Saturday 13 June 2020

ब्रिटिशांना त्यांच्या मातीत हरवणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर)... विनीत वर्तक ©

ब्रिटिशांना त्यांच्या मातीत हरवणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर)... विनीत वर्तक ©

१२ ऑगस्ट १९४८ चा दिवस होता. ब्रिटिशांच्या १५० वर्षाच्या गुलामगिरीतुन मुक्त झालेल्या भारताला आपला पहिला स्वातंत्र्य दिवस अजुन साजरा करायचा होता. एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला दारिद्र्याच्या खाईत लोटून आणि विभाजन करून ब्रिटिश निघून गेले होते. भारत अजून त्यातून सावरत होता. अनेक  स्वातंत्र्य विरांच्या बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. ब्रिटिश साम्रज्या विरुद्ध असलेला असंतोष अजुन सर्व भारतीयांच्या मनात खदखदत होता.  ब्रिटिशांच्या अपमानाचा आणि त्यांच्या अन्यायाचा बदला घेण्याची नामी संधी भारताला ह्या दिवशी चालून आली होती. भारतापासून सातासमुद्रापार ब्रिटिशांच्या घरात, वेम्बली मैदानावर, ब्रिटिशांची राणी एलिझाबेथ च्या समोर ऑलम्पिक च्या महापर्वात ११ वीर उतरले होते. ह्यात २५ वर्षाचा एक तरुण आपली पहिली ऑलम्पिक स्पर्धा खेळत होता. त्याच्या समोर एकच ध्येय होतं ते म्हणजे भारताचा तिरंगा ब्रिटिशांच्या घरात सन्मानाने फडकवायचा.

ऑलम्पिक स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला. पुर्ण स्टेडियम मध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच भारतीय होते. संपुर्ण स्टेडियम ब्रिटिश लोकांनी भरलेलं होतं. ब्रिटिशांची राणी (त्याकाळी राजकन्या असणाऱ्या) एलिझाबेथ आवर्जून उपस्थित होत्या. सगळीकडे ब्रिटिश संघाला प्रोत्साहन असताना त्या आवाजाच्या गर्दीत ते ११ मावळे आपल्या हॉकी स्टिक घेऊन मैदानात लढत होते. त्या २५ वर्षाच्या तरुणाने ब्रिटिशांच्या संघावर आक्रमण केले. आपल्या सुरेख खेळाने त्याने एकट्याने अर्ध्या वेळेपर्यंत ब्रिटिशांच्या विरुद्ध दोन गोल नोंदवले आणि सामन्याचा नुरच पालटला. एका वेळी ब्रिटिश संघाचा जयजयकार वेम्बली मध्ये होतं होता आता त्यातून 'भारत माता की जय' चे नारे दुमदुमयला लागले. सामना संपेपर्यंत भारतीयांनी ब्रिटिशांची त्यांच्या घरात नाचक्की करताना ४-० अश्या फरकाने दणदणीत पराभव केला. ऑलम्पिक च्या इतिहासात भारताने पुन्हा एकदा हॉकीच्या लागोपाठ चौथ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातलं हे पहिलं सुवर्ण पदक होते. भारताच्या विजयात शिल्पकार ठरलेला तो २५ वर्षाचा तरुण होता बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर).

हॉकी च्या स्पर्धेत भारताने ह्या आधीही ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवलेलं होतं पण हा विजय वेगळा होता. ब्रिटिश राणीच्या समोर ब्रिटिशांच्या घरात वेम्बली च्या मधोमध उभं राहून सगळ्या राष्ट्रध्वजाच्या वरती सन्मानाने तिरंगा फडकवताना बघतानाचा क्षण संपूर्ण भारतीयांनसाठी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासारखा होता. त्यामुळेच ह्या विजयाने बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) हे नाव भारताच्या हॉकीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं ते कायमचं. १९५२ च्या हेलसिंकी इथल्या ऑलम्पिक मध्ये ब्रिटिश संघाविरुद्ध असलेल्या उपांत्य सामन्यात बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांनी एकट्यांनी ३ गोल करताना भारताला एक हाती हा सामना जिंकून दिला. तर नेदरलँड विरुद्ध च्या अंतिम सामन्यात एकट्यांनी तब्बल ५ गोल करताना भारताने नेदरलँड्स चा ६-१ असा दणदणीत पराभव करून पुन्हा एकदा हॉकी च्या सुवर्ण पदकावर आपलं नावं कोरलं. बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांचा झंझावात इतका होता की ऑलम्पिक च्या स्पर्धेत भारताने त्या वर्षी नोंदवलेल्या १३ गोल पैकी ९ गोल (जवळपास ७०% गोल) त्यांनी केले होते. ऑलम्पिक हॉकी च्या अंतिम सामन्यात एकट्याने ५ गोल करण्याचा विश्वविक्रम त्यांनी नोंदवला जो आजतागायत कोणालाही मोडता आलेला नाही.

१९५६ च्या मेलबॉर्न ऑलम्पिक मध्ये आपला झंझावात कायम ठेवताना पहिल्या मॅच मध्ये त्यांनी अफगाणिस्थान विरुद्ध ५ गोल गेले. त्या सामन्यात जखमी झाल्याने त्यांना पुढच्या काही सामन्यांसाठी जायबंदी व्हावे लागले. पण पुन्हा एकदा उपांत्य आणि अंतिम सामन्यात त्यांनी उतरताना पाकिस्तान ला अंतिम सामन्यात धूळ चारून पुन्हा एकदा हॉकी च्या सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरण्यात मोलाचा वाटा उचलला. आपल्या हॉकी च्या संपूर्ण करिअर मध्ये त्यांनी ८ ऑलम्पिक मध्ये भाग घेऊन २२ गोल भारतासाठी नोंदवले. त्यांच्या हॉकी च्या योगदानाची दखल भारत सरकारने घेताना त्यांना १९५७ साली पद्मश्री सन्मान दिला. खेळासाठी हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू आणि हॉकीपटू ठरले. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर ही त्यांनी भारतीय हॉकी संघाची प्रशिक्षकाची धुरा सांभाळली. १९७५ ला पाकिस्तान ला धूळ चारत भारताने हॉकीचा वर्ल्ड कप चषक जिंकला त्यात सुद्धा बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांचा प्रशिक्षक म्हणून सिंहाचा वाटा होता.

भारताच नाव आपल्या अप्रतिम खेळाने जगभर नेणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) हे २५ मे २०२० ला वयाच्या ९६ व्या वर्षी अनंतात विलीन झाले आणि हॉकी च्या एका तपाचा अस्त झाला. क्रिकेट च्या नादात भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी मागे पडत गेला आणि भारताला सुवर्ण क्षण देणारे बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) सारखे खेळाडू भारतीयांच्या विस्मरणात गेले. हॉकी ह्या खेळात भारताने जगावर जे अधिराज्य गाजवलं तितकं अधिराज्य भारताला क्रिकेट ह्या सर्वमान्य खेळात ही जमलेलं नाही. क्रिकेट मध्ये पैसा आल्याने त्याच आता जुगारात रूपांतर झालं. खेळणारा झटपट पैसे कमवू लागला आणि देशभक्ती फक्त नावासाठी उरली. पण हॉकी मात्र आजही भारताचा राष्ट्रीय खेळ आहे कारण त्यातून फक्त आणि फक्त देशभक्ती दिसते. एखाद्या रणजी खेळणाऱ्या क्रिकेटरचे विक्रम लक्षात ठेवणाऱ्या भारतीयांना भारताच्या राष्ट्रीय हॉकी टीम मधल्या ११ पैकी २ जणांची जरी नाव सांगता आली तरी ते खूप मोठं असेल. आज हॉकीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि त्याच सोबत खेळाचा दर्जा ही चांगल्या खेळाडू नसल्याने घसरत गेला. पण अजून वेळ गेलेली नाही. क्रिकेट इतकचं महत्व आपण हॉकीला आज दिलं तर कदाचित हॉकी चा सुवर्ण काळ पुन्हा अवतरेल. माझ्या मते बलबीर सिंग डोसांझ (सिनिअर) ह्यांना ती भारतीयांकडून सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. हॉकी ह्या खेळातील सेंटर फॉरवर्ड ह्या जागेवरील सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या खेळाडूला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment