Tuesday 7 December 2021

सुरक्षित भारत... विनीत वर्तक ©

 सुरक्षित भारत... विनीत वर्तक ©


काल रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारताला धावती भेट दिली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा किती महत्वपूर्ण होता याच विश्लेषण मी वेगळ्या लेखात करेन पण त्यांच्या भेटीत भारताने ऑफिशियली रशियाकडून एस ४०० या एअर डिफेन्स प्रणाली चे भाग मिळण्यास सुरवात झाली असल्याचं मान्य केलं. एस ४०० भारताने घेऊ नये म्हणून अमेरिकेने भारतावर खूप दबाव टाकला. भारताच्या सुरक्षितेतसाठी त्यांची 'थाड' ही सुरक्षा प्रणाली देण्याचं ही मान्य केलं पण त्यांच्या दबावाला आणि त्यांच्या गाजराला केराची टोपली दाखवून भारताने एस ४०० प्रणाली तब्बल ५.२ बिलियन अमेरिकन डॉलर (३५,००० कोटी रुपये) मोजून खरेदी केली आहे. असं काय आहे या एस ४०० मधे ज्याने पाकिस्तान सारखा शत्रू आता संपल्यात जमा आहे तर चीन संपूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. 


जगातील जवळपास सगळ्या रक्षा प्रणाली च विश्लेषण करणाऱ्या तज्ञांचे एकमत आहे कि एस ४०० आजच्या घडीला जगातील सगळ्यात सर्वोत्तम एअर डिफेन्स प्रणाली आहे. भारताने तीच रशियाकडून खरेदी केली आहे. एस ४०० च्या एका बॅटरी मधे एक लॉँग रेंज रडार, एक टार्गेट ला शोधणारे रडार आणि इतर रडार जी वेगवेगळ्या अंतरावरील लक्ष्याचा शोध घेतात ती असतात त्याचसोबत ती क्षेपणास्त्राचा रस्ता ठरवतात. एस ४०० च्या एका बटालियन मधे ८ लॉन्चर असतात. एका लॉन्चर मधे ४ ट्यूब असतात. (खालील फोटोत आपण ट्यूब बघू शकतो.). एका बॅटरी मधे दोन बटालियन असतात. आता शाळेतील गणित केलं तर आपल्याला समजेल की एका बॅटरी मधे २५६ ट्यूब भारताला मिळालेल्या आहेत. म्हणजे एक बॅटरी जर भारताने पाकिस्तान सिमारेषेवर तैनात केली तर पाकिस्तान च्या हवाई क्षेत्रातील कोणत्याही उडत्या वस्तूचा वेध घेण्यासाठी वेगवेगळ्या अंतरावरील २५६ क्षेपणास्त्र तयार असतील. ही क्षेपणास्त्र कमीत कमी ८०००  किलोमीटर/ तास म्हणजेच ६.३ मॅक वेगाने आपल्या लक्ष्याचा वेध घेतात. तर जास्तीत जास्त हा वेग १७,००० किलोमीटर / तास म्हणजेच १४ मॅक इतका प्रचंड आहे. भारताने अश्या ५ बॅटरी रशिया कडून घेतल्या आहेत. भारत यातील २ पश्चिम सरहद्दीवर तर ३ पूर्व सरहद्दीवर तैनात करणार आहे असं म्हंटल जाते. याचा अर्थ ५१२ वेगवेगळी मिसाईल पाकिस्तान साठी तर ७६८ वेगवेगळी मिसाईल चीन कडे नजर ठेवून असणार आहेत. भारताने रशियाकडून कोणत्या प्रकारची किती क्षेपणास्त्र आणि याशिवाय वेगळी किती क्षेपणास्त्र घेतली आहेत हे क्लासिफाईड आहे. 


एस ४०० ची प्रत्येक बॅटरी एका वेळेस ३६ लक्ष्यांवर एकाचवेळी हल्ला करण्यास सक्षम आहे. पाकिस्तान ने अगदी ७२ 'एफ १६' एकत्र भारताच्या दिशेने पाठवली तरी त्या सगळ्यांना एकाचवेळेस ढगात पाठवायला एस ४०० च्या या दोन बॅटरी सक्षम असतील. एस ४०० मधील ४०० चा अर्थ आहे की यातील क्षेपणास्त्र ४०० किलोमीटर अंतरावर कोणत्याही लक्ष्याचा वेध घेऊ शकतात. पण याचं रडार ६०० किलोमीटर अंतरावरील हवेत उडणारी कोणतीही वस्तू टिपण्यास सक्षम आहे. म्हणजेच पाकिस्तान च्या संपूर्ण हवाई क्षेत्रावर उडाण भरणारं ड्रोन, लढाऊ विमान, मिसाईल हे धावपट्टी सोडताच भारताच्या एस ४०० ने टिपलेलं असणार आहे. हे रडार इतकं सक्षम आहे की उडणारी वस्तू कोणत्या मार्गाने जाणार आहे याचा संपूर्ण लेखाजोखा भारताकडे तयार असणार आहे. उडाण केललं लक्ष्य  ४०० किलोमीटर वर येताच एस ४०० चे मिसाईल हे सूचना मिळताच गुप्त ठिकाणाहून पाकिस्तान च्या कोणत्याही हवाई लक्ष्याला पाकिस्तान च्या डोक्यावर पाडण्यास सक्षम आहे. एस ४०० चे मिसाईल इतक्या वेगाने प्रवास करतात की लक्ष्याला भेदण्यासाठी ते कायनेटिक एनर्जी चा वापर करतात. या प्रचंड वेगामुळे त्यांच्या हल्याची ताकद इतकी जबरदस्त असते की एका क्षणात लक्ष्य बेचिराख होते. भारताचं ब्राह्मोस क्षेपणास्त्र ही याच तत्वावर आधारित आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि त्याचे अणुबॉम्ब आता अंडी उबवण्यासाठी कामाला येणार आहेत. 


चीन ने भारताविरुद्ध एस ४०० प्रणाली तिबेट मधे तैनात केलेली आहे. आता भारत त्यांच्या विरुद्ध ३ एस ४०० च्या बॅटरी तैनात करणार आहे. चीन हा एम.टी.सी. आर. चा सदस्य नसल्याने त्याच्या एस ४०० ची क्षमता ही २९० किलोमीटर पर्यंत मर्यादित आहे. तर भारत त्याचा सदस्य असल्याने भारताचं एस ४०० हे ४०० किलोमीटर पर्यंत जाऊ शकणार आहे. त्यामुळे भारताचं एस ४०० हे जास्ती सक्षम आहे. चीन राफेल च्या येण्याने आधीच चाचपडत होता. आता राफेल विथ एस ४०० हे कॉम्बिनेशन चीनसाठी प्रचंड डोईजड ठरणार आहे. चीन चे तिबेट मधील हवाई तळ हे खूप उंचीवर आहेत. त्यामानाने भारताचे हवाई तळ हे मैदानी आहेत. खूप उंचीवर असल्याने चीन चे जे.एफ. १७, जे २० सारखं लढाऊ विमान जास्ती वजन घेऊन उड्डाण भरू शकत नाहीत. त्यामुळेच राफेल इकडे चीन च्या 'जे २०' पेक्षा वरचढ ठरतात हे चीन जाणून आहे. त्यात एस ४०० च्या येण्याने चीन चे तिबेट मधील सर्व हवाई तळ भारताच्या टप्यात येणार आहेत. एस ४०० ही प्रणाली अवघ्या ५ मिनिटात तैनात करता येते. याची ट्यूब कुठेही ट्रकवरून नेले जाऊ शकतात. तसेच ही सर्व प्रणाली मोबाईल आहे. याचा अर्थ शत्रूला याचा मोगावा घेणे अतिशय कठीण आहे. याच रडार एकीकडे तर ट्यूब दुसरीकडे तैनात करून शत्रूला न कळता त्याचा खात्मा केला जाऊ शकतो. यामुळेच चीन बॅकफूटवर तर पाकिस्तान संपूर्णपणे आडवा झालेला आहे. 


एस ४०० , राफेल, आपाचे-चिनुक त्याच्या जोडीला इस्राईल कडून घेतलेले लेझर गायडेड बॉम्ब, ड्रोन आणि ब्राह्मोस मिसाईल हे सगळं भारताच्या दोन्ही शत्रूंसाठी डोकेदुखी तर भारताला अधिक सुरक्षित करणार ठरलेलं आहे. पाकिस्तान तर संपूर्णपणे शेपूट गुंडाळून भुंकण्याशिवाय काही करू शकणार नाही तर चीन च्या गळ्यात भारताने साखळी बांधली आहे. त्यामुळे भारत दोन्ही बाजूने सुरक्षित बनला असं म्हंटल तर ते चुकीचं ठरणार नाही. रशिया चे राष्ट्रपती अवघ्या ६ तासांसाठी लगबगीने भारतात का आले? या का च उत्तर एस ४०० आहे. त्या पलीकडे एस ५०० असणार आहे. भारत एस ५०० प्रणाली घेणारा पहिल राष्ट्र असणार आहे अशी जोरदार चर्चा आहे. पण भारताने यावर तूर्तास काहीही अधिकृत भाष्य केलेलं नसलं तरी एस ४०० च्या येण्याने भारताने हवाई सुरक्षिततेच्या बाबतीत एक मोठा टप्पा गाठला आहे हे जगाला समजलेलं आहे.  

 

जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :-  गुगल


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



3 comments:

  1. खुप खुप आभार अगदी सहज समजेल असं लिहिल्या बद्दल

    ReplyDelete