Wednesday, 4 November 2020

बिडेन की ट्रम्प... विनीत वर्तक ©

 बिडेन की ट्रम्प... विनीत वर्तक ©

अमेरीका मध्ये सध्या चालू असलेल्या निवडणुकी मध्ये कोण विजयी होतं ह्याची उत्सुकता भारतात खुप जास्ती प्रमाणात ताणली गेली आहे. आज सगळ्याच टी.व्ही. चॅनेल मध्ये ह्याच बातम्या सुरु आहेत. खरे तर अमेरीकेत कोण विजयी होत अथवा पराभूत होत ह्याचा काही परीणाम सामान्य भारतीय माणसाच्या आयुष्यात काहीच होणार नाही. खरे तर भारत आणि अमेरीका संबंधात ही त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल असं चित्र सध्या तरी नाही. बिडेन जिंकोत अथवा तात्या ट्रम्प भारत आणि अमेरीका संबंध येत्या काळात दृढ होणार आहेत ही काळाची गरज आहे. 

बिडेन आणि ट्रम्प ह्या दोघांसाठी अमेरीकेचे हितसंबंध सगळ्यात जास्ती महत्वाचे आहेत. अमेरीकेचा कुठे फायदा तिकडे हे दोघेही आपलं वजन वापरणार हे सर्वश्रुत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अमेरीकन आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. चीन चा सर्वच क्षेत्रातील वाढता प्रभाव अमेरीकेसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे चीन ला मागे खेचण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे दोघेही करणार आहेत. कोरोना आणि लडाख च्या प्राश्वभूमीवर भारत ह्या लढाईत निर्णायक भुमिकेत असल्यामुळे अमेरीकेच्या दृष्टीने भारताशी सर्वच संबंध चांगले आणि घट्ट ठेवावे लागणार आहेत. भारत हा चीन वर अंकुश ठेवण्यात महत्वाचा साथी आहे हे अमेरीकेला चांगल माहीत आहे. फरक इतकाच की ट्रम्प ह्यांची भुमिका एकला चालो रे अशी होती तर बिडेन ह्यांची भुमिका थोडी मवाळ म्हणजेच सबका साथ अशी असेल. 

ट्रम्प आणि आपले पंतप्रधान ह्यांचे संबंध चांगले असले तरी देशाच्या राजकारणाचा विचार करताना ह्या गोष्टींचा इतका प्रभाव पडत नाही. ट्रम्प हे जितके चांगले वाटतात तितकेच बेभरवशाचे राहीले आहेत. अनेकदा त्यांच्या भुमिका ह्या गोंधळवून टाकणाऱ्या राहिल्या आहेत. अमेरीका फर्स्ट सांगताना त्यांनी भारताच्या उत्पादन आणि आयतीवर टीका केली आहे. पण त्याचवेळी काश्मीर प्रश्नी त्यांनी उघडपणे भारताची भूमिका घेतली आहे आणि भारताविरुद्ध काहीही टिका करण्यापासून लांब राहिले आहेत. पण त्यांची ही भुमिका आश्वासक वाटली तरी ती निर्णायक असेल ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. ह्याचवेळी बिडेन ह्यांची भुमिका भारताविरुद्ध अशी थोडी राहिली आहे. काश्मीर मधली गळचेपी आणि तिथल्या लोकांचे अधिकार ह्याबद्दल त्यांनी भारताला आवडणार नाहीत अशी वक्तव्य केली आहेत. पण जेव्हा अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बनून आपली भूमिका मांडतील तेव्हा मात्र त्यांना भारत दुखावला जाणार नाही ह्याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. 

आर्थिक बाजुवर कोणीही आलं तरी फारसं भारतासाठी काही बदलणार नाही. जागतिक मंचावर बिडेन जर राष्ट्रपती झाले तर पुन्हा एकदा क्लायमेट एग्रीमेंट मध्ये अमेरीका पुन्हा एकदा समाविष्ट होऊ शकते आणि भारताला त्या क्षेत्रात मदत मिळण्याच्या शक्यता आहेत. तात्या ट्रम्प हे लहरी खटल आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. त्या विरुद्ध बिडेन ह्यांची भुमिका सर्वसमावेशक आणि निर्णायक असेल. ट्रम्प नि ज्या पद्धतीने कोरोना परीस्थिती अमेरीकेत हाताळली त्या विरुद्ध अमेरीकेन जनतेत असंतोष आहे. त्याच प्रमाणे अमेरीकेन कृष्णवर्णीय लोकांमध्ये त्यांच्या विरुद्ध असंतोष आहे. त्यामुळे बिडेन ह्यांना पसंती मिळत असली तरी चीन विरुद्ध आणि अमेरीका फर्स्ट ही ट्रम्प ह्यांची भुमिका अमेरीकन जनतेच्या पसंतीला उतरली आहे. 

तात्या ट्रम्प हरले आणि बिडेन जिंकले तर भारताच्या मोदींना काही प्रमाणात शह मिळेल अशी भोळी आशा काही जणांना वाटत आहे. पण इकडे एक आपण विसरत आहोत की भारताची किंबहुना मोदींची डिप्लोमसी ओबामांच्या वेळी ही स्पेशल होती आणि तात्या ट्रम्प सोबत ही स्पेशल आहे आणि उद्या जर बिडेन आले तर त्यांच्या सोबत पण अशी बघायला मिळाली तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. कारण ही स्पेशल डिप्लोमसी त्या पदासाठी असते हे आपण समजून घेतले पाहिजे. कोणी भारतात जर ट्रम्प हरावेत म्हणून देव बुडवून बसले असतील तर त्यांना जागतिक राजकारण समजून घ्यायची खूप गरज आहे. 

तात्या ट्रम्प येवोत अथवा बिडेन येवोत भारतासाठी अमेरीका आणि अमेरीकेसाठी भारत हे महत्वाचे आहेत आणि येत्या काळात महत्वाचे राहणार आहेत. त्यामुळे कोणीही आलं तरी भारताचा विचार आपण भारतीय म्हणून करायला हवा. आजवर स्वतःची भारतीय ओळख लपवून ठेवणाऱ्या कमला हॅरिस जेव्हा निवडणुकीत भारतीय वंशाचे असल्याचा डंका वाजवतात त्याचप्रमाणे भारताने ही आपला फायदा कुठे आहे हे बघून आपली मैत्री तितकीच वाढवावी ही काळाची गरज आहे. एकूणच काय बिडेन अथवा ट्रम्प भारताला आणि भारतीयांना त्याने जास्ती काही फरक पडणार नाही. 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment