मराठवाड्याचे डब्बे... विनीत वर्तक ©
Tuesday, 29 December 2020
मराठवाड्याचे डब्बे... विनीत वर्तक ©
Sunday, 27 December 2020
'रतन टाटा' एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व… विनीत वर्तक ©
'रतन टाटा' एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व… विनीत वर्तक ©
२१ जानेवारी २००७ ला दिल्ली च्या कार एक्स्पो मध्ये टाटा नॅनो च अनावरण करताना भावनिक होऊन रतन टाटा म्हणाले होते,
“A Promise is a Promise”
पावसाळ्यात स्कुटर वरून आपल्या कुटुंबाला नेताना एका माणसाला बघून रतन टाटा मनातून अस्वस्थ झाले. प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या भारतातील आज अशी अनेक कुटुंब आहेत जी सुरक्षितरित्या प्रवास करू शकत नाहीत. रतन टाटा ह्यांनी मनातून ठरवलं की आपण अश्या लोकांसाठी काय करू शकतो? त्यांनी ठरवलं की आपण अशी कार बनवायची की जी भारतातील मध्यमवर्ग खरेदी करू शकेल. १ लाखात कार देण्याचं आपलं वचन त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं ते फक्त आणि फक्त भारतीयांसाठी. टाटा नॅनो ने टाटा ला कधीच फायदा दिला नाही ( २०१९ मध्ये टाटा नॅनो ची एकही कार ऑर्डर नसल्यामुळे तयार केली गेली नाही. ) उलट टाटा ग्रुप ला ह्या प्रकल्पामुळे खूप नुकसान उचलावं लागलं पण रतन टाटा ह्यांनी आपला दिलेला शब्द पाळला.
१९९८ मध्ये रतन टाटा नी भारतात 'इंडिका' कार आणली. पण ही कार लोकांच्या पसंतीस उतरली नाही. कार क्षेत्रातून टाटा नी मागे फिरावं हा सल्ला अनेकांनी रतन टाटांना दिला. हा सल्ला ऐकून रतन टाटा अमेरीकेतील डेट्रॉईट इकडे आपली कंपनी विकण्यासाठी अमेरीकेच्या फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले होते. ह्या मिटिंग मध्ये फोर्ड चे अध्यक्ष बिल फोर्ड ह्यांनी रतन टाटांचा अपमान केला. बिल फोर्ड म्हणाले होते,
"तुम्हाला ह्या कार बिझनेस मधलं कळत नसताना कशाला ह्यात उतरतात, ही कंपनी जर आम्ही विकत घेतली तर आम्ही तुमच्यावर उपकार करू".
बिल फोर्ड ह्यांचे शब्द रतन टाटांना खुप लागले. भारतात परतल्यावर त्यांनी इंडिका विक्रीचा आपला विचार रद्द केला आणि इंडिका ला भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिलं. रतन टाटांनी आपली कंपनी न विकता लहान गाड्यांच्या उत्पादनात खुप मोठी मजल मारली. बरोबर दहा वर्षानंतर काळाचे फासे उलटे पडले. २००८ साली आता फोर्ड कंपनी आर्थिक गटांगळ्या खात होती. टाटा ग्रुप ने त्यांचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड खरेदी करण्यात उत्सुकता दाखवली. फोर्ड कंपनीला पैश्याची प्रचंड गरज होती. आता तेच बिल फोर्ड अमेरीकेतून मुंबईत 'बॉम्बे हाऊस' ह्या टाटा ग्रुप च्या मुख्यालयात आपली कंपनी विकण्यासाठी दाखल झाले. टाटा ग्रुप ने जगात अतिशय नावाजलेले आणि प्रतिष्ठा असणारे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड तब्बल २.३ बिलियन अमेरीकन डॉलर ( ९३०० कोटी रुपये) देऊन खरेदी केले. बिल फोर्ड ह्यांनी जरी आपली पायरी सोडली असली तरी रतन टाटांनी आपली पायरी एक पाऊल उंचावर नेताना त्यांचा अपमान केला नाही. रतन टाटांनी न बोलता बिल फोर्ड ह्यांनी केलेल्या अपमानाचा बदला आपल्या कृतीतून घेतला. त्या वेळेस बिल फोर्ड रतन टाटांना म्हणाले होते,
"आज जॅग्वार आणि लँड रोव्हर हे ब्रँड विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार केले."
एकेकाळी ब्रिटिशांनी आपला चहा जगभर नेला. चहाची ओढ पूर्ण जगाला लावणाऱ्या ह्या चहाच्या निर्मितीची सूत्र ब्रिटिशांकडे होती. टेटली हा ब्रँड युरोप ,कॅनडा प्रथम क्रमांकाचा तर अमेरीकेत दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड होता. भारताला एकेकाळी हिणवणाऱ्या ब्रिटिशांच्या हातातून टाटा ग्रुप ने तब्बल २७१ मिलियन पौंड मोजत २००० साली ह्या ग्रुप ची मालकी आपल्याकडे घेतली. आज टाटा ग्लोबल बेव्हरेजेस जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. २००७ मध्ये टाटा स्टील ही जगात स्टील चं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये ५६ व्या स्थानावर होती. आपल्यापेक्षा ४ पट मोठ्या असणाऱ्या डच कंपनी 'कोरस' ला टाटा ग्रुप ने ८.१ मिलियन डॉलर ला खरेदी केलं. संपुर्ण भारताच्या जेवणाला चव आणणाऱ्या आयोडीन युक्त मिठाची सुरवात टाटांनी केली. भारतातील मिठाची उलाढाल २२ बिलियन रुपयांची आहे. त्यातील १७% हिस्सा टाटांचा आहे. ज्या वेळेस कॉम्प्यूटर ची पायमुळ भारतात रोवली नव्हती त्यावेळेस १९६८ साली टी. सी. एस. ची स्थापना टाटांनी केली. आज जगातील पहिल्या ४ आय. टी. कंपन्यांमध्ये तिची गणना होते. ३.५ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि ८० बिलियन डॉलर इतक मार्केट कॅपिटल असणारी टी. सी. एस. भारतातील अग्रणी आय.टी. कंपनी आहे.
वय वर्ष २१ ज्या काळात एका नवीन स्वप्नांची सुरवात होते त्या काळात रतन टाटा ह्यांच्या खांद्यावर टाटा ग्रुप ची जबाबदारी आली. पुढल्या अडीच दशकात रतन टाटा नी टाटा ग्रुप च नाव फक्त भारतापुरता मर्यादित ठेवलं नाही तर त्याला जागतिक बनवलं. रतन टाटा ह्यांनी जगातील नावाजलेले ब्रँड टाटा ग्रुप च्या पंखाखाली आणले आहेत. ज्यामध्ये टेटली, जॅग्वार, लँड रोव्हर, कोरस अश्या जगातील नावाजलेल्या ब्रँड चा समावेश आहे. त्यांच्या हाताखाली टाटा ग्रुप चा नफा तब्बल ५०% नी वाढला. आज टाटा ग्रुप कंपनीची उलाढाल १०६ बिलियन अमेरीकन डॉलर च्या घरात आहे. टाटा ग्रुप मध्ये सद्य घडीला ७ लाख ५० हजार पेक्षा जास्ती लोक जगभर काम करतात. मिठापासून ते कॉम्प्युटर आणि हॉटेल पासून ते कार पर्यंत प्रत्येक क्षेत्रात टाटांचा दबदबा आहे. धंदा करून नुसता नफा न मिळवता आपल्या कर्तृत्वाने रतन टाटांनी टाटा ह्या शब्दाला वजन प्राप्त करून दिलं आहे. आज अब्जावधी रुपयांच साम्राज्य असताना सुद्धा रतन टाटांनी जोडलेली माणसं आणि विश्वास टाटा ब्रँड ला एक वेगळं वलय प्राप्त करून देतो. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,
“I have tried to treat all people equally. Whether it’s a poor person on the street or a kid selling magazines as against a millionaire or a billionaire, I talk to them and treat them all the same way. I'm aware that I do that, and I do that not for show, but because of the feeling that I think everyone deserves recognition as a human being.”
TIFR, Tata Memorial Hospital, TISS, IIS ह्या आणि अश्या अनेक संस्था टाटानी स्थापन केलेल्या आहेत. ज्यांचा आजचा भारत घडवण्यात खुप मोठं योगदान आहे. ३०,००० पेक्षा जास्ती रुग्ण प्रत्येक वर्षी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये कॅन्सर वर उपचार घेतात. ह्यातील तब्बल ७०% रुग्णांवर फुकट उपचार केले जातात. टाटा कंपन्यांची जवळपास ६६% मालकीहक्क हा वेगवेगळ्या ट्रस्ट कडे आहे. टाटांना होणाऱ्या वार्षिक ७ बिलियन अमेरिकन डॉलर चा फायदा हा ह्याच ट्रस्ट मार्फत भारताच्या कल्याणासाठी वापरला जातो. आज भारत कोरोना शी लढा देताना चाचपडत असताना रतन टाटा आणि टाटा ग्रुप पुन्हा एकदा भारतीयांसाठी भक्कमपणे उभा राहिला आहे. टाटा ग्रुप ने सगळ्यात आधी १५०० कोटी रुपयांची मदत कोरोना शी लढण्यासाठी भारतीयांना दिलेली आहे.
रतन टाटा आज निवृत्त झाले असले तरी भारत आणि भारतीयांच्या बुद्धिमत्तेला उंच भरारी घेण्यासाठी मदत करण्यात सगळ्यात पुढे आहेत. जवळपास २४ स्टार्ट अप व्यवसायांना उभं राहण्यासाठी रतन टाटांनी मदत केली आहे. काहीतरी नवीन आणि जगावेगळं करण्यासाठी आसुसलेल्या अनेक कल्पनांना रतन टाटा आपल्या परीने उडण्यासाठी पंखांच बळ देत आहेत. माणूस श्रीमंत होतो तो पैसे कमावून पण मनाची श्रीमंती पैश्याने विकत घेता येतं नाही. ती आपल्या कर्तृत्वातून कमवावी लागते आणि माझ्या मते रतन टाटा सारखं भारतीयांच्या मनाची श्रीमंती कमावलेला दुसरा कोणता उद्योगपती नसेल. २००० साली पदमभूषण तर २००८ साली पदमविभूषण देऊन भारत सरकारने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे. माझ्या मते भारताचा सर्वोच्च सन्मान रतन टाटा ह्यांना दिला तर त्या सन्मानाचा गौरव होईल इतकं मोठं कर्तृत्व रतन टाटा ह्यांच आहे.
“I dream of an India that would be an equal opportunity country – a country where we diminish the disparity between the rich and the poor and, most importantly, give an opportunity to anyone to succeed as long as they have the willingness and endurance to do so.”
Ratan Tata
आज त्यांचा ८३ वा वाढदिवस आहे. आजच्या दिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या कर्तुत्वाला ह्या भारतीयाकडून एक कडक सॅल्यूट.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
Thursday, 24 December 2020
आपण सुरक्षित आहोत का?... विनीत वर्तक ©
आपण सुरक्षित आहोत का?... विनीत वर्तक ©
१५ फेब्रुवारी २०१३ चा दिवस होता. जगात सगळचं सुरळीत सुरु होतं. अचानक चेल्याबिन्स्क, रशिया मध्ये सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी आकाशात आगीचा एक गोळा वेगाने पृथ्वीकडे झेपावला. आयफेल टॉवर पेक्षा जास्ती वजनाचा आणि साधारण २० मीटर चा व्यास असलेला तो गोळा पृथ्वीच्या आकाशात ३० किलोमीटर वर फुटला आणि पृथ्वीकडे त्याचे तुकडे वेगाने झेपावले. त्या गोळ्याच तेज सूर्यापेक्षा प्रखर होत आणि त्या तेजात चेल्याबिन्स्क, रशिया मधील त्या भागाचा आसमंत उजळून निघाला. काय होते आहे आहे कळायच्या आत ते तेज पृथ्वीच्या वातावरणात नष्ट झालं. पुन्हा एकदा काही घडलं नाही ह्या आवेशात पृथ्वी वरील व्यवहार सुरु झाले. पण अगदी काही वेळाने एक जबरदस्त शॉक व्हेव चा तडाखा तिथल्या घरांना बसला. त्या तडाख्यात तिथल्या घरांच्या सगळ्या काचा उध्वस्थ झाल्या, जवळपास १००० पेक्षा जास्ती घरांच्या भिंती कोसळल्या आणि १५०० पेक्षा जास्त लोक ह्यात जखमी झाले. तो आगीचा तेजस्वी गोळा म्हणजेच चेल्याबिन्स्क उल्कापात.
चेल्याबिन्स्क उल्कापात होई पर्यंत जगातील कोणत्याही उपग्रहाला अथवा नासा, स्पेस एक्स, इसरो, चीन, युरोपियन युनियन, जॅक्सा, खुद्द रशिया च्या अवकाश यंत्रणेला ह्याची पुसटशी कल्पना पण आली नव्हती. ह्या घटने नंतर अवकाश क्षेत्रात पुन्हा एक प्रश्न ऐरणीवर आला तो म्हणजे आपण सुरक्षित आहोत का? कारण अवकाशात मुक्तपणे संचार करणाऱ्या ह्या लघुग्रहांबद्दल आपल्याला असलेली माहिती ही किती तोकडी आहे हे ह्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं. १९८८ पासून साधारण १२०० अशनी ज्यांचा आकार एक मीटर पेक्षा मोठा होता ते पृथ्वीवर आदळले आहेत. त्यातल्या फक्त ५ अशनी बद्दल जगातील यंत्रणा आधी सांगू शकलेल्या आहेत. ह्या ५ मधील एकही अशनी असा नव्हता ज्याला आपण २४ तासापेक्षा आधी ओळखू शकलो अथवा तो कुठे आदळणार ह्या बद्दल आखाडे बांधू शकलो होतो. वरील आकडे लक्षात घेतले तर कोणालाही लक्षात येईल की पृथ्वीवर अवकाशातून कोणता लघुग्रह आदळणार आहे? त्याचा आकार कसा? त्याने किती हानी होईल? त्याची ह्याविषयी माहित देणार २१ व्या शतकातील कोणतीच यंत्रणा सध्यातरी अस्तित्वात नाही.
लघुग्रहांची निर्मिती आपली सौरमाला जन्माला येताना झाली. आपल्या सौरमालेतील ग्रह बनत असताना ग्रह बनले पण त्याच सोबत काही भाग एकत्र येऊन ग्रहांची निर्मिती करू शकला नाही. हाच तो भाग ज्यातून लघुग्रहांचा एक पट्टा तयार झाला. हा पट्टा आपल्या सौरमालेत मंगळ आणि गुरु ग्रहाच्या मध्ये सामावलेला आहे. ह्याच पट्यातून काही लघुग्रह गुरुत्वाकर्षणामुळे सौर मालेच्या आतल्या भागात खेचले जातात आणि मग त्यांची कक्षा जर का पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ आली तर पृथ्वीकडे खेचले जातात आणि त्यांची टक्कर पृथ्वीशी होते. कोणत्याही लघुग्रहांची कक्षा आपल्याला समजण्यासाठी त्यांच आकलन होणं गरजेचं असते. ह्यासाठी आकाशाचा वेध वेगवेगळ्या काळात घेतला जातो. एकाच ठिकाणची अनेक छायाचित्र एकत्र केली की एखादी वस्तू जर आपली जागा बदलत असेल तर त्यात दिसते आणि मग त्या बदलण्याच्या परिघावरून त्याच्या कक्षेच गणित केलं जाते. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं शक्य होते जेव्हा हे लघुग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या पलीकडे असतील. कारण तेव्हाच सूर्याचा प्रकाश ह्या लघुग्रहांवर पडतो आणि तेव्हा आपण त्यांचा पृथ्वीवर वेध घेऊ शकतो. ह्यामुळे आपण फक्त १५% आकाश धुंडाळू शकतो. ह्याचा अर्थ ८५% अवकाशात कोण कुठे परिक्रमा करते आहे ह्याचा आपल्याला काहीच अंदाज नाही.
समजा आपण एखाद्या लघुग्रहाची कक्षा त्याचा अभ्यास करून नक्की केली तरी ती तशीच राहील ह्याचा काहीच नेम नाही. हे लघुग्रह काही मीटर ते किलोमीटर व्यासाचे असतात आणि ह्यांच्यावर सूर्यासह, पृथ्वी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र अश्या सगळ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पडत असतो. अगदी चंद्रासारखे उपग्रह सुद्धा एखादया लघुग्रहावर आपला प्रभाव पाडू शकतात. ह्याचा सरळ अर्थ म्हणजेच लघुग्रह कधी कसे आपली कक्षा बदलतील ह्याचा अंदाज बांधण जवळपास अशक्य आहे. जे लघुग्रह आकाराने मोठे आहेत त्यांचा अंदाज आपण बांधू शकतो पण जे लघुग्रह काही मीटर व्यासाचे आहेत म्हणजे साधारण १ किलोमीटर व्यासापेक्षा लहान असलेले त्यांचा काहीच अंदाज आपल्याला नाही कारण त्यांच अस्तित्व विश्वाच्या ह्या पसाऱ्यात इतकं सुक्ष्म आहे की आपण त्यांचा शोध घेऊ शकत नाही. अर्थात ह्या लहान लघुग्रहांच्या टकरीमुळे मानवजातीच अस्तित्व नष्ट होणार नाही. पण एखाद्या शहराचं किंवा देशाचं अस्तित्व संपवून टाकण्या इतपत ही टक्कर नक्कीच संहारक असेल.
आपण अशी एखादी टक्कर टाळू शकतो का? तर सध्या तरी ह्याच उत्तर नाही असं आहे. पृथ्वी च्या दिशेने येणारा एखादा लघुग्रहाला आपण क्षेपणास्त्र अथवा आण्विक बॉम्ब टाकून त्याची कक्षा अथवा रोख बदलू शकतो असं अनेकजण म्हणत असले तरी ते अशक्य आहे. एकतर अश्या एखाद्या काही मीटर लघुग्रहाची कक्षा ठरवून त्याचा अवकाशात वेध घेणं कठीण आहे. समजा आपण त्याचा वेध घेतला तरी ह्या स्फोटामुळे त्याचे तुकडे होतील पण गुरुत्वाकर्षणामुळे पुन्हा एकदा हे तुकडे एकसंध होतील आणि समोरून येणार संकट टाळता येणं कठीण आहे. जरी त्याचे तुकडे होऊन ते पृथ्वीवर आदळले तरी त्याची तीव्रता काही अंशी कमी होईल पण आपण टक्कर मात्र अडवू शकत नाही. त्यांचा मार्ग बदलण्याचे जे काही पर्याय आज आपल्यासमोर आहेत ते त्याच्या अफाट वेग आणि कायनेटिक शक्तीपुढे फिके आहेत.
आज मानव कितीही प्रगत झाला तरी अवकाशातून येणाऱ्या आस्मानी संकटाची चाहूल ना आपण आधी ओळखू शकत ना आपण त्याला रोखण्यासाठी काही करू शकत. काही मीटर चा चेल्याबिन्स्क उल्कापात आज, आत्ता कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कोणत्याही भागात होऊ शकतो आणि स्वतःला सर्वात प्रगत समजणारा मानव ह्याकडे हतबलतेने बघण्यापलीकडे काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण किती सुरक्षित हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असाच आहे.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Sunday, 20 December 2020
एका प्रवासाचा प्रवास... विनीत वर्तक ©
एका प्रवासाचा प्रवास... विनीत वर्तक ©
काही आठवड्यापूर्वी संपूर्ण खगोल शास्त्रज्ञांचे आणि वैज्ञानिकांचे डोळे एका घटनेकडे एकटवले होते. ह्या घटनेमध्ये आपल्याला आजवर ज्ञात असणाऱ्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची दृष्टी मिळणार होती त्याचसोबत अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात होण्याची क्षमता होती. त्यामुळेच ही घटना मानवाच्या तांत्रिक क्षमतेचं एक पुढलं पाऊल होत. जपान देशाचं हायाबुसा २ हे यान ६ डिसेंबर २०२० ला ऑस्ट्रेलिया च्या भागात एक कॅप्सूल घेऊन उतरलं. ह्या कॅप्सूल च्या कुपीमध्ये दडलेला होता 'एका प्रवासाचा प्रवास'.हायाबुसा २ ला ३ डिसेंबर २०१४ ह्या दिवशी जपान च्या जॅक्सा ने एका रोमांचकारी प्रवासाला रवाना केलं. हायाबुसा २ अश्या एका प्रवासाला निघालं होत ज्यात ते अश्या एका लघुग्रहाला भेट देऊन त्याच्यावर असणारे दगड मातीचे नमुने घेऊन ६ वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर परतणार होतं. २७ जून २०१८ ला हायाबुसा ने आपल्या लक्ष्याच्या कक्षेत प्रवेश केला. रायगु नावाचा एक लघुग्रह हा त्याचा लक्ष्य होता. रायगु हा अपोलो ग्रुप मधला एक लघुग्रह सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा करत आहे. रायगु ४७४ दिवसात सूर्याभोवती प्रदक्षिणा करतो. रायगु ची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या ९५,४०० किलोमीटर अंतरावरून जाते. त्यामुळे रायगु हा 'पोटेंशियल हझार्डस ऑब्जेक्ट' म्हणजेच पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता असलेल्या लघुग्रहांपैकी एक आहे. अर्थात ह्याची शक्यता नजीकच्या भविष्यात नाही. पण समजा काही गोष्टींमुळे त्याची कक्षा बदलली आणि त्याची पृथ्वीशी टक्कर झाली तरी टक्कर होणारं शहर बेचिराख होईल पण संपूर्ण मानवजातीला त्यामुळे धोका नसेल.
रायगु च वय साधारण ९ मिलियन वर्ष (+,- २. ५ मिलियन वर्ष ) असावं असा प्राथमिक अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. रायगु च्या पृष्ठभाग हा अनेक मोठ्या खडकांनी भरलेला आहे. त्यावर ४४०० पेक्षा जास्ती असे मोठे बोल्डर (खडक) आहेत. रायगु चा व्यास साधारण ०.८७ किलोमीटर आहे. ह्या रायगु च्या कक्षेत प्रवेश केल्यावर हायाबुसा २ ने त्याचा अभ्यास केला. अनेक फोटो आणि त्याच्या पृष्ठभागाचा अंदाज आल्यावर त्याने आपल्या रोबोटिक आर्म ने त्यावरील नमुने घेण्यास सुरवात केली. ११ जुलै २०१९ ला त्याने रायगु वरील मातीचे नमुने आपल्या कुपीत बंदिस्त केले. आपलं मिशन संपवून १३ नोव्हेंबर २०१९ ला पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरु केला.
एक वर्षभर प्रवास केल्यानंतर हायाबुसा २ पृथ्वी च्या कक्षेत पुन्हा एकदा परत आलं. पण कसोटीचा क्षण आता येणार होता. आपल्या आत अतिशय जपून आणलेल्या कुपीत हायाबुसा २ ने तब्बल ९ मिलियन वर्षाचा विश्वाचा प्रवास बंदिस्त केलेला होता. हा प्रवास पृथ्वीवर सुरक्षितरीत्या उतरवणं हे खूप मोठं शिवधनुष्य अजून बाकी होतं. ६ डिसेंबर २०२० ला ऑस्ट्रेलिया इकडे हायाबुसा २ ने सोडलेली कुपी सुरक्षरीत्या पृथ्वीवर उतरली. मानवाच्या तांत्रिक प्रगतीच्या इतिहासात हा दिवस सोनेरी अक्षराने नोंदला गेला. ही कुपी जॅक्सा च्या वैज्ञानिकांनी जपान ला नेऊन उघडल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण समोर दिसत होता तो 'एका प्रवासाचा प्रवास'.
रायगु वरून आणलेल्या मातीत कार्बन असणारी संयुग आहेत. ह्याच संयुगांच्या अभ्यासावरून पृथ्वीवर पाणी, जीवसृष्टी आणि इतर गोष्टी कश्या अस्तित्वात आल्या ह्या रहस्याचा गुंता सोडवण्याची वैज्ञानिकांना आशा आहे. जपानी लोकांच तंत्रज्ञान इतकं उच्च प्रतीचं आहे की हायाबुसा २ ने कुपी यशस्वीरीत्या पृथ्वीवर पाठवल्यानंतर जवळपास ६ वर्ष कित्येक हजारो किलोमीटर चा प्रवास केल्यावर ही त्यावर जवळपास ३० किलो इंधन बाकी आहे. हायाबुसा २ वरील सर्व यंत्रणा आजही व्यवस्थितरीत्या काम करत आहेत. जपान (जॅक्सा) ने पुन्हा एकदा अवकाशातून हायाबुसा २ ला दुसऱ्या एका मिशनची कामगिरी सोपवली आहे. हायाबुसा २ आता 1998 KY26 ह्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी प्रवास करणार आहे. हा लघुग्रह फक्त ३० मीटर आकाराचा आहे. हायाबुसा २ जुलै २०३१ मध्ये ह्या लघुग्रहाचा वेध घेईल. ह्या प्रवासात जाता जाता ते शुक्राचा आणि 2001 AV43 ह्या लघुग्रहाचा सुद्धा वेध घेणार आहे.
हायाबुसा २ ने आणलेल्या नमुन्यांचा अभ्यास करण्याची संधी जगभरातील संशोधकांना उपलब्ध होणार आहे. ह्या अभ्यासातून विश्वाच्या प्रवासाची अनेक रहस्य उलगडण्याचा शक्यता वैज्ञानिकांना वाटत आहे. ह्या संपूर्ण प्रवासाचा वेध घेणाऱ्या जपान च्या वैज्ञानिकांना, संशोधकांना आणि जॅक्सा च्या तांत्रिक प्रगतीला माझा साष्टांग नमस्कार.
माहिती स्रोत :- गुगल, जॅक्सा
फोटो स्रोत:- गुगल, जॅक्सा ( फोटोमध्ये हायाबुसा २ ने पृथ्वीवर पाठवलेली कुपी आणि दुसऱ्या फोटोत त्या कुपीतील मातीचे नमुने ज्यात कित्येक मिलियन वर्षाचा प्रवास बंदिस्त आहे. )
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Tuesday, 15 December 2020
१६ डिसेंबर... विनीत वर्तक ©
१६ डिसेंबर... विनीत वर्तक ©
१६ डिसेंबर १९७१ म्हणजेच बरोबर ४९ वर्षापूर्वी पाकिस्तान ला दुसऱ्या महायुद्धा नंतरचा सगळ्यात लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. पाकिस्तान ला आपली कुवत भारताने ह्याच दिवशी दाखवून दिली होती. पाकिस्तान चे निर्माते मोहम्मद अली जीना ह्यांच्या दोन बाजूचा पाकिस्तान ह्या स्वप्नाला भारताने बेचिराख केलं होतं. पाकिस्तान ला आपल्या अर्ध्या भागावर पाणी सोडायला लागलं तर होतच पण त्याच्या ९३,००० सैनिकांनी भारतीय सैन्यापुढे आत्मसमर्पण केलं होतं. जगाच्या आजवरच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धानंतर इतका लाजिरवाणा पराभव कोणत्याही देशाचा झालेला नाही.
अवघ्या १३ दिवसात भारतीय सेनेने पाकिस्तान च्या सेनेला पाणी पाजलं होतं. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्यावेळेचे भारतीय सैन्य प्रमुख जनरल सॅम माणेकशॉ ह्यांना पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवण्याचा हुकूम दिला होता. पाकिस्तान सेनेने ने पूर्व पाकिस्तान मध्ये सामान्य लोकांवर अत्याचार सुरु केले होते. जवळपास ३ लाख ते ३० लाख लोकांचा ह्यात मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ज्यात बलात्कार, त्रास, छळ आणि खून अश्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टींचा समावेश होता. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले आणि भारताची परिस्थिती बिकट होत चालली होती.
ह्या सगळ्यात पाकिस्तान ने भारताला डिवचण्यासाठी भारताच्या ११ हवाई अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. भारताच्या तिन्ही दलांनी पहिल्यांदा एकत्र कारवाई करताना अवघ्या १३ दिवसात पाकिस्तानी सेनेची दाणादाण उडवली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यावर आपल्या आणि आपल्या सैनिकांच रक्षण करण्यासाठी आत्मसमर्पण करण्याशिवाय पाकिस्तान चे लेफ्टनंट जनरल ए.ए.के. नियाझी ह्यांनी भारताचे सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा ह्यांच्यापुढे सपशेल शरणागती पत्करली. ह्या दोघांनी स्वाक्षरी केलेल्या मसुद्यातील काही भाग इकडे देतो आहे.
The PAKISTAN Eastern Command agree to surrender all PAKISTAN Armed Forces in BANGLA DESH to Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA, General Officer Commanding in Chief of Indian and BANGLA DESH forces in the Eastern Theatre. This surrender includes all PAKISTAN land, air and naval forces as also all para-military forces and civil armed forces. These forces will lay down their arms and surrender at the places where they are currently located to the nearest regular troops under the command of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA.
The PAKISTAN Eastern Command shall come under the orders of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA as soon as the instrument has been signed. Disobedience of orders will be regarded as a breach of the surrender terms and will be dealt with in accordance with the accepted laws and usages of war. The decision of Lieutenant-General JAGJIT SINGH AURORA will be final, should any doubt arise as to the meaning of interpretation of the surrender terms.
ह्या मसुद्याला आज बरोबर ४९ वर्ष झाली आणि ह्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द भारतीयांची मान गौरवाने, देशाभिमानाने उंचावणारा आहे. कोणत्याही सैन्यासाठी शरणागती हा सगळ्यात शेवटचा पर्याय अगदी मृत्यूनंतर समोर असतो. 'बचेंगे तो ओर भी लढेंगे' हे पानिपत च्या युद्धातील वाक्य कोणत्याही सैनिकांसाठी शरणागती ही सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट असते हे सांगणारा आहे. भारताने ह्या लढाईत पाकिस्तान ला नुसतं हरवलं नाही तर त्यांच्या स्वाभिमानाला ठेचलं आहे. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाने हा 'विजय दिवस' त्या अनामिक हजारो सैनिकांसाठी, त्यांनी केलेल्या पराक्रमासाठी साजरा करायला हवा.
आज 'विजय दिवस' आहे. ह्याच दिवशी बांग्लादेश ह्या स्वतंत्र राष्टाची निर्मिती पाकिस्तान च विभाजन होऊन झाली. ह्या सगळ्या निर्मिती मध्ये बलिदान आणि पराक्रम हा भारतीय सैनिकांचा आहे. आजच्या काळातील पिढीला कदाचित ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतील पण त्याकाळी भारतीय सेनेने दाखवलेल्या पराक्रमाची गाथा आजही तितकीच स्फुरण देणारी आहे. आजच्या दिवशी ह्या लढाईत आपलं सर्वस्व पणाला लावून लढलेल्या त्या अनामिक सैनिकांना एका भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या स्मृतीस वंदन..
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Sunday, 13 December 2020
खारे वारे मतलई वारे (भाग ५)... विनीत वर्तक ©
खारे वारे मतलई वारे (भाग ५)... विनीत वर्तक ©
फेब्रुवारी २०१९ चा तो काळ होता त्याचवेळेस भारतात एका पाहुण्याचं आगमन होत होतं. खरे तर अनेक देशातील राजकीय नेतृत्व भारतात येत असतात पण ही भेट खूप वेगळ्या अर्थाने महत्वाची होती. येणारी व्यक्ती आणि त्याचा देश भारतासाठी खूप महत्वाचा होता. त्याही पेक्षा जी वेळ निवडली होती ती 'बुल्स आय' म्हणता येईल अशी होती. ती व्यक्ती होती सौदी अरेबिया चे युवराज मोहम्मद बिन सलमान (एम.एस.बी.). अमेरीकन पत्रकार जमाल खशोग्गी ह्याच्या हत्येला जबाबदार म्हणून ह्याच एम.एस.बी. वर ठपका ठेवण्यात आला होता. अनेक देशांनी एम.एस.बी. ना त्याकाळी आपल्या देशात येण्यासाठी मज्जाव केला. ह्याच वेळेस भारताने मात्र दूरदृष्टीने एक पाऊल टाकलं आणि एम.एस.बी. च रेड कार्पेट स्वागत भारतात झालं. संपुर्ण जग जेव्हा एम.एस.बी.कडे संशयाने बघत होतं तेव्हा भारत एका मित्रासारखा एम.एस.बी.सोबत उभा राहिला. ह्या मैत्रीच्या पेरलेल्या बी ने आता वटवृक्षाचा आकार घ्यायला सुरवात केली आहे. आज भारताचे सैन्य प्रमुख जनरल एम.एम. नरवणे ६ दिवसांच्या युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) आणि सौदी अरेबिया च्या दौऱ्यावर आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचे सैन्य प्रमुख हे गल्फ (अरेबिक) देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. ही गोष्ट ज्याला आमूलाग्र बदल म्हणता येईल अश्या पद्धतीने जागतिक पातळीवर बघितली जात आहे.
गेल्या काही वर्षात गल्फ क्षेत्रातील (मुस्लिम) राष्ट्रातील राजकारण बदललेलं आहे. ह्याला अनेक कारणं आहेत. सौदी अरेबिया ज्याच्याकडे मुस्लिम राष्ट्राचं नेतृत्व आजवर होतं त्याच्या नेतृत्वाला धक्का देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुस्लिम राष्ट्रांमध्ये गट पडत चालले आहेत. एका गटात पाकीस्तान, तुर्की आणि मलेशिया सारखे देश एकत्र येत आहेत तर दुसरीकडे सौदी अरेबिया, यु.ए.ई. सारखी राष्ट्र आहेत. आपण फेकलेल्या तुकड्यांवर पोट भरणारा पाकीस्तान जेव्हा मालकावर भुंकायला लागला तेव्हा सौदी अरेबिया ने त्याला त्याची जागा दाखवण्याचा चंग बांधला आहे. ह्या सगळ्या गोंधळात सगळ्यात जास्ती फायदा करून घेण्याची संधी कोणाला उपलब्ध झाली असेल तर तो देश म्हणजे 'भारत'. भारतात मुस्लिम समाजावर अत्याचार होत असतात असं पाकीस्तान आजवर बोंबलत होता. काश्मीर प्रश्नावर अनेकदा त्याने ह्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांच समर्थन मिळवलेलं होतं. पण आता वारे उलटे वाहायला लागल्यावर भारताने गरम असलेल्या लोखंडावर बरोबर हातोडा मारला आहे.
भारताने अरेबिक राष्ट्रांशी असलेले आपले संबंध अजून मजबूत करायला सुरवात केली. २०१६ ला सौदी अरेबिया ने आपल्या सर्वोच्च सन्मानाने भारताच्या पंतप्रधानांचा गौरव केला. २०१७ मध्ये युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) चे युवराज मोहम्मद बिन झायद अल निहान हे प्रजासत्ताक दिवसाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फेब्रुवारी २०१९ ला सौदी अरेबिया चे युवराज मोहम्मद बिन सलमान (एम.एस.बी.) ह्यांनी भारताला भेट दिली. ऑगस्ट २०१९ ला युनायटेड अरब अमिराती (यु.ए.ई.) ने त्यांचा सर्वोच्च सन्मान भारताच्या पंतप्रधानांना दिला. २०१५, २०१८ भारताच्या पंतप्रधानांनी यु.ए.ई. ला भेट दिली. २०१९ मध्ये त्यांनी सौदी अरेबिया ला भेट दिली. ह्या सगळ्या गोष्टी क्रमाने बघितल्या तर लक्षात येईल की भारताने आपले संबंध मुस्लिम राष्ट्रांशी घट्ट केले आहेत आणि त्याचीच फळ आता आपण चाखत आहोत.
भारताच्या सैन्य प्रमुखांची अरेबिक राष्ट्रांना भेट ही साधीसुधी गोष्ट नाही. कारण ह्या भेटीत टेबल वर अनेक गोष्टी आहेत. ही भेट राजकीय नाही त्यामुळे भेटीत घडणाऱ्या गोष्टी ह्या राजकीय नाही तर सैन्याशी आणि सुरक्षिततेशी निगडित असणार आहेत. हाच तो आमूलाग्र बदल आहे. आपण जनरल एम.एम. नरवणे ह्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम बघितला तर खूप साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील. भारताचे सैन्य प्रमुख यु.ए.ई.मध्ये त्यांचे सैन्य प्रमुख मेजर जनरल सालेह मोहम्मद सालेह अल अमेरी ह्यांना भेटले आहेत. तर सौदी अरेबिया मध्ये त्यांचे सैन्य प्रमुख जनरल फहाद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल मूतीर ह्यांना भेटले आहेत. ह्या दोघांसोबत सैन्य भागीदारी ची चर्चा झाली आहे. सैन्य भागीदारी, सैन्य प्रक्षिशण, सैन्य सराव ह्या शिवाय आयुधांची निर्मिती, त्या तंत्रज्ञानाचं आदान प्रदान ह्या सगळ्या गोष्टी चर्चिल्या गेल्या आहेत. भारताच्या 'ब्राह्मोस' मिसाईल साठी दोन्ही देश अतिशय उत्सुक आहेत. ह्या शिवाय हिंद महासागरात दोन्ही देशांच्या नौसेना सोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव ही टेबलावर आहे. ह्या दोन्ही देशांना लागणाऱ्या विविध तंत्रज्ञान आणि आयुधांची निर्मिती करण्यासाठी भारत मेक इन इंडिया मार्फत एक पर्याय म्हणून समोर आला आहे. ह्या सोबत अवकाश तंत्रज्ञाना मध्ये आणि अवकाश क्षेत्रामध्ये भारतासोबत एकत्र काम करण्यास हे दोन्ही देश उत्सुक आहेत.
भारताच्या सैन्य प्रमुखांची भेट ही राजकीय संबंध नाही तर सैनिकी संबंधांना एका वेगळ्या पातळीवर नेणार आहे. ज्याचा फायदा भारताला येत्या काळात होणार आहे. गेल्या काही महिन्यातील भारतीय सैन्य प्रमुखांच्या भेटी बघितल्या तर भारत कश्या तर्हेने पाकीस्तान आणि चीन ला एकाच वेळेस अडकवतो आहे ते लक्षात येईल. काही आठवड्यांपूर्वी भारताने हिंद महासागरात अमेरीका, ऑस्ट्रेलिया, जपान सोबत मलबार कवायत करून चीन ला आव्हान दिलं आहे. गेल्या काही महिन्यात सैन्य प्रमुखांनी म्यानमार, नेपाळ सारख्या आपल्या शेजारील राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित धोवाल हे श्रीलंकेचा दौरा करून आले आहेत. (अजित धोवाल कधीच रिकाम्या हाताने परत येत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे.) भारताचे प्ररराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या यु.ए.ई, बहरीन आणि सिचेलीस च्या दौऱ्यावर आहेत तर सैन्य प्रमुख यु.ए.ई.आणि सौदी अरेबिया च्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळात सुद्धा भारताच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणातील प्रमुख लोक सध्या विदेश दौऱ्यावर भारताच्या रणनीतील एका वेगळ्या उंचीवर नेण्यात व्यस्त आहेत.
काळ बदलला आहे आणि वाऱ्यांची दिशा बदलली आहे. पाकीस्तान आणि चीन ज्या मस्तीत जगत होते त्यांना भारताच्या ह्या व्यूहरचनेने धक्का नक्कीच लागला असेल ह्यात शंका नाही. ह्या सगळ्या भेटींचे दूरगामी परीणाम काय दिसून येतात ते दिसायला काही काळ जावा लागेल पण एक नक्की आहे की भारताने आपली बाजू आणि तटबंदी भक्कम केली आहे ह्याबद्दल कोणाच्या मनात दुमत नसेल.
क्रमशः
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Saturday, 12 December 2020
एक शून्य शून्य... विनीत वर्तक ©
एक शून्य शून्य... विनीत वर्तक ©
आजएक भारतीय सैनिक एक शून्य शून्य म्हणजेच वयाची १०० वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांच नाव भारतीयांना दूर दूर पर्यंत माहित असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आमचे हिरो नेहमीप्रमाणे वेगळेच असतात. आज अनेक राजकारणी लोकांचा वाढदिवस आहे. त्यामुळे शुभेच्छांचे रकाने आज त्यांच्यासाठी तुडुंब भरून वाहत असतील. पण देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकाची साधी आठवण ही आमच्या सुशिक्षित आणि प्रगल्भ (आपण तसे आहोत असं अनेकांना वाटते) लोकांना नसेल. आज नको त्या हिरोंसोबत देशाचा खरा हिरो १०० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच नाव आहे कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल.
कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे भारताचे एकमेव सैनिक आहेत ज्यांनी भारताच्या तिन्ही दलात देशाची सेवा केली आहे. वैमानिक, खलाशी आणि सैनिक अश्या तिन्ही दलातून वेगवेगळ्या माध्यमातून देशाची सेवा केली आहे. दुसऱ्या महायुद्धात आपलं योगदान दिलेले कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे रॉयल इंडियन एअर फोर्स, रॉयल इंडियन नेव्ही आणि भारतीय सेनेचा भाग होते. १९६५ च्या भारत- पाकीस्तान युद्धात ही त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल ह्यांनी आपलं शिक्षण शासकीय कॉलेज, लाहोर इकडून पूर्ण केलं. त्यांचे वडील हे त्याकाळी मेजर ह्या हुद्यावर सैन्यात कार्यरत होते. आपल्या सैनिकी प्रवासाची सुरवात त्यांनी वैमानिक म्हणून केली. पण त्याकाळी विमान चालवण्यात धोका असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना त्याच्यापासून परावृत्त केलं. मग त्यांनी नौसेनेत प्रवेश घेतला. दुसऱ्या महायुद्धात खलाशी म्हणून रसद पुरवणाऱ्या जहाजात खलाशी म्हणून काम केलं. त्यानंतर नेव्ही मधून त्यांनी निवृत्ती घेतली. भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी भारतीय सेनेत प्रवेश केला. त्यांची नियुक्ती १ सिख ह्या रेजिमेंट मध्ये झाली. १९६५ च्या युद्धात सियालकोट इकडे आपल्या रेजिमेंट चे कमांडिंग ऑफिसर बनून त्यांनी पाकिस्तानी सैन्याचं कंबरडं मोडलं. पण हा सैनिक भारताच्या सैन्य इतिहासात दुर्लक्षित राहिला. १९७० मध्ये ते भारतीय सेनेतून निवृत्त झाले.
२४ डिसेंबर १९५० साली त्यांचा विवाह परमिंदर कौर ह्यांच्याशी झाला. परमंदिर कौर आज ९३ वर्षाच्या आहेत आणि त्यांच्या लग्नाला आता जवळपास ७० वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. आजही कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल हे शारीरिकदृष्ट्या एकदम तंदुरुस्त आहेत. आपल्या ह्या १०० वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यच गुपित सांगताना ते म्हणतात,
“It is rare and it is a secret".
पण त्यांच्या सुनेच्या मते त्यांच्या आयुष्याचं गुपित हे गेली ७० वर्ष ते घेत असलेल्या व्हिस्की मध्ये आहे. अर्थात ह्यातील गमतीचा भाग सोडला तर सैन्यात मिळालेलं शिस्तीचं पालन त्यांनी आजवर केल्यानेच आज एक शून्य शून्य चा दिवस ते बघू शकले आहेत. भारताच्या तिन्ही दलांचा भाग होताना त्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे. अश्या ह्या योध्यास माझा कडक सॅल्यूट. कर्नल (निवृत्त) प्रिथिपाल सिंग गिल ह्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्व भारतीय तुमचे कायम ऋणी आहोत.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Tuesday, 8 December 2020
एलियन आणि मोनोलिथ... विनीत वर्तक ©
एलियन आणि मोनोलिथ... विनीत वर्तक ©
गेल्या काही दिवसापासुन विश्वाचा अभ्यास आणि कुतूहल असणाऱ्या सगळ्यांच्या मनात खळबळ माजली आहे. ह्याला कारण म्हणजे गेल्या एका महिन्यात जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मोनोलिथ ( मोनालिथ म्हणजे सोप्या शब्दात लोखंडाचा खांब) आढळून येत आहेत. रहसमयरित्या प्रकटलेले हे मोनोलिथ कुठून आले? आत्ताच पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात का आढळून येत आहेत? ह्यातील सगळ्यात आधी शोध लागलेला मोनलिथ कोणी चोरला? ते ह्यामागे विश्वातील परग्रहावरील जिवसृष्टी तर नाही न? अश्या अनेक तर्काना सध्या उधाण आलं आहे. मानवाला नेहमीच एलियन म्हणजे परग्रहावरील जीवसृष्टीच कुतूहल राहिलं आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकारामागे एलियन चा हात आहे अशी एक थेअरी जगमान्य होताना दिसत आहे. मग विश्वात खरच एलियन आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उतेह ह्या अमेरीकेच्या एका राज्यातील वाळवंटात नोव्हेंबर २०२० मध्ये काही संशोधकांना प्रिझम सारखा आकार असणारा एक मोनोलिथ हेलिकॉप्टर मधून दिसून आला. साधारण ३ मीटर उंची असलेला ह्या मोनालिथ चा शोध निर्मनुष्य असलेल्या भागात संशोधकांनी घेतल्यावर अनेक प्रश्न समोर उभे राहिले. ह्याची वार्ता जसजशी इंटरनेट वरून पसरत गेली तसतशी हा मोनोलिथ बघण्यासाठी गर्दी जमू लागली. अर्थात ह्यात सगळे बघे ते हौशी प्रकारचे लोक होते. अमेरीकन लोक ही नेहमीच स्वतःला श्रेष्ठ समजत असल्याने जर पृथ्वीवर एलियन कधी अवतरले तर त्यांचा पहिला मुक्काम अमेरीका असणार हे अमेरीकन चित्रपट आणि सिरीज ह्यांनी जनमानसात बिंबवलं आहे. त्यामुळेच अमेरीकेला लक्ष्य करण्यासाठी किंवा अमेरीकेत उतरण्यासाठी एलियन म्हणजेच परग्रहवासी लोकांनी उतेह च्या वाळवंटात एखादा संदेश देण्यासाठी अथवा दिशादर्शक म्हणून हा मोनोलिथ इकडे प्रकट झाला अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली.
गेल्या एका महिन्यात ह्या नंतर मोनोलिथ आढळण्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. उतेह नंतर कॅलिफोर्निया, नेवाडा, कॅनडा, यु.के., स्पेन, जर्मनी, नेदरलँड, रोमानिया ह्या देशात मोनोलिथ आढळून आले आहेत. ह्या सगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा एलियन बद्दल वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. वैज्ञानिकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर एलियन किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता खुप जास्ती आहे. एलियन विश्वात असू शकतात का हे जाणून घेण्यासाठी आपण विश्व थोडं जाणून घेतलं पाहिजे.
आपण जे विश्व बघू शकतो ते जवळपास १३.८ बिलियन प्रकाशवर्ष इतकं आहे. तर विश्वाचा व्यास हा ९३ बिलियन प्रकाशवर्ष इतका प्रचंड आहे. आता ह्या विश्वात अंदाजे २०० बिलियन आकाशगंगा सामावलेल्या आहेत. आपण ज्या आकाशगंगेचा म्हणजेच मिल्की वे चा भाग आहोत तिचा व्यास १,००,००० (एक लाख) प्रकाशवर्ष इतका आहे. ह्या एकाच आकाशगंगेत ४०० बिलियन तारे आणि २०० बिलियन ग्रह आहेत. ह्यात पृथ्वीच्या आकाराचे तब्बल ६ बिलियन ग्रह आहेत. म्हणजे ह्यातील प्रत्येक ग्रहावर जीवसृष्टी असण्याची किंवा उत्पत्ती होण्याची शक्यता खूप आहे. नासा ने आत्तापर्यंत जवळपास ४३०० एक्झॉप्लॅनेट शोधले आहेत. एक्झॉप्लॅनेट म्हणजे असे ग्रह जे आपल्या सोलार सिस्टीम च्या बाहेर आहेत. तर ह्या ४३०० मधील जवळपास ५५ ग्रह हे त्यांच्या ताऱ्याच्या हॅबिटायटल झोन मध्ये आहेत. हॅबिटायटल झोन म्हणजे एखाद्या ग्रहाचे त्याच्या ताऱ्यापासून इतकं अंतर ज्यामुळे ग्रहावरील तपमान हे एकदम उष्ण पण नसेल आणि एकदम थंड पण नसेल. पृथ्वीवर जीवसृष्टी चा उगम होण्याचं कारण म्हणजे पृथ्वीचं सूर्यापासून असलेलं अंतर आहे. त्यामुळेच असे ग्रह जे अश्या पद्धतीच्या हॅबिटायटल झोन मध्ये येतात त्यांच्यावरील वातावरण हे जीवसृष्टीची सुरवात करण्यासाठी सर्वोत्तम असते.
इकडे लक्षात आलं असेल की आपण विश्वात असलेल्या ७०० क्वीनट्रिलियन ( १ क्वीनट्रिलियन म्हणजे एकावर १८ शून्य) ग्रहांपैकी काही हजार ग्रहांची आपल्याला माहिती आहे. त्यातही शेकडो ग्रह पृथ्वी सारखी रचना असणारे आहेत. म्हणजे ह्या क्वीनट्रिलियन ग्रहांमध्ये कितीतरी ट्रिलियन ग्रह असे आहेत जिकडे जीवसृष्टीचा उगम होऊ शकतो अथवा झालेला आहे. तिकडचे एलियन आपल्यापेक्षा प्रगत किंवा मागासलेले दोन्ही प्रकारचे असू शकतात. आपण विचार करतो त्यापेक्षा कित्येक वेगळ्या पद्धतीची जीवसृष्टी आणि संस्कृती ह्या ग्रहांवर अस्तित्वात असू शकते. पण ह्या सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी आजवर आपण अशी जीवसृष्टी शोधू शकलेलो नाहीत किंवा आपलं तंत्रज्ञान अजूनही विश्वाच्या आकारासाठी खूप तोकडं आहे. मोनोलिथ हा त्यापैकी एका जीवसृष्टीचा आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न असू शकतो असं अनेकांना वाटते पण ज्या पद्धतीने ह्या गोष्टी घडत आहेत त्यावरून तरी ह्यामागे सनसनाटी निर्माण करण हाच उद्देश निदान मला तरी दिसून येतो आहे. कारण मोनोलिथ च अचानक समोर येणं, त्याची चोरी होणं हे सगळं परग्रहावरून एलियन नाही तर पृथ्वीवरील माणसचं करत आहेत. पण असं असलं तरी भविष्यात एलियन शी गाठभेट होण्याची शक्यता विश्वाचा आकार लक्षात घेता तितकीच जास्त आहे.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Sunday, 6 December 2020
दोन टोकं अनुभवलेला देव... विनीत वर्तक ©
दोन टोकं अनुभवलेला देव... विनीत वर्तक © (Repost)
फुटबॉल ह्या खेळाचा चा इतिहास लिहायचा झाला तर दोन टप्प्यात लिहावा लागेल. ३२ वर्षापूर्वी वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिना ह्यांच्या आधीचा इतिहास आणि दुसरा त्या नंतरचा इतिहास कारण ह्या सामन्याने फुटबॉल खेळाच्या इतिहासाची पान पूर्णपणे बदलली ती पाच मिनिटाच्या खेळात. जेव्हा पूर्ण जग हा सामना बघत होतं तेव्हा चांगल – वाईट, सुंदर – घाणेरडा, अप्रतिम – फसवणूक अश्या सगळ्याच अनुभूती जगाने त्या काही मिनटांच्या खेळात अनुभवल्या. ह्या अनुभूती जगाला करवून देणारा खेळाडू होता अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू डिएगो आर्मंडो मॅराडोना.
अर्जेंटिना चा हा सुपरस्टार खेळाडू आजही जगातील सगळ्या पत्रकार, ह्या खेळातील विशेतज्ञ तसेच त्याच्या समवयस्क आणि आत्ताच्या पिढीतील खेळाडूंकडून पण एक सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. फिफा च्या २० व्या शतकातील सर्वकालिक महान खेळाडूंमध्ये ब्राझील च्या पेले सोबत अर्जेंटिना च्या डिएगो आर्मंडो मॅराडोना चं नाव लिहलेलं आहे. मॅराडोना च लक्ष्य, त्याच खेळातील पदलालित्य, खेळाची जाण तसेच खेळताना इतर खेळाडूंना दिलेल्या संधी तसेच फुटबॉल वरील त्याच नियंत्रण आणि त्याच्यावर असलेली त्याची पकड ह्या सगळ्या गोष्टी जेमतेम ५ फुट ५ इंच उंचीचा मॅराडोना ज्या चपळतेने करायचा ते बघणं म्हणजे साक्षात देवाचा वरदहस्त लागलेला खेळाडू बघणं. त्याच्या कमी उंचीमुळे त्याच सेंटर ऑफ ग्राव्हिटी कमी उंचीवर होतं ह्यामुळेच फुटबॉल च्या बॉल ला लिलया हाताळण्याच कसब त्याच इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वोत्तम होतं.
डिएगो आर्मंडो मॅराडोना चा जन्म ३० ऑक्टोबर १९६० ला अर्जेंटिनाच्या ब्युनेस आयर्स इकडे झाला. अतिशय गरीब परीस्थितीत त्याच बालपण गेलं. त्याचे वडील हे साधे कामगार होते. तीन बहिणीनंतर झालेलं हे चौथ आपत्य आणि त्या नंतर ही दोन भावंड जन्माला आली. पाच भावडांच्या अतिशय गरीब घरात जन्माला आलेला मॅराडोना एक दिवस आयुष्यात इतके पैसे आणि प्रसिद्धी कमावेल हे तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. लहानपणीच वयाच्या तिसऱ्या वर्षी मॅराडोना ला त्याच्या भावाने फुटबॉल भेट दिला. हा फुटबॉल म्हणजे मॅराडोना चा जीव की प्राण झाला तो शेवटपर्यंत. उठता, बसता ते रात्री झोपेत पण मॅराडोना त्यात रमलेला असायचा. नीट व्यवस्थित धावण्या आगोदर मॅराडोना फुटबॉल सोबत अनेक क्लुपत्या करायला शिकला होता. वयाची ८ वर्ष होईपर्यंत मॅराडोना फुटबॉल खेळायला शिकला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं मॅराडोना च फुटबॉल वरील नियंत्रण अर्जेंटिना च्या ज्युनिअर टीम च्या कोचच्या लक्षात आलं त्यांनी लगेच मॅराडोना ला टीम मध्ये संधी दिली. त्या नंतर मॅराडोना च आयुष्य फुटबॉल ने बदललं ते कायमचं.
ह्या टीम ने १९७२ मध्ये सलग १४० गेम जिंकले आणि त्याच वर्षीचा ज्युनिअर किताब ही ह्याच टीम ला मिळाला आणि ह्याच सर्व श्रेय जाते ते मॅराडोना च्या जादुई फुटबॉल खेळण्याला. ह्यासाठी मॅराडोना ला १० नंबरची जर्सी देण्यात आली जो नंबर फुटबॉल स्टार पेले च्या जर्सी चा होता. सगळ्यात कमी वयात मॅराडोना ने देशाच्या ज्युनिअर टीम मध्ये आपलं नाव जोडलं. १९८२ च्या वर्ल्ड कप मध्ये मॅराडोना फारशी चमक दाखवू शकला नाही. पण त्याचा चाहतावर्ग वाढत होता. मॅराडोना च्या जादुई खेळाने सगळ्यांना भारावून सोडलं होतं. बार्सिलोना ह्या क्लब ने मॅराडोना त्यांच्या क्लब सोबत खेळण्यासाठी प्रचंड असे ७.७ मिलियन अमेरिकन डॉलर मोजले. फुटबॉल इतिहासातील हा एखाद्या खेळाडूसाठी केला जाणार सगळ्यात मोठा सौदा ठरला. मॅराडोना च वय तेव्हा अवघं २१ वर्ष होतं. कमी वयात प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मॅराडोना ला मिळाली. अतिशय गरिबीतून अचानक हाती लागलेला पैसा त्याच्यासोबत अनेक वाईट गोष्टी ही घेऊन आला. ह्यातच मॅराडोना ने कोकेन ची चव चाखली आणि त्याच व्यसनात रुपांतर व्हायला वेळ लागला नाही.
१९८६ चा वर्ल्ड कप मॅराडोना ला दैवत्व देऊन गेला. वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या इंग्लंड आणि अर्जेंटिना चा सामना संस्मरणीय ठरला तो मॅराडोना च्या दोन गोलमुळे. ह्या स्पर्धेला इंग्लंड आणि अर्जेंटिना मध्ये झालेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे एकमकांचे उट्टे काढण्याचा चंग दोन्ही संघांनी बांधला होता. पहिल्या गोलच्या वेळी मॅराडोना च्या हाताला लागून फुटबॉल इंग्लंड च्या जाळ्यात शिरला. फुटबॉल ला हात लावणे हे खरे तर ह्या खेळात चूक मानली गेली आहे पण रेफ्री नी हा गोल अर्जेंटिना ला बहाल केला. त्यावेळी बोलताना मॅराडोना म्हणाला होता,
“ ह्या गोल मध्ये मॅराडोना च थोडं डोकं आणि देवाचा थोडा हात आहे”
म्हणून ह्या गोल ला “ह्यांड ऑफ गॉड” असं म्हंटल गेलं. २२ ऑगस्ट २००५ ला मॅराडोना ने आपण मुद्दामून हा बॉल हाताने जाळ्यात ढकलल्याचा खुलासा केला. हा गोल फिफा च्या इतिहासातील सगळ्यात लाज वाटावी असा आणि नियमांची पायमल्ली केलेला गोल म्हणून प्रसिद्ध झाला. ह्या नंतर मात्र ४ मिनिटांच्या अवधीत मॅराडोना ने जो गोल केला त्या गोल ला “गोल ऑफ द सेंच्युरी” हा किताब २००२ साली फिफा ने दिला. मॅराडोना ला आपल्या बाजूमध्ये फुटबॉल च नियंत्रण मिळालं. त्याने एकट्याने ११ वेळा बॉल ला स्पर्श करत इंग्लंड च्या पाच खेळाडूंना चकवत इंग्लंड च्या जाळीकडे धाव घेतली. शेवटी त्यांचा गोलकीपर पीटर शिल्टन ह्याला चकवत मॅराडोना ने डाव्या पायाने मारलेला फुटबॉल जाळ्यात अडकला तेव्हा पूर्ण जगाने खेळाच्या इतिहासातील सर्वोत्तम गोल बघितला होता. म्हणूनच त्या काही मिनिटांन च्या खेळामध्ये फुटबॉल खेळाचे अनेक नियम ते फुटबॉल खेळातील अजरामर गोल अस सगळच बदलून गेलं. म्हणून आज फुटबॉल चा इतिहास ह्या स्पर्धेच्या आधीचा आणि ह्या नंतरचा असा सांगितला जातो.
१९८२ नंतर मॅराडोना चा खेळ बहरत असला तरी त्याच व्यसन त्याला निराशेच्या गर्तेत ढकलत होतं.त्याचा स्व त्याच्या खेळापेक्षा मोठा होऊ लागला. मॅराडोना दिवसेंदिवस अतिशय उर्मट होऊ लागला. त्याच्या बार्सिलोना कल्ब ला ही त्याचे चटके बसायला लागले. पण मॅराडोना ने त्याच्या बळावर बार्सिलोना ला त्या वर्षीच जेतेपद मिळवून दिलं. बार्सिलोना ने मॅराडोना ला १२ मिलियन अमेरिकन डॉलर ला नापोली क्लब ला विकलं. १९८८ पर्यंत मॅराडोना ने नापोली क्लब मधून खेळताना आपल्या खेळाचा करिष्मा दाखवून दिला. ह्या कल्बसाठी सर्वाधिक ११५ गोल त्याने केले. पण मॅराडोना च व्यक्तिगत आयुष्य मात्र डळमळीत व्हायला लागलं होतं. कोकेन च व्यसन त्याला आतून पोखरत होतं.
१९९० च्या वर्षी मॅराडोना ने पुन्हा अर्जेंटिना च नेतृत्व वर्ल्ड कप मध्ये केलं पण आपल्या लौकिकाला साजेसा खेळ मॅराडोना करू शकला नाही. एकेकाळी अशक्य वाटणारे गोल केलेला देव आज पेनल्टी किक वर साधे गोल करायला ही कमी पडू लागला. अर्जेंटिना जर्मनी कडून ह्या वेळेस पराभूत झाली. मॅराडोना ला पराभवाला आणि चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. त्यातच मॅराडोना व्यसनाधिनता वाढत जात होती. त्याचे परिणाम आता दिसायला लागले होते. त्याच वजन वाढत गेलं आणि चपळाई कमी होत गेली. खेळाकडे दुर्लक्ष झालं. १७ मार्च १९९१ ला मॅराडोना उत्तेजकद्रव्य चाचणीत दोषी आढळला. कोकेन चे अंश त्याच्या रक्तात मिळाले. १५ महिन्यांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली. एकेकाळी दैवत्व प्राप्त झालेला हा देव आता लोकांच्या नजरेत उतरला होता. कोकेन ला सोडण्यात मॅराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. १९९४ च्या वर्ल्ड कप मधील उत्तेजक द्रव्य चाचणीत मॅराडोना पुन्हा एकदा अपयशी ठरला. अस्ताला जात असलेलं वैभव मॅराडोना ला दिसत होतं. चाहत्यांना ही एकेकाळी डोक्यावर घेतलेल्या खेळाडूची फुटबॉल खेळातून अशी पीछेहाट चटका लावून जात होती. पण नशेच्या आहारी गेलेला देव पाण्याखाली गेला तो कायमचा. तिसऱ्यांदा मॅराडोना उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. ह्या नंतर मात्र वयाच्या ३६ वर्षी त्याने पुन्हा एकदा ह्या सगळ्यातून बाहेर येऊन फुटबॉल साठी कसून सराव केला पण तोवर कोकेन ने त्याच्या शरीराची आतून वाट लावली होती. सगळ्याला कंटाळून मॅराडोना ना ने ऑक्टोबर १९९७ ला फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली.
एकेकाळी गरिबीची झळ सोसलेला डिएगो आर्मंडो मॅराडोना फुटबॉल चा सम्राट झाला. ज्या गोष्टींची स्वप्न कधी बघितली नव्हती त्या गोष्टी त्याच्या पायाशी लोळत होत्या पण अचानक मिळालेला पैसा आणि प्रसिद्धी ह्याचा ताळमेळ राखायला मात्र डिएगो आर्मंडो मॅराडोना हरला. एकेकाळी देव असलेला हा स्टार फुटबॉलपटू त्याच्याच तेजात उध्वस्थ झाला. डिएगो आर्मंडो मॅराडोना च आयुष्य आपल्या प्रत्येकासाठी एक धडा आहे. आयुष्याची दोन टोक अनुभवलेला हा देव प्रसिद्धी आणि यशाची हवा डोक्यात जाऊन वाईट संगतीला, व्यसनांना जवळ केल्यावर होणाऱ्या आपल्याच ऱ्हासाच मूर्तिमंत उदाहरण म्हणून नेहमीच लक्षात राहील.
माहिती स्त्रोत :- गुगल
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.