्यांच्यावर केले. आज त्याच समाजाच्या सर्वोच्च दालनात, सर्वोच्च व्यक्तीकडून सन्मान घेताना त्यांनी दृष्ट काढून त्यांना चांगल्या आयुष्याचा आशीर्वाद दिला. खरे तर एक प्रकारे समाजाला त्यांनी सांगितलं की निसर्गाने आम्हाला बाकीच्यांसारखं बनवलं नाही म्हणून आम्ही वाईट नाही. आम्ही तुमच्याकडून मिळालेल्या वाईट वागणुकीनंतर सुद्धा तुमचं चांगलं होवो असाच आशीर्वाद देतो.
आज ६० वर्षाच्या असणाऱ्या मंजम्मा जोगाठी यांना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाला माझा कडक सॅल्यूट. आज कुठेतरी असं मनापासून वाटते की धन्य ते भारताचे राष्ट्रपती ज्यांची दृष्ट मंजम्मा जोगाठी यांनी काढली. धन्य ते भारतीय संविधान,लोकशाही आणि भारत सरकार ज्यांनी समाजातील उपेक्षित वर्गाला आज जगापुढे मानाने जगण्याची उर्मी दिली. धन्य तो भारत जो कोणताही जात, धर्म, पंथ आणि लिंग न बघता समाजात बदल घडवणाऱ्या मंजम्मा जोगाठी सारख्या लोकांचा सन्मान करतो.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment