एव्हरेस्ट शोधणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर... विनीत वर्तक ©
पृथ्वीवरील सगळ्यांत उंच ठिकाण कोणतं, असं विचारलं तर प्रत्येकाच्या तोंडी नाव येतं, ते म्हणजे "माऊंट एव्हरेस्ट". नेपाळ आणि तिबेटच्या भागावर वसलेलं, जवळपास ८८४८ मीटर (२९,०२८ फूट) इतकं समुद्र सपाटीपासून उंच असलेलं, हिमालय पर्वतरांगांमधलं सर्वांत उंच टोक. आजवर ५२९४ लोकांनी ९१५९ वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. जगातील सगळ्याच गिर्यारोहकांचे स्वप्न राहिलेल्या माऊंट एव्हरेस्टचं नाव हे रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. पण किती जणांना हे माहीत आहे, की जगातील सगळ्यात उंच शिखराचा शोध एका भारतीय गणिततज्ञाने लावलेला आहे? त्यांचं नाव होतं 'राधानाथ सिकदर'. पारतंत्र्यात असणाऱ्या भारतातल्या कोणाला हा मान देणं ब्रिटीशांची पद्धत नव्हती, ना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचीच री ओढणाऱ्या भारतीयांना याची कधी दखल घ्यावीशी वाटली. काळाच्या ओघात पृथ्वीवरचं सगळ्यात उंच टोक शोधणारा भारतीय गणितज्ञ इतिहासाच्या पानात लुप्त झाला.
१८५२ चा काळ होता. एके दिवशी सर अँड्रयू वॉ यांच्या भारताच्या उत्तर-पूर्व भागाचं सर्वेक्षण करणाऱ्या कार्यालयातून एक कर्मचारी धावत आला. त्याने अतिशय आनंदाने त्यांना बातमी दिली, की त्याने जगातील सगळ्यात उंच टोकाचा शोध लावला आहे. आपलं सर्वेक्षणाचं काम करताना नेपाळ-भूतानच्या सीमेवर एका उत्तुंग शिखराची उंची, त्याने त्या शिखरावर न जाता गणिताच्या साहाय्याने शोधली होती. त्याकाळी ज्ञात असणाऱ्या उंच शिखरांमध्ये सर्वात उंच टोकाचा मान हिमालयातील कांचनगंगा या शिखराला होता. कांचनगंगाची उंची साधारण ८५८६ मीटर (२८,१६९ फूट) होती. पण त्या कर्मचाऱ्याने गणिताच्या साहाय्याने हिमालयातील माहिती नसलेल्या शिखराची उंची जवळपास २९,००० फूट भरत असल्याचा शोध लावला होता. त्या शिखराला तेव्हा "एक्स व्ही" असं नाव होतं. हा कर्मचारी दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर होते. सर अँड्रयू वॉ यांना वाटलं, २९,००० फूट हा आकडा जर आपण जर्नल मध्ये प्रसिद्ध केला तर तो अनेकांना ढोबळमानाने लिहिल्यासारखा वाटेल, म्हणून त्यांनी त्यावर २ फूट वाढवून या शिखराची उंची २९,००२ फूट असल्याचं १८५६ च्या एशियाटिक सोसायटी, कोलकाता इकडे जाहीर केलं.
राधानाथ सिकदर यांचा जन्म १८१३ मध्ये कोलकाता इकडे झाला. लहानपणापासून त्यांना गणिताची आवड होती. आपलं गणितावरचं प्रभुत्व त्यांनी लहानपणी सिद्ध केलं होतं. आपल्या कॉलेजच्या दिवसात त्यांनी दोन वर्तुळांना समान असणारी स्पर्शिका शोधण्याचं सूत्र गणिताने शोधलेलं होतं. त्याकाळी कॉम्प्युटर नसल्याने गणितात अव्वल असणाऱ्या लोकांना ब्रिटीश सरकारच्या नोकरीचे दरवाजे खुले केले जायचे. त्यांच्या या बुद्धीमत्तेची क्षमता त्याकाळी त्यांना ब्रिटीश सरकारच्या जी.टी.एस. म्हणजेच (Great Trigonometrical Survey) मध्ये नोकरी देऊन गेली. सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नेतृत्वाखाली राधानाथ सिकदर यांनी भूसर्वेक्षणाचं आणि डोंगर रांगांची उंची मोजण्याचं काम सुरु केलं. १८४३ मध्ये जॉर्ज एव्हरेस्ट निवृत्त झाल्यावर सर अँड्रयू वॉ यांनी ते काम पुढे न्यायला सुरूवात केली. १८४७ पर्यंत त्यांनी दार्जिलिंग आणि कांचनगंगाची उंची मोजलेली होती.
उंची मोजण्यासाठी त्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या शिखराचा वेध घेऊन त्रिकोणमितीच्या साहाय्याने त्याची उंची ठरवली जात होती. पण सगळ्यात मोठी अडचण होती ती पृथ्वीच्या वातावरणामुळे होणाऱ्या प्रकाशाच्या अपवर्तनाची (terrestrial refraction). पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना प्रकाशाचं अपवर्तन लक्षात घेणं अचूक उंचीसाठी गरजेचं होतं. त्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणाहून गणित करून उंची मोजली जात होती. 'माऊंट एव्हरेस्टची' म्हणजेच शिखर 'एक्स व्ही' ची उंची मोजण्यासाठी जरोळ, मिर्झापूर, जनीपती, लाडानीया, हरपूर आणि मिनाई ह्या सहा ठिकाणांहून (ही सर्व ठिकाण उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील आहेत) राधानाथ सिकदर यांनी त्याची उंची मोजली. जी प्रत्येकवेळी २९,००० फूट भरली. जेव्हा सगळ्या ठिकाणाहून उत्तर सारखं आलं, तेव्हा आपण जगातील सगळ्यात उंच टोक शोधल्याचं राधानाथ सिकदर यांना कळलं. याची माहिती जेव्हा त्यांनी आपले वरिष्ठ सर अँड्रयू वॉ यांना दिली, तेव्हा त्यांनी अचूकतेसाठी त्यापुढे २ फूट लावले आणि जगातील सगळ्यात उंच टोकाची समुद्रसपाटीपासून उंची २९,००२ फूट असल्याचं जाहीर केलं.
या शोधाचे खरे जनक भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर हे होते, पण त्यांचं कर्तृत्व ब्रिटीशांनी जाणूनबुजून दडपताना १८६५ मध्ये शिखर 'एक्स व्ही'चं नाव सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या प्रयत्नांसाठी "माऊंट एव्हरेस्ट" असं ठेवलं. आजपर्यंत संपूर्ण जग हिमालयातील त्या उत्तुंग अश्या शिखराला माऊंट एव्हरेस्ट असं संबोधते, पण त्याची ओळख जगाला दाखवून देणाऱ्या भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर यांना खुद्द भारतीय ओळखत नाहीत तिकडे जगाकडून काय अपेक्षा! खरे तर माउंट एव्हरेस्टचं नाव आज "माऊंट सिकदर" अथवा "माऊंट राधानाथ" असं असायला हवं होतं, पण ब्रिटीशांनी जाणूनबुजून इतिहासाच्या पानातून पण राधानाथ सिकदर यांचं कर्तृत्व त्यांच्या मृत्यूनंतर लुप्त केलं ते कायमचं. तंत्रज्ञानातील प्रगतीनंतर १९५४ साली माऊंट एव्हरेस्टची अधिकृत उंची २९,०२८ फूट ( ८८४८ मीटर) असल्याचं जगाने मान्य केलं, पण जवळपास १०० वर्षं आधी एव्हरेस्टवर चढाई न करता काही फुटांच्या अचूकतेने (इकडे एक लक्षात घ्यायला हवं की दरवर्षी एव्हरेस्ट ची उंची ४ मिलीमीटरने वाढते आहे) एव्हरेस्टची उंची मोजणारे भारतीय गणितज्ञ राधानाथ सिकदर मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाले. त्यांच्या कर्तृत्वाला माझा साष्टांग नमस्कार. एक भारतीय म्हणून मला नेहमीच तुमचा अभिमान वाटेल आणि प्रत्येकवेळी माऊंट एव्हरेस्ट जेव्हा समोर येईल, तेव्हा तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाची तो साक्ष माझ्यासकट प्रत्येक भारतीयाला देईल.
माहिती स्रोत :- गुगल, भारतीय इतिहास
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment