Monday 8 June 2020

गुरु शिष्याचं नात... विनीत वर्तक ©

गुरु शिष्याचं नात... विनीत वर्तक ©

दोन दिवसापूर्वी माझ्या मेल बॉक्स मध्ये एक अपरीचित मेल धडकला. मेल उघडून आत वाचलं तर तिथल्या तिथे थबकलो. मेल आला होता आजच्या विनीत वर्तक ला ज्यांनी पहिल्यांदा ओळखलं आणि घडवण्यात मोलाची भुमिका बजावली त्या माझ्या आशा ताईचा. प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणतातरी क्षण असतो अथवा अशी कोणतीतरी व्यक्ती जी प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देते. एकेकाळी आयुष्याच्या स्पर्धेत चाचपडणाऱ्या मला आकार देण्यात आशाताई चा वाटा सिंहाचा होता. काठावर जेमतेम पास होणारा विनीत ते मुंगीच अक्षर काढणारा विनीत ह्या मधून मला स्वतःची ओळख आशाताई मधल्या शिक्षिकेने करून दिली. आज ह्या घटनेला २६ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. जगाच्या स्पर्धेत शहर बदलली आणि आमचा संपर्क ही तुटला. दोन दिवसापूर्वी आलेल्या मेलमुळे पुन्हा एकदा तो सगळा काळ डोळ्यासमोरून सरकला. लगेच आशाताई च्या मेल ला मी उत्तर दिलं आणि बोलण्यासाठी माझा नंबर ही दिला.

त्यानंतर आशाताई आणि मी तब्बल तासभर गप्पा केल्या. माझा मेल आय डी कसा शोधला ते तिच्या बकेट लिस्ट मधलं माझं स्थान अश्या सगळ्या गोष्टी ऐकून डोळ्यांच्या कड्या कधी ओल्या झाल्या कळल्या नाहीत. गोष्ट सुरु झाली ती आजच्या विनीत वर्तक ला शोधण्यापासून. तिच्या व्हाट्स अप वर माझ्या नावाने झळकणारे लेख वाचून तिला कुतूहल होतं की नक्की तोच विनीत का?. आजही अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यात व्यस्त असलेली आशा ताई फेसबुक वर नाही. काळाच्या ओघात बदललेल्या नंबरांमुळे संपर्क करण्याचा कोणताच रस्ता दिसत नव्हता. गुगल मदतीला धावून आलं आणि माझा मेल आय डी शोधून एक मेल माझ्या इनबॉक्स मध्ये आल्यावर आमचा संपर्क पुन्हा शक्य झाला. माझ्याशी बोलण्यासाठी पूर्ण गुगल तिने धुडाळलं होतं. माझा आलेला रीप्लाय बघून तिची 'बकेट लिस्ट' मधील एक इच्छा पुर्ण झाल्याचं समाधान तिला मिळालं असल्याचं तिने मला दिलेल्या उत्तरात म्हंटल. आपण कोणाच्या तरी 'बकेट लिस्ट' चा भाग असू शकतो हा विचारच मला निशब्द करून गेला. त्यातही ज्या शिक्षिकेने मला घडवलं त्यांना माझ्याशी संवाद साधण्याचा क्षण परमोच्च आनंदाचा असावा हा अनुभव अविस्मरणीय असा होता.

'तु आजही तितकाच जमिनीवर आहेस आणि तसाच आहेस'. हे तिचे शब्द माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस होतं. मला जे लोकं खूप आधीपासून ओळखतात आणि ज्यांनी माझा प्रवास बघितला आहे. अश्या लोकांपैकी एक म्हणजे आशा ताई. माझ्या लिखाणाची चाहती असल्याचं तिने आवर्जून सांगितलं. बि.ए.आर.सी. मध्ये नोकरीला लागल्यावर तिला खास पुण्याला जाऊन भेटून आलो होतो. त्या भेटीची आठवण तिने आवर्जून आज जवळपास १४-१५ वर्षानंतर लक्षात असल्याचं सांगितलं. ह्या शिवाय माझ्यासाठी एक मोठं सरप्राईज होतं की त्या भेटीची आठवण म्हणून आपल्या स्व कमाईतलं घड्याळ मी तिला दिलं होतं. कोणाकडून कधीच कोणती भेट न स्विकारणाऱ्या आशा ताई ने फक्त माझ्या हट्टापाई ते स्विकारलं होतं त्यातही ते माझ्या स्व कमाई चं होतं म्हणून. आज जवळपास १५ वर्षानंतर ही ७-८ घड्याळ असताना शिकवताना, नव्या पिढीचे विद्यार्थी घडवताना प्रत्येकवेळी तेच घड्याळ आजही माझ्या मनगटावरून वेळ दाखवत असल्याचं तिने मला सांगितलं आणि माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. मी ते घड्याळ विसरून पण गेलो होतो. त्या घड्याळाचा पट्टा तुटला, बॅटरी गेली पण ते सगळं बदलून आजही शिकवताना ते घड्याळ तुझी आठवण करून देतं हे सांगितल्यावर मी निशब्द झालो. पुण्याला आल्यावर घरी येण्याचं आग्रहाचं निमंत्रण तर दिलच पण माझ्या लेखनासाठी माझं खूप कौतुक केलं आणि आशीर्वाद ही दिले. ह्या शिवाय ह्या पुढले प्रत्येक लेख मला आवर्जून पाठव हे सांगण्यास ही ती विसरली नाही.   
     
आयुष्यात येणारे असे अनुभव हेच तर समाधान. लिखाण प्रत्येकाला काय देतं हे ज्याचं त्याने शोधायचं. फेसबुक चे आभासी लाईक, समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा का पैसे. माझ्यासाठी मात्र वाचकांच प्रेम आणि मला येणारे असे अनुभव हे माझं समाधान. आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांकडून मिळणाऱ्या अश्या शब्दातून जे आत्मिक समाधान मिळते त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. गुरु शिष्याचं नातं हे जगातील एक सुंदर नातं असते. जेव्हा आपल्याला घडवणारा शिक्षक समाधानाने आपली प्रगती बघतो आणि आपल्या प्रगतीच मूल्यमापन करतो तेव्हा त्यातून मिळणारं समाधान, प्रेम हे शब्दांपलीकडचं असते. मला घडवण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या आणि आजही मला आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या आशा ताईला माझा साष्टांग नमस्कार. आपलं गुरु शिष्याचं हे नातं नेहमीच मला आयुष्यात पुढे देण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन देत राहील. 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

2 comments:

  1. विनितजी अप्रतिम लेख !! 👍👍👍
    मनःपूर्वक नमस्कार !

    ReplyDelete