Saturday, 7 November 2020

पाकिस्तान ला हादरवणार फॉक्सबॅट... विनीत वर्तक ©

पाकिस्तान ला हादरवणार फॉक्सबॅट... विनीत वर्तक ©

भारतीय सैन्याच्या शौर्याच्या इतिहासात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य जनतेच्या समोर येत नाहीत. भारतीय हवाई दलाच्या फक्त एका लढाऊ विमानाने संपुर्ण पाकिस्तान ला हादरवलं होत आणि त्यांना अमेरीकेकडून मिळालेल्या नवीन एफ १६ नी सर्व शक्ती पणाला लावून पण भारताच्या एका लढाऊ विमानाला ते पकडू शकले नव्हते. भारताची हवेतील ताकद काय आहे हे त्या दिवशी पाकिस्तान कळून चुकलं होतं. २७ मे १९९७ च्या दिवशी इस्लामाबाद, पाकिस्तान च्या आकाशात एक बॉम्बस्फोटा सारखा आवाज झाला. संपुर्ण इस्लामाबाद त्या आवाजाने हादरून गेलं. इस्लामाबाद च्या रस्त्यावर लोक घाबरून उतरले. तो आवाज केला होता भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाने ज्याचं नाव होतं 'फॉक्सबॅट'. 

२७ मे १९९७ ह्या दिवशी फॉक्सबॅट म्हणजेच मिग २५ आर ह्या विमानाने दिवसाढवळ्या इस्लामाबाद, पाकिस्तान च्या आकाशात जाणूनबुजून सॉनिक बूम निर्माण केली. सॉनिक बूम ही एक शॉक व्हेव आहे. एखादी गोष्ट जेव्हा ध्वनी पेक्षा जास्त वेगाने हवेतून प्रवास करते तेव्हा निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी एकमेकांवर आपटून ध्वनी ची ऊर्जा आवाजाच्या रूपाने बाहेर पडते. हा आवाज कानठळ्या बसवणारा एखाद्या स्फोटासारखा असतो. पाकिस्तान च्या आकाशात भारताच्या 'फॉक्सबॅट' ने जाणून बुजून ध्वनी ची रेषा ओलांडली आणि पाकिस्तान ला त्याची जागा दाखवली. ह्या नंतर पाकिस्तानी रडार ने भारतीय विमानाला टिपल्यावर पण पाकिस्तान च्या एकाही लढाऊ विमानाला त्याला पकडणं तर सोडाच पण त्याला साधी भिती पण निर्माण करता आली नाही. भारताच फॉक्सबॅट इस्लामाबाद च्या आकाशात राजा सारखं आपल अस्तित्व दाखवून शांतपणे भारतात बरेली इकडे आपल्या बेस वर परत आलं. पाकिस्तान ची तेव्हा नवीन असलेली एफ १६ सुद्धा हात हलवत सीमेवरून परत गेली होती. 

फॉक्सबॅट (मिग २५ आर) असं एक ब्रह्मास्त्र भारतीय हवाई दलाकडे होत ज्याचं उत्तर देण्याची ताकद जिकडे अमेरीकेकडे नव्हती तिकडे पाकिस्तान काय करणार? फॉक्सबॅट (मिग २५ आर) मध्ये असं काय होतं की ज्याची कल्पना पाकिस्तान सोडाच पण भारतीय हवाई दलातील लोकांना नव्हती. खरे तर अशी कोणती लढाऊ विमान भारतीय वायु दलाचा भाग आहेत हेच एक मोठं गुपित होतं. बरेली इकडे भारतीय वायु दलाचा एखादा बेस आहे हेच त्याकाळी माहित नव्हतं. फॉक्सबॅट (मिग २५ आर) हे रशिया निर्मित लढाऊ विमान सोव्हियत युनियन च्या काळात बनवलं गेलं होतं. अमेरीकेच्या एस आर ७१ (ब्लॅकबर्ड) च उत्तर म्हणजेच फॉक्सबॅट (मिग २५ आर). 

४०,००० किलोग्रॅम (४० टन) उड्डाण करतानाच वजन घेऊन हवेत झेपावणार फॉक्सबॅट हवेत ५० किलोमीटर च अंतर अवघ्या एका मिनिटात कापायचं. बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगात उड्डाण भरताना ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने (३७०० किलोमीटर/ तास) जाण्याची त्याची क्षमता होती. त्याहीपेक्षा महत्वाचं होत ते ज्या उंचीवरून ते उड्डाण भरू शकत होत. जवळपास ७५,००० ते ९०,००० फूट उंचीवरून त्याची उड्डाण भरण्याची क्षमता होती. (एफ १६ जिकडे ४०,००० ते ५०,००० फूट उंचीपर्यंत उड्डाण भरू शकते.). ३ मॅक चा वेग आणि एव्हरेस्ट पेक्षा तिप्पट उंचीवरून उडताना पण त्यावरील १२०० मी. मी. चा कॅमेरा पंजाब आणि काश्मीर मधून उडताना संपुर्ण पाकिस्तान आणि चीन चा तिबेट ह्याचा वेध घेऊ शकत होता. एका भारतीय लढाऊ पायलट ने फॉक्सबॅट बद्दल सांगितलं होत, 

"From the height at which we fly, you can see the entire Himalayan range at one go. No aircraft has ever been able to achieve for us what the Foxbat has".

 ७०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवरून उड्डाण करण म्हणजे जवळजवळ अवकाशातून वेध घेण्यासारखं होत ह्यासाठी ह्या विमानाच सारथ्य करणाऱ्या वैमानिकांना स्पेससूट प्रमाणे वेगळा युनिफॉर्म घालावा लागत होता. भारताने रशियाकडून १० फॉक्सबॅट विकत घेतली होती. जवळपास ४२ वैमानिकांनी ह्याच सारथ्य केलं ज्यांची नाव आजही गुप्त ठेवलेली आहेत. हे सगळे वैमानिक विंग कमांडर ह्या कमीतकमी श्रेणीतील होते तर उड्डाणाचा अतिशय अनुभव आणि त्यांच्या कारकिर्दीत एकही डाग नसणं हे बंधनकारक होतं. ह्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की फॉक्सबॅट च सारथ्य करणारे सर्वोत्तम मधले सर्वोत्तम होते. 

पाकिस्तान ने एफ १६ घेतल्यावर तो भारतावर कुरघोडी केल्याच्या आनंदात असताना भारतीय वायू दलाच्या फॉक्सबॅट ने ७५,००० फुटावरून पाकिस्तान गाठून मुद्दामून सॉनिक बूम तयार केली आणि नुसत्या सॉनिक बूम ने पाकिस्तान ला हादरवून सोडलं होतं. फॉक्सबॅट ने आपलं अस्तित्व दाखवेपर्यंत पाकिस्तान ला त्याची काहीच कल्पना नव्हती. फॉक्सबॅट चा वेग आणि त्याची उंची गाठणं पाकिस्तान च्या एफ १६ ला शक्य नसल्याने त्याला बघण्यापलीकडे पाकिस्तान काही करू शकला नव्हता. असं म्हंटल जाते की कित्येक वेळा फॉक्सबॅट ने अवघ्या काही उड्डाणात संपुर्ण पाकिस्तान चा काना-कोपरा पिंजून काढला होता आणि त्याची छोटीशी कल्पना सुद्धा पाकिस्तान ला कधी आली नव्हती. फॉक्सबॅट चा वेग हे त्याच अस्त्र असलं तरी त्यासाठी एका फेरीत तब्बल २३,००० लिटर इंधन त्याची इंजिन पिऊन टाकत होती. ७० च्या दशकात हेरगिरी करण्यासाठी बनवलं गेलेलं फॉक्सबॅट काळाच्या ओघात त्याचे जुने होणारे भाग आणि देखभालीचा खर्च ह्यामुळे महाग झालं होतं. त्यात ड्रोन तंत्रज्ञानामुळे त्याची गरज कमी झाली होती. २००६ साली भारताने आपल्या ब्रह्मास्त्राला भात्यातून निवृत्त केलं. 

फॉक्सबॅट चा धसका आजही पाकिस्तान विसरू शकलेला नाही. फॉक्सबॅट भारतीय वायू दलाचं एक असं अस्त्र होतं ज्या बद्दल कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती. आज निवृत्ती नंतर फॉक्सबॅट ला आपण दिल्ली इकडे भारतीय हवाई दलाच्या म्युझिअम मध्ये बघु शकतो. आपल्या नुसत्या रौद्र आवाजाने पाकिस्तान ला सळो की पळो करून सोडणाऱ्या फॉक्सबॅट ला माझा कुर्निसात. फॉक्सबॅट च सारथ्य करणाऱ्या त्या सर्व वैमानिकांना माझा साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल, इंडियन एअर फोर्स. 

माहिती स्रोत:- गुगल, बेटर इंडिया, इंडियन एअर फोर्स

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




No comments:

Post a Comment