Tuesday, 16 June 2020

जयजयकार... विनीत वर्तक ©

जयजयकार... विनीत वर्तक ©

मराठी चित्रपट सृष्टी आणि हिंदी चित्रपट सृष्टी ह्यातील सगळ्यात मोठी तफावत म्हणजे त्यात असणारा पैसा. एखादा टुकार हिंदी चित्रपटासाठी ५०० रुपये मोजणारे प्रगल्भ प्रेक्षक मराठी चित्रपटासाठी २५० रुपये पण मोजत नाही. हिंदी चित्रपट हे संपूर्ण भारतात कुठेही चालू शकतात पण मराठी चित्रपटांच तसं नसते. एखाद्या विशिष्ठ भाषिक चित्रपटाची ओळख त्या भागापुरती मर्यादित रहाते आणि त्यातही त्या भागातील लोकांनी त्या चित्रपटाला नाकारलं तर चित्रपटाचं गणित कोलमडून पडते. एका विशिष्ठ धाटणीचे चित्रपट मराठीत येतात अशी एक ओरड प्रेक्षकांची आहे. पण जितके वेगळे विषय मराठी चित्रपटात हाताळले जातात तसे क्वचितच हिंदी चित्रपटात बघायला मिळतात. पण आपलं दुर्दैव असं की एकतर मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही आणि मिळाली तरी प्राईम टाइम चे शो मिळत नाही.  अवघ्या एखाद्या आठवड्यात चित्रपट निकालात निघतो. ह्या सगळ्या खेळात एखादा चांगला चित्रपट कधी येतो कधी जातो कळत सुद्धा नाही.

काल अचानक असाच एक नितांत सुंदर चित्रपट बघायला मिळाला. टी. व्ही. आणि माझा ३६ चा आकडा आहे. त्याला मी बघवत नाही आणि मला तो. पण कधी तरी ओझरती भेट होते आणि अश्या वेळी एखादी सुंदर कलाकृती बघायला मिळाली तर एक वेगळच समाधान मिळते. काल 'जयजयकार' नावाचा २०१४ साली येऊन गेलेला एक मराठी चित्रपट बघायला मिळाला. दिलीप प्रभावळकर सारखे कसलेले अभिनेता म्हणजे काहीतरी वेगळं असणार अशी आशा बाळगून चित्रपट बघायला सुरवात केली. माझा अंदाज बरोबर निघाला. सुंदर कथानक आणि त्याला तितक्याच ताकदीच्या अभिनयाची जोड चित्रपटातील कलाकारांकडून मिळाल्यावर कलाकृती सुंदर होणारचं.

तृतीय पंथी लोकांच्या आयुष्यावर भाष्य करणारा इतका चांगला चित्रपट मराठीत किंवा हिंदीत माझ्या बघण्यात नाही. मुळातच समाजाने वाळीत टाकलेले लोकं कश्या पद्धतीने जीवन जगतात आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जर समाजाने प्रयत्न केला तर ते ही समाजात आपल्या कर्तृत्वावर आपलं स्थान निर्माण करू शकतात ह्यावर भाष्य करणारा हा चित्रपट मला खूप आवडला. २०१४ साली जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा ह्याबद्दल कधीच ऐकल्याचे आठवत नाही. इतका चांगला सुंदर चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघण्याची मज्जा खूप वेगळीच असती. असे सुंदर चित्रपट कधी येतात आणि जातात हे कळत नाही. मराठी चित्रपटाने कात टाकावी असं जर सुजाण प्रेक्षकांना वाटत असेल तर अश्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघायला हवेत. असे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था ही निर्माण व्हायला हवी.

जयजयकार सारखे चित्रपट समाजाच्या अश्या काही गोष्टींवर प्रकाश टाकतात ज्याचा विचार करणं पण पांढरपेशा आणि प्रगल्भ, सुशिक्षित समाजात निषिद्ध मानलं जाते. अश्या वेगळ्या विषयांवर अंतर्मुख करणारा चित्रपट आपल्या हातातून निसटला ह्याची खंत मात्र चित्रपट संपता संपता मनाला लागून राहिली. ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम ला माझा सलाम. एक अविस्मरणीय अनुभव माझी आणि टी. व्ही. ची ६३ प्रमाणे काही वेळ का होईना गट्टी करून गेला.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 


No comments:

Post a Comment