Saturday 4 December 2021

४ डिसेंबर १९७१... विनीत वर्तक ©

 ४ डिसेंबर १९७१... विनीत वर्तक ©

संपूर्ण जगाच्या सैन्य इतिहासात पाकीस्तान इतकी अब्रू कोणाची लुटली गेली नसेल. १६ डिसेंबर १९७१ हा तो दिवस होता ज्या दिवशी तब्बल ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्कारली. कोणत्याही युद्धात इतक्या मोठ्या प्रमाणावर सैनिकांनी शरणागती पत्करण्याचं दुसरं उदाहरण सापडत नाही. आजही पाकीस्तानला हा दिवस काट्याप्रमाणे टोचतो. पण त्या ९३,००० सैनिकांनी शरणागती पत्करण्यामागे कारण होत भारतीय सैनिकांचा पराक्रम, त्यांनी आपल्या देशासाठी दिलेलं बलिदान. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी आपल्या रक्ताचे पाट त्यांनी वाहिले. त्यामुळेच भारताला अभूतपूर्व विजय १९७१ च्या युद्धात मिळाला. येत्या काही दिवसात या पराक्रमाला जवळपास ५० वर्ष पूर्ण होत आहेत. ज्या सैनिकांनी आपलं बलिदान या विजयासाठी दिलं त्यांचा पराक्रम मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाला. असेच एक शूरवीर, पराक्रमी भारतीय सेनेचे ऑफिसर जे मराठी होते त्यांनी आजपासून बरोबर ५० वर्षापूर्वी या युद्धात आपलं बलिदान दिलं. त्यांच नाव होतं 'मेजर श्यामाकांत गजानन केळकर'. 

मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांची नियुक्ती भारतीय सेनेचं ट्रेनिंग पूर्ण केल्यावर ५ गोरखा रायफल ज्याला फ्रंटिअर फोर्स असेही म्हंटल जाते. या रेजिमेंटची ख्याती संपूर्ण जगात पसरलेली आहे. गोरखा सैनिकांबद्दल बोलताना फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ एकदा म्हणाले होते, 

"If a man says he is not afraid of dying, he is either lying or is a Gorkha",  

साक्षात मृत्यूला न घाबरणार कोणी असेल तर तो गोरखा रेजिमेंट चा असला पाहिजे. १८५८ मधे स्थापना झालेल्या या रेजिमेंटला खूप मोठा इतिहास आहे. यातील प्रत्येक सैनिकाने भारताच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं आहे. १९७१ च युद्ध सुरु झाल्यावर सिल्हेट (ज्याला आता राजगुरू नगर असं म्हणतात.) हा भाग सध्याच्या बांग्लादेशच्या उत्तर-पूर्वी भागात येतो. युद्धात पाकिस्तानी सैनिकांनी इकडे ठाण मांडलं होतं. कारण इकडे एकदा कब्जा केला की खूप मोठ्या भूभागावर भारताला नियंत्रण मिळणार होतं. हे पाकिस्तानी सैन्याला माहित असल्याने त्यांनी इकडे खूप मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, बंदुकी, सैनिक यांचा बंदोबस्त करून एखाद्या किल्ल्याप्रमाणे अभेद्य तटबंदी उभी केली होती. ज्याला खिंडार पडण्याचा प्रयत्न भारतीय सेनेच्या ६ राजपूत बटालियन ने केला पण त्यांना त्यात अपयश आलं होतं. या अभेद्य तटबंदीला खिंडार पाडण्याची जबादारी मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांना देण्यात आली. 

मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांना चांगलं माहित होतं की शत्रू सावध आहे. त्याला आपण हल्ला करणार याची जाणीव आहे. त्याच्याकडे दारुगोळा मोठ्या प्रमाणात आहे. पण घाबरतील ते गोरखा कसले. मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांच्या नेतृत्वाखाली ५ गोरखा रेजिमेंट चे पराक्रमी सैनिक ४ डिसेंबर १९७१ ला या पाकिस्तान च्या तटबंदी वर चाल करून गेले. भारताच्या सैनिकांनी पाकिस्तान च्या २२ बलुच रेजिमेंट ला पाणी पाजलं. भारताच्या पराक्रमी सैनिकांपुढे पाकिस्तानी सैनिकांची त्रेधातिरपीट उडाली. आपला पराभव होतो आहे दिसताच पाकिस्तानी सैन्य नेहमीप्रमाणे शेपूट घालून पळून गेलं आणि भारतीय तिरंगा सिल्हेट च्या गाझीपूर वर फडकला. गड आला पण भारताने आपला सिंह गमावला. या युद्धात मेजर श्यामाकांत गजानन केळकर आणि त्यांचे १० पराक्रमी सैनिक हुतात्मा झाले. तर अजून ४ ऑफिसर, २ जे.सी.ओ., ५७ इतर सैनिक जखमी झाले. 

मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज या घटनेला ५० वर्ष उलटत आहेत. त्यांच्या या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार. 

मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मेजर श्यामाकांत गजानन केळकर यांच्या कन्या मधुजा गोरे माझ्या वाचक आहेत. त्यांनी मला त्यांच्या वडिलांविषयी, त्यांच्या पराक्रमविषयी लिहण्याची संधी दिली त्यांचा मी व्यक्तिशः आभारी आहे. तसेच आज ४ डिसेंबर च्या निमित्ताने माझ्या सोबत समस्त भारतीय आपल्या वडिलांनी भारतासाठी दिलेल्या बलिदानासाठी आपले ऋणी आहोत. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



3 comments:

  1. very proudly & your real good skill writing ,thanks Hare Krishna.

    ReplyDelete
  2. हे सगळच खुप ग्रेट आहे.तुमचे ब्लॉग मी नेहमी वाचते.खुप छान लिहिता तुम्ही ,असे प्रसंग वाचून प्रेरणा मिळते.

    ReplyDelete
  3. असे कितीतरी unsung heroes असतील ज्यांच्याबद्दल जगाला काही माहिती नसेल.आपल्याला फक्त गांधी आणि नेहरुबद्दलाच सांगितलं जातं. मेजर केळकरांच्या चरणी शत शत प्रणाम.

    ReplyDelete