Saturday, 21 November 2020

एका गावाची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका गावाची गोष्ट... विनीत वर्तक ©

भारतात सध्या ४ जी चा जमाना आहे पण ह्या ४ जी च्या काळात ही भारतात असं एक गाव आहे जिकडे आजही फक्त पी.सी.ओ. संवाद साधला जाऊ शकतो. आजही ३ रुपये/ मिनिट ह्या दराने फोन लावावा लागतो. जिकडे मोबाईल २ जी, ४ जी वगैरे सगळं कोसो लांब आहे. जिकडे एका मिठाच्या पॅकेट ची किंमत २५० रुपये आहे तर एक किलो साखरेसाठी २०० रुपये मोजावे लागतात तर एक सिमेंट ची गोण तब्बल ७००० रुपयांना मिळते. ह्या गावात एकच सरकारी शाळा आहे जिकडे शिक्षक येणं हेच मुलांसाठी मोठी गोष्ट असते आणि १० ची परीक्षा देण्यासाठी तब्बल ९ दिवस ट्रेक करून डोंगर पार करावे लागतात. तेव्हा कुठे विद्यार्थी परीक्षेच्या ठिकाणी पोहचू शकतो. ह्या गावातल्या लोकांना एखाद वाहन अथवा चित्रपटगृह किंवा ट्युबलाईट बघण्यासाठी १५० किलोमीटर च अंतर कापावं लागते. आज २०२० मध्ये सगळ्या सुविधा आपल्या पायाशी उभ्या आहेत तर तिकडे साधारण आयुष्य जगण्यासाठी भारतातल्या एका गावाला संघर्ष करावा लागतो आहे. ह्या गावात राहणाऱ्या लोकांनी त्याची निवड नाही केली तर ते स्विकारलं आहे भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी. वाचून आश्चर्य वाटेल पण ह्या गावात राहणाऱ्या २०० कुटुंबीयांनी इकडे स्थलांतर केलं ते भारत सरकारच्या आदेशावरून. २७ नोव्हेंबर १९६१ ला इकडे भारतीय सेनेने तिरंगा फडकावला होता आणि त्या दिवसापासून ते आजतागायत हे गाव भारताचा अविभाज्य अंग आहे ते त्या २०० कुटुंबियांमुळे ज्यांनी सगळ्या विपरीत परीस्थितीत ह्या भागात आपलं आयुष्य काढलं. 

१९६१ च्या काळात जेव्हा भारतीय सेनेच्या आसाम रायफल ने भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशावर आपली मोहीम फत्ते केली तेव्हा आसाम रायफल चे माजी अधिकारी मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांना एक असा प्रदेश दृष्टीक्षेपात आला ज्याचं महत्व भारताच्या सिमेच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. ह्या प्रदेशात फक्त जंगल होतं, इथे कोणतीही मनुष्यवस्ती नव्हती. ह्या भूभागाच्या तिन्ही बाजूने भारताला एका देशाने वेढलेलं होतं तो म्हणजे म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा बर्मा). भारताचा हा प्रदेश जर सुरक्षित ठेवायचा असेल आणि हा भारताचा भूभाग आहे हे जागतिक मंचावर सिद्ध करायचं असेल तर तिकडे भारतीय लोकांची वस्ती दाखवणं हे अतिशय गरजेचं होत. मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांनी भविष्यातला धोका ओळखताना अतिशय चातुर्याने एक पाऊल उचललं ज्याचा फायदा भारताला आजतागायत होतो आहे. भारताच्या आसाम रायफल च्या २०० सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मेजर जनरल ए. एस. गौर्या ह्यांनी इकडे वस्ती करण्यासाठी आदेश दिला. ह्या नवीन वस्तीच नाव त्यांनी आपल्या मुलाच्या 'विजय' ह्या नावावरून ठेवताना भारताच्या नकाशावर एका नवीन गावाचा उदय झाला 'विजयनगर'.

भारताच्या अरुणाचल प्रदेश मध्ये विजयनगर वसलेलं आहे. निसर्गचा वरदहस्त लाभलेल्या हे गाव भारतासाठी खूप महत्वाचं आहे. ह्या गावात रस्ते नाहीत जवळच गाव हे म्यानमार मधील पुटाओ हे ४० किलोमीटरवर आहे तर भारतातील रस्ते असलेलं मिओ हे जिल्ह्याचं ठिकाण १५७ किलोमीटर लांब आहे. विजयनगर ला जायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे भारतीय हवाई दल. रस्ते नसलेल्या ह्या गावात भारतीय वायु दलाची धावपट्टी आहे. Advanced Landing Ground (ALG) ही इकडे येण्याचा एकमेव मार्ग आहे. इकडे येणारं प्रत्येक सामान हे भारतीय वायु दलाच्या हेलिकॉप्टर किंवा कुलीन मार्फत आणलं जाते. ९ दिवसांच ट्रेकिंग केल्याशिवाय इकडे येण्याचा मार्ग नाही म्हणून इकडे येणारी प्रत्येक वस्तूची किंमत ही जवळपास ३ ते ४ पट आहे. इकडे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ह्याच दिव्यातून पुढे जावं लागत आहे. 

समुद्रसपाटीपासून जवळपास ५००० फूट उंचीवर वसलेलं विजयनगर हे भारताचं अविभाज्य अंग आहे. पण आज त्या अंगाला भारताशी नाळेप्रमाणे जोडून ठेवणारी ती २०० कुटुंब आणि त्यांच्या पिढ्या आजही सर्वसामान्य सुविधांपासून वंचित आहेत. आज भारताच्या स्वातंत्र्याला जवळपास ७३ वर्ष झाली. ह्या ७३ वर्षात अनेक सरकार बदलली पण विजयनगर मात्र आजही त्याच सुविधांच्या अपेक्षेत आस धरून बसलं आहे. इथल्या लोकांकडे भारतीय पासपोर्ट आहे. भारतीय नागरीकत्व आहे. त्याच जोरावर आज तिन्ही बाजूने म्यानमार ने वेढलेला भाग भारताचं अस्तित्व राखून आहे पण अश्या अतिशय महत्वाच्या प्रदेशाकडे गेल्या ७० वर्षात ना कोणत्या राज्यकर्त्याचे लक्ष गेलं न इकडे काही विकास झाला. 

भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इकडे बदललेल्या वाऱ्यांच अस्तित्व जाणवायला लागलं आहे. भारताने गेल्या काही वर्षात आपल्या अतिपूर्वेकडील राज्यांकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. इकडे दळवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे  Arunachal Pradesh Frontier Highway जवळपास २००० किलोमीटर लांब आणि ४०,००० कोटी रुपये किंमत असलेला हा रस्ता अरुणाचल प्रदेश सोबत विजयनगर इथल्या लोकांच्या अंधारमय आयुष्यात एक सोनेरी पहाट बनेल अशी आशा इथली लोक बाळगून आहेत. विजयनगर वर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. नांदाफा नॅशनल पार्क ला खेटून विजयनगर वसलेलं आहे. ( Namdapha National Park is a 1,985 km2 (766 sq mi) large protected area in Arunachal Pradesh of Northeast India.) त्यामुळे जर रस्ता झाला तर पर्यटनाच्या दृष्टीने विजयनगर जागतिक पटलावर आपलं नाव उमटवू शकेल. रोजगाराच्या अनेक संधी सैनिकांच्या कुटूंबियांना उपलब्ध होतील. 

भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांना जंगलात नेऊन तब्बल ६० वर्षापेक्षा जास्त काळ वनवास जगणाऱ्या विजयनगरच्या त्या ४४३८ पेक्षा जास्ती भारतीय लोकांना माझा साष्टांग नमस्कार. आज त्यांच्यामुळे विजयनगर भारताचा भाग आहे. आज त्या जंगलाच्या मध्यभागात माझा तिरंगा मोठ्या दिमाखाने झळकतो आहे. त्या सर्वाना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




2 comments:

  1. आपण दिलेली माहिती खुप आवडली.आपल्या वरीष्ठअधिकारी यांची आज्ञा पाळण्याची सैनिकी शिस्त कमालीची आहे.झाल ते झाल, पण आता विजयनगर झपाट्याने आधुनिक करण्याची नितांत गरज आहे.तिथल्या विद्यार्थ्यांना खुप सवलती देऊन त्या गावाला mainstream मधे लवकरात लवकर समाविष्ट करून घेणे हे केंद्र व राज्य सरकारांचे आद्य कर्तव्य आहे.

    ReplyDelete