Saturday, 18 December 2021

कोरोना वेशीवर आहे... विनीत वर्तक ©

 कोरोना वेशीवर आहे... विनीत वर्तक ©


लहानपणी मी साईबाबा च्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट बघितला होता. त्यातील एक प्रसंग असा होता की गावाच्या वेशीवर साईबाबांनी दिलेल्या गव्हाच्या पीठाने सीमा आखलेली असते. त्याच्या आत असणारी लोकं साथीच्या रोगाने सुरक्षित राहतात आणि जे लोकं ओलांडत त्यांना त्याची लागण होते. हा प्रसंग आठवायचं कारण म्हणजे तशीच परिस्थिती सध्या जागतिक पातळीवर बघायला मिळते आहे. पण या गोष्टी जागतिक मिडिया आणि भारतीय मिडिया जाणीवपूर्वक बाजूला ठेवतं आहेत. कारण हाच मिडिया होता जो भारतातील कोरोना च्या दुसऱ्या लाटेतील रोजची आकडेवारी ओरडून, कोकलून सांगत होता. मग आज जेव्हा परिस्थिती उलट आहे तेव्हा हाच मिडिया गप्प बसलेला आहे. 


गेल्या काही आठवड्यात ओमिक्रोन या कोरोना विषाणू च्या नव्या अवताराने संपूर्ण जगात खळबळ माजवलेली आहे. अजूनही या नव्या अवताराबाबत वैज्ञानिक आणि डॉक्टर यांना योग्य अंदाज आलेला नाही. नक्कीच याचा संक्रमण वेग अतिशय जलद असला तरी याने मृत्युमुखी पडण्याची शक्यता अतिशय कमी आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की अजून यावर अभ्यास सुरु आहे. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढणं योग्य राहणार नाही. पण तरीसुद्धा जे आकडे दर्शवत आहेत त्यानुसार हे ढोबळ अनुमान आहे. ओमिक्रोन चा शिरकाव भारतात जरी झाला असला तरी त्याचा संक्रमण वेग सध्यातरी कमी प्रमाणात भारतात दिसून येतो आहे. सध्या जागतिक आकडे बघितले तर भारत अतिशय चांगल्या स्थितीत आहे. अर्थात या गोष्टी काही दिवसात उलट- सुलट होऊ शकतात हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 


जेव्हा भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसाला साधारण ४ लाख रुग्ण दाखल होत होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय मिडिया ने अक्षरशः ओरडून ओरडून भारताच्या एकूणच वैद्यकीय, राजकीय, लोकांबद्दल आणि भारतीयांबद्दल जागतिक मंचावर अप्रचार केला होता. एकवेळ तर अशी होती की भारतच कोरोनाच केंद्र असेल आणि सगळ्या जगाला कोरोना विषाणू चा प्रसार हा भारतीयांकडून केला जाईल इथवर ही अनेक चर्चा केल्या गेल्या. पण भारताने ज्या पदतीने परिस्थिती सांभाळली त्याच कौतुक तर सोडाच पण त्याबद्दल काही शब्द बोलण्यास ही हीच लोक तोंड काळ करून बाजूला झाली आहेत. 


आज परिस्थिती अशी आहे की भारतातील कोरोना बाधित रुग्णसंख्या ही अवघी ८३,९१३ आहे. याच वेळी अमेरिका १ कोटी ३ लाख, युनायटेड किंग्डम १३ लाख ९० हजार, रशिया ९ लाख ३८ हजार, फ्रांस- जर्मनी - ९ लाख ५० हजार आणि युरोपातील इतर अनेक देश तसेच भारताच्या शेजारी असणारे अनेक देश हे लाखांच्या वर रुग्णसंख्या नोंदवत आहेत. भारताची आणि इतर देशांची लोकसंख्या लक्षात घेतली तर हा फरक अजून लक्षणीय आहे. त्यामुळेच वर लिहलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. आजची परिस्थिती सांगण्याचं धारीष्ट ना भारतीय मिडियाकडे आहे ना भारताचा द्वेष करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिडियाकडे. भारतात या नव्या आवृत्ती चा प्रसार इतका हळू का आहे? याच उत्तर तज्ञ आणि डॉक्टर सांगू शकतील. पण यामागे भारतात झालेल्या लसीकरणाचा ही  भाग मोठा आहे हे निश्चित. 


हे सगळं मांडण्याचं कारण मोठेपणा हा नाही तर आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्यातून सावध होण्याचा आहे. आज आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत पण ही स्थिती बदलायला वेळ लागणार नाही हे पण तितकं खरं आहे. लसीकरण करून घेणं हे जितकं महत्वाचं आहे तितकच कोरोना संबंधी ज्या सूचना आपण पाळत होतो त्याची पुन्हा एकदा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. याची सुरवात आपल्यापासून करावी लागणार आहे. रात्र वैऱ्याची आहे. आपल्या आजूबाजूला थैमान सुरु आहे. आज बाहेर असलेली साथ कधीही आपल्या घरात येऊ शकते. तेव्हा त्यासाठी आपण तयार राहण्याची गरज आहे. मागच्या वेळेपेक्षा आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने याचा मुकाबला करत आहोत आणि करू शकणार आहोत पण त्यासाठी आपण सज्ज होण्याची गरज आहे. 


आपल्या वैद्यकीय कुटुंबाने मग ते डॉक्टर, नर्सेस, इतर वैद्यकीय स्टाफ, केंद्र आणि राज्य सरकार, पोलीस, इतर सामाजिक संस्था यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा आधीही उचलला होता आणि आताही उचलतील पण त्यांना कमीतकमी ताण देण्याची जबाबदारी आपली आहे. आंतरराष्ट्रीय मिडिया किंवा भारतीय मिडिया यांना आपल्या देशाचा अपमान करण्याची संधी न देण्याचीही जबाबदारी आपली आहे. तेव्हा आपली जबाबदारी ओळखून एक चांगले जबाबदार नागरिक आपण बनूया कारण कोरोना वेशीवर आहे......... 


जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :-  गुगल


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




1 comment:

  1. विनीत तू जे सांगतोस ते खूप छान सांगतो अणि मुद्देसुद सांगतो. पण एवढ वाचणारे फार कमी आहेत अनित तुझे विचार फार कमी लोकांन पर्यंत पोहोचतात. तू तुझे YouTube channel बनव आणि व्हिडिओ मधून ह्या सगळया गोष्टी पुढे आण. अशी माझी तुला विनंती आहे

    ReplyDelete