एका हॅलो चा प्रवास... विनीत वर्तक ©
कोणत्याही संभाषणाची सुरवात 'हॅलो' ह्या शब्दाने करण्याची पद्धत जगभर मान्यता पावलेली आहे. खरे तर ह्या 'हॅलो' ह्या शब्दाचा जनक प्रख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडीसन. त्याच्याच पुढाकाराने हा शब्द जगभर प्रसिद्ध झाला. गेल्या आठवड्यात म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२० ला एका संभाषणाची सुरवात पुन्हा एकदा ह्याच शब्दाने झाली आणि मानवाच्या तांत्रिक क्षमतेने संपुर्ण जग थक्क झालं कारण समोरून आलेला 'हॅलो' हा शब्द तब्बल १८.८ बिलियन किलोमीटर वरून ३४ तासांचा प्रवास करून पृथ्वीवर पोहचलेला होता. हा सगळा वेळ जगातील वैज्ञानिक, शास्त्रज्ञ ह्यांची कसोटी पाहणारा तर होताच पण त्याही पेक्षा ४३ वर्षाआधी मानवाच्या तत्रंज्ञानाच्या क्षमतेला एक कुर्निसात होता.
अमेरीकेच्या नासा ने २० ऑगस्ट १९७७ ला विश्वाच्या अनंत प्रवासाला जाणाऱ्या एका यानाच प्रक्षेपण केलं. ज्याचं नाव होतं 'व्हॉयजर २'. व्हॉयजर २ ने आपल्या प्रवासात सौर मालेतील गुरु, शनी, युरेनस, नेपच्युन ग्रहांना भेटी दिल्या. सौर मालेच्या पलीकडे आपला प्रवास त्याने सुरु ठेवलेला आहे. ५५,२३० किलोमीटर/ तास ह्या वेगाने ते पृथ्वीपासून लांब जात आहे. ह्या यानाने नेपच्युन ला भेट दिल्यानंतर आपल्या प्रवासाची दिशा बदलून आपल्या पृथ्वीपासून दक्षिणेकडे प्रवास सुरु केला. समजा आपल्या सूर्यमालेतील सगळे ग्रह एका पातळीवर आणले तर व्हॉयजर २ आता त्या पातळीच्या दक्षिणेकडे आपला प्रवास करत आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नासा ज्या पद्धतीने ह्या यानाशी संवाद साधते ती यंत्रणा म्हणजेच नासाचे डीप स्पेस नेटवर्क.
नासाच्या डीप स्पेस नेटवर्क मधील अँटेना ज्या संदेश ग्रहण करतात अथवा पाठवतात त्यातील डी.एस.एस. ४३ ही अँटेना कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया इकडे आहे. हीच अँटेना व्हॉयजर २ यानाशी संवाद साधू शकत आहे. ह्यामागे कारण आहे व्हॉयजर २ चा होणारा दक्षिणेकडील प्रवास. व्हॉयजर २ ज्या प्रमाणे वर सांगितलं तसं दक्षिणेकडे प्रवास करत असल्याने पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असणाऱ्या अँटेनांशी त्याचा संवाद होऊ शकत नाही. व्हॉयजर २ हे यान पाठवण्याआधी नासाने आपलं डीप स्पेस नेटवर्क बनवलेलं होतं. गेली ४७ वर्ष ही यंत्रणा न थांबता आपली सेवा नासाला देत होती. पण ह्या यंत्रणेला दुरुस्त करण्यासाठी तसेच अद्यावत करण्यासाठी काही काळ बंद करण्याचा निर्णय नासाने मार्च २०२० ला घेतला. जवळपास वर्षभर हे काम सुरु राहणार होतं. ह्या काळात व्हॉयजर २ ला कोणत्याही प्रकारचं संदेश देणं शक्य होणार नव्हतं. वेळेआधी काम थोडंफार झाल्यावर नासाने २० ऑक्टोबर २०२० ला यंत्रणा सुरळीत दुरुस्त झाली आहे का नाही बघण्यासाठी व्हॉयजर २ ला संदेश पाठवला. व्हॉयजर २ ने तो संदेश ग्रहण करून नासाच्या संदेशाला 'हॅलो' बोलत आपण सुस्थितीत असल्याचं कळवलं आहे.
व्हॉयजर २ वरील सगळ्या यंत्रणा ह्या जवळपास ४३ ते ४५ वर्षापूर्वी फक्त ५ वर्ष विश्वाच्या पोकळीत काम करू शकतील अश्या बनवल्या होत्या. पण आज ४३ वर्षानंतर ही व्हॉयजर १ आणि २ मधील यंत्रणा सुस्थितीत असुन पृथ्वीशी संवाद साधत आहेत. व्हॉयजर २ ऊर्जा देण्यासाठी Multihundred-Watt radioisotope thermoelectric generators (MHW RTG) प्लुटोनियम ह्या समस्थानिकाचा वापर केला गेला होता. ह्याच अर्ध आयुष्य ८७.७ वर्षाच आहे. ह्याचा अर्थ ८७.७ वर्ष ही बॅटरी १५७ वॅट ची ऊर्जा सतत न थांबता व्हॉयजर २ ला देऊ शकणार आहे. आज ही सगळी यंत्रणा विश्वाच्या पोकळीत अगदी शांतपणे आपला प्रवास अनंताकडे करताना पृथ्वीशी संवाद साधत आहे.
गेले जवळपास ७ महीने व्हॉयजर २ कोणत्याही कमांड शिवाय आपला प्रवास करत होतं. गेल्या आठवड्यात आलेल्या 'हॅलो' ने नासाच्या जवळपास ५० वर्ष मागच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीला कुर्निसात केला आहे. गेल्या ५० वर्षात तंत्रज्ञान क्षमता कित्येक पट वेगाने पुढे गेली आहे. ह्याचा अर्थ नासाकडे असलेली तांत्रिक क्षमता आज किती उंचीवर असेल ह्याचा अंदाज आपण बांधु शकत नाही. १८.८ बिलियन किलोमीटर वरून निघालेल्या हॅलो चा प्रवास हा मानवाच्या तांत्रिक क्षमतेतील एक मैलाचा दगड आहे. व्हॉयजर २ च्या निर्मितीमागे असणाऱ्या नासाच्या सगळ्याच वैज्ञानिक, संशोधक आणि अभियंते ह्यांना माझा कुर्निसात.
फोटो स्रोत :- नासा, अमेरीका (एका फोटोत नासाचे व्हॉयजर २ यान, दुसऱ्या फोटोत डी.एस.एस. ४३ ही अँटेना कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया )
माहिती स्रोत:- नासा, अमेरीका
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment