Monday, 23 November 2020

दि फॉरगॉटन हिरो.. आबिद हसन सॅफ्रॉनी... विनीत वर्तक ©

 दि फॉरगॉटन हिरो.. आबिद हसन सॅफ्रॉनी... विनीत वर्तक © 


भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासात केवळ एका कुटुंबाच्या नावासाठी असे अनेक हिरे लुप्त केले गेले, अथवा लपवले गेले ज्यांचं कर्तृत्व एव्हरेस्टपेक्षाही उंच होतं. आपलं संपूर्ण आयुष्य देशाला स्वतंत्र करण्यासाठी वेचताना त्यांनी पुढच्या पिढीला एक आदर्श घालून दिला, ज्याचं पालन आपण आजही करतो. आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या देशाबद्दल वाटणारं प्रेम आणि अभिमान वाटणारे दोन शब्द कोणते असतील तर ते म्हणजे, 

"जय हिंद!!"

नुसते शब्द उच्चारले, तरी देशभावना जागृत होते. देशाबद्दल प्रेम, समर्पण, आदर, आनंद, अभिमान अश्या सगळ्याच भावना त्यातून व्यक्त होतात. आजही देशाचा प्रत्येक सैनिक आणि नागरिक जेव्हा एकमेकांना कुठे भेटतात, तेव्हा हे दोन शब्द देशाबद्दलच्या सगळ्याच भावना त्याच तीव्रतेने व्यक्त करतात. भारतातील ६ धर्मांना, २२ प्रमुख भाषांना, ५००० जाती-जमातींना एकत्र धरून ठेवणारा शब्द म्हणजेच "जय हिंद". याच शब्दाने भारतातील विविधतेतील एकतेला स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर आजतागायत बांधून ठेवलं आहे. हा शब्द भारतीयांना देणारे ते महापुरुष म्हणजेच, 'आबिद हसन सॅफ्रॉनी'. 

१९४१ चा काळ होता. नेताजी सुभाषचंद्र बोस बर्लिन, जर्मनी इकडे हिटलरकडून मदत घेण्यासाठी पोहोचले. नेताजींचं एक स्वप्न होतं, ते म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना. आझाद हिंद सेना, अशी एक सेना ज्यामध्ये जवळपास ५०,००० सैनिक असतील आणि यांतील प्रत्येक सैनिक ब्रिटिश सैनिकांना पुरून उरेल, असा त्यांना बनवायचा होता. याच सेनेच्या मदतीने भारताला स्वातंत्र्य देण्याचं स्वप्न नेताजी बघत होते. आझाद हिंद सेनेतील प्रत्येक सैनिकाला सर्वोत्तम बनवण्यासाठी हिटलरकडून मदत मागण्यासाठी नेताजी जर्मनी मध्ये आले होते. नेताजी इकडे भारतीय युद्धकैद्यांना भेटत असताना त्यांची भेट आबिद हसन यांच्याशी झाली. आबिद हसन गांधीवादी विचारांचा पगडा घेऊन, हैद्राबादहून जर्मनीमध्ये अभियांत्रिकी शिकण्यासाठी आले होते. पण जेव्हा त्यांची गाठ नेताजींशी झाली, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाने ते इतके प्रभावित झाले, की आपलं शिक्षण सोडून त्यांनी नेताजींसोबत आझाद हिंद सेनेच्या निर्माणात भाग घेण्याचं नक्की केलं.  

आबिद हसन नेताजींसोबत त्यांच्या जर्मनीमधील वास्तव्यात कायम सोबत राहिले. नेताजींसाठी त्यांनी दुभाषी म्हणून काम केलं. नेताजींनी त्यांना आपलं वैयक्तिक सचिव बनवलं. आझाद हिंद सेनेची स्थापना होत होती, पण एक पेच नेताजींसमोर होता तो म्हणजे आपल्या सेनेची घोषणा काय असावी. आझाद हिंद सेनेमध्ये सर्व धर्मांचे, जातींचे लोक होते, त्यामुळे सर्वांना आवडेल आणि कोणत्याही धर्माला दुजाभाव दिला जाणार नाही, अशी एक घोषणा असावी ज्यामुळे सैनिकांना स्फुरण चढेल, तसेच आपल्या धर्मातून एकमेकांचं स्वागत करण्यापेक्षा, ही घोषणा त्यांचं सर्वांचं ब्रीदवाक्य असेल, अशी घोषणा नेताजींना हवी होती. त्याचवेळी आबिद हसन सॅफ्रॉनीनी जे दोन शब्द सुचवले, ज्याला १९४१ मध्ये आझाद हिंद सेनेची घोषणा, आणि स्वातंत्र्यानंतर भारताचं घोषवाक्य म्हणून स्वीकारण्यात आलं, ते दोन शब्द म्हणजे, 

'जय हिंद!!!'

१९४२ साली आबिद हसन सॅफ्रॉनी यांनी नेताजींसोबत एक ऐतिहासिक यात्रा केली, ज्याचं महत्व इतिहासाच्या पानात लुप्त झालेलं आहे. ती यात्रा म्हणजे नेताजींनी जर्मनी ते टोकियो, जपान इकडे जर्मन पाणबुडीतून (Unterseeboot 180) मधून केलेला प्रवास. हा प्रवास इतिहासाला एक वेगळं वळण देणारा ठरला. जपान मध्ये पोहोचताच नेताजींनी आझाद हिंद सेनेची सूत्रे आपल्या हातात घेतली, आणि पुढे जे झालं तो इतिहास आहे. आझाद हिंद सेनेचा ध्वज काय असावा यात भारतीय लोकांमध्ये रंगावरून मतभेद होते. हिंदू सैनिकांना भगवा रंग हवा होता तर मुस्लिम सैनिकांना हिरवा. या पेचातून तोडगा काढताना हिंदू सैनिकांनी ध्वज भगव्या रंगाचा असावा ही आपली अट मागे घेतली. त्यांच्या या दानशूरपणाला कुर्निसात करताना आबिद हसन यांनी आपल्या नावापुढे 'सॅफ्रॉनी' जोडलं(इंग्रजी मध्ये भगव्या रंगाला सॅफ्रॉन म्हणतात). आबिद हसन सॅफ्रॉनी यांनी मुमताज हुसेन आणि जे.आर.भोसले यांच्यासोबत आझाद हिंद सेनेच्या राष्ट्रगीताला  बांगला भाषेतून हिंदीमध्ये अनुवादित केलं. 

"शुभ सुख चैन की बरखा बरसे, भारत भाग है जागा
पंजाब, सिन्ध, गुजरात, मराठा, द्राविड़ उत्कल बंगा
चंचल सागर, विन्ध्य, हिमालय, नीला जमुना गंगा
तेरे नित गुण गाएँ, तुझसे जीवन पाएँ
हर तन पाए आशा।
सूरज बन कर जग पर चमके, भारत नाम सुभागा,
जए हो! जए हो! जए हो! जए जए जए जए हो!॥"

 १९४५ च्या त्या दुर्दैवी प्रवासात नेताजींच्या सोबत आबिद हसन सॅफ्रॉनीही असणार होते, पण शेवटच्या क्षणी काही कामामुळे त्यांनी हा प्रवास केला नाही. नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांना लगेच देशविघातक कारवायांसाठी अटक केली गेली. त्यांच्यावर खटला भरला गेला. १९४७ साली त्यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यावर वाणिज्य राजदूत म्हणून त्यांनी अनेक देशांमध्ये काम पाहिलं. १९६९ साली आपल्या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी एक शांत आयुष्य हैद्राबाद इकडे व्यतीत केलं. ५ एप्रिल १९८४ ला आबिद हसन सॅफ्रॉनी हे पंचतत्वात विलीन झाले. 

स्वतंत्र्य भारतात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद सेनेचं महत्व हे मुद्दामहून कमी लेखलं गेलं. पण आझाद हिंद सेनेमुळे, हिंदुस्थानला  आपण शक्ती आणि सैन्याच्या जोरावर जास्त काळ पारतंत्र्यात ठेवू शकत नाही, याची जाणीव ब्रिटिशांना झाली, हा इतिहास आहे. नेताजींच्या अनेक निर्णयांमध्ये आबिद हसन सॅफ्रॉनी यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग राहिलेला होता. नेताजींना इतकं जवळून ओळखणारे हे हिरो स्वतंत्र भारतात कायम दुर्लक्षित ठेवले गेले. आज त्यांनी दिलेल्या दोन शब्दांना बोलताना देशप्रेमाचे स्फुरण चढते, रक्त सळसळते पण खेदाने त्या शब्दांना जन्म देणारे हे हिरो मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झाले आहेत. आबिद हसन सॅफ्रॉनी यांच्या स्मृतीस माझं वंदन आणि त्यांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल, बेटर इंडिया 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment:

  1. इतिहासात हरवलेली पाने प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete