खारे वारे मतलई वारे (भाग ४)... विनीत वर्तक ©
काही आठवड्यापूर्वी भारताचे सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांनी नेपाळ ला भेट दिली होती. भारत- चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अनेक दृष्टीने महत्वाची होती. नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेने तसेच नेपाळ ने आपल्या नकाशात केलेल्या बदलांमुळे भारत- नेपाळ संघर्ष ताणले गेले होते. लिंपियाधुरा, कालापानी, लिपूलेख सारखा प्रदेश नेपाळ ने आपल्या भागाचा हिस्सा दाखवला होता ज्याला भारताने अधिकृतरीत्या आक्षेप घेतला होता. अजून ह्या गोष्टीवर तोडगा निघालेला नाही. पण अश्या परिस्थितीचा फायदा चीन ने घेतला नसेल तर नवलच. 'दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है' असं म्हणत चीन ने नेपाळच्या राजकारणावर आपली पकड घट्ट करण्याची तयारी केली.
चीन चा नेपाळ मधील वाढता हस्तक्षेप भारतासाठी एक धोक्याची घंटा होती. नेपाळच्या राजकारण्यानी काय पावलं उचलावी ह्यावर भारत अंकुश ठेवू शकत नाही पण भारताने काय करावं ज्याने ह्या गोष्टी बदलल्या जातील ते करण्याची चाल भारत यशस्वीरीत्या खेळला. चीन ची नेपाळ सरहद्दीवर असलेली अरेरावी खुद्द नेपाळ मधील लोकांना नको आहे. त्यामुळेच नेपाळ मधील लोक आजही भारतासोबतच्या संबंधांना जास्ती महत्व देतात. १९४७ साली भारत, नेपाळ आणि ब्रिटिश सरकार ह्यांच्या मध्ये एक करार झाला होता. त्या करारा नुसार तत्कालीन ब्रिटिश सैन्यात असलेल्या ११ गोरखा रेजिमेंट पैकी ७ रेजिमेंट ह्या भारतीय सैन्याचा भाग झाल्या होत्या तर उरलेल्या ४ रेजिमेंट नी ब्रिटिश सैन्याचा भाग राहणं स्वीकारलं होतं. त्यामुळेच नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे ज्यांचे सैनिक भारतीय सेनेचा भाग आहेत. भारतासाठी आजवर आपल्या जीवाचं बलिदान करत आलेले आहेत.
आज ह्या ७ रेजिमेंट मध्ये ४०,००० गोरखा सैनिक भारताच्या रक्षणासाठी सदैव तयार आहेत. गोरखा रेजिमेंट भारतीय सेनेतील अतिशय नावाजलेली रेजिमेंट आहे. ह्या रेजिमेंट ला आत्तापर्यंत २ वेळा परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. ह्याशिवाय गोरखा रेजिमेंट च्या अनेक अधिकाऱ्यांकडे भारतीय सेनेचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा, चीफ जनरल दलबीर सुहाग ह्यांच्यासह भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत हे ह्याच रेजिमेंट मधून आलेले आहेत. गोरखा आपल्या पराक्रमासाठी जगात नावाजलेले आहेत. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा ह्यांच अतिशय गाजलेलं वाक्य,
"If anyone tells you he is never afraid, he is a liar or he is a Gurkha.”
गोरखा च्या पराक्रमाची साक्ष आजही देते.
१९५० पासून भारत आणि नेपाळ ह्यांच्यामध्ये मानद पद एकमेकांच्या सैन्य प्रमुखांना देण्याची प्रथा आहे. अर्थात हा मान कधी द्यायचा हे दोन देशांच्या त्यावेळच्या संबंधावरून ठरवलं जाते. सर्वात प्रथम हा मान भारताचे त्या काळचे सैन्य प्रमुख के.एम.करीअप्पा ह्यांना देण्यात आला होता. नेपाळ च्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी ह्यांनी हा मान भारताचे तत्कालीन सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांना देत असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी भारताचे सैन्य प्रमुख हे नेपाळ ला गेले होते. पण हा मान नावापुरता नाही तर ह्या सोबत नेपाळी सेनेचं नेतृत्व आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेचा ही जनरल नरवणे हे भाग असणार आहेत. चीन साठी ही बातमी चेक मेट सारखी समजली जात आहे. कारण हा सन्मान देण्याच्या आगोदर पंतप्रधान ओली ह्यांनी आपल्या देशाचे संरक्षण प्रमुख इश्वर पोखरलाल ह्यांची त्या पदावरून उचलबांगडी करत त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. जनरल नरवणे हे नेपाळ ला जाण्याच्या २४ तास अगोदर रॉ Research and Analysis Wing (R&AW) चे प्रमुख सामंत कुमार गोयल हे काठमांडू ला भेट देऊन आले होते.
नेपाळ सरकारचा हा निर्णय अश्या वेळी आलेला होता ज्यावेळी भारत आणि नेपाळ ह्यांचे संबंध खूप ताणले गेलेले होते. अश्या वेळी भारतीय सेनाप्रमुखांना काठमांडू इकडे मानद पद देण्याचा कार्यक्रम होणं हे भारताने चीन च्या नाकावर टिच्चून आपण आपल्या गल्ली चा राजा आहोत हे दाखवणं होतं. भारतातल्या मिडियाने ह्या गोष्टीची दखल नेहमीप्रमाणे घेतली नाही. एखादा पुरस्कार सोहळा असावा अशी ही गोष्ट दाखवण्यात आली पण ही गोष्ट घडवण्यामागे ज्या चाली खेळल्या गेल्या आहेत त्याने चीन तोंडावर आपटला आहे. जनरल नरवणे ह्यांच्या नेपाळ दौऱ्याने दोन्ही देशातील थंड पडलेल्या संबंधांना पुन्हा एकदा संजीवनी दिली आहे. अर्थात ह्याचे परीणाम काय होतील ते येत्या काळात स्पष्ट दिसून येतीलच. तूर्तास भारताचे सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ह्यांच ह्या मानद पदासाठी अभिनंदन.
फोटो स्त्रोत:- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment