Monday 1 June 2020

सहानभूती चे अश्रू... विनीत वर्तक ©

सहानभूती चे अश्रू... विनीत वर्तक ©

काल कोणत्यातरी संगीतकाराचे कोरोनामुळे निधन झालं. कोरोना च्या ह्या लढाईत अजून एक निष्पाप जीव गेला. एक दुःखद घटना नक्कीच पण ज्या पद्धतीने कालपासून सहानुभूतीचे अश्रू सगळीकडे बघायला मिळाले ते बघून नक्कीच मनात काही प्रश्न उभे राहिले. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच एक दुःखद घटना असते. जेव्हा ती व्यक्ती जनमानसात प्रसिद्ध असते तेव्हा त्या दुःखाचा आवाका मोठा असतो. पण ह्या दुःखाच अवडंबर करण्याचा एक ट्रेंड सोशल मिडीया च्या माध्यमातून सुरु झालेला आहे. गेल्या काही घटनांमधून तो अधिकच ठळकपणे पुढे आला आहे. कालच्या घटनेने पुन्हा त्याचीच पुनुरावृत्ती होते आहे असच मनोमन वाटून गेलं.

मध्यंतरी चित्रपट सृष्टीतील दोन ताऱ्यांचे एका पाठोपाठ एक असं निधन झालं. चित्रपटसृष्टी सोबत सामान्य नागरिक सुद्धा ह्या घटनेने हळहळले. दोन्ही कलाकारांची एक कलाकार आणि एक माणूस म्हणून उंची नक्कीच खूप मोठी होती. त्यामुळेच त्यांची एक्झिट सगळ्यांना चटका लावून गेली. दुःख शब्दातून आणि कृतीतून व्यक्त करणं हे नक्कीच समर्थनीय पण आज काल त्याची जाहिरात केली जाते. फेसबुक किंवा इतर सोशल मिडिया मधील अश्या अनेक पोस्ट आणि ट्विट होते जे वाचून नक्की दुःख झालं आहे की दुःख दाखवण्याचा एक खटाटोप चालू आहे असा प्रश्न मनात आला. कलाकारांची एक्झिट नक्कीच त्यांच्या आठवणी जाग्या करणारी पण त्यांच्या आठवणीने आता जेवणच गोड लागत नाही ते मन कशातच रमत नाही ते सकाळ आणि रात्र त्यांच्याच विचारात गुंतलेले आहोत. त्यांच्या जाण्याने आयुष्य कसं निरस झालं ते आयुष्याचे रंगच संपले वगैरे आशयाच्या अनेक पोस्ट आणि लोकांच्या प्रतिक्रिया वाचून काय व्यक्त व्हावं हे कळत नव्हतं.

त्यांच्या जाण्या आगोदर त्या कलाकारांची तब्येत कशी आहे? त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे? किंवा एकूणच त्यांच्याविषयी एक काडीचीही कल्पना नसणारे आणि त्यांच्या जाण्यामुळे स्वतःच्या आयुष्यात एक काडीचाही फरक न पडणारे असे सहानुभूतीचे अश्रू ढाळत होते की त्यांच्या घरातला आणि कुटुंबातला कोणत्यातरी आपल्या माणसाची एक्झिट झाली आहे. वाईट वाटणं, दुःख वाटणं अगदी योग्य पण त्या दुःखाचं अवडंबर करण? हे कितपत योग्य ह्याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. सहानुभूतीचे अश्रू जगासमोर मांडून त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा मोठी करण्याची रेस सध्या सुरु आहे. कोणीही जनमानसातील प्रसिद्ध व्यक्तीची एक्झिट झाली की हेच लोकं मोठ्या मोठ्या शब्दांनी असं काही लिहतात की वाटावं आता ह्यांच कसं होणार? पण खरच त्याची गरज आहे का? हे अश्रू जर खरेच असतील तर मग ते इतरांसाठी का येत नाही?

सिमेवर आज प्रत्येक दिवशी एक सैनिक आपल्या मातृभूमीच रक्षण करताना आपल्या जिवाचं बलिदान तुमच्या, आमच्या प्रत्येकासाठी देतो आहे. आज प्रत्येक डॉक्टर, नर्स, मेडीकल स्टाफ आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचं, आमचं रक्षण करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र एक करत आहे. आज पोलीस, निमलष्करी दल, एन.डी.आर.एफ, सी. आर. पी. एफ., सी. आय. एस. एफ.  ह्यांचे योद्धे आपलं जीवन सुखकर व्हावं म्हणून झटत आहेत. हे सगळं आपल्यासाठी करताना स्वतःच्या जीवाचं बलिदान करत आहेत. त्या बलिदानासाठी मात्र आपल्या अश्रूंना वेळ मिळत नाही. त्या बलिदानासाठी मात्र सहानुभूतीचे शब्द आपल्या कडून ना कोणत्या सोशल मिडियावर निघतात किंवा ना त्याची जाणीव आपल्याला होते. पण कोण कुठचा एखाद्या गाण्याच्या संगीतकाराची एक्झिट मात्र आपल्या मनाला चटका लावून जाते की त्याने आपल्या आयुष्याचे रंग फिके पडावे?

कोणाच्या जाण्याने वाईट वाटणं किंवा दुःख होणं हे साहजिक पण ते सिलेक्टिव्ह का? जसं दुःख आपल्याला एखाद्या कलाकारा बद्दल होतं तसं एखाद्या सैनिकाबद्दल, पोलिसांबद्दल, डॉक्टर बद्दल का होतं नाही? एखाद्या कलाकाराच्या जाण्याने आयुष्यात पोकळी नक्कीच निर्माण होतं असेल तर आयुष्य वाचवणारे आपले शिलेदार धारातीर्थी पडल्यावर आपल्या आयुष्यात खड्डा पडायला हवा पण तसं होतं नाही. सिमेवर शहीद झालेल्या एका सैनिकासाठी कधी आयुष्यातले रंग उडाले अशी पोस्ट वाचली आहे का? एखाद्या कोरोना अथवा सामान्य आयुष्यात आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या पोलीस, डॉक्टरसाठी आता आयुष्यातला आनंद संपला काहीच गोड लागत नाही. अशी पोस्ट अथवा ट्विट कधीच ना समोर येते ना ते व्हायरल होते.

आपले अश्रू सुद्धा आता सिलेक्टिव्ह झाले आहेत. ते येतात, वाईट वाटते पण फक्त काही लोकांसाठी. कारण आमच्या कल्पना आणि विचारांची पातळी एवढी खाली गेली आहे की आमच्या दुःखातून सुद्धा आम्हाला प्रसिद्धी हवी आहे. ती सुद्धा आभासी. जो जेवढं जास्ती दुःखाचं अवडंबर माजवेल तेवढे जास्ती लाईक आणि तेवढं जास्त शेअर झालं की आमचे सहानुभूतीचे अश्रू अजून मोठे होतात. कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोणाच्या जाण्याने दुःख होणं आणि वाईट वाटणं हे सुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न पण त्या सहानुभूतीच्या दुःखातून आभासी प्रसिद्धी मिळवणं हा प्रकार मात्र मला पडलेला एक मोठा प्रश्न आहे. ज्याची उत्तर माझ्याकडे नाहीत. आपली वैचारिक बैठक इतक्या खालच्या पातळीला गेली आहे की कोणी काही म्हंटल तरी त्याला ट्रोल करणं, त्यावर अतिशय हलक्या भाषेत कमेंट करणं, त्याच गॉसिपिंग करणं हे संविधानाने दिलेले हक्क आपण मानायला लागलो आहोत. त्यामुळे सहानुभूतीच्या अश्रूंची खरतर आता चीड यायला लागली आहे.

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment