Friday, 17 December 2021

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १५ )... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १५ )... विनीत वर्तक ©

आज फ्रांस च्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले भारतात दाखल होत आहेत. अनेक देशांचे प्रतिनिधी आपल्या देशात येत असतात त्यामुळे त्यात असामान्य असं काही नाही. पण ज्या पद्धतीने सध्या आंतरराष्ट्रीय मंचावर वाऱ्यांची दिशा बदललेली आहे ते बघता फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांची भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे. जागतिक पातळीवर सध्या छुपे आणि उघड अश्या दोन्ही पद्धतीने गटबाजी होताना दिसते आहे. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घडामोडींवर जर आपण नजर टाकली तर ज्या पद्धतीने शह- कटशह दिले जात आहेत त्यामुळे अनेक जागतिक समीकरणं बदललेली आहेत. त्यामुळेच फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांचा भारत भेटीला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. ही भेट इतकी महत्वाची का झाली? या भेटीने भारताला काय मिळणार आहे? जागतिक मंचावर यामुळे काय संदेश जाणार आहे? एकूणच या भेटीने आंतरराष्ट्रीय पटलावर कोणत्या नवीन चाली खेळल्या जाणार आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. 

अचानक फ्रांस आणि भारताच्या संरक्षण मंत्र्याची भेट महत्वाची का झाली हे समजून घ्यायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल. १६ सप्टेंबर २०२१ चा दिवस होता जेव्हा अचानक अमेरिका, युनायटेड किंगडम (इंग्लंड) आणि ऑस्ट्रेलिया यांनी AUKUS (Australia-UK-US) या तीन देशांचा मिळून संरक्षण करार केला. या करारा प्रमाणे अमेरिका ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान हस्तांतरण करून अमेरिका आणि युनायटेड किंगडम मिळून ऑस्ट्रेलियासाठी ८ आण्विक पाणबुड्यांची निर्मिती करणार आहे. या सर्व कराराची किंमत तब्बल ७० बिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात आहे. ( १ बिलियन = १०० कोटी). कोणाच्या ध्यानीमनी नसताना या तीन राष्ट्रांनी चीन च्या इंडो-पॅसिफिक मधील वर्चस्वाला शह देण्यासाठी ऑस्ट्रेलिया सोबत हा करार करत असल्याचं जाहीर केलं. पण या करारामुळे खूप मोठं नुकसान फ्रांस च झालेलं आहे. 

आण्विक पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान पी-५ म्हणजेच सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य देश यांच्याकडे आहे. अमेरिका, फ्रांस, रशिया, चीन आणि युनायटेड किंगडम. अमेरिकेने हे तंत्रज्ञान फक्त युनायटेड किंगडम सोबत १९५८ साली झालेल्या करारानुसार दिलेलं आहे. आता झालेल्या करारामुळे हे तंत्रज्ञान अमेरिकेकडून मिळवणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा देश ठरला आहे. रशिया ने सुद्धा भारताला आण्विक पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान दिलेलं नाही. पण रशियाने आपल्या आण्विक पाणबुड्या भाडेतत्वावर दिल्या आहेत. पी ५ नंतर आण्विक पाणबुड्या चालवणारा भारत हा ६ वा देश होता. (भारताने २००९ साली बनवलेली आय. एन. एस. अरिहंत ही SSBN (nuclear-powered ballistic missile submarine) आहे न की SSN (SSN is a nuclear-powered general-purpose attack submarine) भारताकडे आजमितीला फक्त एकच एस.एस.एन. आहे तर चीन कडे ६ एस.एस.एन. आहेत. भारताची आण्विक पाणबुडी रशियाकडून भाड्यावर घेतलेली आहे. भारत आज ४ आण्विक पाणबुड्यांची निर्मिती करतो आहे पण त्या सर्व SSBN आहेत. त्यामुळेच भारताला चीन च्या वर्चस्वाला शह देण्यासाठी आणि हिंद महासागरावर वचक ठेवण्यासाठी SSN ची अत्यंत गरज आहे. 

ऑस्ट्रेलियाने अमेरिका आणि इंग्लंड सोबत जाण्याने फ्रांस ला खूप आर्थिक आणि राकीय असं दुहेरी नुकसान झालेलं आहे. २०१७ पासून फ्रांस ९० बिलियन अमेरिकन डॉलर किमतीच्या १२ डिझेल- इलेक्ट्रिक पाणबुड्या बनवण्यासाठी प्रयत्न करत होता. ऑस्ट्रेलिया आणि इतर दोन्ही देशांनी फ्रांस ला अंधारात ठेवत एकप्रकारे फ्रांस च्या पाठीमागून वार करत ऑस्ट्रेलिया सोबतचा कराराला केराची टोपली दाखवली आहे. ४ वर्ष फ्रांस मधील अनेक कंपन्या आणि राजकीय नेतृत्वाने हा करार होण्यासाठी अनेक गोष्टी केल्या होत्या आणि पैसा खर्च केला होता पण ते सगळं बुडीत खात्यात जमा झालेलं आहे. फ्रांस या करारामुळे प्रचंड संतापला होता आणि आपला राग त्याने उघडपणे व्यक्त करून दाखवला होता. याचवेळी भारत (SSN :- A nuclear-powered general-purpose attack submarine) तंत्रज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेने आणि रशियाने भारताचे जवळचे सहकारी असूनसुद्धा हे तंत्रज्ञान भारताला देण्याचं नाकारलेलं होतं. हीच संधी फ्रांस ने आता ओळखली आहे. 

एकाचवेळेस अमेरिकेला कटशह आणि आपलं आर्थिक स्तरावरील नुकसान कमीत कमी करण्यासाठी फ्रांस ने भारताला एस.एस.एन. या आण्विक पाणबुडी तंत्रज्ञान देण्याचं गाजर पुढे करण्यासाठी फ्रांस च्या संरक्षण मंत्री तातडीने भारतात दाखल होत आहेत. फ्रांस या भेटीत भारताला प्रोजेक्ट ७५ अल्फा अंतर्गत त्याच्या बाराकुडा या एस.एस.एन. आण्विक पाणबुड्यांच तंत्रज्ञान हस्तांतरण आणि मेक इन इंडिया मार्फत त्या भारतात बनवण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. जर का फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांनी भारतापुढे हा प्रस्ताव ठेवला तर भारत आणि फ्रांस संबंधांना राफेल करारानंतर अधिक मजबुती तर मिळणार आहेच पण त्या पलीकडे दोन्ही देशांसाठी हा करार विन-विन असणार आहे. 

एकीकडे फ्रांस आपल्या चालीने अमेरिकेला कटशह देणार आहे. अमेरिका या करारामध्ये हस्तक्षेप तात्विक दृष्ट्या करू शकणार नाही. अमेरिकेच्या जवळच्या मित्राला म्हणजेच भारताला आण्विक मुद्यावर आपल्या सोबत करून फ्रांस आपल्या आर्थिक आणि राजकीय नुकसानीची भरपाई करू शकणार आहे. भारत हा चीन विरोधी असल्याने एकूणच चीन विरुद्ध क्वाड सोबत भारत-फ्रांस, अमेरिका- ऑस्ट्रेलिया- इंग्लंड हे गट उदयाला येत आहेत. भारताला जर हे तंत्रज्ञान उपलब्ध केलं गेलं तर भारत हिंद महासागरात एक सशक्त नौदल म्हणून अजून सक्षम होणार आहे. तर तिकडे चीन ची डोकेदुखी वाढणार आहे. कारण एकीकडे ऑस्ट्रेलिया तर दुसरीकडे भारताचं नौदल हे सक्षम होणं चीन च्या वर्चस्वाला धक्का देणारं आहे. फ्रांस च्या संरक्षण मंत्र्यांनी याच सोबत भारताला अजून राफेल लढाऊ विमान देण्याचं ही उघडपणे प्रस्ताव दिला आहे. 

“We are open and ready to provide any other Rafales if this is India’s decision" 

France, more than any other country, understands the necessity of the Indian content and we are fully committed to the Make in India initiative as well as to the further integration of Indian manufacturers into our global supply chains,

we are an Indian-Indo-Pacific country and we want to develop a very close multilateral relationship with the neighboring countries. Of course, India is at the centre of this strategy.

 फ्रांस च्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांची ही काल भारतात निघण्यापूर्वी केलेली वक्तव्य पुरेशी बोलकी आहेत. सगळ्याच गोष्टी या उघडपणे बोलल्या जात नाही. बदललेल्या वाऱ्यांचा अंदाज आपण त्या शब्दातून बांधायचा असतो. फ्रांस जरी आपलं तंत्रज्ञान विकण्यासाठी असं बोलत असेल असं मानलं तरी ज्या प्रमाणे ५९,००० कोटी रुपये खर्चून भारतात राफेल च्या येण्याने प्रचंड ताकद भारतीय वायू दलाला मिळाली आहे ते जगातील कोणताही संरक्षण तज्ञ नाकारत नाही. त्याच प्रमाणे बाराकुडा आण्विक पाणबुडी चा करार हा भारतीय नौदलाची ताकद प्रचंड वाढवणारा असणार आहे. त्यामुळेच खारे वारे आता मतलई होऊन वहायला सुरवात झालेली आहे. त्याचे परिणाम काय होतात ते येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईलच. तूर्तास आजच्या भेटीतून आंतरराष्ट्रीय मंचावर भारत-फ्रांस चालीची बीजे रोवली जातील अशी आशा आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



1 comment:

  1. एक नंबर विश्लेषण, भाऊ

    ReplyDelete